१५ ऑगस्ट २०१७: प्राजक्ता सावंत आणि वृषाली परब - "शी बाबा, सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामावर बोलावतात हे लोक. कसला आपला देश? कसलं हे स्वातंत्र्य? आधी लोक आपल्या देशातील स्त्रियांना घरात डांबून ठेवायचे. आता ऑफिसच्या कामांमध्ये डांबून ठेवतात. एक दिवस मिळतो हक्काच्या सुट्टीचा, तो सुद्धा सुखाने जाऊ देत नाहीत हे लोक. असं वाटतं उगाच या क्षेत्रात आले." प्राजक्ता आपल्या ऑफिसमधील मैत्रिणीला म्हणते.

"तू हे काम काल संपवलं असतं तर आपल्याला आज यावं लागलं नसतं." प्राजक्ताची मैत्रीण वृषाली गाणे ऐकत शांतपणे म्हणते.

"असं काही नाहीये, हे काम काल संपवलं असतं तर काही ना काही काम काढून या मारवाड्याने आपल्याला आज परत बोलावलं असतंच." प्राजक्ता म्हणते.

"ते जाऊ दे. मला आता भूक लागली आहे." वृषाली म्हणते.

"मला खा आता, आताच तर पिझ्झा संपावलास ना!" प्राजक्ता म्हणते.

"नाही गं, खरंच खूप भूक लागली आहे." वृषाली म्हणते.

"अवी दादाला सांगितलंय डबा घेऊन यायला, तो आपल्यासाठी काही चटर पटर घेऊन येईल बघ." प्राजक्ता म्हणते.

"अविनाश येणार आहे का? आधी नाही का सांगायचं? चांगला ड्रेस घालून आले असते मी." वृषाली प्राजक्ताला रागात म्हणते.

"सुट्टीच्या दिवशी काम असलं की अवी दादा येतोच, माहितीये ना तुला?" प्राजक्ता तिच्याकडे बघत आश्चर्याने म्हणते.

"नाही म्हणजे तो मला तसं काही बोलला नाही." वृषाली मिश्कीलपणे म्हणते.

"एक मिनिट, तो तुला का सांगेल? म्हणजे तुम्हा दोघांचं..." प्राजक्ता खुश होत विचारते.

"हो. त्याने मला प्रपोज केलाय." वृषाली लाजत म्हणते.

"शप्पथ!! अगं मग मला सांगणार कधी? अच्छा, म्हणजे म्हणून तो मला रोज पिकअप करायला येतो तर…" प्राजक्ता म्हणते. वृषाली लाजातच असते.

"बरं आहे म्हणा, मला वाटत होतं दादाच्या बायकोसोबत माझं जमायचं नाही. पण तूच आहेस तर आता मला टेन्शन नाही." प्राजक्ता पुढे म्हणते, "थांब, येईलच तो, तेव्हा विचारते त्याला."

"वेस्टवरून यायला वेळ लागत असेल ना त्याला." वृषाली म्हणते.

"डोंबिवलीतल्या डोंबिवलीत आहोत ते एक बरं आहे, नाहीतर उगाच ट्रेनचा प्रवास कोण करत बसलं असतं आणि आता तर तुला वेस्टसुद्धा लांब वाटत असेल." प्राजक्ता खोडकर स्वरात म्हणते.

"तू पण ना! पण तुला राग नाही आला का?" वृषाली म्हणाली.

"राग कसला त्यात? मला आधीच तुम्हा दोघांवर डाउट आला होता. फक्त..." बोलता बोलता प्राजक्ताचा फोन वाजतो, ती बघते तर तिच्या दादाने फोन केला असतो.

"हा दादा, बोल ना! कुठपर्यंत पोहोचला आहेस?" प्राजक्ता अविनाशला विचारते.

"तुम्ही दोघी कुठे आहात?" अविनाश विचारतो.

"आम्ही? ऑफिस मध्ये. का रे?" प्राजक्ता विचारते.

"अच्छा. एक काम करा, ऑफिस आतमधून लॉक करून घ्या आणि कोणीही आलं तरी दरवाजा उघडू नका." अविनाश म्हणतो.

"का रे? ते जाऊ दे, आधी हे सांग कि तू मला पार्टी कधी देतो आहेस?" प्राजक्ता म्हणते.

"देईन गं पार्टी, पण सांगतो तेवढं करा." अविनाश म्हणतो.

"अरे पण झालंय तरी काय?" प्राजक्ता विचारते.

"डोंबिवली स्टेशनवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तुम्हा दोघींना फायरिंगचा आवाज नाही आला का?" अविनाश विचारतो.

"काय?" वृषालीकडे वळून, "अगं गाण्याचा आवाज कमी कर जरा." प्राजक्ता म्हणते.

"का गं? काय झालंय?" वृषाली दचकत विचारते.

"तू कर ना बंद आवाज." प्राजक्ता म्हणते. वृषाली गाणे बंद करते, दोघीही कानोसा घेतात तर त्यांना बंदुकीच्या गोळ्या चालवण्याचा आवाज येतो.

"हो रे दादा, आता आम्ही काय करु." प्राजक्ता अविनाशला फोनवर विचारते.

"तुम्ही फक्त बाहेर निघू नका आणि कुणालाही आत घेऊ नका, दरवाजा आतून बंद करा. शटर लावून घ्या, सगळं शांत झालं की मी येईन तुम्हाला घ्यायला." अविनाश म्हणतो.

"अरे पण तू कुठे आहेस?" प्राजक्ता दादाला विचारते.

"मी आणि बरेचजण द्वारका हॉटेलमध्ये लपून बसलो आहे." अविनाश म्हणतो.

"दादा प्लिज तिथून निघू नकोस. आम्ही इंटरनेट ऑन करतो, आम्हाला काही कळलं की आम्ही तुला कळवू, व्हॉट्सअप करू. पण तू तिथून निघू नकोस." प्राजक्ता भीत भीत म्हणते.

"बरं, चल ठेवतो मी." अविनाश फोन ठेवतो.

"काय गं? काय झालंय? आणि तू एवढी घाबरली का आहेस? दादा व्यवस्थित आहे ना तुझा?" वृषाली एकावर एक प्रश्न विचारू लागते.

"डोंबिवली स्टेशनवर दहशतवादी हल्ला झालाय." जागेवरून उठून दरवाजा बंद करत प्राजक्ता म्हणते.

"काय?" वृषाली दचकत म्हणते.

"हो, बाहेर जो आवाज येतोय तो त्यांचाच आहे." प्राजक्ता म्हणते.

"अविनाश कुठे आहे?" वृषाली पुढे विचारते.

"तो इथेच येत होता, पण हल्ला झाला म्हणून तो द्वारका हॉटेल मध्ये लपला आहे." प्राजक्ता म्हणते.

"अगं पण ते हॉटेल स्टेशनपासून खूप जवळ आहे." वृषाली म्हणते.

"तो सेफ आहे तिथे." प्राजक्ता म्हणते.

"मला नाही माहीत, त्याला फोन लाव ना गं." वृषाली म्हणते.

"नको, काही झालं तर!" प्राजक्ता म्हणते.

"प्लिज, एकदा बोलू दे त्याच्याशी. माझ्याकडे बॅलन्स नाहीये, नाहीतर मीच फोन केला असता त्याला." वृषाली म्हणते.

"बरं थांब." असं म्हणत प्राजक्ता अविनाशला फोन लावते. रिंग वाजण्याच्या आवाज येताच ती वृषालीकडे फोन देते.

"हॅलो, काय झालं?" समोरून अविनाश दबक्या आवाजात बोलतो.

"वृषाली बोलतेय, तू ठीक आहेस ना! आणि दबक्या आवाजात का बोलतो आहेस?"

"कोणीतरी हॉटेलचं शटर उघडलं आहे. बहुतेक दहशतवादी असावेत."

"प्लिज तू बाहेर निघू नकोस. तुला खरचटलेलं सुद्धा चालणार नाही मला, तुला काही झालं तर ही मालवणी मुलगी काय करू शकते हे त्या दहशतवाद्यांना चांगलंच दाखवेन मी. मालवणी मुली माहित नाहीत त्यांना."

"तू नको गं काळजी करुस, तुझा होणारा नवरा सुद्धा मालवणी आहे. तुझ्याशी लग्न करून…" अविनाश पुढे काही बोलणार तेच गोळ्या चालवण्याचा आवाज येतो आणि सगळं एकदम शांत होतं.

"अविनाशsss…" वृषाली मोठ्याने ओरडते, पण समोरून कसलाही आवाज येत नाही.

"काय झालं?" प्राजक्ता घाबरून विचारते.

"तिथे फायरिंगचा आवाज आला आणि अवी आता बोलत नाहीये. मला भीती वाटतेय." वृषाली म्हणते.

"आता आपण काय करायचं?" प्राजक्ता विचारते.

"मला वाटतं आपण तिथे जायला हवं." वृषाली म्हणते.

"काय? वेडी झालीस का? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? डोंबिवली स्टेशनवर दहशतवादी हल्ला झाला आहे, गल्लीतल्या गुंडांचा नाही." प्राजक्ता म्हणते.

"इथे बसून तिथे काय झालं हे मला कळणार नाही आणि अवीला काही झालेलं मला चालणार नाही. ते कुठले कोण आहेत त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मला माझा अवि जसाच्या तसा हवा आहे. त्याच्यासाठी मी कुणालाही सामोरं जायला तयार आहे. मी निघतेय, तू येणार आहेस का सोबत? काही झालंच तर त्या मेल्यांना सुद्धा कळू दे, मालवणी मुली काय करू शकतात ते." वृषाली म्हणते.

वृषाली भावनेच्या भरात बोलत होती हे प्राजक्ताला ठाऊक होतं. पण तिच्या बोलण्यातली एक गोष्ट प्राजक्ताला पटली. असं किती दिवस लपून बसायचं? प्रत्येक वेळी ते दहशतवादी येतात आणि कुणाला ना कुणाला मारून निघून जातात. आपण पळायचं नाहीतर लपून बसायचं. बस्स झालं हे सगळं, आपण सुद्धा काहीतरी करायला हवं, असा विचार करून प्राजक्ता वृषालीसोबत निघू लागते.

"चल, मी पण सोबत येतेय. अवीच काय, कुणालाही काही झालेलं आपल्याला चालणार नाही. चल, जे व्हायचं ते होईल." दरवाजा उघडून दोघीही द्वारका हॉटेलच्या दिशेने निघू लागतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel