रामा म्हणाला, ''निजा तुम्ही. दमलात सकाळपासून.'' शेटजी जेवायला बसले. काय आश्चर्य? एकेक घास घेत तो त्यांना काही अपूर्व वाटला. आपल्या शरीरातील अणुरेणु बदलत आहे असे त्यांना वाटले. त्यांच्या देहालाच पौष्टीक आहार मिळत होता असे नाही तर मनोबुध्दीसह जणु खाद्य मिळत होते. जेवण झाले. तसे व्यापा-याच्या तोंडावर निराळेच तेज दिसू लागले. ''किती पैसे?'' त्याचे विचारले. ''दर तेथे लिहिलेला आहे'' रामा म्हणाला. व्यापा-याने दहाची नोट दिली. ''जो दर आहे तेवढेच पैसे द्या.'' ''घ्या हे दहा रुपये. पुस्तके आणा. तुमच्या वाचनालयाला देणगी समजा. तुम्ही मला आज असे भोजन दिले आहे की ज्याची किंमत करता येणार नाही.''

राम काय बोलणार? व्यापारी गेला. परंतु तो व्यापारी खानावळ विसरला नाही. तो आपल्या गावी गेला. तो पूर्वी घरी नीट वागत नसे. पत्नीला मारहाणही करायचा. जरा बाहेरख्याली होता. परंतु घरी गेला व पत्नीच्या पाया पडला. तिला आश्चर्य वाटले. ''मी अपराधी आहे. क्षमा कर,'' तो म्हणाला. ''कोण भेटला गुरु?'' तिने डोळयांत पाणी आणून विचारले. ''कोण गुरुबिरु नाही. एका खानावळीत जेवलो. तेथे जेवत असताना मी जणू निराळा होत होतो. जणू जीवनातील वाईट जात होते. मंगल येत होते. मला सांगता येत नाही काय ते!'' ''तो खानावळवाला का देव होता?'' ''रामाची खानावळ म्हणतात. किती मनापासून वाढले त्याने, म्हणायचा 'देवा, प्रसन्नपणे जेवा. पोटभर जेवा. तुम्ही केव्हा येणार माझ्या गरिबाच्या खानावळीत!' त्याच्या शब्दांत जणू अमृत होते.'' व्यापा-याच्या बायकोने रामाच्या खानावळीला हजार रुपयाचा एक चेक पाठवला. माझ्या पतीचे प्रेम मला तुम्ही परत दिलेत म्हणून ही अल्प देणगी असे तिने लिहिले होते. पैशांचे काय करायचे? रामाने दोन खोल्या बांधल्या. गरीब विद्यार्थी तेथे रहात.''

''एकेक आश्चर्यच तुम्ही सांगता आहात. कादंबरी तरी नव्हे?''

''कधी कधी सत्य कादंबरीपेक्षा अद्भुत असते. प्रत्येकाचे जीवन म्हणजे कादंबरीच आहे. पहायला डोळे हवेत. रामाच्या किती तरी गोष्टी आसपास पसरल्या आहेत. अहो एकटा मुलगा होता. मास्तर त्याला थट्टेने म्हणाले, ''तो रामाच्या खानावळीत तरी जेवायला जात जा. बुध्दि येईल.' तो मुलगा खरेच रामाच्या खानावळीत येऊ लागला जेवायला. आणि किती वाचले तरी त्याच्या लक्षात रहायचे नाही अशा त्या विद्यार्थ्याच्या आता लक्षात राहू लागले. त्याच्या मनाची एकाग्रता होऊ लागली. शिक्षकांना आश्चर्य वाटले. आणि एका मुलाचे वडिल काही केल्या बरे होत नव्हते. तो त्यांना आमच्या गावी घेऊन आला. रामाने विद्यार्थ्यांसाठी ज्या खोल्या बांधल्या तेथे त्या वडिलांना रामाने जागा दिली. रामा त्यांच्यासाठी निराळा स्वयंपाक करी. त्यांची शुश्रुषा करी. त्यांना काही वाचून दाखवी. जणू रामा नकळत निसर्गोपचार कुशल होता, मानसशास्त्र कुशल होता. त्याची प्रेमशक्ति अपूर्व होती. प्रेमामध्ये अनंत शक्ती आहे असे म्हणतात ते खरे आहे.''

''दिवसेंदिवस रामा आपल्या साधनेत अधिकच तन्मय झाला. जेवायला मुले आली की, हात जोडायचा व म्हणायचा, 'या देवरुपांनो, या भारतमातेच्या लाडक्यांनो, या आत्मरुपांनो, या निष्पापांनो!'' तो कधी कधी वाढायचा विसरायचा. मुले म्हणायची, ''रामा, भाकरी वाढ व मग डोळे मिटून उभा रहा.'' सुटीत मुले गेली की, रामा खिन्न होई. वाट पहात असायचा मुले केंव्हा येतील म्हणून. आणि पाच वर्षांपूर्वीची गोष्ट.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel