भारताच्या भव्य इतिहासाचा अभ्यास करा. त्यातून सामर्थ्य प्राप्त होईल. आणि आजचा इतिहासही खोल दृष्टीने बघा. तिसरी गोष्ट म्हणजे निसर्गावर प्रेम करा. निसर्ग आपली माता आहे. शेक्सपिअर सृष्टीजवळ शिकला. माझ्या मनात कधी कधी विचार येतो की, जन्म-णा-या मुलांचे पोषण व्हावे म्हणून विश्वशक्तीने आईच्या स्तनांत दूध निर्माण केले. परंतु मुलाच्या मनोबुध्दीचे पोषण व्हावे म्हणून कोणती योजना ?  शेवटी माझ्या ध्यानात आले की, 'समुद्रवसना नि पर्वत-स्तनमंडला 'ही सृष्टीमाता मनोबुध्दीचे पोषण करणारी.  Books in brooks sermons in stones. निर्झरात पुस्तके नि पाषाणांत प्रवचने असे शेक्सपिअरने म्हटले. महाकवी तिच्याजवळ शिकला. परंतु आपण या मातेची उपेक्षा करतो. निसर्गावर प्रेम केल्याशिवाय तुमच्या साहित्याला भव्यता, व्यापकता येणार नाही ; ताजेपणा, मधुरता येणार नाही.

महाराष्ट्रातील, भारतातील जनस्थिती बघा. ही सभोवतीची सृष्टी बघा. मनुष्याचे स्वभावही कळायला आसमंतातची नैसर्गिक परिस्थिती बघावी लागते. या निसर्गातील सौंदर्य-प्रतीती तुम्हाला येऊं दे. मला एखादे वेळेस वाईट वाटते की, महाराष्ट्रातील निसर्गाचे वर्णन फारसे कोणी केले नाही. गोविंदाग्रजांनी' अंजनकांचनकरवंदांच्या देशाला ' वंदन केले आहे. वासुदेव शास्त्र्यांनी 'आंबे नारळि पोफळी' असे दोनचार श्लोक केले आहेत. ते शिकवित असता मी वर्गातून साश्रू नि सद्गदित होऊन उठून गेलो होतो. कवी माधव यांचे कोकणातील सुंदर वर्णन, बालकवींनी केलेले सृष्टी वर्णन, पांचगणीच्या घाटातील दृश्यावरची रे. टिळकांची कविता अशा थोडया कविता आहेत. परंतु हे अपवाद. कोणत्या ऋतूत कोणती फुले फुलतात, कोणते पक्षी गातात, कोणती पिके होतात हे सुध्दा आपणांस नीट माहीत नसते. शरदऋतूत कमळे फुलतात हे परंपरेनेच आम्हाला माहीत आहे. मी दापोलीच्या हायस्कूलमध्ये शिकत होतो. तेथील थोर मुख्याध्यापक एकदा म्हणाले, 'कोकणात किती सौंदर्य ! पावसाळयातील भव्य देखावे ! डोंगरावर उभे रहावे. दुरून समुद्र दिसावा,   झाडांवरून पाणी टपटप पडत असावे,  चिंचेच्या झाडांना कोवळी पाने फुटावी.' मी वेडा होतो. परंतु याचे वर्णन कोठे नाही. या सौंदर्याला काव्यात कोणी अमर केले नाही. इंग्लंडमध्ये सदैव धुके, ढग आहे; परंतु तिकडचा कीट्स तेथील सौंदर्याने वेडा होतो. मला त्याची प्रतिभा असती तर ? कोकणचा अपार घों घों करणारा समुद्र ! परंतु बायनरप्रमाणे ' कर गर्जना कर हे सागरा ' असे म्हणून कोणी कवी उचंबळला नाही. वाल्मीकी, कालीदास, भवभूती, रवींद्र हे निसर्गाचे महान उपासक होते. परंतु आपणाला निसर्गाचे प्रेम नाही. नाद नाही. छंद नाही. वर्डस्वर्थ कवी लिलॅक फुले पाहून 'as if made of light' - प्रकाशाचीच जणू ही बनलेली असे म्हणून नाचतो. आपण असे कधी उचंबळतो का ?

मित्रांनो, सृष्टीचे सहृदय मित्र बना. तृणपर्णांवरचे दंवबिंदू पहा. ती मोती बघा आणि गवतातून कोळयांनी विणलेली जाळी-सूर्यकिरणांनी रंगलेली जणू सोनेरी मोत्यांच्या झालरी लावलेली परींची ती हवेवर डोलणारी नाजूक मंदिरे-बघा ती मौज. आणि पहाटेच्या प्रशांत वेळी झाडांवरून थेंब पडतात, जणू अश्रू - ते ऐका. ते निळे डोंगर बघा. खोल द-या, नद्यानाले, तळी, वृक्षवेली, फुले, पाखरे-सारे पहा. एखादे साधे फूल-परंतु किती सुंदर असते ! टेनिसन म्हणाला, 'एक फूल जाणणे म्हणजे विश्व जाणणे.' फुलपाखरांच्या अंगावरची नक्षी बघा. फुलपाखरांच्या पाठीमागे धावा. कोकिळेला शोधीत फिरा. घुबडाचे घूत्कार ऐका : नाचणारे मोर बघा. गायी, बैल, मांजरे-त्यांचे डोळे बघा- गंमत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel