श्याम आत्याला म्हणाला, “आत्या, मी आता जातो. बराच उशीर झाला,” असे म्हणून तो उठला व त्याने आत्याच्या कृश चरणावर डोके ठेविले. “शताउक्षी हो!” गहिवरून व त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाला, “आत्या, मी काही श्रीमंत नाही. माझ्याजवळ पैसे उरत नाही. तुला काय मी देऊ! हे घे पाच रुपये.”

आत्याच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, “श्याम, अरे पैसे का चाटायचे आहेत? पैशांचे काय, आज आहेत उद्या नाहीत. गोड शब्द बोलू, ते राहतात. गोड शब्दांची तरी दुनियेत वाण नसावी. गोड शब्द बोलायला काय रे जाते! परंतु तेसुद्धा नाही हो जगात. बरे, येत जा हो मधूनमधून. ‘कोकणात आपले कोण आहे! आई नाही, बाप नाही!’ असे नको म्हणू. आम्ही आहोत ना? लग्न तर नाहीच करत म्हणतोस! असते आज तुझे आईबाप, तर ते तुला असा राहू देते का? कोण रे जगात काळजी करायला आहे? बायको आपली सत्तेची, प्रेमाची असते. आमच्या त्या वडपुनवेच्या सावित्रीच्या गाण्यात आहेः
स्त्रिया यशाची शक्ती
भ्रताराची करिती भक्ती

साधुसंतांनीही नाही का लग्ने केली ? लग्न करणे आपले बरे असते. पण तुला वाटत नाही. एवढे शिकूनसवरून आपला बैराग्यासारखा राहणार का ? मग शिकलास तरी कशाला ? माझे ऐकून रागवू नकोस हो ! आम्ही जुनी माणसे; आम्हाला आपले वाटते, संसार करावा, मुलेबाळे असावी अन् होईल तेवढे दुस-यालाही सहाय्य करावे. परंतु तुम्हाला ते गांधी काय सांगतात, आम्हाला काय कळे ? त्या गांधींनासुद्धा मुलेबाळे आहेत म्हणतात- पण जाऊ दे. जाल तेथे नीट राहा. जपून राहा. प्रकृतीस आधी जपत जा. थोडे दूधबीध घेत जा. प्रकृत धड तर सारे धड. ऐकलेस ना ? आणि अरे, एखादे वेळेस सठी सहामासी कधी बोटभर चिठ्ठी पाठवावी. आहे आपली एक आत्या- पाठवले एखादे पत्र. अरे, तेवढेच बरे वाटते ! खुशाली आपली कळवावी. दुसरे काय घ्यायचे-द्यायचे आहे ? खरे ना ? पाठव हो पत्र गेलास म्हणजे.”

सद्गदित झालेला श्याम म्हणाला, “पाठवीन हो पत्र. येतो हो आता.”
“अरे थांब, ही चार ओली पोफळ घे. काल एक शिंपुट मिळाले होते,” असे म्हणून सीताआत्याने ओल्या सुपा-या श्यामच्या हातात दिल्या. सीताआत्याकडे द्यावयाला दुसरे काय होते ? एक काळ असा होता की सीताआत्याकडे अंगणात सुपा-यांचे ढीग पडत असत. परंतु आज चार पोफळांना ती महाग झाली होती ! घरापलीकडे ती पूर्वीची बाग अजून होती. तेथे रहाटाचे कुऊ कुऊ चालले होते तेथे पोफळींवर सुपा-यांची पेंदे लटकलेली होती. परंतु सीताआत्याची सत्ता तेथे नव्हती. बाळपणी सीताआत्याकडे पाहिलेले वैभव श्यामला आठवले. त्या चार पोफळांनी सारा जुना इतिहास एका क्षणात उभा केला. श्याम खिन्न झाला. त्याने त्या सुपा-या खिश्यात टाकल्या. ‘येतो’ असे आत्याला पुनः सांगून ‘रामचंद्रपंताना नमस्कार करून जड पावलांनी भरल्या डोळ्यांनी  निघून गेला.

श्यामची आत्या गायी-वासरांच्या संगतीत कोकणात आनंद मानीत आहे. श्याम आपल्या उद्योगात गढून गेलेला आहे. मनुष्य समोर असला म्हणजे त्याची आठवण असते; परिचयाने प्रेम वाढते हे काही खोटे नाही. आपापल्या व्यवसायात आपण गुंतून राहिले म्हणजे महिन्या महिन्यांतूनसुद्धा दूरच्या आप्तेष्टांची, स्नेह्या-सोबत्यांची आठवण येत नाही. परंतु श्याम दररोज पहाटे उठतो, स्नान करून येतो व देवाजवळ बसतो आणि त्याच्या मनात, त्याच्या हृदयात या सर्व गतस्मृतींचे ढग एखादे वेळेस जमून येतात आणि त्याचे डोळे भरून येतात. कितीदा तरी असे होते ! त्याची संध्या पुष्कळदा या अश्रुजलानेच होत असते !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel