एक पंडीत मोठा गर्विष्ठ होता. तो आपल्या विद्यार्थांना एकदा तत्त्वज्ञान शिकवत असता एका विद्यार्थ्याने त्याला सहज थट्टेने विचारले, 'गुरुजी, अगस्ति ऋषींनी समुद्र प्राशन केला असे पुराणात सांगितले आहे, तर ही गोष्ट शक्य आहे का?' पंडिताने मोठ्या आढ्यतेने उत्तर दिले, 'शक्य आहे, इतकेच नव्हे मीसुद्धा स्वतः तुला समुद्र पिऊन दाखवतो. जर असे झाले नाही तर मी तुला एक हजार मोहरा देईन.'
पैज ठरविल्यानंतर काही वेळाने पंडित शुद्धीवर आला व भलत्याच गोष्टीविषयी पैज लावल्याबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला. मग तो कालीदासाकडे गेला व पैजेची गोष्ट त्याला सांगून म्हणाला, 'ह्या एवढ्या संकटातून मला सोडवाल तर मी तुमचा फार आभारी होईन.' पंडिताच्या मूर्खपणाची कालीदासाला दया येऊन त्याने त्याला मदत करण्याचे कबूल केले. दुसर्या दिवशी तो विद्यार्थी, पंडित, कालीदास व गावातले बरेच लोक समुद्रावर गेले. कालीदासाच्या सांगण्याप्रमाणे पंडिताने खूप तांबे बरोबर आणले होते. ते पाहून पंडिताच्या मूर्खपणाचे लोकांना आश्चर्य वाटले. तो काय करतो याची मोठ्या उत्कंठेने पैज लावली होती त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, 'अरे, ठरल्याप्रमाणे समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकण्यास मी तयार आहे, पण ज्या नद्या समुद्राला येऊन मिळाल्या आहेत, त्यांचं पाणी बंद करण्याची तुझी तयारी आहे का?' नुसतं समुद्रातलं पाणी पिण्याचं मला कबूल आहे. त्यात जे नद्याचं पाणी येत असतं ते पिण्याचं मी कबूल केलं नाही, हे तुला माहीत आहेच.' हे बोलणे ऐकून तो विद्यार्थी काहीच बोलूं शकला नाही व पंडिताच्या हुशारीबद्दल सगळ्या लोकांनी त्याचे फार कौतुक केले.
तात्पर्य
- समयसूचकता हा गुण वेळ आल्यास संकटातून मुक्तता करायला मदत करतो.