दॅट्स ऑल युवर ऑनर.

 प्रकरण अकरा.

दोन ला पाच मिनिटे असताना पाणिनी कोर्टात प्रवेश करत असतानाच  ओजस ने त्याच्या खांद्याला हात लावून लक्ष वेधून घेतले. “ पाणिनी, रात्री नऊ नंतर  पोलीस प्रभाकर लघाटे ने रात्री बारा नंतर घरी जाण्या पूर्वी आणखी समन्स का लावला नाही गाडीला याची तू चौकशी करायला सांगितली होतीस. मी केली. त्याने खरोखर एकदाच समन्स लावला होता , त्या नंतर आलेल्या पोलिसाने दोन लावले.असे तीन समन्स लागल्यामुळे गाडी उचलून नेली गेली. आधी पोलिसांनी या घटनेकडे फार लक्ष नाही दिले पण नंतर जेव्हा समजले की या गाडीचा खुनाशी संबंध आहे,तेव्हा  मोठा गहजब झाला.पोलिसांनी आता त्या गाडीवरचे बरेचसे ठसे घेतलेत.”

पाणिनी ने डोळे मिटून ओजस ने दिलेली माहिती पचवली.

 “ तुला कितपत मोठा धक्का आहे हा? ” ओजस ने विचारले.

“ मला नाही सांगता येणार आत्ताच. काय काय घडतं पुढे बघू.”

पाणिनी पटवर्धन कोर्टात न्यायाधीशांसमोर उभा राहिला.

“ पोलिसांनी दिलेली गाडीच्या पार्किंग बद्दल ची साक्ष स्वीकारावी असे मला सांगण्यात आले होते आणि मी ती स्वीकारली होती. वेळ वाचवण्याचे दृष्टीने मी कोणतीही साक्ष स्वीकारण्यास नेहेमीच  तयार असतो अर्थात जर माझ्या अशिलाच्या हिताच्या आड ते येत नसेल तर. प्रभाकर लघाटे ची साक्ष मी स्वीकारलीच आहे पण मला त्याची उलट तपासणी घ्यायची आहे.माझ्या अशिलाच्या हितासाठी ते गरजेचे आहे असे माझे मत आहे.”

“ ठीक आहे.देतो परवानगी ” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. “ पण मला नाही वाटत त्यातून फारसे काही निष्पन्न होईल.”

दैविक दयाळ उठून उभा रहात नाटकी पणाने सभ्यतेचा आव आणत म्हणाला,

“न्यायमूर्ती महाराज काय म्हणतात याच्याशी मी सहमत आहे.पण आता असे जाणवतं की त्याची उलट तपासणी ही खटल्याचा बराचसा वेळ घेईल,मी पटवर्धन ना त्याची साक्ष स्वीकारण्याची केलेली विनंतीच मागे घेतो. त्याची साक्षच आम्ही गृहित धरत नाही.”

“ म्हणजे जणू काही प्रभाकर लघाटे हा तुमचा साक्षीदार नव्हताच असे तुम्ही समजणार?”

कार्तिक भाटवडेकर नी विचारले.

“ हो तसेच !  दैविक म्हणाला.”

“ अशा या प्रकाराला आमचा विरोध आहे.त्याची साक्ष काय असेल ते सरकारी वकिलांनी सांगितले आणि मी मान्य केले, म्हणजे प्रत्यक्ष त्याची साक्ष  घेतली न जाता.पण ते केवळ वेळ वाचवण्यासाठी.प्रभाकर लघाटे कोर्टात हजर आहे आणि उलट तपासणी चा मला अधिकार आहे. त्याची झालेली साक्ष अशी रद्द नाही करता येणार. ” पाणिनी ने हरकत घेतली.

 न्यायाधीश म्हणाले, “ सरकार पक्षाने आपला हा साक्षीदारच रद्द केलाय. मग उलट तपासणी कोणाची घेणार?”

“ त्याची साक्ष मी प्रत्यक्ष न घेता तो काय बोलणार आहे ते सरकार पक्षाने सांगितले आणि मी ते मान्य करावे अशी सरकार पक्षाचीच विनंती होती.मी न्यायालयाचा वेळ वाचवा म्हणून ती मान्य केली पण माझा उलट तपासणीचा अधिकार अबाधित ठेऊन. त्यामुळे माझा हक्क कोर्ट हिरावून घेऊ शकत नाही.”

कार्तिक भाटवडेकर हसले. “ मला वाटते पटवर्धन बरोबर आहेत. सरकार पक्षानेच सांगितले म्हणून पटवर्धन ने प्रस्ताव स्वीकारला.सरकारी वकीलांना आता त्यांचा निर्णय फिरवता नाही येणार.प्रभाकर लघाटे ला बोलवा.”

        “ मला नाही वाटत त्याला एवढया कमी वेळेत हजर करता येईल.” दैविक दयाळ म्हणाला.

“ त्याला तुम्ही कोर्टातून बाहेर जाऊ द्यायलाच नको होते. पटवर्धन ने उलट तपासणी घेण्याचे अटीवरच तुमचा प्रस्ताव मान्य केला होता. ” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ मला अजिबात अंदाज नाही आला की पटवर्धन उलट तपासणी घेतील.” दैविक म्हणाला.

“ तुमचा अंदाज चुकला.पण आता व्यवस्था करा.दरम्यान तुमचा दुसरा साक्षीदार बोलवा. कोण  असणार आहे ? ”

“इन्स्पेक्टर तारकरना बोलवायचे आहे.” दैविक म्हणाला.

इन्स्पेक्टर तारकरने येऊन शपथ घेतल्यावर दैविक ने प्रश्नांना सुरुवात केली.

“ तुम्हाला कंपनीच्या आऊट हाऊस वर सहा तारखेला बोलावण्यात आलं होत आणि तिथे तुम्हाला तपन चे प्रेत दिसले ? ”

“ नाही. मी तिथे जाण्यापूर्वी ते हलवण्यात आले होते.”

“ परंतू, त्याच्यावर अंत्यविधी होण्यापूर्वी त्याचे कपडे तपासण्यात आले तेव्हा तुम्ही हजर होता? ”

“ होतो.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

“ काही विशेष असे सापडले का त्याच्या कपड्यात ? ”

“ गाडीतल्या  इंजिन मधील एक इलेक्ट्रिक भाग.”

“ तुमच्याकडे आहे का तो अत्ता? असेल तर तो कोर्टाच्या ताब्यात द्या पुरावा म्हणून.” दैविक दयाळ म्हणाला.

इन्स्पेक्टर तारकरने आपल्या कडील भाग कोर्टाच्या लेखानिकाकडे दिला.त्याने तो नोंदवून पटवर्धन कडे बघायला दिला.

“ या भागाचे कार्य काय असते गाडीमध्ये?

“ गाडीच्या विविध भागात जिथे विद्युत प्रवाह आवश्यक असतो तिथे तो पोचवणे.”

“ आणि हा भाग नसेल तर काय होईल?”

“ मोटार चालूच होणार नाही कारण ठिणगी पडणार नाही ”

“ आणि हा भाग त्याच्या खिशात होता? ”

“ हो सर.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

“ आरोपीची गाडी तुमच्या परिचयाची आहे? ”

“ आहे.”

“ मग मला सांगा की हा जो पार्ट आहे तो आरोपीच्या गाडीत इंजीन मधे बरोब्बर बसतो की नाही ? ”

“ बसतो.”

दैविक कोर्टाला उद्देशून म्हणाला,  “ मी आता जे पश्न इन्स्पेक्टर तारकरना विचारणार आहे, त्याला ‘ऐकीव माहिती’ या निकषाखाली आरोपीचे वकील हरकत घेऊ शकतात.पण कोर्टासमोर पूर्णपणे चित्र स्पष्ट होण्याचे दृष्टीने आणि वेळ वाचवण्याचे हेतूने मी ते विचारणार आहे.त्याला पटवर्धन ने हरकत घेतली तर मला नाईलाजाने संबंधित मेकॅनिक ला साक्षीला बोलवावे लागेल आणि त्यात जास्त वेळ जाईल. ”

“ मला सांगा की आरोपीची गाडी पाच तारखेला रात्री चालू अवस्थेत होती की नाही याची माहिती तुम्ही घेतली का? काय आढळलं तुम्हाला? ” पटवर्धन ची संमती गृहित धरून दैविक ने इन्स्पेक्टर तारकरला विचारले.

“ पाच तारखेला रात्री तिची गाडी पूर्ण रात्रभर ,अगदी  सहा तारखेला सकाळ पर्यंत कंपनीच्या पार्किंग मधे होती.सहा तारखेला मेकॅनिक आला आणि त्याने गाडी दुरुस्त करून दिली.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

“मेकॅनिक ने काय सांगितले? ”

“ तो म्हणाला अत्ता कोर्टाला मी जो पार्ट दाखवला, तो त्या गाडीत नव्हता.”

“ तोच पार्ट ? ”

“ तो किंवा अगदी तसाच हुबेहूब ”

“ मी कोर्टाला विनंती करतो की या पार्ट ला योग्य क्रमांक देऊन पुरावा म्हणून घेण्यात यावा.”

“ ब ७  असा अनुक्रमांक त्याला दिला आहे.” कोर्टाच्या लेखनिकाने सांगितले.

“ पाच तारखेला आरोपीच्या ठाव ठिकाण काय होता या बद्दल तुम्ही तिला प्रश्न विचारलेत का? आणि ते कधी  विचारलेत? ”

“ सात तारखेला, जेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा.”

“ आणखी कोणी तुमच्या बरोबर उपस्थित होता तेव्हा ? ”

“ एक पोलीस होता. ”

“ तिला तुम्ही काही आमिष दाखवले होते? दम दिला होता? ”

“ बिलकुल नाही.”

“ तिला तिच्या अधिकाराची जाणीव करून दिली होती? की तिने कोणतीही कबुली देणे सक्तीचे नाही ”

“ तिला मी सांगितले होते की कोणतेही विधान तू करशील ते काळजीपूर्वक कर,त्याचा उपयोग तुझ्या विरुद्ध केला जाऊ शकतो. तिला मी हे पण विचारले की पाच तारखेला  रात्री तू कुठे होतीस ? तपन बरोबर होतीस का? ”

“ त्यावर तिने काय उत्तर दिले? ” दैविक ने विचारले.

“ तिने सांगितले की कंपनी तून घरी निघताना गाडी सुरु झाली नाही. तपन ने दुरुस्तीचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.त्याने मला लिफ्ट दिली.मला घरी सोडण्यापूर्वी मला घेऊन तो  कामासाठी म्हणून ऑफिस च्या आऊट हाऊस मधे गेला.तिथे संबंधित माणसाची वाट बघण्यात खूप वेळ गेला , आम्ही तिथे बिस्किटे,आम्लेट आणि मटण बनवले.तेथे त्याने अति प्रसंग केला.त्याच्या तावडीतून मी निसटले आणि अंधारात त्याची नजर चुकवत रस्त्यावर आले.तो गाडी घेऊन मला शोधत आला. मी काटेरी तारेच्या कुंपणा खालून सरपटत गेले. माझे बुटाचे ठसे शोधत  तो  गाडीतून खाली उतरून आला. मी त्याची नजर चुकवून त्याच्या गाडीत शिरले आणि तो मला पकडायला येण्या आधीच गाडी सुरु करून शहरात आले.त्याच्याच इमारतीसमोर असलेल्या अग्नी शमन यंत्राच्या खांबा समोर मी त्याची गाडी लावली , मुद्दामच, त्याला त्रास व्हावा म्हणून, आणि सरळ माझ्या घरी आले. ” इन्स्पेक्टर तारकरने सविस्तर सांगितले.

“  तेव्हा किती वाजले होते या बद्दल तिने काय सांगितले? ”

“ ती म्हणाली रात्री सव्वा आठ ते साडेआठ. वाजले होते तेव्हा.”

“ तिने किल्ल्या गाडीतच ठेवल्या होत्या? ”

“ हो . गाडीतच होत्या.”

 “ पुन्हा आपण आधीच्या घटनेकडे जाऊया. तिने तुम्हाला सांगितले की तपन ने मटण आणि अंडी आम्लेट बनवले म्हणून?”

“ हो ”

“ तिने असे सांगितले का की त्या मटणआणि आम्लेट पैकी त्यांनी थोडे अन्न खाल्ले म्हणून? ”

“ तिने सांगितले की तिच्यावर त्याने हल्ला केला त्यामुळे खाण्यापूर्वीच ती बाहेर पळाली.

“ तिने जे जे सांगितले त्याची शहानिशा करण्यासाठी तुम्ही काय केले? ”

“ सर्वात प्रथम तपन च्या  गाडी ची हातचे ठसे मिळण्याचे दृष्टीने तपासणी केली.आरशाच्या मागील बाजूस काही ठसे मिळालेत.ती आऊट  हाऊस मधून बाहेर पडल्यावर ज्या रस्त्यावरून गेली, त्यावर तिच्या पावलांचे ठसे मिळतात का हे पाहण्यासाठी त्याची तपासणी केली. पण त्यात यश आले नाही कारण त्या रस्त्यावर इतक्या लोकांच्या बुटाचे ठसे होते की त्यातून आरोपीचे ठसे शोधणे शक्यच नव्हते. या प्रकरणात मोठ्या कुटुंबातील माणसाचा बळी गेल्यामुळे,प्रसिध्दी फार मिळाली त्यामुळे.खूप लोक त्या आऊट हाऊस जवळ आले होते.”

“ मुख्य रस्ता सोडून जो आड रस्ता आहे त्या ठिकाणच्या परिसरात काय आढळलं ?  म्हणजे  त्या टेकडीच्या उताराला? ”

इन्स्पेक्टर तारकर या प्रश्नाची आतुरतेने वाट बघत होता.परंतू उत्तर देताना फार  उत्तेजित झाल्या सारखे न दाखवता तो म्हणाला “  आरोपीने त्या ठिकाणी जाणून बुजून काही पुरावा निर्माण केल्याचे आढळले. ”

न्यायाधीशांनी चमकून त्याच्याकडे पहिले.नंतर पटवर्धन कडे आणि दैविक कडे .

“  बचाव पक्ष म्हणून पटवर्धन तुम्हाला ,या प्रश्नावर हरकत घ्यायची आहे का? किंवा हे उत्तर म्हणजे साक्षीदाराने काढलेला निष्कर्ष आहे या मुद्द्यावर त्याचे उत्तर मान्य करू नये अशी तुमची मागणी आहे का मिस्टर पटवर्धन? ” कार्तिक भाटवडेकर यांनी पटवर्धन ला सुचवण्याचा प्रयत्न केला.

“ हरकत घ्यायच्या ऐवजी मला या मुद्द्यावर इन्स्पेक्टर तारकरची उलट तपासणी घ्यायची आहे. ”  पाणिनी पटवर्धन म्हणाला.

“ असं असेल तर अशा अप्रस्तुत गोष्टी खटल्यात आणल्या जात असताना उलट तपासणीच्या प्रतीक्षेत  गप्प बसून राहणे बरोबर नाही पटवर्धन.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ मला यात अप्रस्तुत वाटत नाही.जर आरोपीने खरोखर असा काही पुरावा त्या ठिकाणी निर्माण केला असेल तर ती फार महत्वाची आणि न  पटणारी गोष्ट आहे.” पाणिनी म्हणाला.

“ पण या साक्षीदाराला हे माहिती नाहीये की आरोपीनेच तो पुरावा निर्माण केला म्हणून. तुमचे काम आहे यावर हरकत नोंदवण्याचे आणि त्याचे उत्तर मान्य न करण्याची कोर्टाला विनंती करण्याचे.” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ कोर्टाला मी विनम्र पणे सांगू इच्छितो,’’ दैविक नाटकी पणाने म्हणाला.  “ की या साक्षीदाराला हे माहित आहे  परिस्थितीजन्य पुरावा बोलका आहे. पटवर्धन ने उलट तपासणी घेतली तर साक्षीदार आणि सरकार पक्ष त्याचे स्वागतच करेल.”

“ वकिलांनी आपला खटला कसा चालवायचा हे त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे.पण मी मात्र या मताचा आहे की साक्षीदाराने हे विधान त्याचा निष्कर्ष म्हणून केले आहे. ज्यावर पटवर्धन ना हरकत नोंदवण्याचा अधिकार आहे. ” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ इन्स्पे.  तारकरचा या क्षेत्रातला अनुभव आणि त्याने घेतलेले प्रशिक्षण आणि अनुमान काढण्याची हातोटी पाहता तो तज्ज्ञ समजला जातो आणि त्यामुळे आमचा बचाव पक्ष त्याने केलेल्या विधानावर काहीही आक्षेप घेऊ इच्छित नाही.” पाणिनी ने जाहीर करून टाकले. ”

दैविक दयाळ खुष होवून झपकन  इन्स्पेक्टर तारकरकडे वळला.  “ काय आढळले तुम्हाला  त्या जागी ? ”

सात तारखेला आरोपीला प्रश्न विचारण्यापूर्वी आम्हाला असं आढळलं की कोणीतरी आरोपीच्या ड्रेस चा एक तुकडा चाकूने कापला होता.हा तुकडा नंतर त्या काटेरी कुंपणाला अशा तऱ्हेने अडकवलेला होता ही कोणाचेही सहज लक्ष जाईल.एक उंच टाचांचे बूट घातलेल्या स्त्री ला कोणीतरी उचलून कुंपणाच्या पलीकडील मऊ माती असलेल्या जमीनीवर सोडल्याच्या खुणा सापडल्या. कोणीतरी कुंपणा खालून सरपटत पलीकडे गेल्याचा भास निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता.” इन्स्पे.  तारकरम्हणाला.

“ तुम्ही हे खात्रीने सांगू शकता का , की ज्या व्यक्तीच्या बुटांचे हे ठसे होते ,ती व्यक्ती कुंपणा खालून सरपटत पलीकडे गेली नाही म्हणून . ”

“ शंभर टक्के खात्री देवू शकतो. ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ कशावरून ? ”

“ कुंपणाच्या मागील बाजूची जमीन  बुटांचे ठसे टिकण्याच्या दृष्टीने मऊ होती.पण कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला मात्र ठसे नव्हते.”

“ ज्या ड्रेस चा तुकडा तारेत अडकवलेला आढळला,तो ड्रेस नंतर तुम्हाला मिळाला का ? आणि कुठे? ”

“ तो आरोपीच्याच घरात अशा तऱ्हेने ठेवलेला मिळाला की कोणालाही तो सहज दिसावा.”

“ तो ड्रेस अत्ता आहे का तुमच्याकडे? असेल तर सदर करा.”

इन्स्पेक्टर तारकरने आपल्या बॅगेतून तो काढला आणि सादर केला. तो तोच ड्रेस होता जो ने  पाणिनी च्या बरोबर आकृती च्या घरी जाताना घातला होता.

“ फाडलेला तुकडा तुम्ही आणलाय का तुमच्या बरोबर? ”

इन्स्पेक्टर तारकरने तो दाखवला.

“ हा तुकडा त्या ड्रेस ला फाडलेल्या ठिकाणी जोडून पहिला तर तंतोतंत जुळतोय का? ”

“ अगदी बरोबर जुळतो.”

“ कोर्टाला जरा दाखवा कसा जुळतो ते. ”

इन्स्पेक्टर तारकरने तो दाखवला.

न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर यांच्या कपाळाला आठ्या पडल्या.त्यांनी पटवर्धन कडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले.त्यांनी स्वतः तो तुकडा पुन्हा नीट जुळवून पहिला.

“ हा तुकडा  आणि मूळ ड्रेस पुरावा म्हणून मी कोर्टात जमा करू इच्छितो.” दैविक दयाळ म्हणाला. “ ड्रेस ला ब ८ आणि तुकड्याला ब ९ असे क्रमांक राहतील.”

“  त्या पूर्वी बचाव पक्षाला  या विषयावर  साक्षीदाराची तपासणी करण्याचा अधिकार आहे.पटवर्धन तुम्ही घेऊ इच्छिता ? ”

“ हो घ्यायचीच आहे मला ” पाणिनी  पटवर्धन म्हणाला.

“ परवानगी आहे.”

पाणिनी उठून उभा राहिला. इन्स्पेक्टर तारकरकडे बघून हसला. “ तू म्हणालास की आरोपीने सांगितलेली हकीगत खरी वाटावी म्हणून पुरावा निर्माण केलं गेला?”

“ दुसरा काहीच असू शकत नाही याचा खुलासा.”

“ तर मग असा पुरावा फारच कमकुवत आहे.” पाणिनी म्हणाला.

“ ज्या व्यक्तीने आरोपी ला मदत करण्यासाठी पुरावा निर्माण करायचा प्रयत्न केला ती व्यक्ती  उंच टाचांचे बूट घातलेली तरुणी असली पाहिजे, आणि ती कुंपणाच्या पलीकडच्या बाजूने मऊ माती असलेल्या जमिनीवरून पळत गेली असली पाहिजे.” पाणिनी म्हणाला.

“ तेवढा वेळ त्या व्यक्तीला मिळाला नसेल.”

“ आणि तू असे सांगितलेस की कापडाचा तुकडा ज्या ड्रेस चा होता,तो ड्रेस आरोपीचा होता.” पाणिनी ने विचारले.

“ तो ड्रेस तिच्याच मापाचा होता.आणि तिच्याच घरात सापडला एवढी गोष्ट तिची मालकी सिध्द व्हायला पुरेशी आहे.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ तो ड्रेस आरोपीने खरेदी केला आहे का हे शोधून काढायचा तू प्रयत्न केलंस का? ” पाणिनी ने विचारले.

“ नाही केला प्रयत्न . मला नाही वाटत त्याची गरज होती.”

“ त्या ड्रेस वरचे लॉण्ड्री च्या खुणा तपासल्या का? त्यावरून मालकी शोधायचा प्रयत्न केला का ? ”

“ अजून नाही केला तसा प्रयत्न ” .” इन्स्पेक्टर तारकरने कबुली दिली.

“ तरीही तू साक्षीत सांगितलेस की तो ड्रेस तिच्याच मालकीचा होता ? ”

“तो ड्रेस तिच्याच मापाचा होता.आणि तिच्याच घरात सापडला एवढी गोष्ट तिची मालकी सिध्द व्हायला पुरेशी आहे.” इन्स्पेक्टर तारकर पुन्हा म्हणाला ”

“ आणि तू सांगितलेस की त्या ड्रेस चा तुकडा  काटेरी कुंपणावर अडकलेला तुला आढळला आणि त्यामुळे  पुढे जमिनीवरील ठशांचा  मागोवा घेण्यात आला ? ”

“ बरोबर ”

“ आणि तो मागोवा घेत असताना तू अशा निष्कर्षाप्रत पोचलास की कोणीतरी वेगळा पुरावा निर्माण करून आरोपीच्या म्हणण्याला पुष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.” पाणिनी म्हणाला.

“ याचे उत्तर देणे म्हणजे माझा निष्कर्ष आहे असा अर्थ होईल पण मी देतो उत्तर.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला “ माझे मत आहे की आरोपीनेच तपन ला मारला.तिला त्या वाचून कदाचित इलाज नसेल पण वस्तुस्थिती सांगायच्या ऐवजी तिने कुंपणाच्या खालून घसरत गेल्याचे कुभांड रचले आणि ते खरे आहे असे भासवण्यासाठी ड्रेस चा तुकडा फाडून तारेला अडकवला.”

“ हे उत्तर म्हणजे साक्षीदाराने पाहिलेली घटना नाही . त्याने केलेला अंदाज किंवा निष्कर्ष आहे.” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

दैविक दयाळ त्याच्या मदतीला धावला. “ त्याचे मत हे तज्ज्ञ म्हणून आहे. हे गृहीत धरूनच प्रश्न विचारला गेला होता आणि त्याला प्रतिसाद म्हणून साक्षीदाराने हे उत्तर दिले आहे.”

“ जो पुरावा मिळाला तुला ,त्यावरून ,ज्या ठिकाणी कापडाचा तुकडा मिळाला त्याच्या आसपासचा  परिसर तपासायला  तुला भाग पडले.? ”

 साक्षीदार अस्वस्थ पणे चुळबुळला. “ वस्तुस्थिती आहे तशी ” तो म्हणाला.

“ तो तुकडा जर त्या तारेला अडकलेला सापडला नसता तर आसपासचा परिसर तू तपासाला नसतास.”

“ काहीही घडू शकले असते पटवर्धन.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ आणि तू आसपासच्या परिसराची जी पाहणी केलीस त्यातून मिळालेल्या माहिती वरून  आरोपीने सांगितलेली हकीगत खरी असल्याचे च पुरावे मिळाले?” पाणिनी ने विचारले.

“  तिथे पावलांच्या खुणा मिळाल्या .पण त्या मुद्दाम निर्माण केलेल्या  खोट्या पुराव्याच्या होत्या.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

“ कशावरून ? ”

आसपासची जमीन तीन प्रकारची होती. एक प्रकार म्हणजे मातीचा कच्चा रस्ता.ज्यावर पाउस पाडला होता.आणि त्यावर पावलांच्या खुणा होत्या ,त्या कदाचित पाच तारखेला उमटल्या असतील पण त्या , नंतर च्या पावसाने पुसल्या गेल्या असाव्यात.त्यामुळे सहा किंवा सात तारखेला त्या दिसतं नव्हत्या.दुसरा प्रकार होता तो रस्त्याच्या लागत असलेली मऊ सर माती.त्यावर खळगे होते ज्यात रस्त्यावरचे पाणी वाहत येत होते. त्यामुळे ती माती बऱ्यापैकी कालावधीसाठी मऊ राहिली.हीच परिस्थिती रस्त्याच्या पश्चिमेकडील  टेकडी लगतच्या उतारावरील मातीची होती. कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या पश्चिमेकडे तिसऱ्या प्रकारची जमीन होती.यावर गवत आणि रान उगवले होते . त्यामुळे यावर उमटलेल्या  कोणत्याही खुणा दिसूच शकत नाहीत तरी सुद्धा उंच टाचांच्या काही खुणा इकडे  तिकडे दिसतं होत्या पण त्या इतक्या  स्पष्ट नव्हत्या की त्यातून काही ठोस असे शोधता येईल.  पण आम्हाला माहित्ये की या खुणा नंतर पडल्या गेल्या आहेत कारण कुंपणाच्या पलीकडील सर्वात जवळची खूण ही, ड्रेस च्या तुकड्या पासून सत्तावीस फुट अंतरावर होती ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

“ तारेला जर कापडाचा तुकडा अडकला नसता तर या सगळ्या खुणांकडे दुर्लक्षच झाले असते? ”

“ मी नाही सांगू शकत त्या बद्दल.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

“ तुम्ही हे कापड  पुरावा म्हणून सादर करू इच्छिता? ” पाणिनी ने दैविक ला विचारले.

“ हो , आमचा आग्रह आहे तसा ”

“ मग माझा पण आग्रह आहे की लॉण्ड्री मार्क वरून त्याची मालकीण कोण आहे याची तपासणी व्हावी आधी.” पाणिनी म्हणाला.  “ तो ड्रेस केवळ तिच्या घरी मिळाला ,हा पुरावा नाही होऊ शकत ,तो तिचाच आहे या गोष्टीचा.”

“ पण तो तिच्याच मापाचा आहे, तिच्याच घरी मिळालाय, दुसऱ्या कोणाचा ड्रेस कसा येईल तिच्या घरात आणि तो सुद्धा अगदी तिच्याच मापाचा ?”

“ सध्या आपण फक्त तो ड्रेस पुरावा म्हणून न घेता, केवळ लक्षात ठेऊ. मालकी सिध्द झाली की अनुक्रमांक टाकून पुरावा म्हणून घेऊ.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. “ दैविक तुम्ही तुमची सर तपासणी पुढे चालू ठेवा.” 

“ तुम्हाला प्रत्यक्ष असा काही पुरावा मिळाला का की ज्यामुळे आरोपी सांगत असलेली गोष्ट खोटी आहे हे सिध्द होईल ? ” दैविक ने  विचारले.

“खूप पुरावे मिळाले. ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ सांगा , काय काय ते ”

“ पहिली बाब म्हणजे तपन ने जे बूट घातले होते,ते चिखलाच्या रस्त्यावर वापरलेले नव्हते.त्या बुटांना अजिबात चिखल लागलेला नव्हता. त्याने वापरलेल्या पॅण्ट ला  कोणत्याही ओलसर झुडपाचा स्पर्श ही झालेला नाही. त्याच्या कपड्यांना जरा सुद्धा चिखल नाही लागलेला.आरोपी जे सांगत्ये की मटणआणि अंडी , आम्लेट वगैरे बनवले पण खाल्ले नाही दोघानीही हे खोटे आहे कारण सर्व अन्न खावून फस्त झालेले होते. ”

दैविक दयाळ खुश होवून पाणिनी कडे वळून म्हणाला, “ तुम्ही घेऊ शकता उलट तपासणी.”

पाणिनी च्या कपाळाला आठ्या पडल्या.  “ तू  म्हणालास  की  तपन च्या बुटाला चिखल लागलेला नव्हता. तू तपासलेस का  ते बूट ? ”

 “ तपासले.फक्त बूट च नाही तर त्याची पॅण्ट ही तपासली.कशालाच चिखल नव्हता.तो जर कुंपणाच्या पलीकडील गवतातून फिरला असेल किंवा  चिखलाच्या कच्च्या रस्त्यावरून  गेला असेल तर त्याच्या कपड्याला ,बुटाला चिखल किंवा ओल्या गवताचे तुकडे चिकटलेले दिसायला हवे होते.तसे काहीही आढळले नाही.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

पाणिनी ला आश्चर्य वाटले. इन्स्पेक्टर तारकरच्या क्षमतेवर त्याचा विश्वास होताच, त्याचं बरोबर तो खोटे सांगणार नाही या बद्दल त्याला खात्री होती.दोघेही बालमित्र होते पण परिस्थितीने त्यांना एकमेकांविरुद्ध उभे केले होते.

“ आरोपीच्या अपार्टमेंट मधे तुम्ही शोध घेतला तेव्हा चिखल लागलेली अंडर पॅण्ट तुला मिळाली? ” पाणिनी ने विचारले.

“ हो मिळाली.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ त्याला लागलेला चिखल हा त्या कुंपणाच्या परिसरातील चिखलाशी मिळता जुळता आहे का , म्हणजे दोन्ही ठिकाणाची माती सारखीच आहे का याची तपासणी तुम्ही केली का? ”

“ नाही केली.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ का नाही केली मला समजेल का? ”

“ ती अंडर पॅण्ट म्हणजे तिथे मुद्दाम ठेवली गेलेली खोटी अंडर पॅण्ट होती असे आमचे मत आहे ,म्हणजे जसा तो ड्रेस चा तुकडा कुंपणाला मुद्दाम लटकवला होता तशीच ही अंडर पॅण्ट सुद्धा आमची दिशा भूल करण्यासाठी ठेवली होती असे आमचे मत आहे.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

“ असा निष्कर्ष कोणतीही तपासणी न करता काढणे चुकीचे आहे इन्स्पेक्टर.” पाणिनी म्हणाला.  “ माझी सूचना आहे की त्या अंडर पॅण्ट ”ला लागलेल्या चिखलाचे म्हणजे मातीचे नमुने घेऊन त्याची तुलना कुंपणाच्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्याशी केली जावी. मला आणखी काही विचारायचे नाही.

दॅट्स ऑल युअर ऑनर.”

“ दैविक तुम्हाला पुन्हा काही विचारायचे आहे? ” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ ही जी परिस्थिती अचानक निर्माण झाली आहे त्या वरून मला इन्स्पेक्टर तारकरन विचारायचे आहेत प्रश्न पुन्हा. ” दैविक म्हणाला.

“ मयत तपन ने  जे बूट आणि जी पॅण्ट घातली होती त्यावर तू काही खूण करून ठेवली आहेस का ओळख पटवण्यासाठी? ”  दैविक ने विचारले.

“ केली आहे तशी खूण ”

“ अत्ता या दोन्ही गोष्टी कोर्टात हजर कर.” दैविक म्हणाला.

“  त्यासाठी मला काही अवधी लागेल.मी अत्ता आणलेल्या नाहीत या दोन गोष्टी इथे.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

“ दहा मिनिटे पुरतील तुम्हाला?” दैविक ने विचारले.

“ पुरतील सर्.”

“ मी कोर्टाला दहा मिनिटे सुट्टी जाहीर करायची विनंती करतो ” दैविक म्हणाला.

“ एक विशेष बाब म्हणून थांबू आपण ,परंतू सरकार पक्षाने आधीच या गोष्टीचा अंदाज बांधून हे पुरावे आपल्या सोबत  कोर्टात आणून ठेवायला हवे होते. येथून पुढे अशा कोणत्याही कारणासाठी  कोर्टाचे कामकाज थांबणार नाही.” न्यायाधीशांनी तंबी भरली.

ते आपल्या चेंबर मधे गेल्यावर पाणिनी आकृती ला म्हणाला, “ माझ्याशी तू खोटे बोलली आहे का ? असेल तर आत्ताच सांग. नंतर तुला ईश्वर सुद्धा वाचवू शकणार नाही.”

“मी तुम्हाला सत्यच सांगितलंय पटवर्धन.”

“ जर त्यांनी ते बूट आणि कपडे कोर्टात आणून दाखवलं की त्याला चिखलाचा कण सुद्धा नाही लागलेला, तर तुझी रवानगी फाशी किंवा जन्मठेपेच्या दिशेने झालीच म्हणून समज.”

“ माझा नाईलाज आहे पटवर्धन पण विश्वास ठेवा मी तुम्हाला संपूर्ण सत्यच सांगितलंय. मी खरे बोलली आहे हे गृहीत धरूनच तुम्ही तुमची पुढची खेळी खेळा.”

पाणिनीच्या चेहेऱ्यावर काळजी उमटली.

“ खुनी माणसाने प्रेतावरचे बूट आणि कपडे बदलले , असे झालेले असू शकत नाही का ? ” आकृती ने शंका व्यक्त केली.

“ओह ! खरं की काय? ” पाणिनी झोंबणाऱ्या स्वरात म्हणाला.

“ कल्पना कर आकृती की तू म्हणतेस ती कल्पना न्यायाधीशांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे मला तर मी काय सांगू त्यांना? असे सांगू की तुझी आणि तपन ची झटपट होणार होती आणि नंतर त्याला चकवून तू त्याच्याच गाडीतून पळून जाणार  हे खुन्याला माहिती होते, म्हणून तो बुटाची   आणि मोज्याची जोडी आणि  पॅण्ट  घेऊन तयारच होता.तू गाडीतून निघून गेल्यावर आणि तपन पुन्हा घरात आल्यावर त्याने तपन ला भोसकले .नंतर त्याच्या तोंडात मटण आणि अंडी कोंबली. नंतर त्याच्या अंगात दुसरी पॅण्ट चढवली, मोजे आणि बूट बदलले..... किती हास्यास्पद ठरेल हे ! ”

 आकृती ला अश्रू अनावर झाले. “ पण दुसरे काय घडणार ? असेच घडले असले पाहिजे , नाहीतर त्याचे बूट आणि पॅण्ट स्वच्छः कसे? ”

पाणिनी काही बोलला नाही.तेवढ्यात इन्स्पेक्टर तारकर हातात एक पिशवी घेऊन आला.कार्तिक भाटवडेकर यांनी कोर्टाचे काम पुन्हा सुरु करायचे आदेश दिले. दैविक दयाळ यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“ तुम्ही आणलेल्या वस्तू आता इथे सादर करा.प्रथम बूट सादर करा. प्रेतावरून काढलेले बुटच आहेत ना ते? आणि अगदी त्याचं स्थितीत आहेत ना?”

“ अगदी त्याचं स्थितीत आहेत फक्त ओळखू येण्यासाठी खडू ने खुणा केल्या आहेत ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

दैविक ने ते आपल्या हातात घेतले.पाणिनी पटवर्धन कडे तपासणी साठी दिले.पाणिनी ने आपला चेहेरा भावनाहीन ठेवायचा प्रयत्न केला.

“ या वस्तू पुरावा म्हणून घेण्यात येण्याची मी विनंती करतो.” दैविक दयाळ म्हणाला.

“ त्या पूर्वी मी या साक्षीदाराला काही विचारू इच्छितो ” पाणिनी म्हणाला.

“ ठीक आहे विचारा.” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ तपन मेला तेव्हा त्याच्या पायात तेच बूट होते हे समजायला तुझ्या कडे काय पुरावा आहे? ”

“ जेव्हा मी प्रथम त्याचे प्रेत पहिले तेव्हा तेच बूट त्याच्या पायात होते.” इन्स्पेक्टर तारकरने खुलासा केला.

“ त्या आऊट हाऊस मधे इतर कपडे होते किंवा नाही हे शोधायचा तू प्रयत्न केलास की नाहीस?”

 

“ अर्थातच आम्ही केला ” इन्स्पेक्टर तारकर चिडून म्हणाला.  “ त्या घराचा कोपरा अन् कोपरा आम्ही पिंजून  काढला. तिथे आम्हाला मयताचे कोणतेही कपडे मिळाले नाहीत, अपवाद फक्त टेनिस च्या बुटाची एक जोडी, मयताच्याच मापाची. एक बर्म्युडा शॉर्ट,दोन जाकिटे,पोहण्याच्या शॉर्टस् दोन जोड्या, एक पुरुषांचा गाऊन,म्हणजे रोब. एक टोपी. एक सॅन्डल ची जोडी.”

“ तिथे इतर कपडे नाही मिळाले?” पाणिनी ने पुन्हा खोदून विचारले.

“ मयताच्या मापाचे नाही मिळाले. त्याच्या बुटाचे माप साडे दहा होते. त्याच्या वडलांचे काही कपडे मिळाले.स्वयंपाकाचा एप्रन वगैरे., आणि साडेआठ मापाचे बूट.ते वडलांचे म्हणजे नमन चे होते.तपन चे माप साडेदहा आहे. तपन वाद्त्याच्या वडिलांचे कपडे घालेल अशी शक्यता कमी आहे. ” इन्स्पेक्टर तारकरने उत्तर दिले.

“ तू अगदी काटेकोर पणाने जागेची तपासणी केलीस? ”

“ अक्षरशः पिंजून काढली जागा. पोहण्याच्या तलावाजवळील खोली सुद्धा.”

“ त्या घरात मद्य आणि खाद्य पदार्थाचा भरणा करून ठेवला होता.?”

पाणिनी ने विचारले.

“ मद्य, गोठवलेले अन्न, डबा बंद अन्न अशा वस्तूंचा साठा करून ठेवला होता.थोड्याफार नाशवंत पदार्थाचा पण साठा होता.ताजा ब्रेड नव्हता.एका वाडग्यात बिस्किट करायचे मिश्रण होते. ओव्हन मधे भाजलेल्या बिस्किटांची एक ताटली होती.सहा बिस्किटे खाल्लेली दिसतं होती तर सहा शिल्लक होती ताटलीत.एका छोट्या तव्यावर अंडी फ्राय केलेली दिसतं होती. खरकट्या ताटल्या तिथे होत्या.........” बोलता बोलता इन्स्पेक्टर तारकर अचानक दैविक दयाळ कडे बघून म्हणाला,  “ हे सगळं मी अत्ता सांगायचं आहे ना ,की बचाव पक्षाने विचारल्या नुसार मी फक्त कपड्या बद्दल बोलणे अपेक्षित आहे? ”

“ पटवर्धन हरकत घेत नाहीयेत तो पर्यंत सगळे सांग.” दैविक म्हणाला.

“ खरकट्या ताटलीला अंड्याचे पिवळे  बलक, आणि मांसाचे कण चिकटले होते जाम आणि बटर च्या बाटलीमधून. दोन्ही गोष्टी वाढून घेतलेल्या होत्या. या सर्व अन्नाचे आणि बिस्किटाचे कण ताटल्या वर चिकटलेले दिसत होते, शिवाय बाजूला कप –बशी सुद्धा होती. ”

“ किती कप आणि बश्या होत्या?” पाणिनी ने विचारले.

“ दोन. त्यात थोडी कॉफी शिल्लक होती.पाण्याचे दोन पेले होते.खरकट्या ताटल्या जेवणाच्या खोलीतील टेबल वर होत्या.तवा आणि अन्न शिजवायची भांडी स्वयंपाक घरातील शेगडी वर होती.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

“ मला आणखी नाही विचारायचे काहीच .” पाणिनी म्हणाला. “ दॅटस् ऑल युवर ऑनर.”

“ म्हणजे तुमची तात्पुरती ,या विषयापुरती उलट तपासणी संपली?”

“ होय संपली.पण बुटाच्या संदर्भातली फक्त.अन्य कपड्याचा बाबत मी उलट तपासणी चे अधिकार राखून ठेवतो.” पाणिनी ने स्पष्ट केले.

“ ठीक. मिस्टर दयाळ चालु करा तुमची पुढची सर् तपासणी.” न्यायाधीश म्हणाले.

“ मिस्टर तारकर, मृताच्या अंगावरील पॅण्ट चे काय? ” दैविक ने विचारले.

इन्स्पेक्टर तारकरने ती दैविक कडे सुपूर्त केली.
“ या पॅण्ट च्या वरच्या बाजूला डाग दिसतात.कसले आहेत ते? रक्ताचे का? आणि त्याचे प्रेत सापडले तेव्हा तेव्हा पासूनच ते आहेत का? ”

“ हो रक्ताचेच आहेत आणि प्रेत सापडल्या पासून चे च आहेत.”

“ ते बूट आणि ही पॅण्ट मी पुरावा म्हणून दाखल करण्यात यावा अशी विनंती करतो. ”

“ माझी काही हरकत नाही.” पाणिनी म्हणाला.

“ तुम्हाला पुन्हा तात्पुरती  म्हणजे हा पुरावा दाखल करून घेण्य बाबत च्या  विषया पुरती उलट तपासणी घ्यायची नाही का?” कार्तिक भाटवडेकर यांनी  पाणिनी ला विचारले.

“ नाही सर् पाणिनी म्हणाला.

“ ठीक आहे. बूट आणि पॅण्ट दोन्ही पुरावा म्हणून दाखल करा. ” कार्तिक भाटवडेकर यांनी आदेश दिला.

“ माझी सर् तपासणी संपली  ” दैविक दयाळ म्हणाला.

“  मिस्टर पटवर्धन, तुम्हाला उलट तपासणी घ्यायची आहे? ”

पाणिनी ने होकार दिला आणि तो प्रश्न विचारायला उभा राहिला.

“ तू म्हणालास की सर्व जागा पिंजून काढून तपासली.मग लिहायचे टेबल ही तपासले असशील ना? तिथे काही कागद पत्रे आणि चेक बुक , चेक च्या काउंटर  तुला दिसले असेलच.”

“ हो होते चेक बुक तिथे.”

“ते चेक बुक कोणाचे होते तुला समजले? “

“ आम्हाला  एवढे समजले की चेक च्या काउंटर वरचे  अक्षर तपन चे होते आणि ती काउंटर  ज्या मूळ चेक ची होती तो चेक बँकेत वटवला जाऊन रोख रक्कम काढली गेली होती आणि त्या मूळ चेक वरचे अक्षर ही तपन चे च होते. ” इन्स्पेक्टर तारकर सावध पणे म्हणाला.

“ सर्व चेक्स वरचे?”  पाणिनी ने विचारले.

“ एक चेक हरवलाय त्यातला.”

“ नेमका कुठला चेक ? ”
 “ ज्या चेक च्या काउंटर वर पाच हजार रक्कम टाकण्यात आली होती.”
“ तो चेक कोणाला दिला होता?”

“ कुणालाच् दिला नव्हता.”

“ म्हणजे ? ”

“ म्हणजे सकृत दर्शनी चेक लिहिला गेला होता पण काउंटर वर रक्कम टाकल्या  नंतर चेक बुक मधून फाडून टाकण्यात आला. काउंटर वर मात्र ओके असा शेरा लिहिण्यात आला.याचा अर्थ चेक फाडला असला तरी  काउंटर ठेवायला हरकत नाही पेई चे नाव न लिहिता ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ हे तुझे मत आहे किंवा अंदाजित निष्कर्ष आहे?” पाणिनी ने विचारले.

“ योग्य असे मत आहे.तुम्हाला फक्त वस्तुस्थिती हवी असेल तर माझे उत्तर असे असेल की  चेक च्या काउंटर स्लीप मधे एक चेक  पाच हजार रक्कम लिहिलेला होता त्यावर फक्त ओके एवढेच शब्द होते.”

“ आणि ते शब्द तपन च्या अक्षरातले होते?” पाणिनी ने विचारले

“ मला माहित नाही ” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला

“ हा जो चेक फाडण्यात आला होता आणि ज्याच्या काउंटर स्लीप वर पाच हजार रक्कम टाकली गेली होती तो चेक खुनाच्या दिवशीच फाडला गेला होता?”

“ मला माहित नाही ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

“ तुला माहित नाही? ”

“ नाही.” इन्स्पेक्टर तारकर ठाम पणे म्हणाला.

“ या काउंटर स्लीप च्या पुढेच एक काउंटर स्लीप होती त्यावर ओनिक केपसे असे नाव होते. बरोबर आहे की नाही? ” पाणिनी ने विचारले.

“ बरोबर आहे.”

“ आणि हा चेक सुद्धा पहिल्या चेक प्रमाणे फाडला गेला असणार. बरोबर का?”

पाणिनी ने विचारले.

“ हा प्रश्न  वादाला निमंत्रण देणारा आहे. आणि साक्षीदाराच्या निष्कर्षावर याचे उत्तर अवलंबून आहे.” दैविक दयाळ म्हणाला.

न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर यांनी पण मान हलवून त्याला दुजोरा दिला. तेवढ्यात पटवर्धन चे डावपेच दैविक च्या लक्षात आले. आणि लगेचच तो म्हणाला,  “ थांबा थांबा, मी माझी हरकत मागे घेतो. इन्स्पेक्टर तारकरन उत्तर देऊ दे या प्रश्नाचे. ”

“ कोर्टाला वस्तुस्थिती हवी आहे.साक्षीदाराचे मत नको.प्रश्नावर हरकत घेतली जावो किंवा न जावो ”

"माझं मत असं आहे की तपन ला  केपसे ला जो 5000 चा चेक द्यायचा होता तो नजरचुकीने त्याने दुसऱ्या चेक बुक मधून काढला. त्याला त्याची चूक लक्षात आल्यानंतर त्याने तो चेक फाडून टाकला.परंतु त्याची काऊंटर फाईल मात्र त्यांनी तशीच ठेवली आणि त्याच्यावर ओके असे शब्द लिहिले याचा अर्थ त्याला असे म्हणायचे असावे कि ही काउंटर फाईल इथेच राहिली तरी चालेल "  तारकर म्हणाला.," "आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा 5000 चा दुसरा चेक दुसऱ्या चेक बुक मधून काढला"

"हे चेक बुक तू पुरावा म्हणून जप्त केलेस का?" पटवर्धन ने विचारले

"कशाचा पुरावा?" इन्स्पेक्टर तारकर ने विचारले

" आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवशी मयत व्यक्तीने केलेल्या कृत्याचा पुरावा"

"आम्ही असले काही केले नाही.फक्त चेक ची यादी केली."इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

"ते चेक बुक अत्ता कुठे आहे?" पाणिनी ने विचारले

"ते त्या टेबलाच्या खणातच असेल.द्रौपदी मंडलिक ने मला फोन वर सांगितले की तुम्ही तिला ते चेक बुक पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगितले परंतु......."

कार्तिक भाटवडेकर यांनी तारकरचे बोलणे मधेच तोडले.

" ही साक्ष फारच भरकटत चालली आहे आणि ऐकीव माहिती दिली जात आहे. बचाव पक्षाला हवे असेल तर ते चेक बुक कोर्टात हजर करायची आज्ञा मी देतो पण त्याचा या खटल्याशी काय संबंध आहे माझ्या लक्षात येत नाही. " न्यायाधीश म्हणाले.

" जर कोर्टाची हरकत नसेल तर मी सांगतो खुलासेवार" पाणिनी म्हणाला.

"ही साक्ष दाखवून देते की तपन जेव्हा त्या आऊट हाऊस मध्ये आला तेव्हा त्याच्याकडे चेकबुक होते त्याने आपल्या खिशातून चेकबुक काढले आणि ज्याच्या नावाची अध्यक्षरे  ओके   अशी होती त्याच्या नावाने 5000 चा चेक लिहिला.तो घाईत असल्यामुळे चेकच्या काउंटरवर मात्र पूर्ण नाव न लिहिता फक्त अद्याक्षरे म्हणून ओके असे शब्द लिहिले."

" चेकवर तारीख लिहीली होती का?"

" नाही फक्त रक्कम लिहिली होती आणि आद्याक्षरे" पाणिनी पटवर्धन म्हणाला.

"तुमचं म्हणणं बरोबर आहे असं जरी समजलं तर पुढे काय? त्यांतून काय सिद्ध होणार आहे?"न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर यांनी विचारलं

" त्यातून सिद्ध होतं की आणखीन कोणीतरी त्या हाउस मध्ये होता त्या संध्याकाळी " पाणिनी म्हणाला.

"तुम्हाला हवं असेल तर तुमच्या बाजूने तुम्ही ते चेकबुक पुरावा म्हणून सादर करून घेऊ शकता. पण तुम्हाला सांगतो मी , त्यातून त्या आऊट हाऊस मध्ये आणखीन कोणी तरी होता हे सिद्ध करण्यासाठी ते चेकबुक पुरावा म्हणून कितपत उपयोगी ठरेल याची मला शंका आहे. तुम्हाला उलटतपासणीत आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत का?"

न्यायाधीशांनी विचारले

"नाही मला या साक्षीदाराला आणखीन कोणतेही प्रश्न उलट तपासणीत विचारायचे नाहीत. दॅट्स ऑल युवर ऑनर" पाणिनी म्हणाला आणि खुर्चीत बसला.

" सरकार पक्षाला अत्ता तरी कोणीही साक्षीदार आणायचा नाही निदान आत्ता तरी " दैविक दयाळ म्हणाला.

" एक मिनिट मी बोलू इच्छितो " पाणिनी पटवर्धन पुन्हा खुर्चीतून उठून उभा राहून म्हणाला

" प्रभाकर लघाटे  पोलीस अधिकारी याची उलटतपासणी घ्यायचा मला हक्क आहे"

" हो खरच तुम्ही तसे म्हणाला होतात मिस्टर पटवर्धन. मी निरोप दिला आहे प्रभाकर लघाटेला बोलण्यासाठी" दैविक दयाळ म्हणाला आणि आपल्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. दैविक च्या शेजारी बसलेल्या त्या अधिकाऱ्याने दैविक  दयाळ ला काहीतरी सांगितले त्यावर प्रतिक्रिया म्हणून दैविक च्या कपाळावर आठ्या पडल्या त्याचा चेहरा पडला हताशपणे तो उठून उभा राहिला आणि न्यायाधीशांना म्हणाला " माफ करा पण अत्यंत विचित्र परिस्थिती उद्भवली आहे. आम्ही प्रभाकर लघाटेला संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु आज त्याची सुट्टी आहे आणि तो कुठे गेला आहे माहित नाही त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही. खरंतर या परिस्थितीला मीच कारणीभूत आहे कारण मी प्रभाकर लघाटेला सांगितले होते की मिस्टर पटवर्धन यांनी जर तुझी साक्ष काय असेल हे मी सांगितल्यानंतर  जर आहे तसे स्वीकारले तर तुला प्रत्यक्ष साक्ष द्यायला यायची गरज लागणार नाही. मिस्टर पटवर्धन यांनी ती साक्ष स्वीकारली परंतु उलट तपासणी चे अधिकार अबाधित ठेवून ती स्वीकारली. म्हणजे प्रत्यक्षात ते प्रभाकर लघाटेला उलट तपासणीसाठी कधीही बोलावू शकत होते, परंतु ही गोष्ट आमच्या ऑफिस मार्फत प्रभाकर लघाटेला स्पष्टपणे सांगण्यात आली नाही त्यामुळे तो सुट्टी घेऊन बाहेर गेला आणि आता त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही. पुनश्च एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. त्या बदल्यात मी एक प्रस्ताव असा देतो की मिस्टर पाणिनी पटवर्धन यांनी त्यांची उलटतपासणी काय असणार आहे आणि त्यातून त्यांना कोणते मुद्दे सिद्ध करायचे आहेत हे जर स्पष्ट केले तर मी त्यांची उलटतपासणी आहे तशी स्वीकार करेन. यातून कोर्टाचा वेळ वाचेल"

या निवेदनावर कोर्टाने काही निर्णय देण्यापूर्वीच पाणिनीने ही गोष्ट मान्य नसल्याचे मान हलवून दर्शवले.

"प्रभाकर लघाटे ची उलटतपासणी घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे तसेच ठरले होते आणि सरकार पक्षाने मान्य केले होते"

या सगळ्या प्रकाराचा परिणाम म्हणून न्यायाधीशांच्या कपाळावर रागाने आठ्या पडल्या" मिस्टर पटवर्धन तुम्हाला उलटतपासणीत काय सिद्ध करायचे आहे हे तुमच्या मनात तयार असणारच ते आम्हाला सांगायला काय हरकत आहे? " न्यायाधीशांनी विचारले.

" अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी एक विशिष्ट सिद्धांत मनाशी ठरवून किंवा एक विशिष्ट व्यूह रचना मनाशी ठरवून प्रभाकर लघाटे ची उलटतपासणी घेण्याचे ठरवले आहे आणि  जोपर्यंत मी प्रभाकर लघाटेला सुरुवातीचे काही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत ती    व्यूह रचना मला आत्ता कोणालाच कळून द्यायची नाही. हा साक्षीदार म्हणजे एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सरकार पक्षाच्या तर्फे साक्षीदार म्हणून  आला आहे माझ्या उलटतपासणीत त्यांच्या या साक्षीदारावर मी जो काही हल्ला करणार आहे तो मी  सरकार पक्षाला का म्हणून स्पष्ट करू? " पाणिनीने शांतपणे पण स्पष्टपणे प्रतिप्रश्न केला.

" तुम्हाला त्याच्या साक्षी बद्दल संदेह आहे मनात?" न्यायाधीशांनी विचारले.

" साक्षी बद्दल ही आहे आणि प्रामाणिकपणाबद्दल ही आहे " पाणिनीने सडेतोडपणे उत्तर दिले

“ पण हे हास्यास्पद आहे. युअर ऑनर. हा माणूस पोलीस अधिकारी आहे. जेव्हा त्याने त्या गाडीवर समन्स चिकटवले, तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की तो नेहेमीच्या दैनंदिन कामाच्या  व्यतिरिक्त वेगळे काही करतोय म्हणून.मी त्याच्याशी वैयक्तिक आणि सविस्तर बोललो आहे.त्याने मला जे सांगितले ते सर्व मी कोर्टाला सांगितले आहे आणि त्याची दफ्तरी नोंद झाली आहे.प्रभाकर लघाटे च्या दृष्टीने तपन ची गाडी म्हणजे  समन्स लावलेल्या अनेक गाड्यातील एक गाडी होती. ” दैविक दयाळ ने स्वत:ची पाठ राखण केली.

कार्तिक भाटवडेकर यांनी पाणिनी कडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

“ ते काहीही असले तरी मला त्याची उलट तपासणी घ्यायचीच आहे ” पाणिनी ठाम पणे म्हणाला.

“ कायद्याने तुम्हाला साक्षीदाराला समोर आणून उलट तपासणी घेण्याचा अधिकार आहेच. ” कार्तिक भाटवडेकर वैतागून म्हणाले. “ एकंदरित हा खटला उद्या पर्यंत लांबणार असे दिसते. मला खर तर हा खटला आजच दुपार पर्यंत संपवायचा होता.आधीच बरीच प्रकरणे साचून आहेत. उद्याचा पूर्ण दिवस पुन्हा जाईल.दोन्ही बाजूचे वकील वेळ काढू पणा करताहेत.”

“ चूक माझी नाही.प्रभाकर लघाटे ची सर तपासणी मी मान्य केली.उलट तपासणी नाही सरकार पक्षाच्या हे लक्षात आले नाही.”

“ ठीक आहे कोर्ट उद्या सकाळी दहा वाजे पर्यंत तहकूब करण्यात येत आहे. आरोपी ला पुन्हा कोठडीतच राहू दे. पण पटवर्धन, तुमच्या उलट तपासणीत मला तुमचा विशिष्ट सिध्दांत दिसला नाही तर मात्र तुम्ही खटला लांबवण्याचा प्रयत्न करता आहात असे समजेन मी.” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

“ आकृती, तुला आणखी काही सांगायचं आहे मला? ” पाणिनीने विचारले

तिला अश्रू अनावर झाले होते.मानेनेच तिने पाणिनी ला नकार दिला.

“ ठीक आहे उद्या कोर्टात दहा वाजता भेटू.” पाणिनी म्हणाला.

(प्रकरण अकरा समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel