( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी मित्राला सीसीटीव्हीचीकल्पना सांगितली. 

त्याला ती एकदम पसंत पडली.दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये रजा टाकली.

चांगल्यापैकी सीसीटीव्ही विकत घेतला.मी व मित्र घरी आलो.

त्याच्या साहाय्याने सीसीटीव्ही सर्व खोलीतील हालचाल व्यवस्थित दिसेल अशाप्रकारे बसविला.त्या दिवशी मित्र सोबतीला माझ्याकडे झोपला.

रात्री कांहीही प्रकार घडला नाही.आम्ही शांतपणे झोपलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे  मी ऑफीसला गेलो.

जाताना अर्थातच सर्व कांही मुद्दाम इधर उधर करून गेलो होतो.मी काय केले ते पाहायला आज मित्र होता.माझा एक साक्षीदार होता.मला भास होत नाहीत.मी खोटे बोलत नाही. थापा मारीत नाही. हे सांगायलाही मित्र होता  

संध्याकाळी खरे काय ते कळणार होते.अजून या बाबतीत मी करंबळेकर काकांकडे कांहीही बोललो नव्हतो.

संध्याकाळी मी व मित्र घरी आलो.दबकत दबकत हळूच खोलीचे कुलूप काढून दरवाजा उघडला.

खोलीतील सर्व वस्तू   व्यवस्थित लावलेल्या होत्या.जाताना मी शू रॅक आडवे करून गेलो होतो.चपला व बूट डावी उजवी उलटसुलट करून ठेवले होते.एवढेच नव्हे तर चपलेच्या जोडीला बूट अशा जोड्या लावल्या होत्या.अंथरूण पांघरूण केले होते.पांघरूण बेडशीट सारखे गादीवर घातले होते.टॉयलेटमधील दिवा चालू ठेवला होता.बाहेर खोलीत पाणी ओतून ठेवले होते.

मी व माझा मित्र सर्वत्र निरीक्षण करत फिरलो.शू रॅक भिंतीलगत दरवाजाजवळ उभा केलेला होता.मी शू रॅक आडवा केला होता, एवढेच नव्हे तर तो उचलून कॉटजवळ ठेवला होता.कुणीतरी उचलून शू रॅक दरवाजाजवळ डाव्या बाजूला त्याच्या नेहमींच्या जागी ठेवला होता.आम्ही कॉटजवळ येऊन  पाहिले.घडी करून पायथ्याशी पांघरुणासारखा ठेवलेला बेडशीट गादीवर व्यवस्थित घातला होता.पांघरुणाची घडी करून पायथ्याशी ठेवले होते.मुद्दाम ओतलेले पाणी कुणीतरी व्यवस्थित पुसून घेतले हाेते सर्व जागा कोरडी होती.टॉयलेटमधील दिवा मालवलेला होता.एखादा म्हणेल मला भास होतात.एखाद्याला मी सायकॉलॉजिकल केस आहे असे  वाटेल.कुणीही असे म्हणू नये म्हणून मी माझ्या मित्राला साक्षीदार म्हणून बरोबर ठेवले होते.तोही सर्वकाही व्यवस्थित ठेवलेले,लावलेले,केलेले, पाहून आश्चर्यचकित झाला होता.

आम्ही सीसीटीवी पाहण्याचे ठरविले.सीसीटीव्हीमध्ये अज्ञात अदृश्य अस्तित्व दिसत नव्हते.फक्त खोली दिसत होती.शू रॅक उचलला गेलेला दिसला. दरवाजाजवळ आणला गेला. दरवाजाच्या डाव्या बाजूला भिंतीजवळ ठेवला गेला.पटापट कुणीतरी बूट चपला व्यवस्थित लावून ठेवल्या.हे सर्व दिसत होते परंतु हे कोण करीत आहे ते दिसत नव्हते.जी गोष्ट शू रॅकची तीच गोष्ट अंथरूण पांघरुण याची.फरशी कुणीतरी व्यवस्थित पुसत आहे असे दिसत होते.परंतु कोण पुसत आहे ते दिसत नव्हते.थोडक्यात अदृश्य हात सर्वत्र फिरत होता.सर्व कांही व्यवस्थित नीटनेटके करीत होता.फक्त त्या हाताचा धनी किंवा धनीण दिसत नव्हती.

मला चार शक्यता दिसत होत्या.

पहिली काकांच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी या खोलीत पूर्वी बराच काळ राहात असावे.त्याचा किंवा तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला असावा.कांही कारणाने ते अस्तित्व अजून या खोलीत आहे.खोली नीटनेटकी ठेवायची, स्वच्छ ठेवायची, एवढाच त्याचा उद्योग आहे.इथे कोण राहतो त्याच्याशी त्या अस्तित्वाचे कांहीही देणेघेणे नाही.त्या अस्तित्वाचा त्रास देण्याचा स्वभाव नाही.   

दुसरी ही जागा भाड्याने माझ्याप्रमाणेच अगोदर कुणाला तरी दिली असावी.त्याचा किंवा तिचा मृत्यू झाला.आता ते अस्तित्व खोली नीटनेटकी करीत आहे.  

तिसरी दुरान्वयाने कदाचित असू शकत होती.उगीचच इकडे तिकडे आसमंतातून अवकाशातून फिरणाऱ्या एखाद्या अस्तित्वाला ही खोली आवडली.ते अस्तित्व या खोलीत मी येण्याअगोदर राहात होते.मी आल्याचे त्याला नावडले नाही.माझा अव्यवस्थितपणा त्याला आवडत नाही.तो खोली व्यवस्थित करतो.ही शक्यता केवळ मुद्दा म्हणून होती तसे असेल असे मला वाटत नव्हते.  

आणि चौथी मी खोलीचा इतका पक्का बंदोबस्त केला होता की बाहेरील एखाद्या व्यक्तीला माझ्या लक्षात न आलेला चोर दरवाजा असल्याशिवाय आंत येणे शक्य नव्हते.एखादा चोर दरवाजा आणि त्यातून एखादी व्यक्ती मुद्दाम आंत येऊन सर्व खोली व्यवस्थित लावते अशी एक शक्यता होती.  

मी काकांना भेटून सर्व कांही त्यांना सांगण्याचे ठरवले.ते काय उत्तर देतात त्यावर खोलीत राहायचे की नाही आणि त्याप्रमाणेच  हे कोण करत आहे त्याचा उलगडा होणार होता.

मी काकांना फोन केला.एका महत्त्वाच्या गोष्टीवर तुमच्याजवळ बोलायचे आहे असे त्यांना सांगितले.त्यांना वेळ केव्हां आहे ते विचारले.त्यांनी मला आता वेळ आहे अवश्य या म्हणून सांगितले.मी व माझा मित्र त्यांच्या घरी गेलो.   

काकांनी या बसा म्हणून आमचे स्वागत केले.तुम्हाला दिलेली खोली कशी आहे तुम्हाला   कांही त्रास नाही ना?असे विचारले. सहज कांहीतरी बोलायचे म्हणून ते बोलले असावेत किंवा त्यांना मी समस्येमध्ये आहे अशी शंका असावी.

मी त्यांना उत्तरादाखल कांहीही ठीक नाही.तुमची खोली चांगली आहे.एकटय़ा मनुष्याला  आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयींनी युक्त आहे.एरवी तर मी आनंदी राहिलो असतो.परंतु पहिले आठ दिवस सोडले तर मला एक समस्या भेडसावत आहे.त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत.अशी प्रस्तावना करून त्यांना मला असलेल्या सर्व समस्या सांगितल्या.मला आलेले सर्व अनुभव सांगितले.खोलीतील सामान अस्ताव्यस्त केले तरी मी बाहेरून येतो तेव्हां ते व्यवस्थित लावलेले असते.अंथरूण पांघरूण उलटसुलट केले तरी ते परत व्यवस्थित केले जाते.अधूनमधून फ्लशचा आवाज येत राहतो.मुद्दाम पाणी ओतून ठेवले तरी ते स्वच्छ केले जाते.इत्यादी सर्व गोष्टी सांगितल्या.सीसीटीव्ही बसवला तर त्यात कुणीही दिसत नाही.फक्त अव्यवस्थेच्या ठिकाणी व्यवस्था केली जात असलेली दिसते.हे सर्व अनुभव सांगितले.या खोलीत कुणाचे तरी अस्तित्व आहे.त्यामुळे मला भीती वाटते.या खोलीत मी येण्याअगोदर कोण राहत होते असे त्यांना विचारले.मला खूप भीती वाटते.अजून तरी मला त्रास झालेला नाही.भविष्यकाळात काय होईल माहित नाही.मी तसा घाबरट पळपुटा नाही.मला खरे खरे काय ते सांगा.असे त्यांना बोललो

काकांनी सांगण्यास सुरुवात केली.ते म्हणाले,मला माफ करा.तुम्हाला कांही त्रास होईल असे मला वाटले नव्हते.नाहीतर मी अगोदरच तुम्हाला सर्व कांही स्पष्ट केले असते.आम्हाला एवढय़ा मोठय़ा जागेची गरज नाही.आमची मुले परगावी राहतात.ती येतील तेव्हां पुरेल एवढी जागा असली म्हणजे झाले.तेव्हा दोन शयनगृहे ठेवावीत आणि एक भाड्याने द्यावे.त्या खोलीला स्वतंत्र प्रवेशद्वार आहे.त्यामुळे आम्हाला किंवा भाडेकरूला त्रास नाही.कुणीतरी पेइंगगेस्ट भाडेकरू म्हणून ठेवावा असा विचार आम्ही केला.एक मुलगी या शहरात नोकरी करीत होती.आमच्या एका ओळखीच्या गृहस्थामार्फत ती आमच्याकडे आली.आम्ही तिला ही जागा, तुम्हाला दिली त्याप्रमाणे भाड्याने दिली.तिचे नाव शोभा.ती अत्यंत व्यवस्थित नीटनेटकी मुलगी होती.प्रत्येक वस्तूला जागा पाहिजे आणि त्या जाग्यावर ती वस्तू पाहिजे असे तिचे ब्रीद होते.जवळजवळ सहा महिने ती येथे राहत होती.ती आमच्याकडे अधून मधून येत असे

आमच्या हिला, तुमच्या काकूला, तिचा स्वभाव पसंत पडला होता.दुर्दैवाने एक दिवस रस्ता ओलांडत असताना तिला अपघात झाला.जवळजवळ दहा बारा दिवस ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झगडत होती.शेवटी ती हरली.तिचा मृत्यू झाला.नंतर बरेच दिवस ही जागा रिकामी होती.तुम्ही ओळखीतून आलात.तुमचा स्वभाव मला पसंत पडला.आणि मी तुम्हाला ती जागा दिली.तुम्हाला असे कांही अनुभव येतील अशी मला सुतराम कल्पना नव्हती.

तिचा मृत्यू झाला असला तरी ती अजून या खोलीत वास्तव्य करीत आहे असे तुमच्या बोलण्यावरून दिसते.ती अत्यंत सद्गुणी,सज्जन, सरळ स्वभावाची मुलगी होती. ती कोणालाही त्रास देणार नाही.तुम्ही निश्चिंत मनाने खोलीमध्ये रहा.उलट ती तुमची काळजी घेत आहे.तुमची खोली व्यवस्थित ठेवीत आहे.तुम्ही खोली भाड्याने घेताना खोलीची  स्वच्छता, टापटीप यासह घेतली आहे असे समजा.त्याउप्पर तुम्हाला खोली सोडायची असल्यास तसे मला सांगा.एवढे बोलून ते थांबले.तेवढ्यात काकू चहा घेऊन आल्या.त्यांनीही शोभा तुम्हाला त्रास देणार नाही असे सांगितले.

मी उद्या तुम्हाला काय ते सांगतो असे म्हणून त्यांचा निरोप घेतला.खोलीमध्ये आल्यावर आम्हाला खोलीत मंद सुगंध येत असलेला आढळला.याचा अर्थ शोभा आमचे स्वागत करीत होती.मी खोली सोडून जावे अशी तिची इच्छा दिसत नव्हती. आम्ही दोघांनी चर्चा केली.अजूनपर्यंत मला कांहीही त्रास झाला नव्हता.काकांच्या बोलण्यावरून कांही त्रास होण्याचा संभवही नव्हता.खोली नीटनेटकी करून,झाडूपोचा करून, स्वच्छता करून,मिळत होती.मी तिथेच राहण्याचे ठरविले.

शोभाने मला कधीही कोणताही त्रास दिला नाही.वाईट अर्थाने तिचे अस्तित्व जाणवू दिले नाही.टॉयलेटमध्ये दिवा तसाच राहिला तर ती तो बंद करीत असे.सर्व वस्तू जागच्या जागी लावून ठेवीत असे.मी मुळात अव्यवस्थित  नव्हतोच.जो कांही थोडाफार होतो त्यामध्येही क्रमशः सुधारणा होत गेली.

झोपायला गेल्यावर कधी कधी मला अंथरूण गरम वाटत असे.जणूकांही आताच कुणीतरी येथे झोपले असावे असे वाटे.कधी कधी सोफ्यावर कुणीतरी  बसले आहे असे वाटे.तेवढाच सोफा दबलेला दिसे.थोड्या वेळाने सोफा व्यवस्थित दिसे.कधी कधी फ्लशचा आवाज येत असे.मला झोपताना वाचायची सवय आहे.मी पांघरुण न घेता  तसाच झोपी गेलो.तर शोभा मला पांघरूण घालत असे.मी दरवाजाला बाहेरून कडी कुलूप लावण्याचे सोडून दिले.दरवाजा नुसता ओढून घेऊन जात असे.एक दिवस मी दरवाजा उघडा टाकून तसाच गेलो.लिफ्टपर्यंत जातो तो दरवाजा लावल्याचा आवाज आला.कधी कधी कुणीतरी माझ्याशेजारी कॉटवर झोपले आहे असा भास मला होत असे.

मी कधीही घाबरलो नाही.शोभाने मला कधीही भीती दाखविली नाही.शोभाने मला कधीही दर्शन दिले नाही शोभा माझी व खोलीची पूर्ण काळजी घेत असे.जवळजवळ असे सहा महिने गेले.एके दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा मला आतूनच शोभा इथून निघून गेली आहे असे वाटले.खात्री करून घेण्यासाठी मी बाथरुममध्ये दिवा तसाच ठेवला.तो बंद झाला नाही.बाहेर जाताना कपडे गादी चपला बूट अस्ताव्यस्त करून गेलो.परत आलो तेव्हा सर्वकांही जसेच्या तसेच जिथे ठेवले होते तेथे  होते.याचाच अर्थ शोभा पुढच्या गतीला गेली होती.मृत्यूनंतर कां कोण जाणे सहा महिने ती या खोलीत घुटमळत होती.

*तुम्हाला मी थापा मारीत आहे असे वाटले तर तुम्ही गणेश संकुलामध्ये कमलाकर करंबेळकर फ्लॅट नंबर दोन शे तीन येथे जावून चौकशी करा.*

*मी आता ती जागा सोडली आहे.*

*माझे लग्न झाल्यामुळे मोठय़ा जागेत मी आता राहात आहे.*

*काका करंबेळकरांकडे तुम्हाला माझा पत्ता मिळेल.*    

(समाप्त)

२८/२/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel