हरदयाळ अजून क्रोधाने थरथरत होते. थोड्या वेळाने ते शशीजवळ गेले. तो शशी थंडगार झालेला! अमीनला मारलेली ती काठी जणू शशीलाच लागली ! हरदयाळ घाबरले. पार्वतीबाईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली. पण छे, तिचा उपयोग नव्हता. शशीची प्राणज्योत गेली ! दिव्याची ज्योत हरदयाळांनी मोठी केली होती;  परंतु शशीची ज्योत त्यांनी मालविली, विझविली ! अरेरे!

दादू अमीनच्या अंथरुणापाशी रात्रंदिवस बसून होता. अमीन त्या दिवशी घरी आला, तो आजारीच होऊन आला. एकदम १०४ डिग्री ताप ! थंडगार होणा-या शशीने का आपला ताप त्याला दिले ? अमीन दोन दिवस वातातच बडबडत होता:

“आलो रे शशी ! अशी घाई नको करू गडया ! आई-बाबांना सांगून येतो. जाऊ बाबा ? जातो, तो बघा शशी बोलावतो आहे-” मध्येच तो थांबे, डोळे गरगर फिरवी, बोटे नाचवी. पुनः म्हणे, “काय- तेथे हिंदू-मुसलमान वगैरे काही नाही ? देवाघरी सारी एकत्र खेळतात तर ! आलो मी-शशी. आपण एकत्र बसू, हसू, खेळू. जातो- आलो शशी-”

असेच काही तरी अमीन मधूनमधून बडबडे. काय होणार हे दादू आधीच समजून चुकला होता. “काय, पाखरू पण घेऊन येऊ ? बरे. ते पण आणतो. तेथे आपणाला खेळू देतील- हो, मजा, चल रे पाखरा, चल.” पिंज-यातील पाखरू पंख फडफडवू लागले. ते अधीर झाले ! पाखरू दाणा खाईना, पाणी पिईना.

मध्यरात्र झाली होती. अमीनची प्राणज्योत विझत चालली. दादू व अमीनची आई तेथे बसलेली होती. दुसरेही काही लोक होते. “बाबा, अम्मा जातो. चल रे पाखरा. शशी-” हेच शेवटचे शब्द. “अमीनचे प्राण आता राहात नाहीत.” सारे म्हणाले तिकडे सूर्य उगवत होता. पाखरे उडू लागली. शशीकडे अमीनचे प्राणहंस उडून गेले. ते पाखरू- त्याचाही प्राण शशीकडे गेला. ती तीन पाखरे देवाच्या अंगणात खेळू लागली.

“दादू हरदयाळांवर तू खटला का भरीत नाहीस ? त्यानेच तुझ्या मुलाला मारले- खटले भर,” कोणी दादूला सांगितले. दादू म्हणाला, “ज्या मित्रासाठी अमीनने प्राण दिले, त्या मित्राच्या बापावर खटला ? छे: ! मुसलमानांतही काही चांगले गुण असतात, हे जगाला कळू दे. हरदयाळांचा मुलगा गेला, ही त्यांना थोडी का शिक्षा आहे ?”

थोर मनाचा दादू ! दादूने अमीनची सुंदर कबर बांधली. अमीनला शशीने एकदा सुंदर चित्र दिले होते- ते त्याच्या शेजारी पुरण्यात आले. शशीचा देह जेथे जाळला गेला, तेथली थोडी राख आणून तीही त्याने अमीनच्या शेजारी ठेवली. बुक्क्याप्रमाणे ती त्याने अमीनच्या कपाळाला लाविली. शशी व अमीन दोघांची जणू ती एकत्र समाधी होती ! जिवंत असताना दोन देहांत असून ते एक होते; आता एकाच मृण्मय कबरीत ते दोघे राहिले. त्या कबरीशेजारी त्या सुंदर कृतज्ञ पाखरांचीही एक कबर दादूने बांधली. तो पिंजराही त्याने कबरेतच पुरला.

आठवड्यातून एक दिवस दादू तेथे जातो. त्या कबरीवर फुले वाहतो. नंतर तेथेच तो दोहरे व कबिराची गाणी म्हणत बसतो.
दादू म्हातारा झाला तरी अजून पिंजणकाम करावयास जातो. पुष्कळ वेळा मुले-मुली त्याच्याभोवती जमतात व त्याला प्रेमाने म्हणतात, “दादू, सांगा ना हो ती शशीची न् अमीनची गोष्ट. सांगा ! दादूला मुलांचा आग्रह नाकारवत नाही. तो एकीकडे पिंजीत असतो. परंतु गोष्ट सांगता सांगता तो तल्लीन होतो, त्याचे डोळे पाण्याने भरतात, पिंजणाचे तुंई तुंई थांबते. दादू रडू लागतो ! तो म्हातारा दादू रडतो व ती गोष्ट एकणारी मुले-मुलीही रडतात !”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel