निमिष सोनार, पुणे
(8805042502)

त्याचा फोन आला होता काल. पैसे दे म्हणाला! आता काय सांगू तुम्हाला! त्याचे पैसे माझ्याकडून खर्च झाले. ज्या कारणासाठी घेतले होते त्यासाठी ते पैसे वापरले गेलेच नाहीत. दुसरीकडेच खर्च झाले. त्यामुळे त्या पैशांपासून जो फायदा होऊ शकला असता तो झालाच नाही...आणि आहे ते पैसेही गेले! काय करू आता?

त्याचंही बरोबर आहे! तो म्हणजे शिरीष! एक वर्ष झालीत त्याच्याकडून पैसे घेऊन! सहा महिन्यांत मी अर्धे आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर उरलेले अर्धे असं कबूल केलं होतं! पण एक वर्ष लोटलं पण एक रुपयाही त्याला मी परत करू शकलो नव्हतो मी! मागच्या महिन्यात मात्र त्याने निर्वाणीचा इशारा दिला होता. गुंडांकरावी पिटून काढेल म्हणाला! हातपाय मोडून काढेल म्हणाला. आजची तारीख दिली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आज पैसे मागतोय तो...रेल्वे फूटओव्हर ब्रिजवर बोलावलंय!! रात्री दोन वाजता!

आणि त्याचंही बरोबर आहे, म्हणजे खरंतर त्याचंच बरोबर आहे कारण रक्कम काही थोडीथोडकी नाही आहे हो! पाच लाख! रोख! नोटा भरून मोठ्या विश्वासाने सोपवली होती त्याने एक बॅग माझेकडे! तीच बॅग रिकामी पडलीय आता घरात...धूळ खात! आता सांगा आजच मी कुठून आणणार पाच लाख??

जुगारात हरलो मी अर्धे पैसे... बिझिनेस सुरू करायचा होता खरं तर...पण गावातून शहरात पळून आलो, आणि शिरीषशी मैत्री झाली. त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला नवीन जीवन सुरू करायला पैसे दिले. मी मात्र गावाकडच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवल्या. जसे मी गावाकडे सुद्धा अनेक लोकांची उधारी न फेडता आणि काही गुन्हे करून शहरात पळून आलो होतो ही गोष्ट आणि अशा अनेक गोष्टी!!

त्याने मला पैसे दिले त्याच दिवशी बसने जवळच्या शहरात बिझिनेससाठी पाच लाख रुपयांचे काही साहित्य खरेदी करण्यासाठी मला जायचे होते. त्यासाठी बस स्टँडवर बसची वाट बघत असतांना अचानक गावाकडचा एक जण भेटला... त्याचे अडीच लाख मी बुडवून परागंदा झालो होतो... त्याला पाहून तोंड लपवून पळायला लागलो पण त्याच्या बसमधून तो उतरला आणि माझ्या मागे जिवाच्या आकांताने पळाला, मला गाठलं आणि माझी गचांडी धरून मला खाली पाडले आणि अडीच लाख परत मागू लागला. पोलिसात तक्रार देईन म्हणाला. मी घाबरून गेलो आणि त्याला एका अटीवर पैसे देण्याचे मी कबूल केले ती म्हणजे गावातील इतर कुणाला मी या शहरात आहे हे सांगू नको! त्याला पैसे दिले! सुटलो! पण उरलेल्या अडीच लाखात बिझिनेस सुरू होणं शक्य नव्हतं...

माझी मती गुंग झाली होती. सिगारेटचे व्यसन तर आधीच जडले होते. सिगारेट फुंकत विचारांच्या गर्दीत एकदा रात्री सुनसान रात्री रेल्वे स्टेशनवर भटकायला लागलो. विचारांत असतांनाच एक जाहिरात भिंतीवर चिकटवलेली दिसली...

"जादुई ताईत. फक्त पाचशे रुपयांत विकत घ्या त्या दिवशी तुम्ही जुगार खेळल्यास जुगार कधीही हरणार नाही!"

जुगार!!

खेळून पाहायला काय हरकत आहे? भाग्यात असेल तर अडीचचे पाच, पाचाचे दहा, दहाचे वीस होतील.

जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर गेलो. अंधारात रस्त्यावर कोपऱ्यात तो ताईतवाला बसला होता त्यांचेकडून ताईत घेतले. माझे नाव त्यात कोरून एक लाल मणी त्यात पक्का बसवून त्याने ते मला दिले. तडक त्याच रात्री ताईतवाल्यानेच दिलेल्या एका पत्त्यावर म्हणजे शहरातील एका फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या एका कोपऱ्यात गेलो. जुगाराचा अड्डा होता तो!

एक लाख डावात लावले, हारलो; आणखी एक लाख लावले, हारलो. पन्नास हजार लावले नाहीत...ते लोक चोर होते, त्यांनी मला माझेजवळचे उरलेल पन्नास हजार पण जुगारात लावायला आग्रह केला.

मी नाही म्हटलं तेव्हा ते माझी बॅग हिसकावून घ्यायला लागले...

बॅग त्यांच्या हातातून घेऊन मी पळायला लागलो. पळता पळता एक माणसाने मला पायात पाय अडकवून पाडले. मी पुन्हा उठलो. त्याने बॅग ओढण्याचा प्रयत्न केला पण मी ती पक्की धरून ठेवली होती.. जवळच दारूची बाटली पडलेली होती.. चपळाईने उचलून जोराने त्याच्या डोक्यावर हाणली...त्याचे डोके रक्ताने भरले...तो मेला की जिवंत हे बघायला मागे न वळता पळत सुटलो... आता रस्त्यावर तो ताईतवाला नव्हता... कदाचित तोही या जुगारी लोकांपैकी असावा!!

त्यानंतर छोटेमोठे कामं करत, चोऱ्या चपाट्या करत कसेबसे दिवस काढत होतो आणि त्यातच आज शिरीषचा फोन आला. त्याची मुदत संपली आहे. मी एक ठिकाणाहून खोट्या नोटा आणल्या आणि बॅगेत भरल्या आहेत.

तो तरी किती दिवस वाट बघणार?

अधून मधून त्याने सहज मला भेटायला बोलावले होते

पण त्याला मी कोणत्या तोंडाने सांगणार की मी त्याने दिलेले पैसे हारलो. कोणत्या तोंडाने सांगणार की मी कोणताच बिझिनेस करत नाही ते. तो सुद्धा महिने महिने शहराबाहेर असायचा आणि तो शहरात आल्यावर त्याने मला फोन केला की मी त्याला शहराबाहेर असल्याचे सांगायचो...

आज त्याला ही अगदी असली वाटणाऱ्या नकली नोटांनी भरलेली बॅग देतो आणि बघू काय होतं ते!! मोठ्या प्रयत्नांनी एका नकली नोटा छापणाऱ्या टोळीचा पत्ता लागला होता आणि काही गुन्हेगारांशी माझ्या असलेल्या ओळखीतून मला ह्या नकली नोटा मला भेट म्हणून मिळाल्या होत्या, मी केलेल्या एका गुन्ह्याच्या बदल्यात!! खरं तर शिरीषला फसवणे माझ्या जीवाला पटत नाही आहे, अजून दोनेक वर्षांनी त्याचे पैसे नक्की दिलेच असते मी, पण त्याने मला सरळसरळ धमकावले त्यामुळे नाईलाज झाला. त्याला पैसे दिले की घरी जाऊन त्याला ते नकली आहेत हे कळेपर्यंत मी या शहरातून पळून गेलेला असेन. तो काही लगेच असली नकली चेक करत बसणार थोडंच आहे? आजच सकाळी मी रेल्वेचं तिकीट काढलंय. सकाळी चार वाजता ट्रेन आहे. तोपर्यंत अंधारात कुठेतरी लपून राहायचे किंवा एखादे नवीन स्टेशन गाठून लगतच्याच एखाद्या लॉजवर राहायचे. लोकल ट्रेन भेटली तर ठीकच नाहीतर पायी चालत जायचे. नवीन शहरात नवीन नाव धारण करून मग बघूया काहीतरी!

रात्रीचे दोन वाजले होते. मी रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवर जाऊन उभा राहिलो. स्टेशन फारसे गजबजलेले नव्हते आणि त्यातून रात्रीचे दोन वाजले असल्याने ब्रिज निर्मनुष्य होता. खाली पाहिले तर स्टेशनवर दोन चार कुत्री भुंकत फिरत होती आणि एक दोन माणसं बाकड्यावर बसून पेंगत होती. खाली रुळांकडे बघत शिरीषची वाट बघत उभा राहिलो. दुरूनच रुळांवर लख्ख उजेड पाडत धडक धडक करत एक ट्रेन वेगाने स्टेशनात शिरली आणि न थांबता धाड धाड रूळ थरारत स्टेशनातून निघूनही गेली. ट्रेन जाईपर्यंत ब्रिजला हादरे बसले. पिवळ्या मंद लाईटच्या प्रकाशात आता मला दूरवर जिन्यावर एक सावली चढतांना दिसली. कुणीतरी पायऱ्या चढत होतं वाटतं... शिरिष असावा बहुतेक!!

मी सावध झालो. ती सावली मोठी होत गेली आणि पूर्ण पायऱ्या चढून एक काळा कोट घातलेला माणूस दिसू लागला. तो माझेकडे वळला आणि मला त्याने उजवा हात वर करून खूण केली आणि मी डावा हात वर केला. ओळखायला तशी खूण ठरली होती. मग तो हळूहळू इकडे तिकडे खाली सावधपणे बघत माझेकडे येऊ लागला. संपूर्ण ब्रिजवर कुणीही चिटपाखरू नव्हतं. मंद पिवळा प्रकाश पसरलेला होता. तो माझेकडे येतांना अजून त्याचा चेहरा नीटसा दिसत नव्हता. त्याने बरेच पुढे प्रकाशात येताच कोटला जोडलेला एक काळा मुखवटा घातला आणि वेगाने माझेकडे चालू लागला. ह्याने मुखवटा का घातला? हा नक्की शिरीष आहे की दुसरं कुणी? नाही! शिरीषच असावा कारण ओळखायची खूण ठरली त्याप्रमाणे झाले होते.

तो माझ्यासमोर आला, थांबला. काही बोलला नाही. शेक हँड केले नाही. मास्कच्या आडून त्याचे डोळे एकसारखे माझ्याकडे रोखून बघत होते. त्यामुळे त्याच्याशी बोलायची हिम्मत झाली नाही. त्याने बॅगसाठी हात पुढे केला, मी त्याच्या हातात बॅग दिली. मी निघतो आता अशी खूण करून जायला निघालो पण त्याने डोळ्यांनी मला थांबण्याची खूण केली आणि खिशातून टॉर्च काढून त्याने बॅगची चेन उघडली आणि टॉर्चच्या प्रकाशात पैसे चेक करू लागला. याला जर कळलं की ह्या नोटा नकली आहेत तर? माझे बिंग फुटणार म्हणून मी घाबरलो. काय करावे? पळावे का? अचानक काहीतरी वाटून मी त्याच्या टॉर्च असलेल्या हाताला हिसका दिला आणि अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने तो गोंधळला आणि टॉर्च घरंगळत जाऊन बऱ्याच दूर जाऊन थांबली.

मी जिवाच्या आकांताने पळण्याचा प्रयत्न केला पण त्याने चपळाईने माझा हात धरून मला त्याच्याकडे ओढले आणि माझ्या तोंडावर जोराचा बुक्का मारण्याचा प्रयत्न केला. पण मी तो चपळाईने चुकवला आणि त्याचा तोल गेला. ही संधी साधून मी त्याला वेगाने ढकलले, त्याला सावरायला वेळ न मिळता तो सरळ पुलावरून खाली रुळांवर धाडकन जाऊन पडला आणि नेमकी एक ट्रेन दूरवर त्याच रुळांवरून त्यावेळेस स्टेशनात येण्याच्या तयारीत होती...त्या मास्क घातलेल्या माणसाचे काय झाले हे बघायला मी थांबलो नाही...

मी बॅगची चेन पुन्हा लावली आणि बॅग घेऊन पायऱ्या उतरू लागलो. ट्रेन स्टेशनात थांबली आणि मी चपळाईने जाऊन ती पकडली. बहुतेक ट्रेन रिकामी होती, दोन चार तुरळक माणसे बसलेली दिसत होती.

पाच मिनिटांनी पुढचे स्टेशन आले आणि मी उतरलो. स्टेशनच्या उजव्या दिशेला उतरल्यावर जवळच एक साधारण असा"शुभम लॉज" दिसला आणि मला हायसे वाटले. काउंटरवर बसलेला माणूस दारू पिलेला होता.

"रूम हाये का?"

"नाही, फुल आहे लॉज!"

"असेल एखादी बघा ना!"

"आहे एक खोली, पण मालक कुणाला ती देत नाही. ती खोली बंदच असते!"

"मालक देत नाही, पण तू दे मला! तुला जास्त पैसे देतो! मालकाला सांगू नकोस! काय?"

त्याला दोन हजार रुपये ज्यादाचे दिले. एका रात्रीचे हजार भाडे होते. असे एकूण तीन हजार दिले.

मी वर लाकडी पायऱ्या चढतांना तो दारुड्या आवाजात झिंगत म्हणाला, "साह्यब, त्या खोलीत अजून एक खोली आहे, तिचा दरवाजा काहीही झाले तरी उघडू नका. अगदी काहीही झाले तरी! आज अमावस्या आहे म्हणून सावधगिरीची सूचना!! वर्षानुवर्षे बंद आहे तो खोली..."

"बरं!", मी म्हटलं आणि माझं खोटं नाव तेथल्या रजिस्टरवर लिहिलं.

मला फक्त दोन चार तासांचा प्रश्न होता, नुसती लपून बसून राहायला जागा मिळाली तरी पुष्कळ होती मला. त्यामुळे मी कशाला नसत्या कुणाच्या खोल्या उघडत बसू? आणि काय करायचंय मला अमावस्या असो की पौर्णिमा!! माझा त्या चंद्राला दुरूनच नमस्कार!!

रूमवर आलो आणि आतून कडी लावली. बेडवर बसलो. तेथे पांढरी पांघरायची चादर होती. पूर्वीच्या रूममध्ये जास्त समान नव्हता. ज्या थोड्याफार वस्तू माझ्या मालकीच्या होत्या त्या सकाळीच विकून टाकल्या होत्या. काही कपडे विकून टाकले आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला देऊन टाकले. या शहराची कोणतीच खूण सोबत घेऊन जायचे नव्हते मला!

मी ढकललेला माणूस शिरीष होता की आणखी कुणी? माझया हातून नकळत का होईना एक खून झालाय? पण मला तिथे थोडंच कुणी पाहिलंय? तो माणूस आपोआप तोल जाऊन सुद्धा पडू शकतो खाली, त्यामुळे माझ्यावर संशय येण्याचा प्रश्नच येत नाही!

पण त्या माणसाला किंवा शिरीषला कुणी शोधण्यासाठी येईल तर? त्याने कुणाला सांगितले असेलच की तो मला भेटायला जात आहे? मग काय होईल?

असू दे! तसे कळले तरीही तोपर्यंत मी नव्या नावाने नव्या शहरात नवीन जीवन सुरू करायला निघालेलो असेल.

दोनच तासांचा प्रश्न आहे! मी सकाळी चार वाजता तर निघणार आहे. जवळच स्टेशन आहे. दहा मिनिटे आधी जरी पायी निघालं तरी होतंय!! आणि झोपायचा तर प्रश्नच नाही, झोपायचं नाहीच आहे मला!

मी बेडला टेकून बॅगवर हात ठेवून बसून राहिलो. बॅगमधले नकली पैसे काही ठिकाणी कामास येतील आणि माझ्याजवळ असली पैसे सुद्धा होतेच. मग मी बॅगमध्ये वरच्या बाजूला सोबत आणलेले काही कपडे मुद्दाम अशा पद्धतीने ठेवले की जेणेकरून चेन उघडल्यावर लगेचच नोटा कुणाला दिसणार नाहीत...

मग मी मोबाईल स्विच ऑफ केला. इमर्जन्सीला बरा आहे नाहीतर मी याचे सिम कार्ड याच शहरात फेकून देणार होतो पण नंतर विचार केला की त्या शहरात गेलं रे गेलं की देऊ हे सिम कार्ड फेकून आणि घेऊ नवीन सिम, नवीन नावाने! मग त्या शहरात तेच धंदे सुरू करायचे जे ह्या शहरात करत होतो. तिथेही या शहरातील टोळीशी संबंधित लोकं आहेत, ते देतील मला आसरा. नाहीतरी काय करायचंय सत्याच्या आणि प्रमाणिकपणाच्या मार्गाने चालून? कुणाचं भलं झालंय?

कदाचित बेडला टेकून जमिनीवर बसल्या बसल्याच झोप लागून गेली की काय मला कुणास ठाऊक? पण खूपच गाढ, शांत झोप लागली होती. अशी झोप आख्या आयुष्यात पहिल्यांदाच लागली असेल. शांत, गाढ आणि अतिशय गूढ! जणू काही झोपेत माझ्या मनावरचं सगळं दडपण, ताण कुणीतरी एखाद्या पोत्यात भरला आणि ते पोते करकचून साखळीने बांधून समुद्रात मध्यभागी फेकून दिले जे थेट समुद्राच्या तळाशी जाऊन आदळले. म्हणूनच माझा मेंदू शांत झाला होता जागे झाल्यावर!!

पण मला जाग आली ती कसल्यातरी विचित्र आवाजाने. त्या काउंटरवरच्या माणसाने सांगितलेल्या त्या बंद असलेल्या खोलीतून कसले कसले चित्रविचित्र बोलण्याचे आवाज येऊ लागले.

वर्षानुवर्षे बंद असलेल्या खोलीतून अचानक असे आवाज का येत आहेत? मी उठलो. म्हटलं बघूया तरी, काय प्रकार आहे ते! भलतेच गूढ आणि विचित्र आवाज येत होते आतमधून!! की मुद्दाम मला घाबरवण्यासाठी कुणीतरी गंमत करतंय? पण मला इथे अनोळखी ठिकाणी इतक्या रात्री मुद्दाम घाबरवण्यासाठी कोण कशाला येईल? घड्याळात पाहिले, सव्वातीन वाजले होते, ट्यूबलाईट तसाच पांढराफटक प्रकाश देत होता.

दहा बारा जण एकमेकांशी बोलत बोलत होते असा आवाज होता तो, पण शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, जणू मोठे भुंगे गुणगुण करत एकमेकांशी भांडत आहेत असा आवाज होता तो. पण आवाज खोलीतूनच येत होता. खोलीला कुलूप नव्हते. मी आताही कडी सहज उघडू शकत होतो पण कशाला विषाची परीक्षा घ्या? त्यापेक्षा खोलीत नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायचं असेल तर दाराला कान लावल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतरी झोपायचं नाही आहे...

मी बाजूची खुर्ची दरवाज्याजवळ सरकवली, त्यावर बसलो आणि दरवाज्याला कान लावला. आता आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले.

"कंचा अपराध केलाय रं या येड्यानं?"

"आरं, त्यानं एका माणसाला दिलंय ढकलून पुलावरून खाली, सरळ झुक झुक झुक झुक आगीन गाडी च्या चाकांखाली! त्या माणसाचं डोस्कं आनं शरीर अलगच झालं की राव!"

"आसं व्हय? काय बात करतो!"

"आरं, पुढं ऐक, यानं ज्याला मारलं त्यो याचा मित्र व्हता म्हनं! यांचेकडे त्याचं पैकं उधार हुतं!"

"आनं त्याचाच खून केला व्हय यानं? लई हरामखोर हाय हा! आनं मंग, त्याच गाडीत बसून लपून छापून पळून गेला हा, पुढच्या स्टेशनात. एका लॉज वर राह्यला..."

हे काय चाललंय? मला घामच आला हे ऐकून! अंगभर काटे आले! कोण हे लोकं? या खोलीत काय करताय ते सगळे? यांना कसं माहीत हे सगळं?

"आरं, हा लॉजवर जाऊन लपून बसला होता, पण पोलिसांना याचा ताईत सापडला त्या माणसाच्या मढ्यावर! त्याच्यावर याचं नाव लिहिलं हुतं!! पोलिसांनी तडक जाऊन पकडलं त्याला, लॉजवर जाऊन, ठीक सकाळी पावणेचार वाजता. कोर्टात गुन्हा सिद्ध झाला आनं झाली याला जन्मठेप! काळकोठडीत आलाय ह्यो आता आपल्या संगं!"

मी घाबरून गळ्यात हात लावून पाहिलं. खरंच, गळ्यात ताईत नव्हता!! मग घड्याळात पाहिलं. साडेतीन वाजून गेलेले होते...

मी झोपेत आहे, स्वप्न पाहतोय की मला भास होत आहेत, काही म्हणजे काही कळत नव्हतं मला! माझ्या हृदयाची धडधड अचानक वाढली.

काय करावं? हे जे बोलताय ते खरं असेल तर पावणेचार वाजण्याच्या आत म्हणजे पोलीस येथे लॉजवर यायच्या आधी मी येथून पळून जावं का? आणि मी या आवाजांचे ऐकून नेमकं खाली उतरावं आणि पोलिसांना मी दिसलो तर? या आवाजांची मला पकडण्याची ही चाल तर नाही ना? खिडकीबाहेर पाहिल्यावर त्या काउंटरवरच्या माणसाचे शब्द आठवले की आज अमावस्या आहे. कुणी पिशाच्च तर नाही ना राहात या खोलीत? कदाचित मेलेल्या शिरीषचा की त्या मास्कवल्या माणसाचा आत्मा तर हे सगळे खेळ खेळत नसेल ना?

ते काहीही असलं तरी या आवाजांवर भरवसा ठेवायचा समजा ठरवला, तरीपण मला एक कळत नाहीए की मी तर लॉजच्या रजिस्टरवर खोटं नाव लिहिलंय? तर मग पोलीस माझा मग काढत इतक्या लवकर इथपर्यंत कसे येऊ शकतील? पण आता हा सगळा विचार करायची वेळ नाही! हे आवाज आणखी काय म्हणताय ते ऐकलं पाहिजे! पण हे आवाज मला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत की फसवण्याचा? असा विचार करून ते आवाज मी पुन्हा ऐकू लागलो.

"आपल्यासोबत काळकोठडीत जो कुनीबी पहिल्यांदा येतो तो आपल्या सर्वांच्या हातचा लई मार खातो, काय रं!"

अच्छा, म्हणजे, येथे आतमध्ये मीच काळकोठडीत कैदी म्हणून नवीनच आलेलो दिसतो आहे आणि ते सर्वजण खोलीत असलेल्या मला बोलत आहेत आणि खरंच पुढे लगेचच मला खोलीतून माझाच आवाज ऐकू आला...

"नाही हो, मला नका मारू. मी परिस्थितीमुळे गुन्हेगार झालोय. मी काही जन्मापासून गुन्हेगार नाही..आधीच मला पोलिसांनी भरपूर मारलंय, आता पुन्हा मार खाण्याची शक्ती नाही माझ्यात!"

ते सर्वजण कुत्सितपणे खदाखदा हसायला लागले.

"तू जन्मापासून गुन्हेगार नाय म्हणतो, मंग आम्ही जन्मापासून गुन्हेगार जन्मलो का काय? कपाळावर अपराधी असा शिक्का छापून आम्ही जनमलो हुतो काय रं?"

"नाही, तसं नाही हो पण..."

"ते काय नाय. पकड रे याला...दोन जण हात धरा, दोन जण पाय पकडा याचे! आणि आम्ही चौघे याला मग देतो चोप!"

मी मार खातांनाचा माझाच असा असहाय्य अगतिक आवाज ऐकून मला मनाला आणि शरीराला असंख्य वेदना होऊ लागल्या. घड्याळ टिक टिक करतच होतं!!

दरवाज्याला लावलेला माझा कान हटत नव्हता. पावणेचार आता वाजणारच होते. आतमधला मी त्यांच्या पकडीतून सुटून पळण्याचा आवाज मला आला आणि अचानक माझ्या कानाला हादरे बसले कारण आत मधला मी त्या खोलीचा दरवाजा आतमधून ठोठावत होतो आणि बाहेरच्या मला विनंती करत होतो, " दरवाजा उघड रे, वाचव मला. तू काय आणि मी काय एकच आहोत रे! उघड दरवाजा लवकर! शिक्षा भोगण्यापासून बचाव करायचा असेल तर एकच मार्ग आहे, हा दरवाजा उघड! लवकर! वेळ कमी आहे! नाहीतर वेळ निघून जाईल किंवा तू तरी वेळेच्या आधी निघून जाशील!"

काय करावं आता? दरवाजा उघडावा का? उघडला तर काय होईल? नाही उघडला तर मी पोलिसांच्या हाती लागेल का? की मी हा दरवाजा उघडून आत खोलीत लपू नये म्हणून हा या सगळ्या अभद्र आवाजाचा खटाटोप चाललाय? एकापेक्षा एक असे हजार प्रश्न डोक्यात फेर धरून नाचू लागले...

आतमधून हसण्याचे आवाज आले,

"बघू तर खरं कोण वाचवतोय तुला? तो बाहेरचा तू वाचवतो का तुला बघू! बाहेरचा तू खूप भेकड आहे, पळपूटा आहे, तो नाय दार उघडणार बघ!!"

दरवाज्यावर जोरजोरात थपडा पडू लागल्या. काय करू? दरवाजा उघडू की नको? माझा चेहरा घामेघूम! अंगावर भीतीने शहारे आले!!!

असा विचार करत असतांनाच पावणेचार वाजले आणि लॉजच्या माझ्या रूमच्या दरवाज्यावर बाहेरून थपडा पडू लागल्या. आता तर माझी भीतीने गाळणच उडाली. शरीरात प्रचंड भीतीची लहर!! काय प्रसंग आलाय हा माझ्या या आयुष्यात??

"उघड दरवाजा, आम्ही पोलीस! आम्हाला माहीत आहे तू आतमध्ये आहेस. तीन म्हणेपर्यंत दरवाजा उघड नाहीतर दरवाजा तोडला जाईल!"

बापरे, म्हणजे हे सगळे मधले आवाज खरं बोलताय तर! मला त्या खोलीचा दरवाजा उघडलाच पाहिजे, नाहीतर मी पोलिसांच्या हाती लागेल. बघू तरी, तो "पलीकडचा मी" काय म्हणतोय नेमका? कारण आता जास्त विचार करत बसायला वेळ कुठे होता??

मी झटकन त्या खोलीची कडी उघडली. आतमध्ये शिरलो. पटकन पहिल्याप्रथम ते दार लगेच आतून कडी लावून बंद केले आणि पोलिसांचा दार ठोठावण्याचा आवाज अचानक बंद झाला, जणू काही मी एका नव्या खोलीत नव्हे तर एका वेगळ्याच नव्या जगातच शिरलो होतो...

आणि समोर खोलीत पाहतो तो काय? काळा मिट्ट काळोख! घनघोर अंधार! हा अंधार काही वेगळाच होता!

ते सगळे कैदी आणि त्यांच्या हातचा कोठडीत मार खाणारा तो दुसरा मी... कुठे आहेत सगळेजण? मला इतक्या ठार अंधारात काहीही डोळ्यांनी दिसत नसतांना सुद्धा असेच वाटत होते की ते सगळेजण इथेच उभे आहेत! माझ्याभोवती कडं करून! माझा घात करायला! हे सगळेजण मला आता मारतील! म्हणजे पोलिसांचा दार ठोठावण्याचा आवाज खोटा होता की काय? मी स्वप्नात आहे काय? की हे माझ्याविरुद्ध कुणी अघोरी शक्ती षडयंत्र रचत आहेत? असा मी विचार करत असतांनाच पाठीमागून एक आवाज आला. माझाच आवाज होता तो, म्हणजे त्या खोलीत असणाऱ्या दुसऱ्या "मी" चा!

"अरे, षडयंत्र तर नेहमी कुणाचे तरी कुणाविरुद्ध तरी सुरूच असते! ही अमर्याद सृष्टी सुद्धा आपल्या विरुद्ध नेहमी षडयंत्र रचतच असते! आता कसलाच विचार करत बसण्याची वेळ नाही, थांब मी तुझ्यावर स्वार होतो म्हणजे तुला नीट कळेल मी काय म्हणतो ते!"

कुणीतरी अंधारात छोटासा उंदीर आपल्या पाठीमागून पायावरून चढत गेल्यावर जसे वाटेल तसे मला पाठीवर जाणवले. मी पूर्ण अंगभर शहारलो!! पण तो उंदीर नव्हता, तर त्या खोलीतला "मी" होतो, छोट्या आकारातला मी! जसे स्पायडरमॅन पटापट डोंगरावर, भिंतींवर झरझर चढत जातो तसा ती माझी छोटी मानवाकृती पाठीवरून चढत चढत माझ्या मानेपर्यंत येऊन माझे केस पकडून माझ्या डोक्यावर बसली आणि तिने माझ्या डोक्याच्या मधोमध एका हाताची मूठ दणकून आपटली, माझ्या डोक्याला एक छिद्र पडलं आणि त्यातून ती माझी छोटी जिवंत प्रतिकृती आत शिरली आणि माझ्या मेंदूवर जाऊन बसली...

आणि माझे डोके पूर्ववत झाले. पुढे पुढे मला ती आकृती माझ्या मेंदूत समाविष्ट होऊन विरघळून गेली अशी जाणीव झाली. ह्या सगळ्या फक्त जाणिवाच तर होत्या! काळ्याशार अंधारातील मन सुन्न आणि बधिर करणाऱ्या जाणीवा!! डोळ्यांनी कुठे काहीच दिसत नव्हतं!! हे जे घडत होतं तेच मुळी नेमकं खरोखर घडत होतं का??

तो मेंदूत सामावलेला दुसरा मी, मलाच मेंदूमध्येच म्हणाला, "पुढं पावलं टाक पटापट! थोडयाच वेळात तुला एक धूसर गोलसर प्रकाश दिसेल. त्यात आपल्याला म्हणजे तुला म्हणजेच मला...आपण दोघे एकच आहोत रे! तर मी महणत होतो की, थोड्या वेळेसाठी त्या गोलसर धूसर प्रकाशात थोड्यावेळापूर्वी घडलेले परत दिसेल ते तू बदलू शकतोस, वेळ कमी आहे! लाव डोकं आणि बदल भूतकाळ! डोके वापर, वेळ कमी आहे! धूसर प्रकाशातल्या स्वतःला नीट विचार करून मार्गदर्शन कर!! संधी एकदाच आहे, हे लक्षात ठेव....आता ही संधी तुला म्हणजे आपल्याला कुणी दिली? का दिली? याचा विचार करत बसू नकोस!!"

आणि त्याचा आवाज माझ्या मेंदूतून येणं कायमचं बंद झालं. म्हणजे आता तो खोलीतला मी आणि लॉजमधला मी एकच झालो होतो आणि थोडे पुढे चालत जाऊन धूसर गोलाकार प्रकाशात मला थोड्यावेळापूर्वीचा प्रसंग पुन्हा दिसू लागला...

आता मी त्या अंधाऱ्या खोलीत उभा राहून त्या भूतकाळातील प्रसंगामधल्या मला सूचना देऊन नियंत्रण करायला लागलो...

रात्रीचे दोन वाजले होते....

मी रेल्वेच्या फूटओव्हर ब्रिजवर जाऊन उभा असलेलो दिसलो. ब्रिज निर्मनुष्य होता. खाली पाहिले तर स्टेशनवर दोन चार कुत्री भुंकत फिरत होती आणि एक दोन माणसं बाकड्यावर बसून पेंगत होती. एक ट्रेन न थांबता धाड धाड रूळ थरारत स्टेशनातून निघून गेली. मी एक केले, ते गळ्यातले ताईत काढून खिशात ठेऊन टाकले. म्हणजे पुढे काही चूक होणारच नाही! आता तो मास्कधारी माणूस येणार....

पिवळ्या मंद लाईटच्या प्रकाशात आता मला दूरवर जिन्यावर एक सावली चढतांना दिसली. कुणीतरी पायऱ्या चढत होतं वाटतं... शिरिष असावा बहुतेक!! ती सावली मोठी होत गेली आणि पूर्ण पायऱ्या चढून एक काळा कोट घातलेला माणूस दिसू लागला. तो माझेकडे वळला आणि मला त्याने उजवा हात वर करून खूण केली आणि मी डावा हात वर केला. ओळखायला तशी खूण ठरली होती.

तो हळूहळू माझेकडे येऊ लागला....

ह्याने मुखवटा का घातला? हा नक्की शिरीष आहे की दुसरं कुणी? नाही! शिरीषच असावा कारण ओळखायची खूण ठरली त्याप्रमाणे झाले होते...

तो माझ्यासमोर आला, थांबला. काही बोलला नाही. शेक हँड केले नाही. मास्कच्या आडून त्याचे डोळे एकसारखे माझ्याकडे रोखून बघत होते. पण...

पण मी घाबरलो नाही! त्याने बॅगसाठी हात पुढे केला, पण मी त्याच्या हातात बॅग दिली नाही.

मी म्हणालो, "आधी मास्क काढ!"

"ए, जास्त आवाज करतो काय? चुपचाप बॅग दे!"

"तू शिरिषच आहेस कशावरून?"

"जास्त आवाज करतो लेकाचा!" असे म्हणून त्याने

मला जोराचा बुक्का मारला आणि खाली पाडले व तो बॅग घेऊन पळू लागला...

मी उठून त्यांचेकडे पाळायला लागलो. त्याला पकडलं आणि बॅग खाली ठेऊन त्या अंधाऱ्या पुलावर आमची जोरदार मारामारी जुंपली...मी भारी पडतोय हे पाहून त्याने मला पायांच्या बुटाचा जोरदार तडाखा दिला...त्या तडाख्याने तोल जाऊन कमी उंचीच्या कठड्यातून रेल्वे रुळांवर खाली पडायला लागलो....तो तडाखा वाचवायला मी चपळाईच्या सूचना त्या पुलावरच्या "मी" ला दिल्या पण त्याला तितक्या वेगाने हालचाल करणं शक्य झालं नाही...

नाही!! मला हे असे अपेक्षित नव्हते!! मी आता पुन्हा मागे वळून लॉजवरच्या खोलीत परत जायला हवे नाहीतर माझा खेळ इथेच खलास!! मी जर धूसर प्रकाशातल्या भूतकाळातल्या मला रुळांवर पडू दिले तर मी ट्रेनखाली येऊन मरेन! ट्रेन समोर दिसतच होती...

जास्त विचार करायची आता वेळ नाही...मी परत जायला हवे...जास्तीत जास्त काय होईल?

पोलीस पकडतील!

पण मी मरणार तर नाही ना!

सिर सलामत तो, बचनेके तरिके पचास!!!

आणि हा सगळा विचार मी प्रचंड वेगाने काही सेकंदातच माझ्या मेंदूत केला होता आणि त्याच वेगाने मी पुन्हा मागे पळत जाऊन ते दार उघडले आणि लॉजवरच्या खोलीत पुन्हा येऊन पोहोचलो आणि कडी लावून टाकली! एकदाची! आणि सुटकेचा निश्वास टाकला....

घड्याळात अजून पावणेचार वाजले होते आणि पोलिसांच्या लॉजच्या दरवाज्यावर थपडा पडतच होत्या, शेवटी मीच जाऊन दरवाजा उघडला...

आनंदी चेहऱ्याने पोलिसांना सामोरा गेलो...मरण वाचल्याचा तो आनंद होता हे पोलिसांना काय माहिती बरं??

पोलिसांनी माझ्या मुसक्या आवळल्या, बेड्या घातल्या...दोनचार काठीचे दणके दिले...

आता मात्र मी घाबरून रडत, ओरडत होतो...

त्यांनी मला पोलीस व्हॅनमध्ये डांबले...

कोर्टात माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला...

मी गुन्हे करून गाव सोडून पळून आलेलो असल्याने माझ्या अटकेबद्दल कळलं किंवा नाही कळलं तरी मला सोडवायला कुणीही येणार नव्हतं...

मला शेवटी एका कोठडीत टाकण्यात आलं...

खोलीत अनेक कैदी होते...

तिथे प्रवेश करताच एका दांगट राकट टकल्या गुंडांने दुसऱ्या गुंडाला विचारलं,

"कंचा अपराध केलाय रं या येड्यानं?"

"आरं, त्यानं एका माणसाला दिलंय ढकलून पुलावरून खाली, सरळ झुक झुक झुक झुक आगीन गाडी च्या चाकांखाली! त्या माणसाचं डोस्कं आनं शरीर अलगच झालं की राव!"

तेच संवाद, तेच प्रसंग जे मी दाराआडून लॉजच्या खोलीत ऐकले होते...

"आपल्यासोबत या 'काळ'कोठडीत जो कुनीबी पहिल्यांदा येतो तो आपल्या सर्वांच्या हातचा लई मार खातो, काय रं!"

"नाही हो, मला नका मारू. मी परिस्थितीमुळे गुन्हेगार झालोय. मी काही जन्मापासून गुन्हेगार नाही..आधीच मला पोलिसांनी भरपूर मारलंय, आता पुन्हा मार खाण्याची शक्ती नाही माझ्यात!"

ते सर्वजण कुत्सितपणे खदाखदा हसायला लागले.

"तू जन्मापासून गुन्हेगार नाय म्हणतो, मंग आम्ही जन्मापासून गुन्हेगार जन्मलो का काय? कपाळावर अपराधी असा शिक्का छापून आम्ही जनमलो हुतो काय रं?"

"नाही, तसं नाही हो पण..."

"ते काय नाय. पकड रे याला...दोन जण हात धरा, दोन जण पाय पकडा याचे! आणि आम्ही चौघे याला मग देतो चोप!"

ते सगळे कैदी मला मारायला धावले...

आणि मी वेड्यासारखं त्या कोठडीतील सगळ्या दगडी भिंती ठोठावून बघायला लागलो...कुठे ते लॉजचं दार दिसतं का ते शोधत राहिलो...जेणेकरून मला तो लॉजवर थांबलेला "पलीकडचा मी" सापडेल आणि मी त्याला खोलीचा दरवाजा उघडायला लावेल आणि सांगेल, "बाबा रे! कृपया भूतकाळात काहीही झालं तरी पुन्हा परत पळत जाऊन खोलीतून लॉजमध्ये जाऊ नकोस...आणि गेलास तरीसुद्धा पोलीस दार कितीही ठोठावू देत...उघडायचा नाही दरवाजा...!!"

आता रोज वेड्यासारखं मी त्या दगडी भिंतीवर माझ्या हाताच्या मुठी आपटत असतो आणि सगळे कैदी पोट धरून मला हसतात...माझे कपडे फाटलेले आणि मळलेले...

मला वेडा म्हणायला लागलेत ते...

नाही, मी वेडा नाही...

एक न एक दिवस मला तो दरवाजा नक्की सापडेल!!

आणि मला वाचवायला येईल तो - पलीकडचा मी!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel