एके दिवशी मुंगी व माशी एकमेकांच्या श्रेष्ठपणाबद्दल वाद घालत होत्या. त्या वेळी माशी मुंगीला म्हणाली, 'अग, माझ्या श्रेष्ठत्वाविषयी तर कोणालाच संशय नाही. तुला ठाऊकच आहे की, यज्ञयागासारख्या धर्मकार्यात जे जे पदार्थ असतात ते ते अगोदर मी चाखते आणि नंतर ते देवाला मिळतात. देवळात किंवा राजवाड्यात मी वाटेल तेव्हा जाते. वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या वेळी बसते. राजाच्या दरबारात सुद्धा मला कोणी आडवत नाही. राजाच्या मुकुटावरच नव्हे तर त्याच्या नाकावरसुद्धा मी बसते. त्याप्रमाणे बिलकुल श्रम न करता वाटेल तो पदार्थ मी खाते. तर इतकी मी श्रेष्ठ असताना तुझ्या सारख्या भिकारडीची कशी बरोबरी होईल?' माशीची ही सर्व बडबड मुंगीने शांतपणे ऐकून घेतली व मग उत्तर दिले, 'अग थोरामोठ्यांच्या घरी जाऊन जेवण्यात थोडीशी प्रतिष्ठा मिळते हे खरं, पण त्या जेवणाचं आमंत्रण असेल तर ! आमंत्रणाशिवाय आगंतुकासारखं एखाद्याच्या घरी जाऊन जेवणं हा निर्लज्जपणाच. आणि यासाठीच लोक तुला पानावरून हाकलून देतात. राजदरबारात जाण्याच्या आणि राजाच्या मुकुटावर बसण्याच्या तू कितीही गप्पा मार. पण परवा मी दाणा घेउन घराकडे जात असता तुझ्या जातीची एक बाई मिटक्या मारत रस्त्यावर पडलेला घाणेरडा पदार्थ खात असलेली मी प्रत्यक्ष पाहिली. तू म्हणतेस की आपण वाटेल तितका वेळ देवळात जाऊन बसतो, तर याचं कारण तुझा निरुद्योगीपणा आमच्याप्रमाणे तुला घरदार नसल्यामुळे तू वाटेल तिथे जाऊन बसतेस, यात काही भूषण आहे असं नाही. आमच्या सारखं उद्योग करून दाणा न साठविता आयत्या पिठावर रेघा ओढण्याची सवय तुला आणि म्हणूनच थंडीच्या दिवसात उपाशी मरावं लागतं, आमचं तसं नाही. आम्ही सुगीच्या दिवसात वारुळात दाण्याचा संग्रह करून ठेवतो अन् हिवाळ्यात त्या दाण्यावर दिवस काढतो !'

तात्पर्य

- जो सदुद्योगाने चरितार्थ चालवतो आणि आपल्या श्रमाने जे काय मिळेल त्यातच समाधानी राहतो, त्याची योग्यता टिवल्याबावल्या करीत हिंडणार्‍या, दुसर्‍याचे अन्न खाणार्‍या लोकांपेक्षा नक्कीच मोठी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel