( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आम्ही नाशिकला राहतो.आमचे घर कोकणात रत्नागिरीजवळ आहे .आमचे आजोबा आजी कोकणात राहतात.माझे बाबा त्यांना तुम्ही तिकडे कशाला राहता इकडे या,आपण एकत्र राहू म्हणून नेहमी सांगत असतात.आजोबा आजीची प्रकृती अजून चांगली आहे.त्यांना ऐसपैस मोकळेढाकळे लांबरुंद कोकणातील घर आवडते.नाशिकला त्यांना एका खोलीत कोंडल्यासारखे होते. हात पाय थकले की तुझ्याकडे यायचेच आहे. तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला असे ते उत्तरादाखल म्हणत असतात.

सुटी लागली की आम्ही मुले कोकणात हमखास जातो.गाडी आमच्या घरापर्यंत जाते.येथून मुंबई, मुंबईहून रेल्वेने रत्नागिरी, रत्नागिरीहून पुढे रिक्षा असे आम्ही आमच्या गावी जातो.किंवा आमचा ड्रायव्हर आम्हाला आमच्या गाडीतून घरापर्यंत सोडून परत जातो.आणखी एक मार्ग आहे.मंगला एक्स्प्रेस पहाटे नाशिक रोडला येते.त्याने रत्नागिरीला जाता येते.उन्हाळ्यात कोकणात करवंदे जांभळे फणस आंबे काजू यांची रेलचेल असते.काय खाऊ आणि किती खाऊ असे होते.आजोबा आम्हाला मुद्दाम सर्व प्रकारची फळे मिळतील याची काळजी घेतात.हापूस आंब्याची कलमे आंबे काढण्यासाठी जरी दुसऱ्याला दिली तरी आजोबा  आम्हाला आंबे मिळतील अशी व्यवस्था करतात.आंबे पिकल्यावर सर्वत्र सुवास दरवळतो.आंबे कापून, चोखून,रस काढून, सोलून सर्व प्रकारे आम्ही खातो.आजी विळीवर आंब्याची साल काढते नंतर फोडी करते.अशा फोडी खायला मजा येते.सालीचा किंचित कडक हिरवेपणा व आतील रसाळ गर एकत्रित खाताना खूपच छान लागतो.आजोबांना अशा फोडी आवडतात.आजी कौतुकाने आजोबांना आंबे विळीवर सोलून  फोडी करून देत असते.आम्हालाही देते.एकदा विळीवर मी आजीसारखा आंबा सोलण्याचा प्रयत्न केला.हात कापून घेतला.एकूण" जेनू काम तेनू थाय" हेच खरे.            

फणसात दोन प्रकार असतात.कापे व बरके.आम्हाला दोन्ही प्रकारचे फणस आवडतात.गरे, सांदण{बरक्या फणसाचा रस, तांदळाच्या कण्या(इडली रवा) गूळ एकत्रित करून केलेल्या एक प्रकारच्या गोड इडल्या},शेक, तीनही प्रकार आजी आम्हाला देते.शक्यतो आम्ही आजोबांना अगोदर कळवून नंतरच कोकणात जातो.

या वर्षी आम्ही आजोबांना आश्चर्यचकित करायचे ठरविले.बाबांनी ड्रायव्हर देऊन त्याला आम्हाला घरी पोहोचवण्यास सांगितले.अशाप्रकारे आम्ही आजोबा आजीना अगोदर न कळवता अकस्मात त्यांच्या पुढ्यात दत्त म्हणून हजर झालो.आमच्या इच्छेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे व अंदाजाप्रमाणे,आम्हाला बघून  आजी आजोबा आश्चर्यचकित झाले.परंतु त्यांच्यापेक्षा जास्त आश्चर्यचकित होण्याची आमची वेळ होती.

आमच्या घरावर आठ दहा गडी चढले होते.चार पाच पयरी(स्त्री मजूर) होती.आम्ही आजोबांना हे काय चालले आहे असे विचारले.ते म्हणाले,"खापरी नळे परतणीचे काम चालू आहे.तुम्ही   शहरातील लोकांनी मंगलोरी कौले बघितलेली असतीलच.कांही जणांच्या बाबतीत तीही शक्यता कमीच.शहरात सर्व काँक्रीट बिल्डिंगचा जमाना.अलीकडे खेडेगावातून सुद्धा खापरी नळ्यांची घरे कमी होत चालली आहे.कारण खापरी नळे नवीन निर्माण केले जात नाहीत.एकेकाळी स्थानिक मातीपासून खापरी कौले (नळे)तयार केली जात असत.सर्व घरांवर तेच असत.(हे नळे पन्हळाच्या आकाराचे होते.पन्हळ म्हणजे एखादा पाईप उभा कापल्यानंतर  त्याचे दोन अर्धवर्तुळाकृती भाग होतील त्यातील एक)खापरी नळ्यांमुळे घरात थंडावा चांगला राहतो.मंगलोरी कौलांची घरे जास्त तापतात ही कौले आता मिळत नसल्यामुळे नाइलाजाने मंगलोर घरावर घालावा लागतो.आपल्याही घरावर कांही दिवसांनी मंगलोरी कौले घालावी लागतील."

प्रत्येक खोलीतील सामान एकत्र करून त्यावर केर पडू नये म्हणून  पाले (गोणपाट उसवून नंतर शिवून तयार केलेले ताडपत्रीवजा कापड )टाकलेली होती.आम्हाला हे सर्व नवे होते.नळे परतावे कां लागतात असे आम्ही आजोबांना विचारले.आजोबा म्हणाले,"या नळ्यांच्या फटींमधून केर ,पातेरी(झाडाची सुकलेली पाने)  साचते.त्यामुळे पावसात पाणी घरात गळू लागते.दर तीन चार वर्षांनी नळे परतावे लागतात.छप्पर झाडावे लागते. नळे परतून झाल्यावर घराची झाडफेड करावी लागते.भिंती लाल मातीने सारवाव्या लागतात.घराची जमीनही सारवावी लागते.कांही वेळा जमीन नव्याने करावी लागते.त्यामध्ये आठ पंधरा दिवस जातात.आमचा मुक्काम बाहेर अंगणात असतो.आम्ही तिथेच झोपतो. शिजवतो.बाहेर ऊन लागू नये म्हणून मांडव घातलेला आहे. तुम्ही येणार असे अगोदर कळविले असते तर एवढ्यात येऊ नका म्हणून मी कळविले असते."आजोबाना  घराला फरशा घातलेल्या,कोबा घातलेला आवडत नाही.घराचा गारवा टिकत नाही. जमीन चालताना टणक वाटते असे त्यांचे मत आहे.   

कोकणात सर्वच घरापुढे उन्हाळ्यात अंगणात नेहमीच मांडव घातलेला असतो. मांडवाचा वापर उन्हाळ्यात वार्‍यावर बसण्यासाठी,वाऱ्यावर  काम करण्यासाठी होतो.कोकणात खूप उकडत असल्यामुळे आजी आजोबा मांडवातच बाजली (नवारी ऐवजी सुंभाने विणलेली कॉट) टाकून उन्हाळ्यात झोपतात.ते म्हणतात हा आमचा फुकटचा एसी.तुमच्या बंद खोलीतील गारव्यापेक्षा हा आमचा गारवा हजार पटीने चांगला. उन्हाळ्यात घरी गेल्यावर आम्हीही क्वचित बाहेर मांडवात झोपतो.पण शक्यतो नेहमी आंत घरातच झोपतो.आठ दहा दिवस किंवा कदाचित जास्त दिवस मांडवात उघड्यावर झोपावे लागेल हे ऐकून आम्ही हादरून गेलो.

आम्ही तयार घरात नेहमी जात असल्यामुळे नळे परतणे, भिंती लाल मातीने सारवणे, वगैरे सर्व गोष्टी आम्हाला नवीन होत्या.बोलता बोलता आजोबा म्हणाले हल्ली इथे एक वाघ(बिबट्या  )गावात वारंवार चकरा मारतो.बाहेर असलेली कुत्री कोंबड्या वगैरे पकडून नेतो.केव्हां केव्हां गोठ्यात शिरून गुरानाही मारण्याचा प्रयत्न करतो.वासरे तर मारतोच.हल्ली वाघाच्या भितीने लोक वासरे रात्री घरातच बांधून ठेवतात.कोंबड्या डालग्याखाली(भरपूर फटी असलेली वारा खेळेल अशी मोठी टोपली)   घरातच ठेवतात.वाघाच्या भितीने काही लोकांनी उघड्यावर खळात(अंगणात) झोपणे बंद केले आहे.कधी कधी वाघ आपल्या कुंपणाच्या बाहेर बेड्याजवळ(दोन चिरे उभे करून त्याला मोठी छिद्रे पाडून त्यातून बांबू घातलेले असतात.एक प्रकारचे फाटक)   येवून ओरडतो. 

हे सर्व ऐकून आम्ही हादरून गेलो.मी तशी मोठी अठरा वर्षांची आहे.माझ्या पाठीमागून एक भाऊ व एक बहीण आहे.आम्ही कित्येक वर्षे तिघेही गावी जातो. कधी कधी आई बाबाही बरोबर येतात.जर कांही कारणाने दर वर्षी जाता आले नाही तर एक वर्षाआड  तरी जातोच.आतापर्यंत वाघाबद्दल आम्ही कधीही ऐकले नव्हते.एखाद्या कुत्र्याबद्दल बोलावे तसेच आजोबा वाघाबद्दल बोलत होते.त्यांना वाघाची कांहीही भीती वाटत असलेली दिसत नव्हती.आम्हाला रात्री उघड्यावर मांडवात झोपायला पहिल्यापासूनच भीती वाटते.सर्वत्र अंधार असतो.कुठेही बघितले तरी चित्र विचित्र आकृत्या दिसतात. चांदण्या रात्री तर बघायलाच नको जिकडे तिकडे सावल्या आणि फारच विचित्र आकृत्या दिसतात. कोकणात खूप भुते असतात असे ऐकते.अजूनपर्यंत फक्त ऐकून होते.या वेळी त्याच्याशी प्रत्यक्ष गाठ पडली. ती गोष्ट पुढे येणारच आहे. भुतामुळे आणखीच भीती वाटते.शक्यतो आम्ही घरातच झोपतो.आजोबा म्हणतात भुताला काय घाबरायचे आणि ते येणार असेलच तर बंद घरात येऊ शकेलच कि.त्यावर आमच्याजवळ कांहीही उत्तर नसते.अर्थात आजी आजोबा बाहेर असताना घरातही झोपायला भिती वाटते.परंतु  बऱ्याच वेळा नर्मदा आमच्या सोबतीला येते.(नर्मदा  आजोबांकडे कामासाठी येणारी एक मुलगी) ती माझ्या चांगली ओळखीची आहे.माझ्यापेक्षा दोन चार वर्षांनी मोठी असावी.केव्हां केव्हां आम्ही झोपेपर्यंत आजी आमच्या जवळ असते.नंतर ती बाहेर वाऱ्यावर मांडवात झोपायला जाते.

आजोबा आम्हाला म्हणाले तुम्ही बिनधास्त बाहेर मांडवात झोपा.आपल्या इथे दत्तमंदिर आहे.महापुरुषाची आपल्यावर छाया आहे.वाघ किंवा इतर कुणीही जनावर, भुते, कुंपणाच्या आंत यायला धजणार नाहीत.आम्ही उन्हाळ्यात कित्येक वर्षे बाहेर मांडवात झोपतो. कधीही वाघ आंत आला नाही.आम्ही कुरकुरतो असे पाहून आजोबानी आणखी एक योजना सुचवली.आम्ही मध्ये झोपावे.एका बाजूला आजोबा झोपतील.दुसऱ्या बाजूला आजी झोपेल. वाघ आला तर तो आजोबा किंवा आजी यांना धरील.आम्हाला अर्थातच कोणतीच योजना पसंत नव्हती.वाघ आजोबा किंवा आजी यांच्या बाजूनेच येईल याची खात्री काय?एका बाजूला घराची भिंत होती.चौथ्या बाजूने तो आला तर काय करणार!आजोबा किंवा आजी यांच्यावरून उडी मारून आला तर काय करणार?

आम्ही घरांत झोपणे शक्य नव्हते तर बाहेर झोपणे अशक्य होते.  

आमची बिकट अवस्था आजीच्या चांगलीच लक्षात आली.ती अजोबांजवळ म्हणाली मुलांच्या झोपेची कांहीतरी व्यवस्था केली पाहिजे. 

*आजोबा मोठ्याने हसत म्हणाले चार दिवस गेले की त्यांना चटदिशी सवय होईल.*

*कांही काळजी करू नको.परंतु आजीला माझी दशा पहावेना.*

*आजीनेच एक उपाय सुचविला.त्यामुळेच आमची दत्तोपंतांच्या भुताशी भेट झाली.* 

(क्रमशः)

२/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel