राजकुमार पुढे बोलू लागला,
“ त्या रात्री दिवसभर केलेल्या प्रवासामुळे मी थकून गेलो होतो. मी माझ्या कक्षात विश्राम करण्यासाठी गेलो होतो. मध्यरात्री माझ्या अंगाची लाही लाही झाल्याप्रमाणे आग होऊ लागली. त्यामुळे मी झोपेतून खडबडून जागा झालो. तेव्हा मला दिसले कि मी एका वनाच्या मधोमध वणव्यामध्ये अडकलो आहे. त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मी वज्रसेनाला मदतीसाठी कितीतरी हाका मारल्या, आपण सर्वानाही हाका मारल्या परंतु कोणालाही आमच्या हाका ऐकू गेल्या नाहीत.
काही क्षणात त्या वणव्यामधून एक भयंकर चित्कार ऐकू आला. इतका भयंकर कि ऐकून एखाद्या शूरवीर योद्ध्याचेही काळीज चळचळ कापेल. मी घाबरून दीडमूढ झालो आणि एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे जागच्या जागी थिजून बसून राहिलो. कशी क्षण उलटून गेल्यानंतर मला मी जिवंत असल्याची जाणीव झाली आणि मी माझ्या बिछान्यावर दचकून उठून बसलो. मला दरदरून घाम फुटला होता. मी प्रश्न केला ‘कोण आहे? हा सगळा मायावी प्रकार काय आहे?’
माझ्या त्या प्रश्नाला प्रतिसाद देणारी एक आकाशवाणी कानावर पडली
‘ अरे मुर्खा तू ज्या स्त्रीला बंदी बनवले आहेस ती कोणी मायावी चेटकीण नाही तर साक्षात शक्तीचे एक स्वरूप आहे. तिच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करून तू तिचा भयंकर अवमान केला आहेस. एक कुलवंत क्षत्रिय असून देखील तू एका परस्त्री प्रती तू कामांध भाव प्रकट केलास. हा अक्षम्य अपराध आहे.’
पुढच्याच क्षणी त्या वणव्याच्या मधोमध एक विवर तयार झाले आणि त्या विवरातून अगणित विशालकाय हत्ती माझ्या दिशेने धावत येऊ लागले. त्या हत्तींना माझ्याकडे धावत येताना पाहून एखाद्या क्षुल्लक मुंगीप्रमाणे मी असहाय्य झालो होतो. त्यापैकी काही हत्ती त्यांच्या सोंडेने मला मारू लागले काहींचे सुळे मला भोसकू लागले. काहींनी तर मला पायदळी तुडवायला सुरवात केली आणि मी इकडेतिकडे फेकला जाऊ लागलो. मी मदतीसाठी याचना करत राहिलो परंतु मला मदत करायला कोणीही आले नाही. काही क्षणातच मला ते दु:ख असह्य झाले आणि माझं मृत्यू समीप आला आहे याची मला जाणीव झाली. एखाद्या लहान मुलाने ठेच लागताक्षणी 'आई गं' असे रडावे त्याप्रमाणे माझ्या मुखातून ‘त्राहि मां गणाधीश’ हे अस्फुट उच्चार बाहेर पडले.
माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि लगेचच त्या सर्व हत्तींनी माझ्यावर प्रहार करणे बंद केले. माझ्या समोर स्वत: उच्छीष्ट गणपती उग्ररुपात प्रकट झाला होता. त्याच्या काळ्या कभीन्न महाकाय शरीरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्या ज्वाळा एखाद्या वणव्याप्रमाणे तप्त भासत होत्या. त्यांचे नेत्र रक्तासारखे लाल झाले होते. त्यांत क्रोध स्पष्ट दिसत होता. त्यांची सोंड आणि दोन्ही सुळे रक्ताने माखलेले होते. त्यांच्या ह्या रुपात ते साक्षात तांडव करणारे त्यांचे पिता शिवशंकर यांची आवृत्ती भासत होते. त्यांच्या त्या अद्भुत आणि अद्वितीय रूपाचे वर्णन करण्यासाठी माझे शब्द तोकडे पडत आहेत.
त्यांचे हे भयंकर रूप पाहून मला असे वाटले कि मी आता अखेरच्या घटिका मोजत आहे. परंतु त्या गणपती बाप्पाचीच कृपा म्हणून केवळ बेशुद्ध पडलो. माझी दयनीय अवस्था पाहून कदाचित त्याला माझ्यावर दया आली असावी त्याने उग्ररूप त्यागून मंगलमुर्ती रूप धारण केले.
जेव्हा मला जाग आली तेव्हा मी लहानपणी वर्णन ऐकल्याप्रमाणे श्यामवर्णाच्या, दिगंबर आणि सुडौल बाळसेदार अशा गणपतीचे रूप पहिले. त्याला तीन नेत्र होते आणि चार भुजा होत्या. त्या भुजांमध्ये पाश, अंकुश आणि ऊस धारण केला होता. त्यांच्या मांडीवर तीच स्त्री विराजमान होती जीचा मी उपमर्द केला होता. तीही दिगंबर रुपात होती आणि उच्छिष्ट गणपतीच्या चौथ्या भुजेने त्यांना आलिंगनात घेतले होते.
उभयतांच्या तेजापुढे या विश्वातील कोणत्याही धर्मपरायण नृपतीचे किंवा वर्षानुवर्षे तप केलेल्या तपस्वी पुरुषाचे तेजही एखाद्या लहानशा दिव्याप्रमाणे भासेल इतके ते दोघे तेजस्वी होते. त्या दोहोंच्या वैभवापुढे साक्षात कुबेर देखील एखाद्या भिक्षुप्रमाणे प्रतीत होईल. त्यांचे सौंदर्य पाहून स्वत: कामदेव देखील लज्जित होईल. हे निश्चितच आमच्या पूर्वजांचे पुण्यसंचय असावे कि इतके उद्दाम वर्तन करून देखील त्या दोघांचे दिव्य दर्शन या माझ्या चर्मचक्षुना घडू शकले. त्यांचे दर्शन घडल्यानंतर प्रत्येक संसारिक उपलब्धी जिचा मला दुराभिमान वाटत होता ती आता मला नीरस आणि कंटाळवाणी वाटू लागली आहे. परंतु हे माझे दुर्भाग्य देखील होते कि मी आपल्या कुळाच्या आराध्यासमोर त्याचा प्रिय भक्त बनून नव्हे तर अपराधी म्हणून उभा होतो. हि गोष्ट माझ्या लक्षात येताच मला मेल्याहून मेल्यासारखे वाटले. त्यांच्याकडे डोळे भरून पाहण्याची इच्छा होती पण मी त्यासाठी अपात्र असल्याची जाणीव मला झाली. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मी क्षमा याचना करू लागलो.
इतक्यात दश दिशांमध्ये कंपने निर्माण करून दुमदुमणारा उच्छिष्ट गणेशाचा तो आवाज कानी पडला.
“ नंदीतेज, उठ! एखादी स्त्री सामान्य नेत्रांना भले कितीही असमर्थ प्रतीत होत असेल तिचा आदर करणे हे क्षात्रधर्माच्या सामान्य नियमांपैकी एक आहे. एक पुरुष, एक क्षत्रिय आणि नंदिमोक्ष राज्याचा भावी नृपतीला हे असे हीन वागणे शोभून दिसत नाही. तू एक अक्षम्य अपराध केला आहेस. परंतु तू आम्हाला शरण आला आहेस म्हणून आम्ही तुला तुझा दंड निश्चित करण्याचा अधिकार देतो. सांग नंदीतेज, तुला काय दंड स्वीकार आहे?”
नंदीतेज उठला त्याने दोन्ही हात जोडून उच्छिष्ट गणेशाला सांगितले,
“ बाप्पा, तू दयेचा सागर आहेस, माझ्या अपराधाचा दंड मलाच ठरवण्याचा अधिकार देऊन तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे हे निश्चितच माझे पूर्वसंचित आहे. मी निश्चित काही ना काही पुण्यकर्म केले असावे. मी आपल्या आज्ञे शिवाय आपल्या अधिकार क्षेत्रातील न्यायव्यवस्थेचे हनन केले. एका स्त्रीला अबला मानून तिच्यावर वाईट नजर टाकली आणि तिचा अपमान केला. हे सर्व अपराध करून मी केवळ एका राजपुत्राच्या पदाचाच नाही तर क्षात्रधर्माचा आणि पौरुषत्वाचा देखील अवमान केला आहे. या अपराधासाठी निश्चितपणे हाच दंड योग्य ठरेल कि एका स्त्रीच्या रुपात असहाय परिस्थिती मध्ये त्याच कारागृहात आजन्म बंदी बनवून ठेवावे ज्या कारागृहात मी मातेसमान पूज्य अशा पुष्टीदेवीना बंदी बनवून ठेवले होते.परंतु जर आपणास हा दंड मी केलेल्या दुष्कर्माची शिक्षा म्हणून पर्याप्त वाटत नसेल तर मी आपणास प्रार्थना करतो कि आपण स्वत: माझा दंड निश्चित करावा ज्यामुळे माझ्या या पापकर्माचे दहन होईल."
उच्छिष्ट गणपती म्हणाला,
“तू आपल्यासाठी निवडलेला दंड मला मान्य आहे नंदीतेज! तुझ्या या पश्चातापपूर्ण व्यवहाराने मी प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर मागून घे.”
“बाप्पा माझ्या सारख्या अभद्र व्यक्तीला वरदान देण्याचा विचार आपल्या मनात आला यातच मी भरून पावलो. जर आता आपण माझ्यावर रुष्ट नसाल तर एक कृपा करावी. माझ्या परिवाराच्या आणि प्रजेच्या मनातून माझ्याबद्दल असलेल्या सर्व स्मृती नष्ट करून टाकाव्यात. नंदीमोक्ष राज्याच्या स्वर्णमयी इतिहासात कोणतेही कलंकीत पृष्ठ असावे अशी माझी इच्छा नाही. जर माझ्या या अभद्र दुष्कर्माबाबत माझे पिताश्री सम्राट सेतूपती यांना समजले तर ते आपला देह त्याग करतील. माझी स्वर्गीय माता तिच्या पूर्वजन्मीच्या दुष्कर्माचे फलित म्हणून तिच्या उदरी मी जन्माला आलो असे समजून कष्टी होईल. संपूर्ण प्रजा माझ्या कुळात जन्माला आलेल्या आणि सर्व भावी धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजांच्या चारित्र्याबद्दल शंका उपस्थित करेल. म्हणून हे गणराया, तू मला वर दे. सर्वजण माझे अस्तित्त्व विसरून जातील.”
राजपुत्राचे हे शब्द ऐकून गणराय प्रसन्न झाले.
“ तथास्तु. नंदीतेज, पुढील सात दिवसात तुझे शरीर हळूहळू बदलांना सामोरे जाईल आणि सातव्या दिवशी एका परिपूर्ण स्त्री मध्ये परिवर्तीत होईल. ज्या दिवशी तू पूर्ण स्त्री रूप धारण करशील त्या दिवशी तुझ्या बद्दलची संपूर्ण स्मृती लोकांच्या मनातून पुसली जाईल. सोबत मी तुला आणखी एक वर देत आहे कि आज गुह्यनगरीत घडलेल्या घटनेची स्मृती तुझे अंगरक्षक आणि गुह्यनगरीचे नागरिक यांच्या मनातून तत्काळ पुसली जाईल.”
असे म्हणून उच्छिष्ट गणेश महाराज अंतर्धान पावले.
क्रमश: