महाराष्ट्र...अनेक महान व्यक्ती, संत, योद्धे, शूरवीरांची भूमी...... हिंदुस्तानातील संपन्न प्रदेश.....अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण अशा अनेक घटना बघितलला सुखी व समाधानी प्रदेश.....संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर या प्रदेशावर परकीय आक्रमणे झाली ...हळूहळू परकीय आक्रमणे व महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात इथली  पवित्र माती परकियांच्या गुलामगिरीत गेली...
      या गुलामगिरीच्या विळख्यात पडलेल्या महाराष्ट्राला यातून बाहेर काढायचा प्रयत्न करायचा सोडून अनेक सरदार वतनासाठी बादशाहीला सामील झाले....यामुळे महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही व मुघल साम्राज्य पसरले.....वर्षानुवर्षे गुलामगिरीच्या वेढ्यात पडलेल्या महाराष्ट्राला आशेचा किरण दाखवला शहाजी राजांनी....निजामशाहीत राहून आपली सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांनी दिलेला लढा अपुरा ठरला व निजामशाही पडली...तरीदेखील शहाजी राजे संघर्ष करत राहिले... पण त्यांच्याकडून अपूर्ण राहिलेली स्वमुलुख स्वातंत्र्याची इच्छा त्यांनी आपल्या पराक्रमी पुत्राच्या हातून पूर्ण होताना बघितली...त्यांचे नाव शिवाजीराजे..
         शहाजीराजांच्या जीवनात धावपळीचा काळ सुरू असताना त्यांनी गरोदर असणाऱ्या जिजाऊ राणीसाहेब यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. शिवनेरीवर १९ फेब्रुवारी १६३० ला जन्मलेल्या शिवबानी व जिजाऊ राणीसाहेब यांनी लवकरच आपला मुक्काम शिवनेरी वरून पुण्याला हलवला. पुणे ही शहाजीराजांची जहागीर नुकतीच काही दिवसांपूर्वी उद्ध्वस्त झाली होती. वैराण बनलेल्या त्या प्रदेशात चैतन्य निर्माण करण्यासाठी राणीसाहेबांनी लालमहाल बांधून आसपासच्या लोकांना गोळा करून पुणे शहर पुन्हा वसवले.. लहानग्या शिवबाला अनेक मित्रमंडळी मिळाली.
     जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली..
     रोहिदेश्र्वराला शपथ घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यस्थापनेची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले.कान्होजी जेधे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ.  महाराजांनी पुण्याच्या परिसरातील  पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला महाराजांनी हस्तगत केला. महाराजांनी राजमुद्रा बनवून घेतली ...

  प्रतिपच्चंद्रलेखेववर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसुनौ शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

       महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट (रायगड) महाराजांच्या ताब्यात आला.
     महाराजांच्या या कृत्यांनी खवळलेल्या विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली.  वाई परगणा अफझलखानची जहागीर म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफझलखान हा विजापूरहून एप्रिल १६५९ मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला.विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हे त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली.प्रतापगडाभोवतालच्या डोंगरांत मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. दोघांनीही बरोबर दहा शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला.अफझलखानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे, त्याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्याक्षणी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली . संभाजी कावजी ने खानाला मारून त्याचे मुंडके सोबत घेतले.  ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालींसाठी सैन्याला इशारा दिला.महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाचे बरेच अधिकारी कैद  झाले. काहीजण पळून गेले.
   नोव्हेंबर १६५९ च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळागडाला वेढा घातला. तीन महिन्यानंतर शिवाजी महाराज सुखरूप वेढ्यातून निसटले व विशाळगडावर पोहचले..यादरम्यान बाजीप्रभू देशपांडे  यांनी घोडखिंडीत दिलेली झुंज इतिहासात अजरामर ठरली.
          पुण्यात येऊन आसपासचा प्रदेश बेचिराख करणाऱ्या शायिस्तेखानाला अद्दल घडवण्यासाठी महाराजांनी धाडसी बेत केला. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शायिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे, ही होय.५ एप्रिल १६६३ च्या रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकाऱ्यांसह शायिस्तेखानाच्या मुक्कामात घुसले, किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शायिस्तेखानाला महालात गाठले. शायिस्तेखान पळून जाण्याचा प्रयत्नात असता, त्याच्यावर तलवारीचे वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली. त्याचा एक मुलगा या हल्ल्यात ठार झाला. महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे सिंहगडाकडे निघून गेले.
        महाराजांनी स्वराज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. त्याकाळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले.  मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली . सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती.
      पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले.
     औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झाराजे जयसिंह यांची दक्षिणेत नेमणूक केली.मिर्झाराजांनी महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा, पोर्तुगीज आणि लहानमोठे जमीनदार यांना शिवाजीला मदत करू नये असे बजावले. आदिलशाहीतील अनेक सरंजामदार त्याने आपल्याकडे ओढले. महाराजांचे पुरंदर व रुद्रमाल हे किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले.अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. त्या अशा :
१. महाराजांनी मोगलांना २३ किल्ले आणि वार्षिक चार लाख होन उत्पन्नाचा  मुलूख द्यावा.
२. उरलेले १२ किल्ले आणि वार्षिक एक लाख होनाचा मुलूख बादशहाशी राजनिष्ठ राहण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा.
३. मुलगा संभाजीराजे यांना पाच हजाराची बादशाही मनसब देण्यात येईल.
शिवाजी महाराजांच्या नाराजीमुळे नेताजी प्रथम विजापूरला मिळाला आणि मिर्झाराजांनी त्याची मनसब वाढविल्यावर मोगलांकडे गेला व पुढे त्यास औरंगजेबाने मुस्लिम करून  त्याचे नाव मुहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले.शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली . महाराज आग्र्याला पोहचले. महाराज आणि संभाजीराजे यांनी दरबारी पध्दतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांना दरबारी अधिकाऱ्याच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. महाराजांनी हा अपमान सहन केला नाही..औरंगजेबाला त्याच्याच दरबारात खडे बोल सुनवून,  खिल्लत नाकारून महाराज बाहेर पडले व थेट आपल्या मुक्कामी गेले. त्यानंतर चिडलेल्या औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले. ऑगस्ट १६६६ रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले. नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडाला सुरक्षितपणे आणण्यात आले.
       काही वर्षांनी रयतेला राजा हवा व सिंहासन हवे या मागणीसाठी गागाभट्ट रायगडावर आले.  राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टांनी ठरविले. रायगड ही स्वराज्याची राजधानी ठरवली. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके १५७६, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले. महाराज छत्रपती झाले...तुळजाभवानी, १२ ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, ११ मारुती, खंडोबा , विठोबा, असे सर्व देव व प्रजा तसेच सर्व गड किल्ले परकीय शक्तींना जणू काही खिजवू लागले ....झाला आमचा राजा छत्रपती झाला... मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला व तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला.
    शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि त्याबरोबरच राज्यकारभाराविषयक एक सुसूत्र नियमावली तयार केली. राजव्यवहारकोश तयार करवून घेतला.
       राज्याभिषेकानंतर महाराजांनी अनेक किल्ले पुन्हा जिंकून घेतले..दक्षिणेकडचा मोहीम यशस्वी झाली. स्वराज्य वाढले..
       अखेर ३ एप्रिल १६८० रोजी महाराष्ट्राचा एक युगपुरुष निजधामी गेला....समर्थ रामदास त्यांचे वर्णन यथार्थ करताना म्हणतात..

      "निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु।
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी॥"
     
     स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली.महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे  छत्रपती संभाजीमहाराज, राजाराम महाराज, ताराराणी , शाहूराजे यांच्या नेतृत्वाखाली लढले आणि स्वराज्य महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पुढे भारतव्यापी झाले.स्व्् संस्था्ाा्ा

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel