(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)              

*आनंदा दादा*

आज कुठेतरी चमचमीत खायला जावे असे वाटत होते.नेहमीच्या त्याच त्याच मेसच्या जेवणाने कंटाळा आला होता .माझा मित्र संतोष या बाबतीत माहीर आहे. त्याला कुठे केव्हा आणि काय चांगले मिळते हे माहित आहे.त्या बाबतीतला तो एक चालता बोलता संदर्भकोष आहे असे म्हणता येईल.त्याच्याजवळ मी माझी इच्छा बोलून दाखविली .तो म्हणाला काही दिवसांपूर्वी एक नवीन हॉटेल सुरू झाले आहे .हॉटेल कसले तो एक छोटासा गाळा आहे.नशीब चांगले असले तर तिथे बसायला जागा मिळते .नाहीतर बाहेर टाकलेल्या बाकड्यावर बसून किंवा उभे राहून आस्वाद घ्यावा लागतो . 

संतोषने सांगितले म्हणजे  प्रश्नच नाही उत्कृष्ट असणारच म्हणून  मी बिनधास्तपणे त्याच्याबरोबर गेलो. दुकान छोटेसे होते.परंतु गर्दी भरपूर होती .बाहेर मोकळ्या जागेत बाके व टेबले टाकली होती .त्यावर काही लोक बसून, तर काही लोक उभे राहून, हातात प्लेट घेऊन खात होते. संतोषने दोन तीन वस्तूंची ऑर्डर दिली. पदार्थांची चव लाजवाब होती .आम्ही आणखी एकेक प्लेट मागितली .लोक गर्दी कां करीत होते ? केवळ सहा महिन्यात एवढी प्रसिद्धी कशी झाली होती. त्याचे उत्तर पदार्थांच्या चवीमध्ये मिळत होते .

गाळ्यामध्ये पदार्थ बनविण्याचे काम जोरात सुरू होते.तेवढ्यात माझे लक्ष गाळ्यांत काम करणाऱ्या एकाकडे गेले.मला त्याचा चेहरा ओळखीचा वाटला .मला एकदम तो कोण आहे ते लक्षात आले .आमच्या बंगल्याच्या शेजारी एक झोपडी आहे .झोपडी कसली लहानसे घरच आहे ते .त्यात बाबांचे कारभारी दौलतकाका राहतात.त्यांचा मुलगा स्वप्नील तोच हा असावा असे मला वाटले .माझे गावाकडे जाणे विशेष होत नाही .गेलो तरी दोन चार दिवसच राहतो .त्यामुळे मला खात्री नव्हती. 

मी आत जाऊन निरीक्षण केले .तो स्वप्नीलच होता.त्याला नांव विचारून मी खात्री  करून घेतली .त्याने मला लगेच आनंददादा म्हणून ओळखले .त्याला तू इथे कसा असे मी विचारले .तो म्हणाला ती एक मोठी स्टोरी आहे.इथे कामांच्या गर्दीत सांगता येणार नाही .आमचे दुकान मंगळवारी बंद असते .त्यादिवशी मी तुमच्याकडे येईन. मला तुमचा पत्ता द्या.हे सर्व बोलत असताना हाताने त्याचे काम चालले होते .मंगळवारी मी तुझ्याकडे येतो असे त्याला सांगितले त्याचा पत्ता विचारून घेतला .

मंगळवारी त्याला घेऊन हॉटेलात जेवायला गेलो .त्याची दर्दभरी प्रेम दास्तान ऐकिली.नंतर तो येथील मित्राकडे आला. हा धंदा करायचे ठरले.धंदा उत्तम चालू लागला.  वगैरे गोष्टी त्यानेक सांगितल्या .त्याचा पुढे विचार काय आहे म्हणून विचारले .काकानी त्याला जी अट घातली होती ती तो सहज आत्ता सुद्धा पुरी करू शकत होता .त्यानंतर तो जे काही बोलला त्यामुळे मला लहानसा धक्काच बसला .मी लगेच काकाना फोन करायचे ठरविले.

*काकासाहेब* 

आनंदाचा अकस्मात फोन आला.  बहुतेक दर रविवारी तो फोन करतो .काही विशेष काम असेल तर तो मध्येच फोन करतो .काहीतरी खास काम असणार तेव्हाच त्याने असा फोन केला .त्याने फोनवर  जे सांगितले ते ऐकून मला एका बाजूने आनंद झाला होता तर दुसऱ्या बाजूने मी अस्वस्थ झालो होतो.

स्वप्नील नोकरी पेशाचा मनुष्य आहे ,अल्पसंतुष्ट आहे,त्याच्याजवळ धाडस नाही, व्यावसायिक दृष्टी नाही ,ही माझी समजूत निखालस खोटी ठरली होती. त्याने शहरात जावून नोकरीसाठी प्रयत्न न करता धंदा सुरू केला होता.त्यात तो यशस्वी झाला होता .धंदा कोणताही असो जोपर्यंत तो आपण प्रामाणिकपणे करीत आहोत तोपर्यंत त्याला माझी काहीही हरकत नव्हती.हा व्यवसाय मोठा, तो व्यवसाय लहान, अशा कल्पना माझ्या मनात कधीही नव्हत्या .न घाबरता न बिचकता त्याने रस्त्यावर वडा पावची  हातगाडी टाकली .त्यात तो यशस्वी झाला .थोड्याच काळात त्याने गाळा घेवून हॉटेल सुरू केले .माझी घातलेली अट सहा महिन्यातच त्याने पूर्ण केली .तो धाडसी व्यावसायिक आहे .या गोष्टींचा मला आनंद वाटत होता.  

परंतु पुढे त्याने जे सांगितले त्यामुळे मी अस्वस्थ झालो.त्याचा पुन्हा खेडेगावात येण्याचा  विचार नाही.मोठे रेस्टॉरंट सुरू करण्याचा त्याचा विचार आहे.त्यात तो कधी ना कधी यशस्वी होईल .त्याने माझी अट पूर्ण केलेली असल्यामुळे, मला प्रियाचे लग्न त्याच्या जवळ लावून द्यावे लागेल.प्रिया मला सोडून शहरात जाईल.आनंद तर माझ्या व्यवसायात येणे शक्य नाही . प्रिया व माझा जावई,माझा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळतील  या माझ्या स्वप्नाचा शेवट होत होता.

यावर काय करावे अशी चर्चा मी आनंदाजवळ केली .  त्याच्या अंदाजानुसार जर स्वप्नीलला मानाने माझ्या व्यवसायात स्थान मिळाले तरच तो येथे येऊन राहण्याला तयार होईल.त्यासाठी आनंदने एक कल्पना माझ्यापुढे मांडली.माझा व्यवसाय एक चालकानुवर्ती आहे .त्याचे रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये करावे.त्यात शेअर्सची विभागणी पुढीलप्रमाणे असावी.काकासाहेब, प्रिया ,आनंदा व स्वप्नील या चौघांमध्ये,शेअर्सची विभागणी समसमान असावी .स्वप्नीलला कंपनीचा सीईओ ठेवावे .प्रियाचे व त्याचे लग्न  झाल्यावर पन्नास टक्के शेअर्स म्हणजे कंपनीचा निम्मा वाटा

त्यांच्याकडे जाईल .नाहीतरी एकूण मालमत्तेचे दोन समसमान भाग होणार प्रिया व मी .प्रियाच्या नावावर पन्नास टक्के शेअर्स केले तर स्वप्नीलला तो अपमान वाटेल.कंपनीचे अंतिम नियंत्रण तुमच्याकडे राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर,तुम्ही सव्वीस टक्के, मी पंचवीस टक्के,प्रिया पंचवीस व आनंदा चौवीस अशी विभागणी करावी.अशा विभागणीला  तो नकार देणार नाही .त्याला मानाचे व मालक म्हणून स्थान द्यावे लागेल .नाहीतर तो आता शहरात मोठी स्वप्ने पाहू लागला आहे .असा मान व प्रियाशी असलेले त्याचे प्रेम, यामुळे तो तिकडे येईल .त्याला तुमच्याबद्दल आदर आहे.तुमच्या शब्दाबाहेर तो जाणार नाही .प्रियावरही त्याचे प्रेम आहे.दौलत काका काकू या आई वडिलांवरील प्रेमही त्याला तिथे राहण्यास सहाय्यभूत ठरेल .

आनंदने सांगितलेली कल्पना मला स्वीकारार्ह वाटली . माझ्या डोक्यावरील बोजा एकदम खांद्यावर आल्यासारखे वाटले .मला वाटले होते तसा आनंदा एकमार्गी नाही. तो सर्वांगीण विचार करू शकतो .या गोष्टीचा मला विशेष आनंद झाला .

*प्रिया*    

आनंददादाचा फोन आला की बाबा नेहमी हॉलमध्येच बसून त्याच्याजवळ बोलतात .बऱ्याच वेळा ते फोन स्पीकर सुरू करून ठेवतात .म्हणजे आम्हा सर्वानाच त्याच्याजवळ बोलता येते . त्याचे बोलणे ऐकता येते .आम्हा चौघांना एकत्र बसून गप्पा मारल्याचा आनंद मिळतो.केव्हा केव्हा तर तो व्हिडिओ कॉल करतो .

काल दादाचा फोन आला तेव्हा बाबा तसेच करणार होते.परंतु अकस्मात ते हॉलमधून त्यांच्या खोलीत निघून गेले.नंतरही सुमारे अर्धा तास त्याच्या जवळ ते बोलत होते .आईने एवढे महत्त्वाचे त्याच्याजवळ काय बोलत होता असे विचारल्यावर ,हसून काही नाही तो तिकडच्या गमती जमती सांगत होता असे म्हणून वेळ मारून नेली.

स्वप्नील शहरात गेला असला तरी दोन चार दिवसांनी आमचा फोन होतो.त्याचे तिकडे झकास चालले आहे हे एेकून मला आनंद होत होता.त्याचबरोबर  त्याचा इकडे येण्याचा विचार नाही. तो तिकडेच स्थायिक होऊ इच्छितो. हे ऐकून समाधान व असमाधान अशी संमिश्र भावना निर्माण होत होती.

दादाला स्वप्नील भेटला असणार .त्या संबंधातच त्याचा काहीतरी फोन असणार असा मी तर्क केला.

स्वप्नीलने दादा त्याला भेटला वगेरे सर्व हकिगत मला फोनवर सांगितली. माझा अंदाज अचूक ठरला होता .

दादा बाबांजवळ काय बोलला ते मात्र मला कळले नाही .

* लक्ष्मीकाकू*

आनंदाचा फोन आला त्या रात्री यांनी मला सर्व काही सविस्तर सांगितले .आनंदच्या म्हणण्याप्रमाणेच सर्व काही करायचे ठरविले आहे असेही सांगितले.त्यांनी एक लहानसा बदल केला होता .स्वप्नीलला आमच्या कुटुंबातील एक घटक असे समजून पाच जणांमध्ये समान भाग करण्याचे ठरविले होते .हे व मी दोघेही आमचा भाग कुणालाही विकण्यास किंवा बक्षीसपत्राद्वारे देण्यास स्वतंत्र होतो .मी माझा निम्मा वाटा प्रियाला देण्याचे ठरविले होते .काकासाहेबही बहुधा तसे करतील.म्हणजे साठ टक्के वाटा स्वप्नील व प्रिया यांच्याकडे जाईल .

*स्वप्नील*

वर्ष पुरे झाल्यावर मी काकासाहेबांना भेटायला गेलो. त्याचवेळी माझ्या बरोबर प्रियाही आली होती.मी अट पूर्ण केल्याचे त्यांना सांगणार होतो.प्रियाचा हात मागणार होतो .त्यांनी अट घातल्याप्रमाणे दोन लाख रुपये त्यांच्या पुढे ठेवले.आणि स्वस्थ बसून राहिलो.ते पुढे काय करतात ते मला पाहायचे होते.  

त्यांनी मला अाश्चर्याचा धक्का दिला.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केल्याचे सर्व कागदपत्र टेबलावर ठेवले.नंतर एका पाकिटात वीस टक्के शेअर्स माझ्या मालकीचे केल्याचे कागदपत्र होते.कंपनीचे पाच भागधारक कोण तेही मला सांगितले.माझी सीईओ म्हणून नेमणूक केल्याचेही पत्र मला दिले. 

सर्वांच्या संमतीने साखरपुडा व विवाह यांच्या तारखा ठरवू असेही सांगितले .यावर माझ्याजवळ बोलण्यासारखे काही शिल्लक राहिले नव्हते .शहरात हॉटेल व रेस्टॉरंट उभे करण्याचे माझे स्वप्न सोडून द्यावे लागणार होते. प्रियाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता .काकासाहेबांनी केलेल्या व्यवस्थेचा, ठरविलेल्या गोष्टींचा, मी सहर्ष स्वीकार करीन म्हणून ती मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहात होती.तिचा विरस करणे मला शक्य नव्हते.मला जो मान हवा होता तो मिळत होता.मी काकांच्या  योजनेला संमती दिली .  

माझे शहरातील व्यवहार आवरण्यासाठी तिकडे गेलो.काशीनाथला तू व्यवसाय पुढे चालव किंवा गावाकडे निघून ये.तुझ्यासाठी चांगली नोकरी तुझी वाट पाहात आहे असे सांगितले.  

*लक्ष्मीकाकू*

* यांनी आनंदाची कल्पना  स्वीकारली.*

* स्वप्नीलने काकासाहेबांचा योग्य आदर ठेवला.*

*आता मला खूप कामे डोळ्यासमोर दिसत आहेत .*

*ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड.*  

(समाप्त)

७/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel