या आठ वर्षात जनतेला सुखकसें होईल, त्यांची दु:खे वेशीवर कशी टांगली जातील याचा त्यांचा रात्रंदिवस ध्यास असे. आपली पत्रिका लोकप्रिय व्हावी म्हणून त्यांनी कोणताही प्रयत्न ठेविला नाही. विनोदी व हास्यरसोत्पादक चित्रें वृत्तपत्रांत घालण्याचा त्यांनीच प्रथम पायंडा पाडिला. ते मथळे फार मार्मिक देत असते. 'राजकीय भूमिती' हा त्यांच्या एका मथळयावरचा शब्द होता. कित्येक बडया अंमलदारांनी हा अंक वाचण्यासाठी विकत घेतला. विनोद, उपरोधिक लिहिणें, ताजे व स्वत:चे स्पष्ट विचार, नवीन धर्तीची मांडणी-असें सर्व और होतें. शिशिरबाबूंच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची छाप पडलेली असावयाचीच. थोडयाच काळांत पत्रिका सरकारवर निर्भीड टीका करणारी म्हणून प्रसिध्द झाली. सरकारची अंडीपिल्ली पत्रिकेनेंच बाहेर काढावी. त्या वेळच्या 'इंडियन डेली न्यूज' या पत्राने म्हटले की'The Patrika has become a thorn in the side of the Government पत्रिका सरकारच्या अस्तनींतील निखारा होय.
बंगालचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल आतां नुकताच या अधिकारावर आरुढ झालेला होता. शिशिरकुमारच्या अंगच्या गुणांची त्याला फार योग्यता वाटे. तो गुणज्ञ होता. एकदां त्यांने शिशिरबाबूंस गुप्त भेटीस बोलविलें होतें. शिशिरबाबूंची खरी योग्यता, त्यांची अलौकिक बुध्दी, त्यांची स्वयंभू ईश्वरी देणगी, देशासाठी स्वार्थनिरपेक्ष अशी अंतरीची खरी तळमळ या गोष्टी पाहून टेंपलसाहेब चकित झाले. त्यांच्या मनावर वजन पडले. बंगाल प्रांतावर स्वामित्व चालविण्याच्या कामीं त्यांनी शिशिरबाबूंस आपला अत्यंत जवळचा विश्वासू सल्लागार असें मानिलें. शिशिरबाबूंनी त्याच्याजवळ दोन गोष्टींची देशासाठीं मागणी केली. स्थानिक स्वराज्याचे हक्क व एक धंदेशिक्षणाची संस्था. सर रिचर्ड टेंपल साहेब म्हणाले, ' जर खरोखरच कलकत्याच्या लोकांस आपला स्थानिक कारभार आपल्या प्रतिनिधींकडून करवून घेण्याची उत्कंठा असेल आणि जर हें शिशिरबाबू सिध्द करुन दाखवितील तर हे हक्क देण्यास सरकार तयार आहे. शिशिरबाबूंनी कित्येक सभा बोलावल्या. आणि अँग्लो इंडियन व नाकर्ते झालेले नामधारी जे. पी. यांची मतें पार धुडकावून दिली. लोकमत तयार केंले. लोकांस जबाबदारीची जाणीव करुन दिली. अशा प्रकारें केवळ शिशिरबाबूंच्या अव्याहत व धडाधडीच्या प्रयत्नांमुळें कलकत्याच्या नागरिकांस इतक्या लवकर स्थानिक स्वराज्याचे हक्क मिळाले. १९११ मध्ये जी म्युनिसिपालिटीची व्यवस्था होती त्यापेंक्षा शिशिरबाबूंनी मिळवून दिलेली स्थानिक स्वतंत्रता जास्त योग्यतेची होती.
दुसरा प्रश्न धंदेशिक्षणाच्या संस्थेचा. पांच दिवसांत अनंत श्रम करुन शिशिरबाबूंनी दोन लाख रुपये जमा केले. देशाचा एकांगी शिक्षणाने फायदा होणार नाहीं हें या देशहितैकाग्र मनाला ५० वर्षापूर्वी कळून चुकलें होतें. दोन लाख रुपये जमा केल्यावर मग टेंपल साहेबांस सांगितले की, वार्षिक ८००० रुपयांची तुम्ही या संस्थेस मदत केली पाहिजे.
रिचर्डनंतर आलेला अधिकारी सर अॅश्ले एडन हाही कांही वाईट अधिकारी नव्हता. परंतु लहरी होता. 'वळलें तर सूत नाही तर भूत' अशी ही स्वारी होती. शिशिरबाबूंचा व अॅश्ले साहेबांचा शेवटी खटका उडाला. १८७७ सालची अखेरी आली होती. अनियंत्रित अशा अॅश्ले साहेबांना बंगालवर बेदरकार बादशाही गाजवावयाची होती अमृतबझार पत्रिका त्याच्या धोतरांतील विंचू होता. या विंचवाची नांगी ठेचण्याची त्यांने एक हिकमत लढविली. ही एक प्रकारची सब्सिडीअरी सिस्टिमच होती. शिशिरकुमारांस थोडेसें गोंजारुन, थोडा धाकदपटशा दाखवून, चुचकारुन आपल्या ताब्यांत घेण्याचा त्यांने घाट घातला. 'हिंदु पेट्रिअट' पत्राचे संपादक बाबु क्रिस्टो दारुपाल यांस तर अॅश्लेनें खांकोटीस मारलें होतेंच. छोटा किल्ला सर करुन अॅश्ले साहेबांची स्वारी आता. कोंडणा सर करण्यास निघाली. परंतु शिशिरकुमार यांचे पाणी निराळेंच होते.