( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

त्यानंतर आमच्या रोज भेटीगाठी होऊ लागल्या.दोघांनाही वेळ मिळेल तेव्हा फोनवर गप्पा, व्हिडिओकॉल, प्रत्यक्ष भेटी, सुरू झाल्या.

एकमेकांच्या प्रेमात आम्ही  आकंठ बुडालो होतो. सिनेमागृहांत,नदीकाठी, तलावाच्या काठी, रेस्टॉरंटमध्ये,अनेक ठिकाणी आम्ही भेटू लागलो.

असे फार काळ चालणे शक्य नव्हते.आमच्या भेटी जादूगार भीमसेनच्या लक्षात आल्या.

कदाचित त्यांचे काही बोलणे त्यांची पत्नी अवंतिका हिच्याबरोबर झाले असावे.

आणि त्या दिवशी रात्री मी गाढ निद्रेत असताना एखाद्या मांजराच्या पिल्लाला उचलावे गोणत्यात घालून कुठेतरी नेऊन सोडावे त्याप्रमाणे त्यांनी मला या बंगल्यात आणून सोडले होते.

पुढची सर्व हकिगत तुम्हाला माहीत आहेच.

विचार करता करता मला केव्हां झोप लागली ते कळलेच नाही.रात्रभर शांतपणे झोपून मी सकाळीच जागा झालो.आज मला जास्त ताजेतवाने वाटत होते.आता उरलेले पहिले शयनगृह व दुसरे शयनगृह पाहायचे होते.त्यामध्ये बाहेर जायचा रस्ता सापडला नाही तर मग मात्र स्वयंपाकघर संशोधन करावे लागणार होते.

दिवाणखाना व शयनगृहे यावरती ज्याप्रमाणे खिडकीची बेमालूम चित्रे काढली होती त्याचप्रमाणे.इतरही कांही चित्रे होती.तीही चित्रे बेमालूमपणे फसवणारी होती.दिवाणखान्यात एका भिंतीला दोन खिडक्या मध्ये संपूर्ण काच बसवलेली आहे असा भास होत होता.त्या काचेतून बाहेरील नयनरम्य दृश्य दिसत होते.समोर क्षितिजापर्यंत पसरलेला भाताचा मळा,वाऱ्याबरोबर ज्यावर लहरी उठत आहेत असे कापणीला आलेले शेत,त्यापलीकडे वाहणारी नदी आणि उंच मऊशार हिरवळीने   व्यापलेला डोंगर असे नयनरम्य चित्र होते.मला पहिल्यांदा बाहेरील परिसर असा आहे असे वाटले.जवळ जाऊन पाहता ते केवळ एक भिंतीवरील चित्र होते असे लक्षात आले.

शयनगृहातील भिंतीवरही अशीच चित्रे होती.एका शयनगृहात बर्फाने आच्छादित डोंगर त्यामध्ये हिमनद्या असे चित्र होते तर दुसऱ्या शयनगृहात समुद्रकाठी आपण आहोत आणि समुद्रावर मंद लाटा येत आहेत, जहाजे फिरत आहेत, असे चित्र होते.

शयनगृहातील एक भिंत तपासत असताना त्यामध्ये चोर दरवाजा सापडला.तो दरवाजा बाहेर कुठे जात नसून दरवाजातून आंत गेल्यावर भिंतीमध्ये एक काळोखी खोली होती.त्यामध्ये एक शिडी सापडली.ती शिडी लावून छताचा कांही भाग तपासता आला असता त्यापेक्षा त्याचा आता तरी कांही जास्त उपयोग दिसत नव्हता.अगदीच कांही नसण्यापेक्षा हे बरे होते.शिडीचा कांहीतरी उपयोग असलाच पाहिजे.ती शिडी मला सुटकेचा मार्ग दाखवील असा विचार माझ्या मनात आला.

मी थोडे खाऊन घेतले आणि स्वयंपाकघराच्या संशोधनाला सुरुवात केली.स्वयंपाकघरातून बाहेरील काही दृश्य दिसेल असे चित्र नव्हते.परंतु स्टँड त्यावरती क्रोकरी, भांडी,गॅस,ओव्हन, मायक्रोवेव्ह, इंडक्शन कुक टाॅप,इत्यादी हुबेहूब चित्रे काढलेली होती.सर्व अद्ययावत गॅजेट्सनी सुसज्ज स्वयंपाकघर वाटत होते.माझ्या नशिबाने एक खरी शेगडी होती.त्यामुळे मी चहा कॉफी तरी करू शकत होतो.तसंच खरी चहापूड साखर कॉफीही होती.नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे झाले असते.मला उपाशीपोटी राहावे लागले असते.भीमसेननी कृपावंत होऊन माझ्या खाण्यपिण्याची थोडीबहुत सोय केली होती.  

स्वयंपाकघर काळजीपूर्वक तपासून झाले.कुठेही मला बाहेर जाण्याचा मार्ग सापडला नाही.शिडी सापडल्यावर मला हुरूप आला होता.तो हुरूप संपूर्णपणे मावळला.आता मी येथे कायमचा कैद झालो होतो असे वाटत होते.कांहीतरी तपासायचे राहिले असावे असे मला आंतून वाटत होते.  बाहेर जायचा मार्ग असणारच त्याशिवाय उगीचच भीमसेननी मला आव्हान दिले नसते.कॉफी पिता पिता मी संपूर्ण स्वयंपाकघर डोळ्यासमोर आणीत होतो.एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला.हॉलमधील शयनगृहातील वस्तू इकडे तिकडे सरकवून जसा मी तपास केला तसा येथे फ्रिज सरकवून केला नव्हता.

नव्या उत्साहात मी पुन्हा स्वयंपाकघरात गेलो.फ्रीज जाग्यावरुन सरकवला.त्याच्याखाली चार फरशा होत्या.त्या ठोकून पाहिल्या.थोडी खटपट केल्यावर  त्या बाजूला सरकवता आल्या.खाली पोकळी होती एक तळघर होते.स्वयंपाकघराच्या फरशा ठोकून पाहत असताना मला कुठेही खाली पोकळ असल्याचा,तळघर असल्याचा,आवाज आला नव्हता.तळघर अत्यंत बेमालूमपणे बांधलेले होते.तळघरात उतरण्यासाठी जिना नव्हता.आता मला शिडीचा उपयोग कळला.बोगद्यामध्ये शिडी सोडून मला तळघरात उतरता येणे शक्य होते.तळघरातून बाहेर जायला कुठेतरी मार्ग असणारच.बाहेर पडण्यासाठी मी उत्सुक झालो होतो.मी एकदा त्या अद्भुत बंगल्याच्या इंटेरिअरकडे पाहून घेतले.जशी कांही मला बाहेर जायची वाट सापडलीच आहे अशा उत्साहात शिडी बोगद्यातून खाली सोडून त्यावरुन मी तळघरात काळजीपूर्वक उतरलो.आपल्या नेहमीच्या तळघरातला असतात त्याप्रमाणे येथे वायूविजन व प्रकाश  यासाठी कडेने रेजे मारलेले होते. निरनिराळ्या ठिकाणी शिडी लावून मी रेजे हलवून पाहत होतो.एका ठिकाणचे रेजे मला बाहेर काढता आले.त्यातून मी बाहेर आलो.  

माझा अवतार पाहण्यासारखा होता.विस्कटलेले केस, चेहऱ्यावर व कपड्यावर ठिकठिकाणी पडलेले डाग,एकदम तीव्र उजेडात आल्यामुळे मिचमिचे झालेले डोळे,कमरेला गुंडाळलेली लुंगी,वरती घातलेला एक टीशर्ट,असे माझे ध्यान होते.मी एका खेळण्याच्या मैदानात उभा होतो.मुले क्रिकेट, कबड्डी, खो खो,टेनिस असे विविध खेळ खेळत होती.बहुधा शाळेला सुटी असावी.संध्याकाळ झाली होती.संध्याकाळी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅकवर निरनिराळ्या वयोगटातील स्त्री पुरुष   आले होते.मी ते मैदान ओळखले.ते गांधी उद्यान मैदान होते.उद्यान मैदान म्हणण्याचे कारण उद्यान व शेजारी खूप मोठे मैदान असे एकत्रित होते.

मला कलिकेला फोन करायचा होता.मी गांधी उद्यान मैदानामध्ये आहे तेथे येऊन मला घेऊन जा असा निरोप द्यायचा होता.माझ्या खिशात पैसे नव्हते. मोबाइल तर नव्हताच.माझा अवतार   पाहण्यासारखा झाला होता.मी मागे वळून पाहिले तो तिथे केवळ मैदान होते.बंगल्याचा मागमूसही नव्हता.तीन दिवस मी बंगल्यात होतो.फ्रिजमधील ब्रेड खाऊन आणि चहा कॉफी पिऊन दिवस काढत होतो.जर मला बाहेर जायचा रस्ता सापडला नाही तर इथेच माझा शेवट होईल असे दिसत होते.जरी रात्री मी गाढ झोपत होतो तरीही सर्व काळ विलक्षण तणावाखाली होतो.आणि आता तिथे बंगलाच दिसत नव्हता.मी कोणत्या बंगल्यात होतो?काळाच्या कोणत्या फटीतून मी मैदानात आलो होतो.का मला तीन दिवस सर्व भास होत होते?हा जादूचा प्रभाव होता?यामागे कांही शास्त्रीय कारणे होती?कि मी तीन दिवस माझ्या डोक्यात झालेल्या बिघाडामुळे भासमय जगात वावरत होतो?

मैदानावर एक जण त्याच्या मोबाइलवर बोलत होता.त्याच्याजवळ जाऊन इंग्रजीत मला फोन करायचा आहे तुमचा मोबाइल मला कांही काळ द्याल का?अशी विनंती केली.इंग्रजीत बोलण्याचे कारण माझी छाप पडावी   आणि त्यांनी मोबाइल द्यावा असा होता.मराठीत बोललो असतो तर कदाचित माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला टाळले असते.इंग्रज जाऊन पंच्याहत्तर वर्षे झाली तरी इंग्रजीची गुलामगिरी गेलेली नाही.इंग्रजीत बोलले म्हणजे छाप पडते.प्रादेशिक भाषेला तो मान ते वजन येत नाही.हे असे असू नये हे जेवढे खरे तेवढेच ते तसे आहे हे खरे.       

त्याने मला नंबर विचारला. कलिकेचा नंबर मला पाठ होता.मी नंबर सांगताच तो नंबर त्याने फिरवला. कलिकेने सुदैवाने फोन उचलला.त्या गृहस्थाने मला माझे नाव विचारले.मी नाव सांगताच त्याने प्रमोदना तुमच्याशी बोलायचे आहे तुम्हाला बोलायचे आहे का? अशी पृच्छा केली.मला ऐकू यावे म्हणून  त्याने फोन स्पीकर मोडवर ठेवला होता.पलीकडून आनंद झाल्याचे स्पष्ट जाणवणारा कलिकेचा स्वर मला ऐकू आला.होय मला बोलायचे आहे ताबडतोब त्याला फोन द्या.त्याने फोन माझ्या पुढ्यात धरला.मी तिला गांधी उद्यानात गेटजवळ आहे तिथे येऊन मला घेऊन जा असे सांगितले.त्या गृहस्थाने फोन मला दिला नव्हता.फोन त्याच्या हातात घट्ट पकडून ठेवला होता.माझ्या अवतारावरून मी फोन घेऊन पळून जाईन असा त्याला बहुधा संशय आला असावा.किंवा ती व्यक्ती   जास्त काळजी घेणारी असावी.  

थोड्याच वेळात कलिका मोटार घेऊन आली.आम्ही दोघे माझ्या फ्लॅटवर पोहोचलो.तीन दिवसांत काय काय घडले त्याची थोडक्यात हकिगत मी तिला सांगितली.तिनेही माझ्या तपासासाठी काय काय प्रयत्न केले ते सांगितले. 

ती मला फोन करीत होती.मी उत्तर देत नव्हतो असे पाहून तिला माझ्या प्रकृतीविषयी काळजी वाटली आणि ती प्रथम माझ्या फ्लॅटवर गेली होती.बेल वाजवली,दरवाजा ठोठावला, कुणीच प्रतिसाद देत नव्हते. तिच्याजवळ माझ्या फ्लॅटची किल्ली नव्हती.किल्लीवाला आणून तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.आंतून कडी आहे.आंतून लॅच लॉक केले आहे असे त्याने सांगितले.तिने पोलिसात जाऊन तक्रार दिली.पोलीस तिचे व माझे नाते विचारीत होते.तिने मैत्रीण व भावी पत्नी असे त्यांना सांगितले. त्यांना घेऊन ती फ्लॅटवर आली होती.चार लोकांच्या देखत कुलूप तोडण्यात आले होते.दरवाजा बंद आणि आंत मी नाही हे पाहून सर्वजण चक्रावून गेले होते. 

चक्रावली नव्हती ती फक्त कलिका.हा तिच्या वडिलांचा प्रताप आहे हे तिने लगेच ओळखले होते.एखाद्या घरातून आतील कडी कुलुप लावलेले  असताना एखाद्याला गायब करण्याची जादू त्यांच्याजवळ होती.

तिने तिच्या  वडिलांवर माझे अपहरण केल्याचा सरळसरळ आरोप केला होता.त्यांनीही तो लगेच मान्य केला होता.त्याला मी कैदेत ठेवले आहे.कैदेतून निसटण्याची वाटही आहे.तसे पत्र त्याला दिले आहे.चार दिवसांची मुदत आहे.तो कैदेतून यशस्वीपणे सुटला तर माझी तुमच्या विवाहाला परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले होते.चार दिवस वाट पाहण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.गेले तीन दिवस कसे काढले ते माझे मलाच माहिती. माझ्या जिवाला कोणताही धोका पोहोचणार नाही असे वचन तिच्या वडिलांनी तिला दिले होते.तेवढाच तिला सहारा होता.

ती प्रत्येक दिवस, आणि दिवसाचा प्रत्येक तास मोजत होती.माझा आवाज कानावर पडल्यावर तिला झालेला हर्ष शब्दांत वर्णन करता येणार नाही असे ती सांगत होती.अगोदर माझ्या काळजीने ती वेडी होईल असे तिला वाटत होते.तर आता हर्षोन्मादाने ती वेडी होईल असेही तिला वाटले होते. 

मी माझ्या फोनवरून भावी सासर्‍यांना फोन केला.त्यांच्या मायाजालातून यशस्वीपणे सुटल्याचे त्यांना सांगितले.त्यांची अट मी पुरी केली होती.त्यांचे वचन ते केव्हां पूर्ण  करतात म्हणून मी त्यांना विचारले.

त्यावर त्यांनी "मला प्रोफेसर जादूगार भीमसेन म्हणतात.मी वचनाचा पक्का आहे.अवंतिकेने कलिकेच्या आईने तुम्हाला अगोदरच पसंत केले आहे.आता मीही तुम्हाला पसंत केले आहे.माझी अट एकच आहे.मला साहाय्य करायला दुसरी एखादी मुलगी तयार होईपर्यंत कलिका माझ्या शोमध्ये काम करील."असे उत्तर दिले.त्यांच्या निवासस्थानी मला व कलिकेला बोलाविले.  

*कलिकेने कांही महिने त्यांच्या शोमध्ये काम करण्याला  अर्थातच मी होकार दिला.*

*एका कैदेतून निसटून दुसर्‍या  कैदेत पडलो.*

*अर्थात ही कैद हवी हवीशी होती.*

*अशी ही माझ्या वैचित्र्यपूर्ण जगावेगळ्या विवाहाची कथा.* 

(समाप्त)

२८/१२/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel