खांडेकर ना कळून चुकले की आपण पाणिनीच्या जाळ्यात अलगद येऊन पडलो.............( पुढे चालू...)
ते उठून काहीतरी बोलायला गेले आणि बसले.
“ पटवर्धन तुम्ही तुमचे तर्क सांगा पुराव्यामागाचे. करा सुरु.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“ परिस्थिती अशी होती युवर ऑनर,” पाणिनी ने उठून बोलायला सुरुवात केली.
“ आकृती ने तपन ची गाडी  घेऊन पोबारा केल्यावर तो आऊट हाऊस वर आला असावा.त्याची प्रचंड चिडचिड झाल्यामुळे  आकृती वरील रागाच्या भरात तिने बनवलेले मटण, अंडी याला त्याने केराची टोपली दाखवली.कॉफी सुध्दा त्याने प्याली नसावी.राग शांत करायला त्याने दारू ढोसली असावी.पुढे काय करावे याचाच तो विचार करत असावा.त्याला त्याची गाडी कुठे असेल ते माहीत नव्हते, आणि हे ही कळायला मार्ग नव्हता की आकृती त्याच्या विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करायला गेली आहे की नाही.आकृती ने घरी आल्यावर मैत्रिणीच्या नात्याने मैथिली  आहुजा ला सर्व सांगितले असावे.पण  मैथिली  आहुजा चे तपन शी सुध्दा निकटचे संबंध होते म्हणून आकृती कडून सर्व कळल्यावर तिने तपन ला फोन केला –आणि तसे रेकोर्ड ही आता आमचे कडे आहे.आणि तिने तपन ला सर्व सांगितले असावे.तपन ची कामवासना आकृती मुळे अपुरी राहिली होती त्याला स्त्री सहवास तातडीने हवा होता म्हणून तो मैथिली  ला म्हणाला असावा की माझी गाडी घेऊन तातडीने मला भेटायला ये.आणि कोणाला तरी निरोप देऊन माझ्या फ्लॅट मधून कोरडे कपडे आणि बूट माझ्याकडे पाठवायची व्यवस्था कर.”
“मैथिली हुशार होती तिला माहीत होते की ती एकटीच त्याला भेटायला गेली तर तपन त्याची  अतृप्त कामवासना  पूर्ण करण्यासाठी तिचा वापर करेल म्हणून तिला तिच्या बरोबर कोणीतरी सोबतीला हवे होते.म्हणून  त्या व्यक्तीला तिने  फोन करून तिच्या सोबत आऊटहाऊस ला यायला सांगितले. त्या नंतर  दुसरा फोन केला अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीकडे तपन च्या फ्लॅट ची किल्ली होती आमच्या  रेकोर्ड नुसार  हे दोन फोन म्हणजे जयराज आर्य आणि मिस अभिज्ञा बोरा यांना केले गेले होते.आता या दोघांपैकी तपन च्या घरी कपडे आणि बूट आणायला कोण गेले आणि  मैथिली बरोबर आऊटहाऊस ला कोण गेले याचा अंदाज आपल्याला करावा लागेल ” पाणिनी म्हणाला.
 न्यायाधीश आणि दोन्ही सरकारी वकील उत्सुकतेने पाणिनी पुढे काय सांगतो हे ऐकण्यात मग्न झाले होते.
पाणिनी पुढे सांगू लागला.  “ आपल्याला माहीत झालंय की तपन च्या अपार्टमेंट समोर  वेड्या वाकड्या प्रकारे गाड्या लावल्या गेल्या होत्या.नवीन गाड्या लावायला जागाच नव्हती,खुद्द प्रभाकर लघाटे नेच हे सांगितले आहे.जी व्यक्ती तपन च्या वस्तू आणायला त्याच्या फ्लॅट मधे गेली ती खूप घाईत असणार कारण त्या वस्तू तातडीने तपन पर्यंत पोचवा असाच तपन चा आदेश होता.त्यामुळे पार्किंग साठी जागा मिळायची वाट न पाहता त्या व्यक्तीने डबल पार्किंग केले म्हणजे गाडी च्या पुढे आपली गाडी लावली असावी. आता प्रभाकर लघाटे ची साक्ष असे दाखवून देते की त्याने अग्नी रोधकाच्या  खांबा समोरच्या  तपन च्या गाडीला समन्स लावले  आणि नंतर केव्हातरी  डबल पार्किंग करण्याबद्दल आणखी एका गाडीला समन्स लावले.आता आम्ही आणलेली माहिती असे दाखवते की डबल पार्किंग चे समन्स लावलेली गाडी मिस अभिज्ञा बोरा ची होती आणि मैथिली चा फोन आल्या नंतर अभिज्ञा बोरा तिथे किती वेळात पोचली असेल याचा अंदाज बांधला तर  समन्स लावल्याची वेळ त्या वेळेशी बरोबर जुळते.  ”
पाणिनी पुन्हा नाट्यमय रीतीने थांबला. न्यायाधीश आणि दोन्ही सरकारी वकील उत्सुकतेने पाणिनी पुढे काय सांगतो हे ऐकण्यात मग्न झाले होते.
“ याचाच दुसरा अर्थ असा की  मैथिली बरोबर तपन ची गाडी घेऊन  आऊट हाऊस ला गेलेली व्यक्ती  म्हणजे जयराज आर्य असावा आणि तपन चे बूट आणि कपडे घेऊन गेलेली व्यक्ती अभिज्ञा बोरा असली पाहिजे. ”
“ म्हणजेच तपन ला शेवटचे जिवंत असताना पाहिलेली व्यक्ती अभिज्ञा असली पाहिजे ” पाणिनीने बोलणे पूर्ण केले.
 कोर्टात सन्नाटा !!!.
 
“ तपन ला शेवटचे जिवंत असताना पाहिलेली आणि मेल्या नंतर सर्वात  प्रथम पाहणारी  दोन्ही व्यक्ती  मीच आहे ”
 कोर्टात बसलेल्या प्रेक्षकातून मागील बाजूने आवाज आला. सर्वानीच मागे वळून पहिले.
 
कोर्टात बसलेली अभिज्ञा बोरा उठली आणि दबकत पुढे आली.  “ मला कोर्टाला काही सांगायचं.”
“ हे कोर्टाच्या कार्य पद्धतीला धरून नाही.” खांडेकर म्हणाले.
“ सरकारी वकिलांनी यात कोणताही हस्तक्षेप करू नये. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.  “ तुला काय बोलायचय मिस  ? ”
“ मीच मिस अभिज्ञा बोरा आहे नमन लुल्ला यांची खाजगी सेक्रेटरी. मी आता थकल्ये फसवणुकीला.आणि  कंटाळा आलाय गुप्त प्रेम संबंधा चा. मला सहनच नाही झालं हे काही आणि मी मारला त्याला त्या पाच तारखेच्या रात्री ”
कोर्टात जमलेले सर्व लोकंच काय, अॅड.दैविक दयाळ,खांडेकर आणि खुद्द न्या.भाटवडेकर सुन्न झाले.
काही क्षण तिथे काळ थांबल्या सारखी शांतता पसरली.
सर्वात प्रथम भानावर आले न्या.भाटवडेकर. “ पुढे येऊन पिंजऱ्यात उभी रहा आणि शपथ घे.” ते म्हणाले.  “ एक लक्षात ठेव तू जे काही सांगणार आहेस त्याचा वापर तुझ्या विरुद्ध केला जाऊ शकतो.तुला कोणी वकील द्यायचा आहे?  तू तुझा माहिती न देण्याचा हक्क सुद्धा वापरू शकतेस.”
“ छे छे, उलट मला माझ्या मनावरचे ओझे कमीच करायचयं सर्व काही सांगून.” अभिज्ञा बोरा म्हणाली.
“  ठीक आहे बोलून मोकळी हो.” न्या.भाटवडेकर म्हणाले.
“लुल्ला कंपनीत मी नोकरीला लागल्यावर काही  ना काही कारणाने माझा सतत तपन शी संबंध येत गेला आणि आमच्यात जवळिक निर्माण झाली.  मला वाटू लागलं की तो माझ्शी लग्न करेल.त्याने पण मला सांगितले की तो त्यासाठी त्याच्या वडिलांना तयार करेल.त्याची पार्श्वभूमी म्हणून किंवा पूर्व तयारी म्हणून तो माझी बदली  त्याच्या वडिलांची सेक्रेटरी म्हणून करील.म्हणजे त्यांचा रोजच माझ्याशी संबंध येईल आणि त्यांचेवर मला माझा प्रभाव टाकता येईल. माझ्या बदली नंतर मला कळलं की तपन चे आणखी एका मुली बरोबर लफडं चालू आहे.तिचं नाव आहे  ”मैथिली आहुजा. ती एक आकर्षक आणि उमद्या स्वभावाची तरुणी आहे.एकदम आधुनिक.मी तिला जाऊन भेटले आणि सगळ सांगितलं.ती म्हणाली की तिच्या दृष्टीने तरी तपन  आणि तिचे नाते फक्त मैत्रीचे आहे,आणि त्याच्या पलीकडे दुसरे कोणतेही नाते ती निर्माण होवू देणार नाही.तिने सांगितले की तिला स्वत:ला  जयराज आर्य मधे रस आहे.तिने मला हमी दिली की माझ्या आणि तपन च्या प्रेमाच्या आड ती येणार नाही त्यासाठी हवे तर नोकरी सुद्धा सोडायची तिने तयारी दाखवली.आणि नंतर खरेच सोडली सुद्धा.म्हणूनच म्हणाले मी , की  मैथिली ही अत्यंत उदार आणि उमद्या स्वभावाची आहे.”
“ तपन ने सतत तिला भेटायचा म्हणजे डेटिंग करायचा प्रयत्न केला पण ती मात्र जयराज आर्य च्याच प्रेमात होती .तपन बरोबर तिने फक्त मित्र म्हणूनच संबंध ठेवले.मी मात्र तपन च्या बाहेरख्याली पणा कडे डोळेझाक करत गेले.”
“ पाच तारखेच्या रात्री  मैथिली ने मला फोन करून सांगितले की तपन ने आकृतीला फसवून आऊट हाऊस वर नेले आणि अतिप्रसंग केला.त्याला गुंगारा देऊन ती निसटली आणि त्याचीच गाडी पळवून घरी गेली.तपन जाम टरकला होता ,वडिलांना हे कळले तर ते काय करतील म्हणून.त्या जागेचा वापर तो अशा कारणासाठी करतो याचा वडिलांना अंदाज आला होता आणि त्यांनी त्याला या पूर्वी एक दोन वेळा या कारणास्तव चांगलेच तासडले होते. ”
“ मैथिली ने मला सांगीतले की मी तपन च्या घरी जाऊन त्याचे कपडे आणि बूट घेऊन आऊट हाऊस वर जावे असा तपन चा निरोप आहे.त्याच्या घराची एक किल्ली माझेकडे असते , तेवढे आमचे जवळचे संबंध होते. ”
“ मी घाई घाईत त्याच्या अपार्टमेंट पाशी गेले ,जागा नसल्याने माझी गाडी दुसऱ्या गाड्यांपुढे लावली त्याच्या वस्तू घेतल्या खाली आले तेव्हा गाडीला समन्स लावलेले दिसले.मी तशीच आऊट हाऊस वर पोचले.तिथे तपन प्रचंड प्यालेल्या अवस्थेत दिसला.मी आणलेले कपडे आणि बूट त्याने बदलले.त्याच्या साठी कडक कॉफी बनवली.मटण आणि अंडी बनवली, थंड झालेली बिस्किटे ओव्हन मधे होती, ती गरम केली.आम्ही दोघांनी ते सर्व एकत्र खाल्ले. ”
“ त्या वेळी मला तो अत्यंत  किळसवाणा वाटला.मला त्याने नावे ठेवली.मी दिसायला चांगली आहे पण आकर्षक नाही.त्याने एक नवीन  मुलगी पटवली आहे आणि तिच्यापुढे मी काहीच नाही असे ऐकवले.अत्यंत निर्लज्जपणे त्याने  आकृती च्या घरी जाऊन तिला क्षमा मागायला लावण्याचा मनोदय त्याने बोलून दाखवला. नाहीतर तिच्यावर तो गाडी चोरल्याचा गुन्हा दाखल  करणार होता.”
“ तो तेव्हा अक्षरशः एखाद्या पशू सारखा मला वाटला. त्याची काम वासना पूर्ण करण्यासाठी त्याने माझ्याशी लगट करायचा प्रयत्न केला,पण त्या आधी माझ्या सौदर्याला नावे ठेऊन मला दुखावले होते.मला हे सर्व सहन न होऊन मी त्याच्या मुस्कडात मारली.त्याने माझा गळा दाबला.मी किचन  मधे पळाले, तो आत आला.किचन आणि बाहेर ची खोली यांना जोडणारे दार अडवून तो उभा होता. एखाद्या क्रूर लांडग्या सारखा त्याचा चेहेरा झाला होता.आमच्या मधे टेबल होते.मी हात मागे नेऊन हाताला येईल ती सुरी उचलली.त्याला घाबरवण्याचे  दृष्टीने मी त्याच्यावर वार करण्याचा अभिनय केला पण त्याक त्याच वेळी त्याने मला चवड्याने ढकलण्याचा प्रयत्न केला केला पण तो फसून त्याचा तोल गेला.पण मी घाबरवण्यासाठी फिरवलेली सुरी त्याच्या पाठीत घुसली. मला कळलेच नाही की तो माझ्या त्या वाराने मेला म्हणून. मला वाटले नाही की ती सुरी इतक्या सहज त्याच्या पाठीत घुसेल म्हणून.तो वरवर जखमी झाला असेच मला त्यावेळी वाटले.मी बाहेच्या खोलीत पळाले. त्याही स्थितीत तो मला पकडायला धडपडत आला.पण टेबलाला अडखळला आणि पडला.मी माझी गाडी घेऊन तिथून अक्षरश: धूम ठोकली.”
कोर्टात सन्नाटा !
“ मिस अभिज्ञा बोरा, तो तुम्हाला पाच हजाराच्या चेक बद्दल काही बोलला? ” पाणिनी ने विचारले.
तिने मानेने होकार दिला.  “ त्या मुळेच तर आकृती च्या बाबतीत तो उतावीळ झाला होता. तो म्हणाला आकृती बरोबर सावकाश ,रसिकतेने प्रणय करण्याचे मनसुबे  त्याने रचले होते पण ओमकार केसवड चा फोन आला की तो आणि द्रौपदी मंडलिक तिथे लगेच येताहेत.त्यांना पाच हजार द्यायचे आहेत, नाहीतर ते माझी सगळी लफडी वडिलांना सांगण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे त्याला त्याच्या कार्यक्रमात बदल करावा पण तो कामांध झाला होता त्यामुळे ओमकार आणि द्रौपदी येण्यापूर्वी आकृती ला भोगण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पुढचे सगळे घडले. ”
पाणिनी पटवर्धन जयराज आर्य कडे वळून म्हणाला “ तुमच्या कडून सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल.” पाणिनी ने कोर्टाकडे बघितले.न्यायाधीशांचे म्हणणे काय असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.न्या.भाटवडेकर नी मान डोलावली.
“ खर सांगायचं तर मी आणि मैथिली आता नवरा बायको आहोत ! ” जयराज आर्य म्हणाला.  “ काल सायंकाळी आम्ही लग्न केलं.आता कायद्या प्रमाणे आम्हाला एकमेकांविरुद्द साक्ष द्यायला कोर्ट भाग पडू शकत नाही.”
एवढे बोलून तो खाली बसला.
न्या.भाटवडेकर यांनी आधी पटवर्धन कडे नंतर खांडेकर आणि अॅड.दैविक दयाळ कडे पहिले.  “ आरोपीच्या वकिलांना काही अजून पुरावे सादर करायचे आहेत? ”
“ काही नाही.” पाणिनी ने जाहीर केले.  “ दॅट्स ऑल युअर ऑनर ”
“ आकृती विरुद्धचा हा खटला कोर्ट निकाली काढत आहे.आकृती ची आरोपातून मुक्तता करत आहे.  मिस अभिज्ञा बोरा ला कोठडीत ठेवण्याचे आदेश देत आहे.आणि हे अत्यंत नाईलाजाने करावे लागत आहे.कारण कोर्टाचे  असे मत आहे की या तरुणीने आपली हकीगत अत्यंत प्रामाणिक पणाने आणि निर्भीड पणे कोर्टाला सांगितली आहे.कोर्टाचे असे स्पष्ट मत आहे की मिस अभिज्ञा बोरा ने तपन ला स्वतःचा बचाव करतानाच न कळत मारले आहे. कोर्ट आपले कामकाज थांबवत आहे.” न्या.भाटवडेकर म्हणाले आणि उठून आपल्या खोलीत निघून गेले.
 
या निकाला नंतर आकृती ,सौम्या कनक ओजस  पाणिनी पटवर्धन बरोबर त्याच्या ऑफिसात बसले.आकृती तर आनंदाने वेडी व्हायचीच बाकी होती.आपल्या डोळ्यातून अश्रूंना मोकळे पणाने वाट करून देत होती.सौम्या तिला प्रेमाने थोपटत होती.
“ चला , एक प्रकरण संपले ! ” पाणिनी उद्गारला.
“ तुमच्या दृष्टीने अनेक खटल्यातला एक खटला संपला पण माझ्या दृष्टीने एक नवी सुरुवात झाली आहे.नव्या जीवनाची सुरुवात.” आकृती म्हणाली.
“ पाणिनी काय झालं नक्की ?  बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.”ओजस म्हणाला.  “ म्हणजे मैथिली पूर्वीच अभिज्ञा बोरा कशी पोचली तिथे.आणि मैथिली आधी पोचली असती तर काय बदल झाले असते ?”
“ साधे आणि सोपे आहे.” पाणिनी म्हणाला “  मैथिली हुशार होती.तिने ओळखले होते की कपडे आणि बूट जर अभिज्ञा बोरा आणून देणार होती  तर तपन ला मी कशाला हवे होते? अर्थात स्त्री म्हणून उपभोग घेण्यासाठी.म्हणजे जे आकृती बाबत घडले ते तपन ने तिच्या बाबत केले असते.म्हणून तिने अभिज्ञा बोरा ला सांगितलेच नाही की तपन ने तिला म्हणजे मैथिलीला   पण बोलावले आहे. तिने एवढेच सांगितले की तातडीने कपडे आणि बूट घेऊन तपन ला नेऊन दे. अभिज्ञा बोरा गेल्या नंतरच जायचे असेच नियोजन मैथिली ने केले होते.तरी तपन समोर एकटे जायला लागू नये म्हणून तिने जयराज आर्य या आपल्या प्रियकराला सोबत यायला सांगितले.”
“ पण अभिज्ञा बोरा स्वतःची गाडी न नेता अग्नी रोधकाजवळ लावलेली तपन ची च गाडी घेऊन का नाही गेली तपन कडे? ”ओजसने विचारले.
“ अभिज्ञा बोरा ला मैथिली ने कुठे सांगीतले होते की त्याची गाडी घेऊन ये म्हणून ?  तिला माहीत पण नव्हते तेव्हा की त्याची गाडी अग्नी रोधकासमोर लावली वगैरे.तपन च्या डोक्यात होत की मैथिली ने तपन ची गाडी घेऊन त्याच्याकडे यावे,अभिज्ञा बोरा तिच्या स्वतःच्या गाडीने त्याच्या घरून त्याच्या वस्तू घेऊन येईल ,नंतर अभिज्ञा बोरा आणि मैथिली या दोघी जणी अभिज्ञा बोरा च्या गाडीने परत जातील आणि तपन स्वतःची गाडी घेऊन आकृती च्या घरी जाईल ,तिला आश्चर्याचा धक्का देईल आणि तिला उपभोगण्याची  त्याची अपुरी इच्छा पूर्ण करेल.  ”
“ कपड्यांचे काय? ”ओजस ने विचारले.
“ अभिज्ञा बोरा ने त्याला दिलेले कपडे आणि बूट त्याने बदलले होते. मात्र त्याचे ओले कपडे आणि बूट तिथेच पडले होते.तो मेल्यावर अभिज्ञा बोरा  घाबरून घाईतच निघून गेली तेव्हा पासून ते कपडे  तिथेच होते.मैथिली आणि  जयराज आर्य यांनी ते तिथून उचलले  आणि नंतर  गॅरेज मधे लपवले. मैथिली चा प्रयत्न सर्वाना वाचवण्याचा होता,आकृती बद्दल  वाईट मत होऊ नये असा, अभिज्ञा बोरा आणि जयराज आर्य वर आळ येऊ नये असा. त्यामुळे तिने तपन ची गाडी पुन्हा बरोबर अग्नी रोधकासमोर ठेवली.  अगदी ज्या पद्धतीने आकृती ने ठेवली होती तशीच ठेवली.तिचा आणि जयराज आर्य चा अंदाज होता की आकृती गेल्यावर काय झाले त्या आऊट हाऊस् मधे हे कोणालाही कळणार नाही.  ”
“ खून झाल्याचे समजून ही पोलिसांना कळवले नाही हा मैथिली आणि जयराज आर्य चा गुन्हा नाही का? ”ओजसने विचारले.
“ नक्कीच गुन्हा आहे, जर सरकारी वकील तो सिद्ध करू शकले तर.” पाणिनी म्हणाला.
“ ते का नाही सिद्ध करू शकणार? ”ओजसने विचारले.
“ त्या दोघांनी लग्न केलंय , त्यामुळे एकमेकांविरुद्ध ते साक्ष नाही देऊ शकत.खांडेकर असे सिद्ध करू शकतील की मैथिली ने अभिज्ञा बोरा ला फोन करून आऊट हाऊस मधे जायला सांगितलं, पण  ते कधीच ”सिद्ध करू शकणार नाहीत की प्रत्यक्षात मैथिली तिकडे गेली होती.याचे कारण असे की अग्नी रोधकापुढे गाडी लाऊन उतरलेली तरुणी मैथिली होती की आकृती यात पायस हिर्लेकर ने एवढा घोळ घातलाय की एकदा तो हो म्हणतो एकदा नाही म्हणतो कधी तरी म्हणतो मला सांगता नाही येणार. पोलिसांनीच त्याचा हा मानसिक गोंधळ घातला, आणि स्वत:ची बाजू कमकुवत केली.” पाणिनी ने खुलासा केला.
“ ओमकार आणि मंडलिक बाईने जर तपन कडून पाच हजाराचा चेक घेतला तर तो बँकेत नेऊन रोख का नाही काढली? ” सौम्या ने शंका विचारली.
“ मला शंका आहे की त्यांचा  आणखी एक कोणीतरी एक मध्यस्त असावा ,त्याच्याकडे त्यांनी चेक दिला असावा.माणूस मेल्यावर बँक त्याच्या सहीने काढलेल्या  चेक चे पैसे देत नाही हे त्या मध्यस्ताला माहीत असावे.नसत्या लफड्यात अडकण्यापेक्षा तो बँकेत गेला नसावा. ” पाणिनी म्हणाला.
“ आणि नमन ने मैथिली ला दिलेला मोठ्या रकमेचा चेक? ” सौम्या ने विचारले.
“ तपन चा बाप नमन कितीही कडक असला आणि तपन ला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत असला तरी खून झाल्या नंतर त्याचा बाहेरख्याली पण समाजा समोर येऊ नये अशी त्याची इच्छा असणारच.त्यामुळे जयराज आर्य आणि मैथिली दोघांना साक्षी करता बोलावले जाऊ नये म्हणून त्याने त्या दोघांचे लग्न लाऊन देण्याचे ठरवले.त्या दोघांना एकमेकात रस आहे हे त्याला माहिती असावे.नवरा बायको परस्पर विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत हे त्याला माहीत होते.लग्नासाठी आणि कोर्टात उपलब्ध न होण्यासाठी बाहेर गावी जाण्यासाठी म्हणून त्याने मैथिली ला मोठी रक्कम चेक ने दिली.  ” पाणिनी म्हणाला.
“ पण नमन लुल्लाला सगळ अद्ययावत कसे कळत होते काय काय घडत होते ते? ”ओजसने विचारले.
“ विसरतोयस तू, कनक, मी तुला म्हणालो होतो की  पूर्वी त्याच्याच कंपनीत नमन ची सेक्रेटरी  असणारी मैथिली ही  अत्यंत चाणाक्ष पोरगी आहे.!  ” पाणिनी म्हणाला.
“ आकृती च्या  फ्लॅट  मधे  तुझ्या समोरच ड्रेस बदलून आकृती चा ड्रेस अंगात चढवताना  तू   मैथिली च्या  फक्त  बुद्धीचे कौतुक करत होतास की............????? ” कनक डोळा मारून  म्हणाला.
 (संपूर्ण कादंबरी समाप्त)
 
 
 
 
 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel