एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, 'कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.' याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, 'खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.'

तात्पर्य

- वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी, हे चांगले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel