सम्राट अशोकानंतर मगध साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि मौर्य घराणे भारताच्या राज्यकारभारातून काळाच्या पडद्याआड झाले. मौर्य घराण्यानंतर शुंग आणि कण्वांकडे मगध साम्राज्याची सत्ता आली, परंतु तोपर्यंत मगध साम्राज्य छोटे झाले होते आणि परकीय सत्ता भारतात स्थिर होऊ लागली होती. आंध्र प्रदेशात सातवाहन राज्य उदयास आले . त्याचा विस्तार हळूहळू भारताच्या पश्चिम समुद्रतटापर्यंत थडकला. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशातील एक बलाढ्य आणि थोर राजा. त्याला 'गौतमीपुत्र शतकर्णी' असेही म्हटले जाते.
सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. 'शालिवाहन शक' सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी पैठण ही होती. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावीत असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव 'गौतमीपुत्र सातकर्णी' असे होते.
नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मारला गेला व सातकर्णी विजयी झाला. त्याने पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले . याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला.
गौतमीपुत्र सातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याचा पराभव करून 'दिनमान पद्धती' रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. सातकर्णीचा राज्याभिषेक झाल्यावर म्हणजेच इ.स. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा आकडा इंग्रजी कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो.
गौतमीपुत्र सातकर्णी याने विदर्भावर चाल करून तेथील क्षत्रपांचा पराभव केला. नहपान या महाक्षत्रपाचाही पूर्ण पराभव केला. महाराष्ट्रातील शकांचा बिमोड केला. तसेच आपले राज्य सौराष्ट्र, कोकण, आंध्र आणि मलय पर्वतापर्यंत पसरविले.
सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली .
सातकर्णीने उच्चवर्णियांना आधार दिला आणि चातुर्वर्ण्यसंकर नष्ट केला. त्याच्या कारकिर्दीत देशांतर्गत तसेच देशाबाहेर भूमार्गे आणि समुद्रमार्गे व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.
असा गौतमीपुत्र सातकर्णी शालिवाहन शक चालू करून इतिहासात अजरामर झाला.