प्रकरण १४.    

पाणिनी तुरुंगातल्या एका खोलीत अनन्या गुळवणी ला भेटायला आला होता. पडद्याच्या पलीकडे ती शांतपणे आणि समाधानी चेहेऱ्याने बसली होती. नेहेमी पेक्षा जास्तच सुंदर दिसत होती.
“ मला तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात ? “
‘’ एक गोष्ट स्पष्ट पणे ध्यानात घे, तुला पिंजऱ्यात उभं केलं तर आईने तुझ्या कडे दिलेल्या त्या पत्रा बद्दल तुला सांगावच लागेल. त्यामुळे त्यात काय मजकूर होता हे मला समजायला हवं.” पाणिनी म्हणाला.
“ मी तुम्हाला सांगितलं ना, की मी ते कधी ही कोणालाही सांगणार नाही.”
“ तुझा वकील म्हणून मला ते माहीत असणे गरजेचे आहे.तुला समजत नाहीये की परिस्थिती किती निराशाजनक आहे. खांडेकर, सरकारी वकील तुझ्यावर ब्लॅक मेल चा आरोप ठेवणार आहेत. तू हर्षल मिरगल ला त्याच्या घरी तुला आणायला , तुझं शिक्षण पूर्ण करायला , त्याच्या मृत्यू पत्रात उर्वरित वारस म्हणून तुझं नाव लावायला त्याला भाग पाडलस म्हणून. त्यामुळे न्यायाधीश एवढे पूर्वग्रह दूषित होतील की तू त्याला विष दिल्याचा थोडा जरी पुरावा सादर झाला तरी तू खुनी असल्याचा निवडा देतील.”
“ मग आपण काय करू शकू?” तिने विचारलं.
“ आपण  विरुध्द विधाने करू आणि त्यांना दाखवून देऊ की तू तसे ब्लॅक मेल केलेले नाहीस.”
“ तुम्हाला हे कधी लक्षात नाही का आले की मी या पत्राचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला नाही कारण सरकारी वकील बरोबर आहेत ?”
पाणिनीने भुवया उंचावल्या.
“ मी ब्लॅक मेल केलंय त्याला !  आणि आणखी काही गोष्टींसाठी नाही केलं याची खंत वाटत्ये ! “
पाणिनी ने दचकून  तिचे बोलणे कोणी ऐकले नाही ना याचा कानोसा घेतला.” तुझ्या आवाजातला ती कटुता काढून टाक “
“ मिरगल खुनी होता माझ्या वडीलांचा त्यामुळेच माझ्या आईलाही प्राण गमवावे लागले.”
“ तुला आईने दिलेल्या पत्राचे काय केलेस तू?”
“ जाळून टाकल ते.”
“ काय होत पत्रात?”
“ आईने मला खुलासा केला होता की माझा जन्म विवाह बंधनातूनच झाला होता.आणि बरंच काही पण मी जेव्हा ते पत्र वाचत गेले तेव्हा दोन ओळी मधले  न लिहिलेले अनेक संकेत मला मिळत गेले.भागीदारीतले काही व्यवहार. हर्षल ने काही गोष्टीत अशी काही फसवणूक केली होती की विचारू नका शाळेच्या .मोठया इमारतीचे बांधकाम त्यातूनच केले आणि त्याची जबाबदारी माझ्या वडिलांवर येईल अशी व्यवस्था केली. माझ्या वडिलांनी जेव्हा हे सर्व हर्षल ने च केल्याचा पुरावा दाखवला तेव्हा त्याने माझ्या वडलांचा खून केला.”
“माझ्या आईने एक पत्र बँकेत ठेऊन दिलंय हे हर्षल ला माहीत होते पण त्यात काय लिहिलंय याची त्याला कल्पना नव्हती. त्याच गोष्टीची त्याला भीती वाटत होती.माझ्या आईला कितपत माहिती असेल याचे त्याला नवल वाटत होते. मी एक जुगार खेळले. त्याला सांगितलं की त्याने माझ्या वडलाना मारल्याचे पुरावे ता पत्रात आहेत.भागीदारी च्या व्यवहारात केलेल्या घोटाळ्याचे ही पुरावे आहेत. त्या मुळेच त्याच्या घरी रहायला ताने मला बोलावले , शिक्षणाचा खर्च केला, म्हणूनच सरकारी वकील जर म्हणतील की मी त्याला ब्लॅक मेल काळे तर ते सत्य आहे ! “
“ तुला ते पत्र मिळाल्यावर तू माझ्याकडे आली असतीस आणि मला माझ्या पद्धतीने हे....”
पाणिनी म्हणाला पण त्याला मधेच तोडत ती म्हणाली. “ मी जेवढ केलं त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगलं करू शकला नसता., लक्षात घ्या, त्या पत्रात फक्त संशय व्यक्त करण्यात आला होता, कसलाही पुरावा नव्हता. मी त्यावर एक जुगार खेळून त्याला ब्लॅक मेल केले तुम्ही ते करू शकला नसता.”
“ मी गुप्त हेर लाऊन पुरावे गोळा केले असते.”
“ नसतं शक्य झालं तुम्हाला ते. तो फार चतुर होता,  पण कालांतराने त्याला कोणी पिन मारली माहीत नाही पण त्याच्या लक्षात आलं की नुसतीच पोकळ धमक्या देत्ये त्याला.म्हणूनच मी आणि निमिष जयकर जेव्हा प्रेमात पडलो तेव्हा त्याने त्याचे हुकमी हत्यार बाहेर काढले आणि सांगितले की मी जर लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिले तर मी ब्लॅक मेलर असल्याचे आणि अनौरस मुलगी असल्याचे  जयकर च्या कुटुंबाला तो सांगेल.”
“आता सांगा पाणिनी पटवर्धन , माझ्या वरच्या या खटल्यावर कितपत परिणाम होईल?”
“असं दिसतंय की जणू काही तूच त्याला मारलं आहेस.”
“ मलाही तसच वाटतंय. आणि तुमच्या देहबोली वरून तरी मला फार संधी आहे अस वाटत नाही.”
पाणिनी उठला , बाहेर गेला, पत्रकार बाहेर होते त्यांना सामोरा गेला,” बोला काय हवंय तुम्हाला?”
“ अनन्याची हकीगत” एक पत्रकार म्हणाला.
“ ती तुम्हाला उद्या कोर्टातूनच समजेल.”
“ बर , मग त्या प्रकरणाबद्दल सांगा, बचाव पक्षाची स्थिती काय आहे?”
“ माझी अशील ही योगायोगाने घडलेल्या परस्पर विरोधी घटनांची शिकार बनली आहे.” पाणिनी ने उत्तरं दिले.
प्रकरण 14 समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel