“परंतु यांचे नाव काय?”

“सांग रे तुझे नाव.”

“तुम्ही एकदम अरेतुरे म्हटलेले पाहून किती आनंद होत आहे. माझे नाव मधू.”

“अरे ! खरेच की. तू सांगितले होतेस हे नाव. कसा विसरलो?”

“आणि तुम्हांला सांगितल्याचे मलाही आठवले नाही.”

“सरले, गोड आहे की नाही नाव?”

“मधू नाव का कडू असेल?”

आश्रमात सर्वांना आनंद झाला. आश्रमाचा व्याप वाढत होता. त्या गरीब जनतेत उत्साह येत होता. तो आश्रम म्हणजे चैतन्याचे केंद्र बनत होता. स्फूर्तीचा व सेवेचा झरा बनत होता.

आणि एके दिवशी एक मैत्रीण आश्रम पाहायला आली. कोणाची मैत्रीण ! सरलेची का? उदयची का? अकस्मात आली. सरला, उदय चकितच झाली.

“नलू, आधी पत्र तरी पाठवावे की नाही?”

“म्हटले खेडयात पत्र आठवडयातून एकदा येत असेल.”

“आश्रम झाल्यापासून येथे रोज टपाल येते.”

“आम्ही मुंबईस आलो होतो. मी त्यांना म्हटले आश्रम पाहून येऊ. वर्तमानपत्रांत नेहमी वाचता. ते म्हणाले, “तू ये पाहून.” माझ्याने राहवेना, मी आल्ये. सरले उदयची नि तुझी झाली एकदाची गाठ. तू पत्र ना पाठवणार होतीस?”

“नलू, त्या वेळेस भेट झाली नाही. किती यातनांतून मी गेल्ये ! रात्री सारे सांगेन.”

“आणि हा तुझा प्रकाश वाटते? किती छान नाव !”

“नलू, तुला मूलबाळ?”

“सरले, तुझी नलू अजून आई नाही झाली.”

“प्रकाश, ही तुझी नलूमावशी हो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel