(एपिक चॅनल: धर्मक्षेत्र) कर्ण एपिसोड - भाग १
निमिष सोनार
(सूचना: फेब्रुवारीच्या अंकात माध्यमांतर भाग एक मध्ये आपण द्रौपदी बद्दल वाचले. आता या महिन्यात कर्ण सुरू करत आहे. कर्ण पर्व एपिसोड मोठ्ठा असल्याने क्रमशः देत आहे. हे वाचतांना वाचकाला महाभारता बद्दल प्राथमिक ज्ञान आहे हे गृहीत धरले गेले आहे.)
कृष्ण सुयोधन (दुर्योधन) च्या बाजूला उभा राहून कर्णाच्या चितेला आग देतो. मागे अर्जुन उभा असतो.
नंतर अर्जुन कृष्णाला विचारतो: तुम्ही त्याच्या चितेला आग का दिली?
कृष्ण: कर्ण चांगला व्यक्ती होता जरी तो तुझ्या शत्रू पक्षाकडून लढला. तसे पाहिले तर युधिष्ठिर ने त्याला अग्नी द्यायला हवी होती.
अर्जुन: काय?
कृष्ण: हो. कर्ण कुंतीपुत्र होता. तुझा भाऊ!
{स्क्रीन ब्लॅक. सिन बदल}
मग चित्रगुप्त च्या दरबारात (धर्मक्षेत्र) -
कर्णाला अंगराज आणि सुर्यपूत्र या नावाने संबोधून कोर्टात बोलावण्यात येतं.
कर्ण (आरोपीच्या पिंजऱ्यात): अरे वा, चित्रगुप्त! बरे झाले कुंतिपुत्र नाही म्हणालात ते!
चित्रगुप्त: कुंतीकडून आम्हाला कळलं की तुला कुंतीपूत्र म्हटलेलं चालत नाही.
नंतर ते एका जाड फाईल मधून आरोप वाचतात.
चित्रगुप्त: तुझ्यावर पहिला आरोप. तू जिवंत असेपर्यंत पृथ्वीवर तुझे कोणतेच कर्तव्य नीट पर पाडले नाहीस.
(दुर्योधन ऑब्जेक्शन घेतो. चित्रगुप्त त्याला खाली बसवतात.)
कर्ण या आरोपामुळे गोंधळलेल्या स्थितीत.
चित्रगुप्त: आरोप नीट समजला नसेल तर मी काही उदाहरणे देतो. तुला जेव्हा कळलं की तू राधेय नसून कौंतेय आहेस तेव्हा तू काय केलेस?
कर्णाला फ्लॅशबॅक मध्ये आठवतं जेव्हा कुंती भेटायला आली होती.
{युद्धादरम्यान एका रात्री ची वेळ. कर्णाच्या तंबूत कुंती}
कुंती: आता तुला कळलं की तू माझा पुत्र आहेस. तेव्हा चल आता माझ्यासोबत. तुझ्या भावांसोबत.
कर्ण: नाही. आता वेळ निघून गेली आहे. उशीर झाला आहे. तुम्ही मला ज्यांचेजवळ सोडून गेलात त्यांनी मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुरक्षित ठेवलं. आता तुम्ही म्हणता म्हणून मी त्यांना सोडून देऊ? दुर्योधनासोबत मैत्री आणि त्याचा विश्वास मी नाही तोडू शकत! तुम्ही तुमच्या पुत्रांच्या शत्रूंच्या शिबिरातून जा आता!!
पुन्हा चित्रगुप्त च्या कोर्टात -
चित्रगुप्त: तुला तू कुंतीपूत्र असल्याचे माहीत पडल्यावर सुध्दा तू तुझ्या भावांकडे जायला नाकारलेस? म्हणजे कर्तव्यापासून दूर जाणे नव्हे का?
कर्ण कुत्सितपणे हसायला लागतो.
कर्ण: चित्रगुप्त जी, तुम्हाला वाटतं की मी पुत्र कर्तव्य निभवलं नाही आणि मला वाटतं की कुंती ने माता कर्तव्य पार पडलं नाही. सापेक्ष आहे हे सगळं! नाही का?
चित्रगुप्त: हे बघ कर्ण. हे आरोप म्हणजे कोडे नाहीयेत, सोडवायला आणि शब्दच्छल करायला! लक्षात घे. काही कर्म असे असतात जे करणारा आणि न करणारा सारखाच दोषी असतो.
कर्ण: मी कर्तव्य पार पाडलं नाही असं तुम्ही म्हणता पण मी ज्या सारथीकडे लहानाचा मोठा झालो त्या घरातील आई वडील आणि माझा भाऊ शोण याचे प्रती माझे जे काही कर्तव्य होते ते मी पार पाडलेच की! त्यामुळे कर्तव्य पार न पडल्याचा तुमचा आरोप चूक आहे!
युधिष्ठिर: पण तुला जेव्हा कळलं की आम्ही तुझे भाऊ आहोत तेव्हा तुझे कर्तव्य आमच्याशी जोडले गेले. मग ते तू का नाही निभवलेस?
कर्ण: धर्मराज तुम्हाला धर्माचे ज्ञान आहे पण जी एक व्यावहारिक समज असावी लागते ती नाही आहे तुमच्यात! आता मी चित्रगुप्त यांना विचारतो की जेथे कर्तव्य असते तेथे अधिकार असतो की नाही, सांगा बरे?
चित्रगुप्त: नक्कीच. अधिकाराने कर्तव्याला बांधलेले असते.
कर्ण: तेच म्हणतो मी! हे बघा युधिष्ठिर जी, मी आणि कुंती यांच्यात एक बंध आहे असे तुम्हाला वाटत होते असे तुम्ही एकदा कबूल केले होते, तेव्हा तुम्ही कुंतीला का विचारले नाही माझ्याबद्दल? माझ्याबद्दल जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न का केला नाहीत? तुम्हाला जीवनात मोठ्या भावाची कमतरता वाटे तेव्हा तुम्ही कुंतीला एका शब्दाने विचारले का नाही? सोडा ते आता. जाउद्या! मी एकच कर्तव्य जाणतो. ते म्हणजे माझा मित्र दुर्योधन याचे प्रती असलेले माझे कर्तव्य!!
भीष्म: तू जे काही दुर्योधना सोबत निभावले ते काही कर्तव्य बिर्तव्य नव्हतं. फक्त मैत्री निभवलीस तू! परतफेड या नात्याने!!
कर्ण: का निभावू नको? दुर्योधन यानेच माझ्या जीवनाला नवीन दिशा दिली. मला अंग देशाचा राजा बनवलं!!
भीष्म: दुर्योधन कोण लागून गेला तुला अंग देशाचा राजा बनवणारा? तो एक युवराज होता, राजा नाही. त्याला कोणी अधिकार दिला तुला अंग देश देऊन त्याचा राजा बनवण्याचा?
(क्रमशः)