भारतात प्राचीन काळी अनेक राजघराण्याची सत्ता होती. अनेक घराण्यांनी दीर्घकाळ राज्य केले. त्यापैकीच एक म्हणजे चोळ वंश घराणे...एक काळ असा होता की या घराण्याचे राज्य भारतात बहुतांश ठिकाणी होते. त्यानंतर काही काळ हे घराणे थोडे प्रसिद्धीपासून दूर झाले...नंतर पुन्हा त्याला नवीन उभारी देण्याचे काम ज्या राजाने केले तो म्हणजे राजा राजा चोल व त्याचा मुलगा राजेंद्र चोल.
दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन सुप्रसिद्ध वंश. अशोकाच्या शिलालेखानुसार चोलांचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख आहे. त्यानंतर इ. स.च्या प्रारंभी करिकाल चोल हा अत्यंत विख्यात आणि थोर राजा होऊन गेला. त्याने पांड्य व चेर या दक्षिणेकडील राजांचा पराभव केला. श्रीलंकेवर स्वारी करुन तेथून बारा हजार बंदी आणून त्यांच्याकडून पुहार या नावाच्या बंदराची तटबंदी करविली. तो एक न्यायी राजा होता . त्याने अनेक लोकोपयोगी कार्ये केली. त्याने श्रीरंगम येथे कावेरीला मोठा कालवा खणून मोठा प्रदेश सुपीक केला. त्याच्या नंतर काही वर्षे चोळांचा उल्लेख आढळतात नाही. पण ते राज्य असावे असे वाटते.
पहिला राजराजा या चोल राजाच्या कारकीर्दीत चोल साम्राज्याला पुन्हा ऊर्जितावस्था आली. त्या वेळी राष्ट्रकूटांचा अस्त होऊन चालुक्यांचा नुकताच उदय झाला होता. राजराजाने चेर व पांड्य राजांचा पराभव केला. नंतर मालदीव बेट जिंकले आणि श्रीलंकेवर स्वारी करून त्यांचा काही भाग जिंकला. त्याने राज्यकारभारात व जमाबंदी खात्यात सुधारणा घडवून आणल्या. त्याने पुढील चोल साम्राज्याचा भक्कम पाया रचला. त्याने बांधलेल्या कित्येक भव्य मंदिरांपैकी तंजावरचे राजराजेश्वर मंदिर त्या काळच्या स्थापत्य व शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.त्याने आपले साम्राज्य विभिन्न जिल्ह्यात विभाजित केले व व्यवस्थित भूमी सर्वेक्षण करून राजस्व संग्रहाचे मानकीकरण केले. आपल्या पद्धतीने त्याने प्रशासनिक व्यवस्था कायम ठेवली.
अनेक सुंदर देवालये व प्रासाद बांधले. प्राचीन वेदांच्या अध्ययनाकरिता मोठे विद्यालय स्थापन केले व शेतीकरिता सुमारे २६ किमी. लांबीचा विशाल तलाव खोदून त्याला गंगासागर नाव दिले.
त्याचा पुत्र राजेन्द्र चोलाने याहीपेक्षा मोठा अद्वितीय असा पराक्रम केला. त्याने आपल्या आरमाराच्या साहाय्याने जावा, सुमात्रा, मलाया द्वीपकल्पांवर स्वारी करून शत्रू साम्राज्याचा विध्वंस केला. अशा रीतीने तो गंगेपासून ते श्रीलंकेपर्यंत आणि मलाया द्वीपकल्पापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा सम्राट झाला.
त्या पितापुत्रांनी विविध कलांना,धर्माला आणि विद्येला आश्रय दिला. त्यांनी अनेक भव्य व सुंदर मंदिरे बांधली. त्यामध्ये तंजावर येथील राजराजेश्वर म्हणजेच बृहदीश्वर व गंगैकोंडचोळपुरममधील गंगैकोंडचोळेश्वर ही प्रमुख आहेत.चोलकालात पंचरसी धातूच्या अनेक सुंदर मूर्ती घडविण्यात आल्या. त्यांमध्ये नटराजाची मूर्ती प्रमुख आहे. ब्रह्मा,सप्तमातृका,विष्णूचे अवतार,भूदेवी इत्यादींच्या मूर्ती तत्कालीन कारागीरांच्या ओतीव कामातील नैपुण्याची साक्ष देतात.केशवस्वामीचा नानार्थार्णवसंक्षेप हा संस्कृतातील विविधार्थ देणाऱ्या शब्दांचा कोश राजराजच्या दरबारी रचला गेला.
सांस्कृतिक , शैक्षणिक, कला व उत्कृष्ट शासन देणारे राजराज व राजेंद्र हे चोल पितापुत्र इतिहासात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून आहेत.