१५ ऑगस्ट २०१७: मल्हार पाटील - '९ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जलद लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने चालत आहे, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीसाठी आम्हाला खेद आहे.' डोंबिवली स्थानकावर घोषणा झाली.

"अरेरे, या लोकांना काय जातं खेद आहे म्हणायला? इथे आमचं काय होतं ते आम्हालाच माहीत. साध्या स्वातंत्र्य दिनी सुद्धा सुखाचा प्रवास नाही आम्हाला." मल्हार पाटील प्लॅटफॉर्म वर उभं राहून म्हणतात.

"नेहमीचंच आहे हे काका." त्यांच्या शेजारी उभा असलेला एक मुलगा म्हणतो.

"अरे पण हे सगळं कधीतरी बदलायला हवं ना! अच्छे दिन अच्छे दिन म्हणतात ते हेच अच्छे दिन का? आम्ही मोठ्या विश्वासाने मतदान केलं होतं आणि आमची नेहमीची ट्रेन एकदाही वेळेवर येत नाही? हे जे काही चाललंय ते खूप वाईट आहे." मल्हार म्हणतात.

"काका, तुम्ही शिक्षक आहात का?" तो मुलगा विचारतो.

"हो, पण तुला कसं कळलं?" मल्हार म्हणतात.

बस्स… त्यांचं हे उत्तर ऐकून तो मुलगा लगेच तिथून पळून जातो. आसपासचे पॅसेंजर सुद्दा जरा बाजूला होतात.

"अरे? हे काय? मी काय दहशतवादी आहे का? सगळे एकदम बाजूला झाले ते. म्हणजे आता शिक्षकाला…"

"ओ काका, बस ना आता. ट्रेन आलीये म्हणून तो मुलगा पळाला." मल्हार सरांचं बोलणं मध्येच थांबवत एक मुलगा म्हणतो.

"अच्छा, असं आहे का? मग ठीक आहे." मल्हार सर आनंदाच्या स्वरात म्हणतात.

ट्रेन येताच सगळे प्रवासी घाईघाईने आत जाऊन आपली जागा पकडतात. काही प्रवासी सर्वांना चढू देऊन स्वतः बाहेर दरवाजाजवळ लटकत उभे राहतात. ट्रेन सुरु होते आणि मल्हार सरांचा ठाण्यापर्यंतचा नेहमीचा प्रवास सुरु होतो. त्यांना बसायला जागा मिळताच ते सुटकेचा निःश्वास सोडतात.

"बरं झालं एकदाची जागा मिळाली. आता निवांतपणे वर्तमानपत्र वाचता येईल." असं म्हणून ते आजूबाजूला बघतात. तर, सर्वांनी कानामध्ये कापसाचे बोळे कोंबून ठेवले होते. इतर प्रवाशांचा देखील तो नेहमीचा डबा असल्याने सर्वांना मल्हार सरांची सवय झाली होती.

"पावसाळ्याचे दिवस आहेत, पण पाऊस नाही. एवढं उन पडलंय, थंडी तर जाणवत नाही. तुम्हा सगळ्यांना रोज कशी थंडी वाजते? माझ्याकडे बघा, मी कधी कानात कापसाचे गोळे घातलेले पाहिलं आहे का? थंडीत सुद्धा माझ्या कानात नसतं आणि तुम्ही सगळे वर्षभर कानात कोंबून ठेवता. कसली तुमची ही तरुण पिढी?" मल्हार सर वृत्तपत्र वाचत म्हणतात.

"ते आमी थंडीपासून वाचण्यासाठी नाही कोंबते, प्रवचनापासून वाचण्यासाठी कान कोंबते." एक गुजराती माणूस मागून म्हणतो.

"म्हणजे?" मल्हार सर वृत्तपत्रातून वर डोकावून विचारतात.

"नाही… नाही… काका आम्हाला थंडीच वाजते… जतिन तू चूप नहीं बैठ सकता क्या?" ट्रेनमधला दुसरा प्रवासी म्हणतो.

"काय म्हणावं तुम्हा तरुणांना… मुलींपेक्षा नाजूक आहात तुम्ही सगळे…" मल्हार सरांचं बोलता बोलता एका प्रवाशाकडे लक्ष जातं. तो प्रवासी कानात हेडफोन लावून गाणे ऐकत असतो. वृत्तपत्र पुन्हा बॅगेत ठेवून मल्हार सर त्याच्या बाजूला जाऊन उभे राहतात.

"कोण आहे तो? त्याला माहित नाही का?" पाठीमागे एक प्रवासी दुसऱ्याला म्हणतो.

"एकतर तो नवीन असावा नाहीतर चुकून या डब्यात चढलेला असावा." दुसरा प्रवासी म्हणतो.

"देव त्याचं भलं करो." पहिला प्रवासी म्हणतो.

सगळे त्या मुलाकडे सहानुभूतीने बघतात. त्या मुलाचं देखील सर्वांकडे लक्ष जातं आणि त्याला कळून चुकतं की सगळे आपल्याकडे बघताहेत. इकडेतिकडे नजर फिरवल्यावर त्याला कळतं, संपूर्ण डब्बा त्याच्याकडे बघत आहे. आपण खूप मोठी चूक केली आहे असं समजून तो कानातले हेडफोन काढतो आणि त्याच्या बाजूला बघतो. मल्हार सर, अजून कोण?

"काय मग?" मल्हार सर.

"माझं काही चुकलं का?" तो मुलगा म्हणतो.

"छे! तुझं कुठे काही चुकलं? तुझ्या आईवडीलांचं चुकलं." मल्हार सर म्हणतात.

मागून कोणीतरी हसतं आणि लगेच आपलं हसू आवरतं.

"काय नाव काय तुझं? काय करतोस?" मल्हार सर विचारतात.

"मी अशोक देसाई, ऍनिमेशन करतो. कार्टून बनवतो." अशोक म्हणतो.

"ते दिसतंच आहे." मल्हार सर म्हणतात.

"काय झालं काका?" अशोक पुढे म्हणतो.

"नाही म्हणजे आता काय ऐकत होतास तू?" मल्हार सर.

"Despacito." अशोक म्हणतो.

"काय असतं ते?" मल्हार सर.

"स्पॅनिश गाणं आहे." अशोक म्हणतो.

"कुठल्या सिनेमातलं गाणं?"  मल्हार सर.

"मुव्ही नाही हो, अल्बम असतो त्यांचा." अशोक म्हणतो.

"काही कळलं?" मल्हार सर.

 "कशाचं?" अशोक विचारतो.

"नाही, तो काय गातोय हे कळलं का?" मल्हार सर.

"काहीच नाही." अशोक म्हणतो.

"मग इतका हलत डुलत का होतास?" मल्हार सर म्हणतात.

"ते गाणं ऐकायला मस्त वाटतं." अशोक म्हणतो.

डब्यात बसलेले सगळे अशोकची मजा घेत असतात. मल्हार सर गेली २१ वर्षे त्या डब्यातून प्रवास करत होते. तो डब्बा आणि त्या डब्यातील माणसं त्यांच्या जवळची झाली होती. त्यांच्या वयाचे जवळजवळ सगळेच रिटायर्ड झाले होते आणि वयस्करांमध्ये ते एकटे राहिले होते. बाकी सगळी तरुण मुलं त्या डब्यातून प्रवास करत होती. त्या सर्वांना मल्हार सर म्हणजे विनोदी पात्र वाटायचे. हो, पण तरुण मुलांनी कधी त्यांना त्रास नाही दिला.

"बाळा, आपल्याला समजतं आणि ऐकायला चांगलं वाटतं ते ऐकावं." मल्हार सर म्हणतात.

"पण काका सगळेच ऐकतात ना!" अशोक म्हणतो.

"हो तर, सगळेच ऐकतात. माझा मुलगा सुद्धा ऐकायचा. तुझ्याच एवढा होता तो, असाच दरवाजाजवळ उभा होता तो, मी त्याला म्हटलं ट्रेन रिकामी आहे, बस इथे तर ऐकलं नाही." मल्हार सर बोलू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बघून हळू हळू सगळेच आपापल्या कानातून कापसाचे बोळ काढू लागतात.

"नाही ऐकलं त्याने माझं, आणि उभा राहिला तिथे. मी माझ्या बायकोसोबत बोलत होतो आणि थोड्या वेळाने एकजण ओरडला, 'कोणीतरी ट्रेनमधून पडलंय.' मी धावत जाऊन बघितलं, माझा मुलगा दरवाजाजवळ नव्हता. एकाने चैन खेचली, आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो, मुलाजवळ गेलो, तो तिथेच होता, फक्त त्याच्यात जीव नव्हता." पाणावलेले डोळे पुसत मल्हार सर म्हणतात. थोडा वेळ कोणीही काही बोलत नाही. नेहमी त्या काकांना चिडावणारे नकळत अश्रू लपवत होते, काहीजण डोळे पुसत होते.

'पुढील स्टेशन ठाणे, अगला स्टेशन ठाणे, next station thane' ट्रेनमध्ये घोषणा होते आणि काका बोलू लागतात, "चला, माझं स्टेशन आलं. मला उतरायला हवं आता. बेटा अशोक, मी काही जास्त बोललो असेल तर मला माफ कर." असं म्हणून मल्हार सर उतरून जातात. ठाण्याला काही माणसं ट्रेनमध्ये चढतात आणि ट्रेन आपल्या पुढच्या प्रवासाला लागते.

मल्हार सर सेंट्रल मैदानाच्या दिशेने निघू लागतात. डोळ्यासमोर आपला हयात नसलेला तरुण मुलगा असतो. रेल्वेमध्ये जरी त्याचा मृत्यू झाला असला तरी याच रेल्वेने इतकी वर्षे त्यांना कामावर पोहोचवलं होतं. चूक आपल्या मुलाची आहे, रेल्वेची नाही, असं ते स्वतःला समजावत होते. विचार करता करता ते सेंट्रल मैदानात पोहोचतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम असतो. मैदानावरील पोलीस कर्मचारी त्यांना त्यांच्या आसनापर्यंत नेतात.

शहिदांना मानवंदना दिली जाते. ध्वजारोहण होऊन पोलीसांचे संचलन होते. महापौर, नगरसेवक, प्रमुख पाहुण्यांचे भाषण होते आणि त्यानंतर मल्हार सर भाषण करण्यासाठी येतात तोच तिथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीसांना फोन येतो, 'मुंबई विद्यापीठात दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी कल्याण ट्रेनमध्ये घुसखोरी केली असून ती ट्रेन कल्याणच्या दिशेने जात आहे. सर्व पोलीसांनी सतर्क रहावे.'

कार्यक्रम ताबडतोब थांबवला जातो आणि पोलीसांची धावपळ सुरु होते. ठाणे शहर बंद ठेवण्यात येतं. शक्यतो कोणीही घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो.

मल्हार सरांना काही कळत नाही, ते रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातात. तिथे सुद्धा शुकशुकाट असतो. एका पोलीस अधिकाऱ्याला विचारल्यावर त्यांना कळतं की, दहशतवाद्यांनी आता दादर रेल्वेस्थानकावर हल्ला केला आहे. सर घाबरतात. काय करावे हे त्यांना देखील सुचत नाही. ते पटकन डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये जाऊन बसतात. संपूर्ण ट्रेन रिकामी आणि त्यात फक्त मल्हार सर असतात. ट्रेन सुरु होते खरी, पण आधी दहशतवाद्यांची ट्रेन कल्याणला पोहोचवायची असल्याने त्यांची ट्रेन मध्येच थांबवण्यात येते. जवळपास तासभर ट्रेन जागेवरून हलत नाही, नंतर जेव्हा त्यांची ट्रेन डोंबिवलीला पोहोचते, तेव्हा प्लॅटफॉर्मवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel