भर दुपारी खरतर देवळात कोणच नसायच. पण आज होत. शेवंता आली होती. मनातून पूर्ण उद्विग्न होऊन ती महादेवाकडे आली होती. सोनगावच्या देवळात एक प्रथा होती येणारा भाविक महादेवाच्या पिंडीवरच्या कलशा मधे पाणी घालायचा.. महादेवाच्या डोक्यावर पाण्याची संततधार घालायला. शेवंताने मनोभावे हात जोडले काय मागायला नाही तर फक्त त्या सगळ्यातून बाजूला यायला ती देवळात आली होती.. महादेवाच्या कलशा मधे तिने पाणी सोडले आणि महादेवा सोबतच तिच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याची संततधार लागली.. काहीच न सुचून तिने महादेवा समोर डोकं टेकलं आणि स्फुंदून रडायला लागली..
बराच वेळ लोटला.. कोणाचा तरी हात तिच्या पाठीवरून मायेने फिरला आणि त्या स्पर्शाने तिने मान वर करून पाहिले.. तिच्यासमोर म्हातारी उभी होती.. तिने ओळखले ही तिच जी त्या दिवशी पारावर भेटली होती..
"म्हादेवा समोर टिपं गाळून काय होत नाय.. आपला तरास आपनच कमी करावा बयो. मनाला लावून घेऊ नगस बाय कोनाच बोलन.. अगं आपला जलमच तसला.." म्हातारी मायेने बोलली..
तिला वाटत होतं गावात कोणीतरी कायतरी बोललं असेल. तमाशातल्या माणसाला फार काय मान नव्हता समाजात हे ठाऊक होते तिला..
"न्हाय गं म्हातारे.. कोन कशाला बोललं मला.. कुनी बोलाव एवडा मान नसतो गं आम्हांना.."
"म्हातारे बाईचा जलम असा कसा गं? सगळं सहन करत जगायचं.. आपली कुट जागा हाय गं??" शेवंता बोलली..
"जलम नसतो.. जुलूम असतो तो बया..", म्हातारी खिन्न होऊन म्हणाली.. पन काय झालं तुला.. आलीस तवा तर माझ्या भोळ्या सदाला तर पार गार करून टाकलस की गं... अन गावात चर्चा हाय तुझ्या नाचाची.. गावं येडं करुन सोडलया तुम्ही.. तू नाचानं आन् तुझ्या त्या गुलाबच्या आवाजाने.. अन् का आसं टिपं गाळतियास गं???" म्हातारीने विचारले.
"त्याच नाचाने आणि गाण्याने घात केलाय गं म्हातारे ..आज पोट आणि जीव आज अडकून बसलाय गं.." डोळ्यातलं पाणी पदराने टिपत ती म्हणाली.. आणि सगळी कर्मकहाणी तिने म्हातारीला सांगितली..
"समदी एकजात सारखीचं.. मर्दाला त्याच्या मर्दानगी वर लई माज असतोया आनि पैसा असला की मंग हे असचं असतयं.. शेवटी बाप्या तो बाप्याचं.. पैसा आणि अंगातली रग ह्यास्नी बाजार मांडाया हुबी करतीया.."म्हातारी उसासत बोलली..
"मी काय करु काय उमगना बगं म्हातारे.. एकतर त्या पोरीला मी आई होऊन सांभाळलयं.. जत्रत गावली मला न् तवादरन नजरेत ठिवल्या.. लई जीव जडलाय तिच्.. "
"जीव जडल्याव असा सौदा करत न्हाईत कोनी म्हातारे", शेवंताचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच एक ओळखीचा पुरुषी आवाज घुमला..
शेवंता आणि म्हातारी दोघींनी चमकून मागे पाहिले.. आणि शेवंता चरकली...
© सुप्रियाघोडगेरीकर
शेवंता आणि म्हातारी दोघींनी चमकून मागे पाहिले.. आणि शेवंता चरकली...
त्या दोघींच्या मागे सदा उभा होता. तो आल्याच कळालच नाही दोघींना पण.
खरतर सदा त्याच राहिलेलं कांबळं घ्यायला आला होता आणि त्याला देवळात म्हातारी आणि तिच्या सोबत कोणतरी दिसलं होतं. त्याला वाटल गुलाब असेल म्हणून तो आला होता. पण त्याच्या कानावर वेगळच काहीतरी पडल होतं..
"एवडा जीव हाय तर सौदा कशापायी लावलाय? पैकाच पाहिजे असल तर कमवता बी येतो.. त्या पोरीच्या आविष्याचा खेळ का लावलाय??" सदा रागाने बोलला..
"सुखाचा घास खाणाऱ्याला न्हाय कळायचं ते. घर दार असलेली मानसं तुमी.." , शेवंता खिन्न होऊन म्हणाली..
"तुमाला हा असला घास घ्याया मी सांगितलं व्हत का?? लाज कशी वाटत नाही तुमाला??" सदा ओरडला.
"अरं गपा.. आता तुमी भांडू नगासा..".म्हातारीने दोघांना गप केले.. सदा ,अरं लेकरा , ती काय आनंदानं करतेया व्हय हे.. तिचा पन नाविलाज हाय.. तमाशातलं जिण तुला न्हाय कळायच पोरा.. अरं बघ तरी पोरीचं डोळं रडून सुजल्यात बघ.." म्हातारीने शेवंताची कड घेतली..
"म्हनून काय तिला त्या पाटलाकडं सोडायची काय मावशे???" सदाचा आवाज चढला होता..
"मंग काय करायच??.त्या पोरीच्या नशीबात पन तेच लिहू का जे आमच्या हाय? समदी जिंदगी तमाशात घालवायची का तिनं?? फडावर नाचताना लोकांच्या भुकेल्या नजरा झेलायच्या?? नव्या गावात नवा आशिक.. आन् एवढं करून म्हातारपणी झिजत मरायचं.. " शेवंता उद्वेगाने बोलली..
"सोडा मग हे काम.." सदा बोलला.
"आनि काय करु?? कोन घालनार पोटाला?? सदाभाऊ पाटलाच्या घरात निदान तिला दोन वेळचं जेवन आन कापड, दागिनं मिळतील.. रखेल म्हनून का असना पन निदान पाटलाच्या वाड्यात राहिल" शेवंता म्हणाली..
"मग लगीन करा की तिच.. मानानं जाईल कुनाच्या तरी घरात ती.. उद्या पाटलाच मन पलटलं तल कुटं जाईल??" सदा तिच्याकडे बघत म्हणाला..
"कुनाशी करायच तिनं लगीन सदाभाऊ????" शेवंताने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं...
"कुनी बी करायची गरज नाय..." गुलाबने शेवंताचा हात धरत तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले..
"तू कवा आलीस वसू??" शेवंताने चमकून विचारले..
"अक्का.. मी तयार हाय जायला.." गुलाबने तिचा निर्णय दिला..
"डोस्क थाऱ्यावर हाय का तुजं???", सदाचा पारा आता चढला होता.. काय बोलतियास ते कळतय का??
"कळतया.. अक्का बोलतिया ते काय चुकीचं न्हाय.. आन.फडाचं बी नुकसान न्हाय हुनार.. अक्का... मी राहिन इथं.." गुलाब महादेवाकडे बघत बोलली..
"ठिक हाय पोरी.. जा तू.. " म्हातारी म्हणाली.. आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून पाराकडे निघाली.. तिच्या पाठोपाठ सदा गेला..
"म्हातारे तू तर तिला समजावं.. अगं आस कसं??"सदाच्याने बोलवल जाईना..
"सदा, लेकरा चल जाऊया आपन घरला.." म्हातारीने त्याचा हात धरून त्याला पारावर नेले..
"म्हातारे का आसं डोस्क फिरल्यागत वागालिस? आन तिला कळतय का? तो पाटील हैवान हाय गं.. उद्या आजनू धा बाया आणलं तवा हिचं काय? चल आपुन जाऊन त्या अक्काला सांगू.. चल.. तुझं ती ऐकलं.. चल म्हातारे .", सदा काळीज तोडून बोलत होता..
"सदा.. ज्यांच्या हक्काचं कोन नसतय.. आई बाप.नसत्यात त्यांच हे असच असतयं.. तू ऐक.. ह्यात पडू नगो लेकरा.. अस परक्या साठी आपल्याला ताप करून घेऊ नगं.." म्हातारी बोलली..
"परकी?? आगं..", सदाला काय बोलावे तेचं कळेना..
"मग सांग बगू राजा कोन हाय ती आपली..??"
म्हातारीच्या ह्या प्रश्नावर सदाकडे कायचं उत्तर नव्हते.. हताशपणे त्याने मंदीराच्या कळसाकडे नजर लावली..
©सुप्रिया घोडगेरीकर