दोन मित्र होते. त्यांच्यात चांगली घनिष्ट मैत्री होती. त्यापैकी एक साधारण घरातला तर दुसरा मात्र श्रीमंत घरातला होता. पैशांतलं हे अंतर दोघांच्या मैत्रीत मात्र जराही आड येत नव्हतं. एके दिवशी गरीब मित्राला स्कूटरची गरज निर्माण झाली. घरी पाहुणे येणार असल्यामुळे त्याला घाईघाईने काही सामान वगैरे आणायचं होतं. त्याच्या श्रीमंत मित्राकडे स्कूटर तर होतीच. मग काय, गरीब मित्राने आपल्या श्रीमंत मित्राकडे एक दिवसासाठी स्कूटर मागण्याचं मनाशी ठरवून टाकलं. हे मनाशी ठरवताच तो मित्राकडे स्कूटर मागायला निघालाही. पण काही पावलं चालताच त्याच्या मनात विचार आला की, आपल्या श्रीमंत मित्राने स्कूटर द्यायला नकार दिला तर? पण लगेच दुसरा विचारही आला की, असं कसं होईल? इतक्या वर्षांच्या मैत्रीत मी कधीच त्याच्याकडे काहीही मागितलेलं नाही. मग मैत्रीच्या नात्यात तो एका दिवसासाठी स्कूटर द्यायला नकार कसा देईल? पण परत त्याच्या मनात विचार आला, तो नक्कीच स्कूटर देण्यास नकार देईल. कारण तो दिसतो तितका सरळ-साधा थोडीच आहे? तो कदाचित असा बहाणा करेल की, स्कूटरमध्ये पेट्रोल नाहीये. काही हरकत नाही,मी पण त्याला सांगेन ठीक आहे. दे तू किल्ली. मी भरून घेतो पेट्रोल.


हा विचार मनात आल्यावर तो पुन्हा आत्मविश्‍वासाने पुढे निघाला. पण आणखी चार पावलं चालतो न चालतो तोच त्याच्या मनात पुन्हा दुसरा विचार आला. आपला मित्र स्कूटर न देण्यासाठी हजारो बहाणे सांगेल. त्याची मैत्री वगैरे सगळं वरवरचंच आहे. तो तर स्कूटरचं टायरच खराब आहे, असं सांगायलाही कमी करणार नाही. किंवा मग तो असंही सांगू शकेल की, आज माझ्याही घरी काही पाहुणे येणार आहेत; त्यामुळे आज तरी मला स्कूटर द्यायला काही जमणार नाही. हा विचार मनात येताच त्याला रागही आला आणि नेमका त्याच वेळी तो मित्राच्या घराच्या दरवाजात जाऊन उभाही राहिला होता. त्याच रागावलेल्या अवस्थेत त्याने मित्राच्या घराची बेल वाजवली आणि योगायोगाने दरवाजाही त्याच्या मित्रानेच उघडला... मग काय त्या क्षणाला त्याच्या रागाचं वादळ परमोच्च क्षणाला पोहोचलेलं होतं. साहजिकच, समोर मित्राला बघून त्याच्या वादळाच्या वाफेला जणू मोकळं होण्यासाठी वाटच मिळाली. तो सरळ ओरडून म्हणाला, खड्ड्यात गेलास तू आणि तुझी स्कूटर. तुझ्यासारखे पैसेवाले मी खूप बघितले आहेत. तुम्ही पैसेवाले कधीच कुणाचे मित्र होऊ शकत नाही. जा. आजपासून तुझी आणि माझी मैत्रीही संपली. बिचारा मित्र तर निःशब्दच होऊन गेला. त्याला काही समजेनासंच झालं. कुठली स्कूटर, कोण श्रीमंत... त्याला काही केल्या काही कळेना. पण इकडे स्वतःचा संताप व्यक्त करून झाल्यावर या सगळ्या प्रश्‍नचिन्हांमध्ये आपल्या मित्राला ढकलून त्याचा गरीब मित्र निघूनही गेला होता.


*तात्पर्य*


मनुष्याचं मन हे असंच असतं. ते स्वतःचं स्वतः चालत असतं आणि असं काही चालतं की अस्तित्वात नसलेल्या गोष्टीही ते मध्ये आणतं. ज्या गोष्टीशी ज्या व्यक्तीचं काहीच घेणं-देणंही नाही, अशा गोष्टींसाठीही मनुष्याचं मन त्या व्यक्तीला जबाबदार ठरवून मोकळं होतं. आणि नात्यांचं काय? नाती तर मन टिकूच देत नाही. त्यामुळे आयुष्यात नात्यांचं सुख हवं असेल, मनुष्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची इच्छा असेल, तर त्याच्यातले दोष शोधण्यापूर्वी आपलं मन आणि मनाचे उलट-सुलट आवेश हे आधी नीट समजून, परखून घ्यायला शिकायला हवं.

------

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel