प्रकरण चौदा
 
 
सकाळी दहाला अर्धा मिनिट बाकी असतानाच अॅड.खांडेकर  लांब टांगा टाकत कोर्टात आले आणि पटवर्धन कडे शिष्ठाचार म्हणून ओळखीचा कटाक्ष टाकून आपल्या सहकाऱ्या शेजारी म्हणजे दैविक दयाळ शेजारी बसले. न्या.भाटवडेकर स्थानापन्न झाले.अॅड.खांडेकर  ना कोर्टात बघून त्यांना आश्चर्यच वाटले.  “  तुमचे काही काम होते का अॅड.खांडेकर ? ” त्यांनी विचारले.
“ नाही नाही.मी फक्त खटला ऐकायला आलोय. ” ते म्हणाले.
पण न्यायाधीशांचे या उत्तराने समाधान झाले नाही.  “ मला नवल वाटतय, हा अत्यंत साधा खटला आहे, प्राथमिक सुनावणी आहे. आणि जवळ जवळ संपताच आला आहे.अगदी एखादी दुसरी साक्ष बाकी आहे.”
“ ते काहीही असले तरी मी बसतो आहे कोर्टात.मी कोर्टाला सांगू इच्छितो की सकाळी अशा काही घडामोडी घडतील की संपूर्ण खटल्याचे स्वरूपच  बदलून जाईल असे मला वाटू लागलय.मागच्या तारखेला कोर्टाने कामकाज थांबवल्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या आहेत की त्या घटनांची खोलात जाऊन तपासणी होणे आवश्यक आहे.आणि त्यात मला स्वत:ला हस्तक्षेप करून सर्व तपास आणि त्यावरील कारवाई करावी लागणार आहे.” अॅड.खांडेकर  म्हणाले.
“ न्यायमूर्ती न्या.भाटवडेकर अजूनही संभ्रमातच होते. “ ठीक आहे बसा तुम्ही. आम्ही खटला चालू करतो.मिस्टर दैविक दयाळ , मागच्या तारखेला असे ठरले होते की प्रभाकर लघाटे या पोलीस अधिकाऱ्याची साक्ष काय असेल ते तुम्ही कथन केले होते आणि ते पटवर्धन यांनी उलट तपासणी चे अधिकार अबाधित ठेऊन मानता केले होते.आता पटवर्धन त्याची उलट तपासणी घेऊ इच्छित आहेत.”
“ इथे लघाटे उपस्थित आहे .  ” दैविक दयाळ म्हणाला.  “ प्रभाकर लघाटे पुढे या आणि शप्पथ घ्या.”
प्रभाकर लघाटे हा तिशीच्या घरातील माणूस होता.वर आलेली गालफडे, बारीक कापलेले केस आणि पातळ ओठ.असे त्याचे व्यक्तिमत्व होते. एकंदरीत तो निश्चयी स्वभावाचा वाटत होता. त्याने पिंजऱ्यात येऊन शपथ घेतल्यावर दैविक दयाळ त्याला पूर्व कल्पना देण्याचे दृष्टीने म्हणाला,  “ प्रभाकर लघाटे तू पाच तारखेला तपन ची गाडी अग्निरोधका समोर लावली गेल्यामुळे नियम बाह्य कृती म्हणून गाडीवर नोटीस चिकटवलीस, अशी तू साक्ष देशील असे मी कोर्टात सांगितले होते पटवर्धन यांनी तुझी प्रत्यक्ष साक्ष न घेता ते मान्य केले होते.आता ते तुझी उलट तपासणी घेणार आहेत  ”
पटवर्धन उठून उभा राहिला.  “ मिस्टर प्रभाकर लघाटे, तू लुल्ला च्या गाडीला नोटीस चिकटवलीस ती किती वाजता? ”
“ माझ्या कडील नोंदी नुसार सुमारे नऊ वाजता ,पाच तारखेच्या रात्री.”
“ गाडी नक्की कुठे लावण्यात आली होती?”
“मधुगंध अपार्टमेंटच्या बरोब्बर समोर असलेल्या अग्नी शमना समोर. ”
“ तू कामावर किती वाजता रुजू झालास”
“ सायंकाळी पाच ला”
“ तू तुझ्या वायरलेस गाडीत होतास?”
“ हो सर. ”
“ तुझ्या कामाचे स्वरूप काय असते साधारण?”
“ एखाद्या वाहनाने अगदी उघड उघड नियम बाह्य ठिकाणी वाहन लावले असेल, उदा. अग्नी शमन खांबा समोर बराच वेळ ,डबल पार्किग,म्हणजे गाडी च्या पुढे गाडी लावणे किंवा  एखाद्या रस्त्याच्या मध्ये यासारखे प्रसंग.तर आम्ही त्याला समन्स लावतो.  मग पुन्हा दुसरीकडे  गस्त घालायला जाऊन येतो, साधारण अर्धा तासात, तेव्हा सुद्धा वाहन हललेले दिसले नाही तर ते उचलून नेण्याची व्यवस्था करतो. ”
“ तुझ्या कार्य क्षेत्राच्याच हद्दीत तपन ची गाडी होती? ”
“ अर्थातच .”
“ आणि तू तुझ्या हद्दीत सायंकाळी पाच वाजल्या पासून गस्त घालत होतास? ”
“ हो सर्.”
“ या गस्तीच्या दरम्यान मधुगंध अपार्टमेंट वरून  सरासरी प्रत्येक तासाला गस्त घातली असशील ना ? ”
“ आता हे सांगणे अवघड आहे.कारण कधी कधी आम्ही त्या अपार्टमेंट वरून गेलो कधी कधी त्याला समांतर किंवा जवळच्या रस्त्याने गेलो.”
“ तरी सुद्धा, संध्याकाळी पाच ते रात्री बारा या वेळेत, अगदी दर तासाला नाही पण अनेकदा त्या अपार्टमेंट वरून गस्त घालत गेला असशील ना? ” पाणिनी ने विचारले.
“ हो . अनेकदा गेलो असेन.”
“ या तुझ्या गस्तीच्या  काळात तुला त्या अपार्टमेंट समोरच्या  अग्नी रोधाकासमोर लावलेली लुल्ला ची गाडी अनेकदा  दिसली असेल ना? ”
“ अर्थातच. म्हणून तर मी नोटीस चिकटवली. ”“ माझा प्रश्न नीट समजावून घे.” पटवर्धन म्हणाला.  “ गस्त घालत असताना तुला ती गाडी रात्री नऊ च्या पूर्वी दिसली होती का? कारण तू समन्स नऊ वाजता चिकटवलंस.”
“ नाही ,त्यापूर्वी नाही दिसली.” प्रभाकर लघाटे म्हणाला.
“ याचाच अर्थ तू जेव्हा त्या गाडीला समन्स –नोटीस लावलीस तेव्हाच तुला ती प्रथम दिसली?”
“ हो सर.”
“ त्याच भागात नियम बाह्य लावलेल्या गाडयात तुला जास्त रस होता का? काय कारण आहे त्याचे?” पाणिनी ने विचारले.
“ आम्हाला त्या भागातील रहिवाश्यांकडून तशा तक्रारी आल्या होत्या.त्यामुळे आम्ही तशा गाड्या विरुद्ध मोहीमच उघडली होती. ”
“ या अर्थ असा की पाच तारखेला रात्री नऊ वाजण्यापूर्वी तू  गस्त घालताना जेव्हा जेव्हा  त्या अपार्टमेंट वरून गेलास तेव्हा विशेषत्वाने नियम बाह्य लावण्यात आलेल्या  गाड्या वरच  तुझी नजर होती? ”
साक्षीदार थोडा घुटमळला. नंतर म्हणाला,  “ हो ”
“ इतर किती गाड्यांना तू समन्स लावलेस त्या रात्री ? ”
“ दोन गाड्यांना.”
“ तपन ची सोडून दोन?”
“ होय.”
“ नेमके तक्रारीचे स्वरूप काय आहे आणि कारण काय घडते की नियम बाह्य पार्किग होते?”
“ एका चौकात तीन मोठी अपार्टमेंट आहेत.त्यातल्या बऱ्याच अपार्टमेंट मध्ये स्वत:चे गाडी लावायला जागा नाही. त्यातल्या एका इमारतीजवळ रिकामी जागा आहे जिथे गाड्या लावल्या जातात. बाकीच्यांना रस्त्यावर लावाव्या लागतात.संध्याकाळी मात्र अशा वेड्या वाकड्या लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूक तुंबते आणि मग तक्रारी येतात.”
“  पाच तारखेला रात्री नऊ नंतर तू किती वेळ कामावर होतास? ”
“ मध्य रात्री पर्यंत.”
“ रात्री नऊ ला तू समन्स लावल्या नंतर, तू गस्त चालूच ठेवलीस बरोबर? त्या दरम्यान मध्यरात्री पर्यंत तपन ची  गाडी तिथेच अग्नी रोधाका समोर होती का?”
“ मला नाही माहीत.” प्रभाकर लघाटे म्हणाला.
“ का नाही माहिती तुला हे? ” पाणिनी ने विचारले.
“ माझ त्याकडे लक्ष नाही गेले.मला असं वाटल की....”
“ तुला काय वाटल या पेक्षा तुला काय माहीत आहे त्या विषयी बोलू.”
“ हो सर्”
“  रात्री नऊ ते बारा या दरम्यान त्याची गाडी अग्नी रोधकासमोर लावलेली होती  हे तुला माहिती होते? ”
“ नव्हते माहीत ”
“  बरं , आता मला सांग की ती गाडी अग्नी रोधकासमोर लावलेली नाही  हे तुला माहित होतं? ” पाणिनी ने सापळा टाकला.
साक्षीदार अडखळला.काय बोलावे हे त्याला सुचेना.
“  हो  किंवा नाही ” पाणिनी म्हणाला.
साक्षीदाराने आपले डोके खाजवले , डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. डोळे मिटूनच समोर प्रसंग उभा करायचा प्रयत्न करून तो म्हणाला, “ मला नाही वाटत  नऊ ते बारा च्या दरम्यान ती गाडी तिथे होती असे. ”
“ तुला खात्री नाही?” पाणिनी ने त्याला बोलता करण्याचा प्रयत्न केला.
“ आहे मला खात्री, म्हणजे मी जास्तीत जास्त खात्री देऊ शकतो की गाडी नव्हती तिथे.”
“ आता का वाटत्ये खात्री ? मगाशी तू थोडा  साशंक होतास.”
“ मला स्मरतंय की माझी कामाची वेळ बारा ला संपण्यापूर्वी मी साधारण अकरा वाजता गस्त घालता घालता त्या रस्त्याने गाडी वळवली ,मला बघायचे होते की मी समन्स लावलेल्या गाड्यांपैकी किती गाड्या तिथून हलल्या आहेत आणि किती अजूनही तिथेच आहेत. ”
“  म्हणून मग तू तिथे तपन ची  गाडी दिसते का नजर टाकलीस? ” पाणिनी ने विचारलं.
“ तपन च्या च गाडीकडे विशेषत्वाने  नजर टाकली असे नाही मिस्टर पटवर्धन, मी ठरवले होते की ड्युटी संपवून घरी जाण्यापूर्वी ज्या ज्या गाड्यांना मी नोटीसा लावल्या होत्या त्या जर तिथून हलल्या नसतील तर त्या सर्व क्रेन आणून उचलून न्यायच्या  ”
“ आणि तुला तिथे तपन ची गाडी दिसली नाही? ” पाणिनी ने विचारले.
“ नाही दिसली.”
“ ती तिथे आहे का हे तू पाहिलस का ? ”
“ मोकळे पणाने आणि खरे सांगायचे तर आम्ही त्या मधुगंध अपार्टमेंट जवळ असताना आम्हाला वायरलेस वरून सूचना आली की दुसऱ्या एका ठिकाणी रहदारीची समस्या निर्माण झाली आहे तिकडे जा.आता मला घटना  क्रम नीट आठवत नाही म्हणजे आम्हाला आलेला वायरलेस फोन हा आम्ही मधुगंध अपार्टमेंट जवळ आल्यावर आला होता की तिथून पुढे गेल्यावर आला होता.  पण जर का तो फोन आधी आला असेल तर मला तातडीने त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जावे लागले असते आणि मग मी तिथे लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्या बाबत तेवढा जागरूक राहिलो नसतो. माफ करा पटवर्धन मला पण मी जास्तीत जास्त आठवून सांगायचा प्रयत्न केला आहे, माझ्या नोंदी तपासल्या आहेत, वरिष्ठांशी चर्चा ही केली आहे. सरकारी वकिलांशी पण बोललो आहे. ”
“  या सगळ्याचा सारांश म्हणून तू एका वाक्यात काय सांगशील? ” पाणिनी ने विचारले.
“ रात्री अकराच्या सुमारास तपन ची गाडी  त्या अग्नी रोधका समोर नव्हती. ”
पाणिनी खुश झाला.  “  ज्या इतर गाड्यांना तू नोटीसा चिकटवल्यास त्या बद्दल काय सांगशील? ”
 “ खास  असे नाही सांगता येणार  अगदी रुटीन म्हणून मी अनेक गाड्यांना समन्स लावतो. त्या नंतर मालक किंवा त्यांचे ड्रायव्हर तिथून त्या हलवतात.काही जण ते लाऊन सुद्धा हलवत नाहीत.मग त्या जप्त करून उचलून नेल्या जातात. थोडक्यात समन्स लावल्यावर ठराविक काळा नंतर गाडी तिथून लाटेच.मालक कडून किवा वाहन जप्ती करणाऱ्या पोलिसांकडून. मला त्या सर्व गाड्या स्मरणात नाही राहणार.”
“ त्या गाड्या कुठे कुठे लावल्या होत्या किंवा नेमका कोणता नियम मोडला गेला होता? ” पाणिनी ने विचारले.
“ मला आठवते त्या प्रमाणे त्यातली एक अग्नी रोधका समोर लावली होती. एक रस्त्यावर  रहदारी ला अडथळा येईल अशी लावली होती. दुसरी  एक  गाडी  पार्क केलेल्या गाडी  पुढे लावली होती. म्हणजे डबल पार्किंग.त्याचे इंजिन चालू होते.गाडीतले दिवे पण चालू होते.थोड्या काळासाठी गाडीचा चालक बाहेर पडला असावा.मी थोडा वेळ वाट बघितली आणि शेवटी गाडीला समन्स लावले. ” प्रभाकर लघाटे म्हणाला.
“ नंतर काय? ”
“ नंतर मी गाडी चालवत पुढच्या कोपऱ्या पर्यंत गेलो तेव्हा आरशातून मला दिसले की त्या  गाडी चा ड्रायव्हर आला होता आणि गाडी निघून गेली होती.त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष दिले नाही. ”
“ तपन चा जर त्याच रात्री खून झाला नसता आणि तुझ्या   नंतर  कामाला आलेल्या पोलिसाने  जर तुला असे सांगितले नसते की तू समन्स लावलेली गाडी  अगदी त्याच जागी आहे तशी होती , तर तुला असेच वाटले असते  की इतर गाड्या ज्याप्रमाणे समन्स लावल्यावर मालक तिथून हलवतात किंवा पोलिसांची एक तुकडी येऊन गाडी उचलून नेते, अगदी त्याच प्रमाणे तपन ची गाडी सुद्धा तिथून हलवली गेली होती. बरोबर आहे की नाही? ” पाणिनी ने विचारले.
“ एकदम बरोबर.मी त्याच समजुतीत असतो.” प्रभाकर लघाटे म्हणाला.
“ आणि तुझे मत असेच आहे ना की रात्री नऊ ते बारा या वेळेत ती गाडी तिथे नव्हती ” पाणिनी ने विचारले.
“ ते मी आधीच सांगितलंय मिस्टर पटवर्धन.” प्रभाकर लघाटे म्हणाला.
“ दॅट्स ऑल युवर ऑनर” पाणिनी म्हणाला.  “ माझी उलट तपासणी संपली.”
“ मला फेर तपासणी घ्यायची नाहीये.” दैविक दयाळ  म्हणाला.
न्यायाधीश भाटवडेकर यांनी घड्याळाकडे पाहिले त्यांच्या अपेक्षेपेक्षा खटला खूपच रेंगाळत चालला होता पण त्यात आता नवीन नवीन वळण निर्माण होते तरी ते थोडे कंटाळलेले दिसले कोर्ट कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात येत आहे ते म्हणाले
.(प्रकरण-14समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel