ज्याचें मन पश्चात्तापाच्या आगीनें पोळलें असेल, या आगीने सर्व खळमळ खाक होऊन मन निर्मळ झालें असेल, त्याचे मनांत हा रामचंद्राचा जन्म होत असतो. योग्य स्थान पाहूनच प्रभुजी जन्म घेतात. जेथें आपली जरुर आहे तेथेंच माणसानें जावें; जेथें आपली पूजा होईल, तेथेंच जावें. ज्या मनास आपल्या जन्मण्यानें आनंद होईल असें रामचंद्रास दिसतें तेथेंच ते जातात. तप्त झालेल्यास चंद्राची, तहानेलेल्यास पाण्याची, क्षुधार्तास अन्नाची, गदार्तास औषधाची, तापलेल्या पांथास छायेची, मरणोन्मुखास अमृताची त्याप्रमाणें पश्चात्तापानें पोळलेल्या मनास रामचंद्राची जरुर असते.

अशा या तत्प हृदयांत, संसारांतील टळटळीत दुपारीं, रामचंद्राचा जन्म झाला, बाळ जन्मास आलें. परंतु बाळाच्या संवर्धनास व संगोपनास आपण तनमन धनानें झटलें पाहिजे. या जन्मास आलेल्या बाळास - या भगवंतास - भक्तीचें दूध देऊन वाढवा; नाहीं तर हें भक्तीचें गोड दूध न मिळाल्यामुळें हें बाळ उपाशीं राहिल, मरुन जाईल आणि पुन्हां दशरथास - या मनोराजास - रडत मरावें लागेल.

मनास आधार देणार्‍या या भगवंतास मारुं नका. आपल्या हृदयाच्या पाळण्यांत त्याला घाला; बुध्दीच्या बिछान्यावर निजवून, त्याच्या पालखावर मनोवृत्तींच्या चिमण्या टांगून ठेवा, म्हणजे मनोवृत्ति इकडे तिकडे भटकण्यास न जातां रामचंद्रांच्या मुखकमलाकडेच पहात राहतील. भक्तीचें दूध या बाळाला पाजा; वैराग्याची दृढ न तुटणारी दोरी या पाळण्यास बांधा व खेळवा. अशा रीतीनें हा भगवंत मनांत वाढूं लागला. म्हणजे तो तुमचें दु:ख व दैन्य दूर करील; चिंता व त्रास यांचा संहार करील; कामक्रोधाचे रावण कुंभकर्ण यांस ठार मारील.

असा हा प्रभु रामचंद्र तापलेल्या मनांस निवविणारा, पोळलेल्या जिवाच्या पाल्यास नवजीवन देणारा, टवटवीत पालवी फोडणारा, भक्तांचा साह्यकारी आहे. मोरोपंत आपल्या सुंदर व प्रेमळ वाणीनें म्हणतात,
संतती संपत्ति वाढे होय हित । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥
न बाधे पर्जन्य वात उष्ण शीत ॥ प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥
धन्य धन्य होय संसारीं जिवित । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥
काळापासूनीहि नव्हे चित्त भीत । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥
अंती बसे स्वर्गी अमृतातें पीत । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥
श्रीरामातें ध्यावें, श्रीरामातें गावें । श्रीरामातें भावें आठवावें ॥
श्रीराम दयेचा मेघ त्यासमोर । प्रेमें दास मोर नाचताती ॥

भक्तरूपी मोरांना सदैव परमानंद देणारा मेघश्याम प्रभु श्रीरामचंद्र यांचे यशोगान, गुणगान करीत रहा, म्हणजे इहलोकीं तुमचें दु:खी कष्टी मन प्रमुदित राहील यांत संशय नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel