रामचंद्र अनेक सद्गुणांचे समुद्र आहेत. अलौकिक पराक्रम, अद्भुत त्याग, नि:सीम पितृभक्ति, मित्रप्रेम, बंधुप्रेम, क्षमाशीलता, एकेक गुण कसे व किती सांगावे ? म्हणून तर रामचंद्रास मानवी कोटींतून आपण देवकोटींत घातलें आहे. रामचंद्राच्या पुण्यवान चरित्राकडे आपण आतां ऐतिहासिक, चिकित्सक दृष्टीनेंच पहात नाहीं. रामचंद्र म्हणजे परमेश्वराचा अवतार; प्रत्यक्ष परमेश्वरच आपण मानतों. त्याचें नाम उच्चारुन अनेक पापी पापपंकांतून उतरुन गेले. कबीर, रामानंद, तुळशीदास यांसारखे भक्त त्यांच्या लीला गाऊन धन्यधन्य झाले. रामचंद्रांच्या देवालयांत जाऊन ‘भगवान रामचंद्रजी त्रैलोक्यनाथ, पाहि मां’ असें म्हणून लोटांगणें घालणारे लाखों लोक पाहिले म्हणजे रामचंद्रांच्या नांवांतील जादू कळते. रामचंद्रांचें नांव घेतांच तनु पुलकित व्हावी, डोळ्यांत प्रेमाश्रु डबडबून यावे, अशी ज्यांची स्थिति होते असे महाभाग अजूनहि दिसतात. ज्याच्या नांवांत अशी अद्भुत जादु आहे, ज्याच्या नांवांत असें सामर्थ्य आहे, त्या रामचंद्रांस परमेश्वर म्हणावयाचें नाहीं तर कोणास म्हणावयाचें ?

‘धांव रे रामराया’ असें म्हणून समर्थांनीं त्यास आळविलें व रामदास हें नांव मिळविलें. त्यांनीं अनुभवाच्या वाणीनें सांगितलें, ‘नुपेक्षी कदा रामदासाअभिमानी’ --प्रभु रामचंद्र हे भक्तांचे अभिमानी आहेत,  ते भक्तांची उपेक्षा कधीं म्हणून करणार नाहींत. त्यांस मनांत चिंतून निश्चिंत व्हा.

रामचंद्रांचा जन्म चैत्र शु॥ नवमीस झाला. रामचंद्र हे दशरथांचे पुत्र. आपलें मन म्हणजेच खरोखर दशरथ. दहा इंद्रियांचे रथ जोडून हा मनोराजा राहात असतो. हा मनोराजा संकटांनीं गांजला, दु:खांनीं दीन झाला म्हणजे मग चंद्राप्रमाणें रमविणारा रामचंद्र जन्म घेतो. या जन्माची वेळ केव्हां आहे ? ‘टळटळीत दुपारीं जन्मला रामराया.’ भर दोन प्रहरीं रामचंद्रांचा जन्म झाला आहे. चैत्र वैशाखाच्या उन्हाळ्यांत भर दुपारीं राम जन्मले यांत फार अर्थ आहे. या संसाराच्या वाळवंटांत आपण भटकून दमून भागून गेलेले असतों, साहरा वाळवंटांत भटकणारा मुशाफर कोठें तरी झुळझुळ वाहणारा जीवनदायी झरा आढळेल म्हणून वणवण करतों, जिवाची तगमग होते. स्नेह, दया, प्रेम यांचे झरे सर्व आटलेले दिसतात. सर्व लोक सुखाचे सांगाती आहेत. पण कठिण समय येतां कोणी कामास येत नाहीं हें कठोर सत्य घडिघडी अनुभवाय येऊं लागतें व हृदय फाटतें; कोणी कोणाचा नाहीं. तें तत्व पाहून हृदयास आधार मिळत नाहीं. दु:ख, पीडा, त्रास, जुलूम, चिंता, दारिद्र्य, व्यसनें, कामक्रोधादिकांचे आघात यांमुळें जीव रडकुंडीस येतो; मन तळमळतें, पोळून निघतें, भाजून जातें. अशी मनाची होळी भडकली असतां म्हणजेच टळटळीत दुपार झाली असतां हा मनोरुपि दशरथ राजा रडूं लागतो आणि रामचंद्राचा मग जन्म होतो. भक्ताच्या भक्तीसाठीं परमेश्वराचा जन्म असतो आणि भक्तीचा जन्म अश्रूंमध्यें आहे. पश्चात्तापांत आहे. दु:ख तप्त हृदयांत आहे. परमेश्वर जन्मावा अशी इच्छा असेल तर पोटीं अनुताप व्हावा लागतो. जर्मन कवि गटे हा म्हणतो, "One who has never wept, can never know God." जो कधीं रडला नाहीं तो देव पाहूं शकणार नाहीं. संतत्प मनांतच रामाचा जन्म होणें शक्य आहे. संसारतापानें तापलेल्या मनाला चंद्राप्रमाणें आल्हाद देतो म्हणून या भगवंतांच्या मनोमय अवताराला रामचंद्र म्हणतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel