उन्हाळयाची सुट्टी संपून शाळा पुन्हा गजबजल्या. काही नवी व काही जुनी मुले रामाच्या खानावळीत आली. त्याच्या खानावळीत प्रवेश मिळावा म्हणून मुलांची धडपड असे. रामाच्या खानावळीत जेवणारा आजारी पडत नाही, नापास होत नाही, अशा दंतकथा गावोगाव पसरल्या होत्या. ''या लाडक्यांनो, या'' मुलांना पाहून रामा उचंबळून म्हणाला. आणि त्याने खरोखरीच त्यांच्या पुढे लोटांगण घातले. ''रामा, पुरे नमस्कार. ऊठ आता. ही नवीन मुले आली आहेत.'' एक जुना मुलगा म्हणाला. परंतु रामा उठेना. हालचाल नाही. मुले घाबरली. त्यांनी डॉक्टरांस आणले. ''रामाने राम म्हटला'' डॉक्टर म्हणाले. ती मुले रामाभोवती अश्रु ढाळीत बसली. रामा मुक्त होऊन गेला.''

''त्याची का आज पुण्यतिथि? त्याची खानावळ आता कोण चालवितो?''

''त्याचाच एक मित्र चालवीत आहे. परंतु सारेच रामासारखे कसे होणार? आपल्या देशाला आज रामा हवे आहेत. जनता म्हणजेच जनार्दन समजून कामे करणारे. मग म्युनिसिपल कारभार सुधारेल. मग काळेबाजार बंद होतील. मग आगगाडया, आगबोटी स्वच्छ राहतील. जो तो एकमेकांस देव समजून वागला तर जीवनात केवढी गोडी येईल! स्पृश्यास्पृश्य, हिंदू-मुसलमान, मालक-मजूर या नाना भेदांत अभेद येऊन सामंजस्य निर्माण होईल. परंतु खरा धर्म हवा आहे. असो.''

''सा-या गावभर ती बातमी गेली. शाळेला सुट्टी मिळाली. विद्यार्थी आले, शिक्षक आले. वकील आले. व्यापारी आले. श्रीमंत आले. तो साधा खानावळवाला. परंतु त्या गावची आध्यात्मिक संपत्ति होता. त्याची खानावळ म्हणजे सेवेचे महान होते. जो कोणी जेवायला येई तो प्रभूचि मूर्ती या भावनेने राम पाही. त्याला तो वाईट जेवण कसे देणार? तांदूळ पुन्हा पुन्हा निवडी. एक भातकण नसे. एक दगड नसे. जीवनसत्त्वे ज्यात आहेत त्या भाज्या आणायचा, त्या कोशिंबीरी करायचा. कोंडयासकट खावे म्हणून व्याख्यान द्यायचा, पटवायचा. सारे स्वच्छ. रागाचा शब्द नाही, अपमान कोणाचा नाही.''

''चला, तुमच्याबरोबर मीहि येतो सभेला'' नवशिका म्हणाला.

''सारे खानावळवाले, सारे हॉटेलवाले आज मिरवणूक काढतील. आपण मिरवणुकीत सामील होऊन सभास्थानी जाऊ.''

''ठीक तर.''

तो नवशिका त्या माणसाबरोबर मिरवणुकीत सामील झाला. मिरवणूक सभास्थानी आली. रामा खानावळवाल्याची सुंदर तसबीर तेथे होती. पुष्पहारांनी ती मंडीत होती. सभेत भाषणे झाली. अनेकांनी रामा खानावळवाल्याच्या आठवणी सांगितल्या. त्याच्या जयजयकारात सभा संपली. रामाच्या तसबिरीला प्रणाम करून तो नवशिका नवीन दृष्टी घेऊन निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel