( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)   

अपघातात मेघनाच्या गर्भाशयाला धक्का बसला होता.तशी ती पूर्ण बरी झाली होती.डॉक्टरानी एकच शंका प्रकट केली होती.

जर तिला दिवस राहिले तर तिच्या जिवाला कदाचित धोका होता.त्या बाबतीतही डॉक्टरांना निश्चितपणे कांही सांगता येत नव्हते.

एखादवेळी सर्वकांही व्यवस्थित निभावेलही.एखादवेळी दोघांनाही गर्भाला व मेघनाला धोका संभवतो.तीच शक्यता त्यांना जास्त वाटत होती.

मेघना गर्भधारणेपासून दूर राहिली तर उत्तम.डॉक्टर  पुढे असेही म्हणाले,अर्थात हे तुम्हीच ठरवायचे आहे परंतु विवाहाच्या अगोदरच तिच्या भावी पतीला हे समजावून सांगावे असे माझे मत आहे.

त्यामुळे पुढे होणारी गुंतागुंत होणार नाही.उगीचच निरनिराळ्या समस्या निर्माण होणार नाहीत.

तीन चार महिन्यांत मेघना पूर्ण बरी झाली.ती पुन्हा कॉलेजात जाऊ लागली.वरवर पाहता ती व्यवस्थित दिसत होती. तिच्या बाबतीत अशी काही समस्या असू शकेल असा कुणाला संशयही येत नसे.ही गोष्ट फक्त मेघनाच्या आईवडिलांना माहीत होती.त्यांनी ही गोष्ट गुप्त ठेवली होती.मेघनालाही त्यांनी ती सांगितली नव्हती.श्रद्धाचा भाऊ भाऊसाहेब, संतोषचे वडील अण्णासाहेब, यांनाही ती गोष्ट अजून माहीत नव्हती.संतोष अर्थातच अनभिज्ञ होता.  

कांही वर्षे लोटली.मेघनाचे शिक्षण अजून  पुरे झाले नव्हते.आता ती वीस वर्षांची झाली होती.संतोष अठ्ठावीस वर्षांचा  होता.संतोषच्या आईने त्याच्या लग्नाची घाई केली होती.संतोष व मेघना यांचे प्रेम आहे हे अर्थातच तिला माहीत होते.दोघेही बरोबर फिरतात. एकमेकांना भेटतात. हेही तिला माहीत होते.सून म्हणून मेघना तिला पसंत होती.मेघना संतोषच्या घरी खेडेगावात दोन तीनदा जाऊनही आली होती.अर्थात प्रत्येक वेळी संतोष बरोबर होताच. जर सर्वांनाच दोघांचा विवाह पसंत आहे तर आता अधिक थांबायचे कशाला असा त्यांचा सवाल होता.तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत न थांबता दोघांचा विवाह करून द्यावा.ती पुढे शिकेल असे त्या माऊलीचे म्हणणे होते. 

कुणालाही अंधारात न ठेवता मेघनाचा विवाह झाला तरच तो अप्पासाहेबांना हवा होता.भाऊसाहेब काय आणि अण्णासाहेब काय यांना सर्व हकिगत व्यवस्थित सांगितली पाहिजे.मुख्य म्हणजे संतोषच्या कानावर मेघनाची परिस्थिती घातली पाहिजे.मेघनामध्ये स्त्री म्हणून आणखी कांही दोष नव्हता.गर्भधारणाही होवू शकत होती.फक्त तिच्या व मुलाच्या जिवाला धोका संभवत होता.अशावेळी ती व तिचा पती यांनी निर्णय घ्यायचा होता.जो कुणी भावी पती असेल त्याला व त्यांच्या कुटुंबियांना ही परिस्थिती स्पष्ट करणे आवश्यक होते.

श्रद्धाला आपल्या  भावाला हे कसे सांगावे असा पेच पडला होता.शेवटी अप्पासाहेबांनी भाऊसाहेब अण्णासाहेब व संतोष यांना एकत्र बोलाविले.तिघेही एका हॉटेलात भेटले. अप्पासाहेबांनी तिथे सर्व परिस्थिती स्पष्ट केली.मेघनाला झालेला अपघात, तिच्यावर झालेले ऑपरेशन, त्यामुळे तिची झालेली नाजूक परिस्थिती आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला,त्यांना सांगितला.ते पुढे म्हणाले,ही गोष्ट तुम्ही संतोषच्या आईला सांगा. आता तुम्ही निर्णय घ्या. मला संतोष जावई म्हणून पसंत आहे.त्याचबरोबर अप्पानी मेघनाला डॉक्टरांनी दिलेला सल्ला सांगितला.

अशा गोष्टी कुणालाही अंधारात ठेवून करता कामा नयेत.त्याचे पुढे वाईट परिणाम होतात.सर्वांनाच बिकट परिस्थितीला दु:खाला तोंड द्यावे लागते.

ही गोष्ट संतोषच्या आईला कळल्यावर तिने मेघनाला सून म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.तिच्या म्हणण्यानुसार विवाहाचा उद्देश केवळ पती पत्नी संबंध एवढाच मर्यादित नाही.वंश पुढे चालवणे हाही एक उद्देश आहे.जर तो सफल होत नसेल तर अशी मुलगी घरात सून म्हणून कशी काय स्वीकारता येईल?एका दृष्टिकोनातून विचार केला तर संतोषची आई बरोबर होती.परंतु अंतिम निर्णय संतोषने घ्यायचा होता.अण्णासाहेबांनी पत्नीची समजूत घातली.ते म्हणाले तुझे म्हणणे सर्वस्वी बरोबर आहे.लग्न ही जरी कुटुंबाशी संबंधित बाब असली तरी शेवटी ती पती पत्नी होणार्‍या   दोघांची वैयक्तिक बाबही आहे.अंतिम निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.विवाह करावा कि न करावा?मूल होऊ द्यावे की न द्यावे?जिवाला संभवत असलेला धोका घ्यावा की न घ्यावा?या बिकट प्रश्नांची उत्तरे पती पत्नीने एकत्रित घ्यायची आहेत.आपण सल्ला द्यावा. तो अवश्य देऊ परंतु अंतिम निर्णय संतोषचा असेल.

संतोषने मेघनाशी न बोलता निर्णय घेतला .तो त्याच्या आईवडिलांना एवढेच म्हणाला.समजा मेघनाचा अपघात लग्नानंतर झाला असता तर आपण काय केले असते?समजा मला अपघात झाला असता आणि मी विवाह योग्य परंतु वंशवृद्धी करण्यास अक्षम झालो असतो तर काय केले असते?

संतोषने मेघनाशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला.दोन्ही कुटुंबानी त्याला संमती दिली.अर्थातच अप्पासाहेबांचा, श्रद्धाचा, प्रश्नच नव्हता.मेघना त्यांची मुलगी होती.तिचा संतोषशी विवाह त्यांना प्रिय होता.विशेषत: संतोषच्या आईनेही मोकळ्या मनाने संमती दिली.लग्न थाटामाटात झाले.मूल होऊ द्यायचे नाही असा कठोर निर्णय संतोषने घेतला होता.

सर्व हकिगत सविस्तर कळल्यावर संतोष व मेघना यांनी मूल होऊ द्यायचे नाही असा संयुक्तपणे निर्णय घेतला होता.कांही महिन्यांचे एखादे मूल दत्तक म्हणून घ्यायचे.म्हणजे मूल संगोपनाची इच्छा हौस भागेल.मातृत्व पितृत्व यामध्ये जो आनंद असतो तो मिळेल.मेघनाच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही. मूल कायदेशीर दत्तक घेतल्यावर वारसाचाही प्रश्न मिटेल.असा मध्यम मार्ग त्यांनी काढला होता.आपापल्या आईवडिलाना त्यांचा निर्णय सांगितला होता.सर्वानी दोघाना तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा   पाठिंबा आहे असे सांगितले होते.

विवाहानंतर दोन वर्षांनी त्यांनी एक मूल अनाथाश्रमातून कायदेशीर दत्तक घेतले.स्वत:च्या मुलाप्रमाणे त्याच्या संगोपनात दोघेही गर्क झाली.आपला नातू म्हणून दोन्ही कुटंबानी त्याचा स्वीकार केला.महेश चार वर्षांचा झाला.सर्व कांही व्यवस्थित सुरळीत चालले होते.

एक दिवस एकांतात असताना मेघनाने संतोषला मला स्वतःचे मूल पाहिजे असे सांगितले.तिचे बोलणे ऐकून संतोष चमकला.मेघनाच्या मनात असे कांही असेल, येईल, असा त्याला संशयही आला नव्हता.आपण विचार करू असे म्हणून त्याने तो प्रश्न त्या वेळी डावलला.मेघना सुखी नाही.अस्वस्थ आहे. तिला कांहीतरी  अंतर्यामी खात आहे,बोचत आहे, ही गोष्ट त्याला जाणवली.एकदा त्याने तिला त्याबाबत विचारले.तू मनात कां झुरतेस?आपले सर्व कांही मनासारखे आहे.मग तू अस्वस्थ असमाधानी कां म्हणून त्याने विचारले.त्यावर तिने तिला स्वतःचे मूल पाहिजे असे पुन्हा एकदा सांगितले.स्वतःच्या उदरात मूल वाढविण्यात जो आनंद व समाधान आहे ते दत्तक मुलामध्ये नाही असे ती म्हणाली.

संतोष म्हणाला तुझ्या म्हणण्यात कांही चूक नाही.तुझ्या भावना,तुझी मन:स्थिती मी पूर्णपणे समजू शकतो.परंतु मला तुझ्या जिवाची काळजी आहे.तुझा विरह, तू मला अंतरलेली, मला सहन होणार नाही.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इतके करूनही,धोका स्वीकारूनही, मूल व्यवस्थित धडधाकट जन्माला येईल असे सांगता येत नाही.आपण उगीचच नको तो धोका कां स्वीकारावा?

त्यावर मेघना म्हणाली,तू म्हणतोस ही प्रश्नाची एक बाजू झाली.परंतु दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे.सर्व कांही व्यवस्थित होणार नाही कशावरून?मूल व मी दोघेही व्यवस्थित असू.आपण अनेकदा मेडिकल मिरॅकलबद्दल ऐकतो वाचतो.आपण मुलाचा चान्स घेतला नाही तरी  मी तुझ्या आयुष्याला जन्मभर पुरेन असे कोण सांगू शकेल?तसे झाले,मी तुझ्या अगोदर अकाली गेले   तर तू काय करशील ?आपण चान्स घेऊया.धोका स्वीकारूया.नशिबात जे असेल ते होईल.

संतोष म्हणाला,भविष्य कुणालाही कळलेले नाही.प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात.सर्व कांही व्यवस्थित होईल याबरोबरच सर्व काही बिनसेल असेही होऊ शकते.आपण उगाच धोका कां स्वीकारायचा?

यावर मेघना कांहीही बोलली नाही.परंतु अंतर्यामी  ती झुरत राहिली.तिचे क्लेश,तिचे दु:ख, तिचे झुरणे संतोषला पाहावेना. 

शेवटी संतोषने तिच्या मनासारखे होऊ दे जे कांही व्हायचे असेल,नशिबात असेल, ते होईल असे ठरविले.

तीन चार महिन्यांत मेघनाला दिवस राहिले.दिसामासानी मूल वाढत होते.डॉक्टर  दर महिन्याला सोनोग्राफी करीत होते.मुलाची वाढ व्यवस्थित होती.मेघनाची प्रकृती सुधारतच हाेती.पोटात मूल वाढवण्याचा आनंद ती पूर्णपणे उपभोगत होती.प्रसूतीच्या वेळी जे कांही होईल ते होईल त्याचा विचार आता करायचा नाही असे तिने ठरवले होते.समजा आपण गेलो तरी आपली निशाणी,आपली स्मृती संतोषजवळ राहील,असे ती गृहीत धरीत होती.त्यात तिला संतोष होता.आपले मूल जगेल असे ती धरून चालली होती.  

सातव्या महिन्यांतच तिला कळा यायला सुरूवात झाली.सिझर करावे लागले.मूल इनक्युबेटरमध्ये ठेवावे लागले.ऑपरेशनमध्ये मेघना जाईल असे डॉक्टरांना वाटत होते.त्यांनी दोघांनाही अगोदरच सतर्क केले होते.दोघांनाही धोक्याची सूचना दिली होती.मूल व्हावे हा निर्णय शेवटी त्यांचा होता.मेघनाने धोका स्वीकारला होता.पन्नास टक्के तिला यश मिळाले.मुलगी तिची स्मृती जगली.ती मात्र गेली.याच्या उलट झाले असते तर मेघना झिजून झिजून मेली असती. झाले ते बरेच झाले असे संतोष म्हणतो.  

डॉक्टरांचे बोल, डॉक्टरांचे निदान, डॉक्टरांचा अनुभव, खरा ठरला.मेघनाचा मृत्यू झाला. तथाकथित मेडिकल मिरॅकल झाले नाही.तिन्ही कुटूंबांच्या शोकाला पारावार राहिला नाही.मेघनाने माहीत असून चक्क आत्महत्या केली असे सर्व जण म्हणू लागले.मेघनाने मरताना संतोषचा हात हातात घेऊन,वाईट वाटून घेऊ नका.मी समाधानाने जात आहे.आपली दोघांची मुलगी ही माझी स्मृती आहे.तिच्याकडे पाहून आपले दु:ख कमी करा असे सांगितले.

*मुलगी कुसुम त्याचा जीव की प्राण आहे.छोटी कुसुम त्याच्या मांडीवर येऊन बसते.*

*तिच्यात तो मेघनाला पाहतो.डोळ्य़ांत आलेले अश्रू निग्रहाने परत फिरवतो.*

*मेघना कुठून तरी आपल्याला पाहत असेल.मी दु:खात असलेला तिला सहन होणार नाही.असे तो स्वत:शीच पुटपुटतो.*

रात्री अंगणात बसलेले असताना छोटी कुसुम त्याच्या मांडीवर येऊन बसते.इतरांच्या आई  पाहून ती बाबांना विचारते,"माझी आई कुठे आहे."तिचे बाबा संतोष त्याच्या हृदयाकडे बोट दाखवितात.*

*दुसऱ्याच क्षणी ते आकाशातील एक तारा दाखवतात.तिला सांगतात ती बघ तुझी आई तिथे आहे.*

(समाप्त)

८/१२/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel