परंतु हा आघात शांत व गंभीरपणे त्यानें सहन केला. या परलोकविद्येवर पूर्ण विश्वास बसल्यामुळे आपल्या प्रिय भावाची भेट त्या शोकदु:ख रहित अशा परमेश्वराच्या राज्यांत होईल अशी त्यांना खात्री वाटत होती. या परकोकविद्येच्या योगानें वसंतकुमाराचे प्राणोत्क्रमण होण्याच्या पूर्वीच्या दिवशीच देवदुताकडून ही वार्ता हेमंतकुमारांच्या मधून मिळाली होती. आणि दुस-याच दिवशी 'उद्या वसंतकुमारांची दु:खे व क्लेश संपतील' या संदेशाप्रमाणे खरोखरच वसंतकुमार वैकुंठवासी झाले.
थोडया काळानें त्यांची पत्नी पण त्यांना सोडून गेली. अशा प्रकारें पिता, भ्राता पत्नी यांच्या वियोगाने विव्हळ झालेले शिशिर बाबू आतां राजकीय रंगणांत उतरले.
पूर्वीचा जुना लाकडी छापखाना होताच. बंगाली भाषेचे टाइपहि होते. आपण पुन:प्रयत्न करुन वृतपत्र कां काढूं नये, असा प्रश्न मनी उभा राहिला. प्रश्नांचे उत्तर होकारार्थी आलें. त्यावेळचे जिल्हाधिकारी मॅजिस्टे्रट मन्रो आणि त्यांचे सहकारी ओकिनील्ली यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी शिशिर बाबू गेले. या दोघांची व शिशिरबाबूंची चांगलीच मैत्री जमली होती. स्नेहाने युक्त असलेल्या या अधिकारीद्वयानें या कल्पनेस जोराचा दुजोरा दिला. आपल्या पत्राच्या आम्ही प्रत्येकी १० प्रती घेऊ असें त्यांनी आश्वासन दिलें.
हें साप्ताहिक मायबोलींत बोलणार होतें. सर्वसामान्य जनतेसाठी तें होतें. या पत्राचें नांव अमृतबझारपत्रिका असें ठेवण्यांत आलें. १८६८ मध्ये हें पत्र सुरु करण्यांत आलें. पत्र सुरु झालें. तीन चार महिने झाले, तोंच या तीन महिन्यांच्या अपत्यावर गदा आली. या बाळाचें बाळसेदार व पाणीदार स्वरुप सरकारकंसाला सहन होईना. पत्रांचे धोरण, या लहान पोराची कडक भाषा सरकारच्या मर्मी झोबूं लागली. राष्ट्रीयत्वाचा हददीपक संदेश प्रथम शिशिरबाबूंनी दिला. सर्व भरताच्या ऐक्याची कल्पना त्यांच्याच विशाल लेखणीने लिहिली. राष्ट्रीयत्वाचा शिशिरबाबू हा जनक होय. त्यांनी या राष्ट्रीयत्वाची आपल्या लहानशा खेडयांत प्राणप्रतिष्ठा केली. हिंदुस्थान हें एक राष्ट्र आहे, तें होऊं शकेल आपल्या राजकीय हक्कांस त्यांनी जागरुक राहिलें पाहिजे याविषयींचे रणशिंग शिशिरनें फुकंले. स्वाभिमानाच्या वहीवर भस्म फुंकणा-या व तो वन्हि प्रज्वलित करणा-या या अभिनव तरुणाकडे सरकार दाव्यांने व हेव्याने पाहूं लागलें. एका युरोपियन डेप्युटि मॅजिस्ट्रेटनें अबु्र नुकसानीचा खटला भरला. या डेप्युटी कमिशनरांचे नांव राइट असें होतें.
अमृतबझारपत्रिकेची धीरवृत्ती, त्यांतील जोर पाहून या अधिकृत वर्गांने ठरविले कीं, शिशिरबाबुंना वेळीच धडा शिकविला पाहिजे. यांना अशी अदद्ल घडली पाहिजें कीं, आजन्म तिचा त्यांस विसर पडणार नाही. लो. टिळकांना देशांत शांतता नांदावी, सरकारस रयतेचें कल्याण करीत असतां डोक्यास त्रास होऊं नये, म्हणून ज्याप्रमाणें न्या. दावर यांनी हदद्पार केलें, त्याप्रमाणे या शिशिरबाबूंसही तेथील स्थानिक तुरुंगात लोककल्याणार्थ दोन वर्ष अडकवून ठेवावें अशी बंगालसरकारची स्थानिक सरकारास आग्रहांची विनंती किंवा हुकुम होता. शिशिरबाबूं च्या कारागृहांतील वस्तीसाठी एक मुददाम घर बांधण्यांतही येत होंते. परंतु इतक्यांत जिल्हयाचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे शिशिरबाबूंचे मित्र असल्यांमुळे त्यांनी जरा रदबदली केली. जर या राजद्रोहात्मक लेखाच्या लेखकांचे नांव तुम्ही सांगाल तर तुमच्यावरील ही फिर्याद काढून टाकण्यांत येईल असें शिशिरबाबूंस कळविण्यांत आलें.