आपला दृष्टीकोण बदला की सारी सृष्टीच बदलते. जसे पाहू तसे दिसते व दिसते त्यावरून विचार करतो. आपण नवीन दृष्टी घेऊन ज्ञानप्रांतात शिरत आहोत. कुत्रा म्हणजे कुत्रा, गाय म्हणजे गाय, एवढे समजूनच आता समाधान नाही. त्याच्यामधील दुवे, साम्य आणि भेद, त्याच्या वाढी कशा झाल्या, त्याचे विशेष काय व ते का निर्माण झाले, हे सर्व समजून घेतल्याशिवाय अत:पर चालणार नाही. कुत्रा व गाय यांच्यात जो फरक आज दिसतात, जे भेद दिसतात, त्यावरून ते मुळात एक होते हे सिध्द होते. आपण पृथ्वी खणतो; खड्ड्यात कोणते निरनिराळे अवशेष सापडतात, त्यावरून गायीचे खूर व घोड्याचे खूर, साप व मासा, या दोघापासून पक्षी याप्रमाणे निरनिराळे फरक मुळात होते, वैचित्र्य कसे निर्माण झाले, भिन्न भिन्न प्रकारचा विचार कसा व का होत गेला हे समजून येते. 

प्राण्यांच्या ज्ञानाबद्दलचे नव्हे तर कला, लिपी, वाङ्मय इतिहास सर्वच शाखांच्या अभ्यासाकडे ही नूतन विकासवादाची दृष्टी घेऊन आपण गेले पाहिजे. सर्व ठिकाणी तुलनात्मक भूमिकेवर उभे राहून आता पाहावयास शिकावयाचे आहे. ज्ञान हे तुलनेनेच होत असते. कोणतीही चळवळ, कोणतेही चित्र, कोणतीही धडपड, कोणताही झगडा, याच्याकडे आता जागतिक दृष्टीने पाहण्याची नितान्त आवश्यकता आहे. पंधराव्या शतकात सर्व जगभरच धार्मिक सुधारणांची लाट उसळली व ती लाट शे; दोनशे वर्षे टिकली. इसवीसनापूर्वीच्या पाचव्या; सहाव्या शतकात सर्वत्रच तात्विक विचारांची लाट उसळली व सॉक्रेटिस, प्लेटो, बुध्द, कन्फ्यूशस् जन्माला आले. ते त्या लाटांवरचे शुभ्र फेस होत; महापुरूष होत. अशा नाना विचारांच्या जगद्व्यापी लाटा डोळ्यांसमोर उभ्या करून त्या लाटांच्या मस्तकावर शुभ्र फेसाच्या रूपाने झळकणारे त्या त्या चळवळीतील महापुरुष तेही पाहावे. एक लाट निघून ती शांत व्हावयास कधी कधी शतकानुशतके लागतात. एकेक लाट दोनदोनशे तीनतीनशे वर्षे घोघावत असते. मग ती  लाट पडते व तिच्यातून दुसरी उठते अशा सामुदायिक, जागतिक लाटा निरनिराळ्या रंगाच्या व निरनिराळ्या आकाराच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक साम्राज्यविषयक, स्वातंत्र्यविषयक, वाङ्मयविषयक, शास्त्रविषयक,  व्यापारविषयक उत्पन्न होत असतात. या सर्व लाटांचे अशा जागतिक पध्दतीने तुलनात्मक ज्ञान घेणे; तुलनात्मक रीतीने या लाटा समजून घेणे, म्हणजे आजचे शिक्षण होय. 

ज्ञानाची कल्पना इतकी विशाल व व्यापक आज झाली असली तरीही अत्यंत विद्वान माणसे संकुचित ज्ञानातच समाधान मानतात असे कधी कधी दिसते. काही बाबतीत हे विद्वान लोक अज्ञानी असतात. त्यांच्या कानावर काही गोष्टी जात नाहीत, किंवा मुद्दाम अहंकाराने ते येऊ देत नाहीत.  उदाहरणार्थ, संस्कृतीच्या इतिहासात चीनबद्दल कितीशी माहिती असते? चीन हे नाव उच्चारता आपल्या मनात कोणते चित्र येते? कोणत्या भावना येतात? चीन हे कोरे नाव वाटते, मोठमोठ्यांची मने चीनच्या बाबतीत कोरी आहेत. चीन म्हटले तर डोळ्यासमोर काही येत नाही.  हदयात व बुध्दीत हालचाल होत नाही. अर्वाचीन जागतिक संस्कृतीत भारताचीही अशीच उपेशा केलेली असते. सांस्कृतिक इतिहासात भारताचे ओझरतेच दर्शन करविण्यात येते. तसेच इस्लामी संस्कृतीबद्दल किती चुकीच्या व भ्रामक कल्पना पसरलेल्या आहेत! 'युरोपमधील ग्रीक व रोमन लोकांच्या वंशजांची संस्कृती म्हणजेच जागतिक संस्कृती' असे आज पाश्चिमात्यांकडून सांगितले जाते, लिहिले जाते. या जागतिक संस्कृतीच्या इतिहासलेखकांना भारतीय, चिनी व इस्लामी या संस्कृतीचा विसर पडतो.  यांचा स्पर्शही त्यांच्या अहंकारी मनाला होन नाही. ह्या संस्कृतीचा उल्लेख केला गेलाच तर रानटी व टाकावू म्हणून उल्लेख केला जाईल किंवा उपहासदर्शक मौन हयांच्या बाबतीत धरले जाईल. परंतु आम्हास असे वाटते की, सांस्कृतिक क्षेत्रात तरी राजकीय वर्चस्वाची धुंदी डोळ्यासमोर असू नये. ही सत्तेची दुर्गधी मनात असू नये. विद्या व कला यांच्या पवित्र व दिव्य मंदिरात तरी सर्वांना जमून परस्परांची ओळख करून घेऊ या.  परस्परांची हदय समजून घेऊ या. परस्परांच्या गुणांचा गौरव करू या.  ज्ञानासाठी, कलाविकासासाठी चाललेली व पूर्वी झालेली जी धडपड, त्यांच्यासाठी सर्वांच्या मनात असलेली जी उदात्त तहान; भूक तेथे तरी गोरे; काळे; पिवळे हे भेद उत्पन्न होऊ नयेत, त्या भूमिकेवर आपण सारे जमू या, हातात हात घेऊ या. परंतु ही थोर दृष्टी आज पाश्चिमात्यांजवळ नाही हे खरे.  संस्कृतीच्या व विचारांच्या इतिहासात पौर्वात्य विचारांना स्थान नाही, त्यांच्या ध्येयाचा, त्यागाचा विकासाचा इतिहास नाही, याचे कारण काय? पौर्वात्य राष्ट्रे आज पाश्चिमात्यांच्या जुंवाखाली, राजकीय व आर्थिक गुलामगिरीखाली सापडली आहेत हे त्याचे कारण आहे काय? पौर्वात्यांच्या बाबतीत, जणू त्यांनी काहीच भर जागतिक संस्कृतीत घातली नाही, अशाचे द्योतक जे मौन धरले जाते त्या मौनाच्या मुळाशी राजकीय परिस्थिती व आजचा त्या राष्ट्राचा दुबळेपणा हे आहे काय?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel