१२ शिक्षक

जो खरा शिक्षक आहे त्याला ''खरोखर कोणी कोणाला मदत करू शकत नाही'' ही गोष्ट माहित असते. मनुष्याने जे स्वत:च स्वत:साठी केले पाहिजे, ते त्याच्यासाठी दुसर्‍याला नीट करता येणार नाही व दुसर्‍याने ते  केलेच तर ते चुकीचेही ठरेल. ज्याने त्यानेच केले तरच त्याचे त्याला फळ व त्या फळाचा आनंदही. शिक्षकाला एवढेच करता येईल. ''धीर देणे,  विद्यार्थ्यांना निराश होऊ न देणे; स्वत:चे काम स्वत:च करावे, स्वत:च्या पायावरच उभे राहावे स्वावलंबनाची कास धरावी वगैरे गोष्टी त्याच्या मनावर बिंबविणे, आणि तो विद्यार्थी याप्रमाणे प्रयत्न करीत असताना त्याच्या मार्गात ज्या अडचणी असतील त्या शक्य तितक्या दूर करणे''

विद्यार्थ्याने आपल्या गुणानुसार आपला विकास करून घेतला पाहिजे. ज्याचा तो मार्ग त्या मार्गाने जाऊनच त्याने वाढावे, मोठे व्हावे. प्रत्येकाने आपला धर्म स्वधर्म ओळखावा, आपले ध्येय ओळखावे. दुसर्‍याचे अनुकरण करून कोणालाही मोठे होता यावयाचे नाही. बेडकी बैलाप्रमाणे मोठी होण्यासाठी फुगू लागेल तर बैल न होता ती मरेल. बैलाने धष्टपुष्ट व्हावे व बेडकीने चांगली बेडकी व्हावे. गुलाबाने सुदर गुलाब व्हावे. शेवंतीने पिवळी धमक शेवंती व्हावे. शिक्षकाचे पहिले कर्तव्य हे की त्याने मुलांच्या मनात, मुलांच्या जीवनात, त्यांच्या आवडीनावडीत, त्यांच्या हृदयात खोल शिरले पाहिजे, कोणत्या भूमिकेवर मुलगा उभा आहे. व कोठे जाण्याचा त्याचा कल आहे हे शिक्षकाने समजून घेतले पाहिजे. या शिवाय तो कसे शिकवील हे न कळेल तर मुलाच्या मार्गातील अडचणी तो कशा दूर करणार? मुलाला काय पाहिजे आहे हे कळल्याशिवाय द्यावयाचे तरी काय?

शिक्षणाला खरा आरंभ शिष्याकडून केला जातो. शिक्षकाकडून नव्हे. शिकवणार्‍याची एखादी शारीरीक व मानसिक क्रिया सहज होऊन जाते.  परंतु शिकविणार्‍या शिक्षकाला त्या सहज क्रियेहून सूचना मिळते. त्या क्रियेचा तो शिक्षक उपयोग करून घेतो. मनाच्या गुणधर्माचा, मानशास्त्राचा त्याने अभ्यास केलेला असतो. त्या अभ्यासाच्या सहाय्याने मुलाची त्या क्रियेतील प्रकट झालेली जी शक्ती तिचा तो विकास करु पाहतो. तो प्रयोग करतो. मुलाची ती शक्ती वाढावी म्हणून त्याला संधी निर्माण करून देतो.  तसे वातावरण निर्माण करतो. मुलाला निरनिराळी साधने तो मिळवून देतो.  प्रथम आरंभ मुलाकडूनच झाला पाहिजे. तसा तो न होईल तर मुले नुसती ठोंबदेवासारखी बसतील आणि शिक्षकाने जिवंत मुलास न शिकविता दगड व खांब यांनाच शिकविले असे होईल. शिक्षण किंवा उत्क्रांती, विनय किंवा विकास यांचा आरंभ नेहमी स्वत:च्या सहज होणार्‍या कृतीतूनच होत असतो. 

ज्ञानाचा प्रत्यक्ष साक्षात्कार ज्याला घडला त्याला ज्ञानी म्हणतात. ह्या ज्ञानाचे बाह्य रंगरूप कोणतेही असो. भूगोल असो वा खगोल असो.  बु्रसेल्समधील मजुरांना आपले अत्यंत थोर विचार देणारा, विश्वचा भूगोल लिहून तो त्यांना समजावून देणारा एलिसी रिक्ल्स हा ज्ञानीच होता. इतर थोर संतांप्रमाणेच तो संत होता.  त्याचे ज्ञान ज्ञानासाठी होते. त्याचा ज्ञानानंद हेतुरहित, फलरहित, निर्दोष व अव्यंग असा होता. ज्या वेळेस तो मेला त्या वेळेस त्याच्या निधनाने जगाने एक ऋषीच गमाविला! ज्ञान हे वाटेल त्या रुपाने नटेल. इतिहास, तत्वज्ञान समाजशास्त्र वाटेल त्या रुपाने अवतरेल. निरनिराळे भक्त त्याचा निरनिराळ्या रुपात साक्षात्कार घेतात.  Origin Of Species हा ह्या जगाच्या विचारात व –`दृष्टीत क्रांती घडवून आणणारा चार्लस डार्विनचा महाग्रंथ जो कोणी वाचील. अभ्यासातील, तो डर्विनला महाज्ञानी म्हटल्यावाचून राहणार नाही. इंग्लडमधील एका झोपडीत राहणारा, स्वत:च्या देशातून हद्द्पार झालेला प्रिन्स क्रॉपोट्किन, तो परस्पर साहाय्य करण्याचे नवीन मार्ग जगाला दाखविण्यासाठी अश्रांत धडपडला तो महान मार्गदर्शक ऋषीचे नव्हे तर काय?

ज्या भारताने अद्वैताला जन्म दिला आहे त्या भारताच्या लक्षात वरील गोष्ट इतर देशांपेक्षा चटकन आली पाहिजे. 'एकं सत्। विप्रा बहुधा वदन्ति।' असे सांगण्याचे अपूर्व धैर्य येथीलच धर्म करु शकला. ज्याला ईश्वर म्हणतात. तोच फक्त चांगला व सुंदर आहे असे नाही, तर आपण सारेच चांगले आहोत; सारे विश्वच मंगल हे; भद्र्रं तद्र विश्व वदन्ति देव: असे हे सर्वत्र मंगल पाहावयास शिकणे हे ध्येय आहे. या ध्येयाकडे कोणत्याही मार्गाने जा. तो धर्माचाच मार्ग आहे. महाभारतातील  श्लोकांइतकीच गाणितशास्त्रातील मूलतत्व पूज्य व वंद्य आहेत. वेदाभ्यासाइतकीच सृष्टीज्ञान शास्त्रही पवित्र आहे. शब्दब्रह्याची उपासना करणारा पाणिनी हा भगवान पाणिनी म्हणून संबोधिला जातो. परंपरेने आलेले आचारविचार संग्राहया वाटतात. तितकेच इतिहासशास्त्रातील सिध्दांतही वाटले पाहिजेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel