( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

*नीलेश*

मी सिव्हिल इंजिनीअर झालो आणि नोकरीसाठी ठिकठिकाणी अर्ज करण्यास सुरुवात केली.कोणत्याही गोष्टीचा मागणीपेक्षा पुरवठा वाढला की त्याच्या किमती घसरतात.इंजिनीयर लोकांचे तसेच झाले आहे.ढीगभर खाजगी कॉलेजेस काढली गेली.त्यावेळी इंजिनिअर कमी होते.फक्त सरकारी कॉलेजमधून इंजिनिअर बाहेर पडत असत.ढीगभर खाजगी कॉलेजेसमध्ये जो तो इंजिनिअरींगला गेला.इंजिनिअरचा पुरवठा वाढला.त्या मानाने मागणी वाढली नाही.इंजिनिअर मोठय़ा प्रमाणात बेकार राहू लागले.फार पूर्वी अशी एक म्हण होती."न मिळे भीक तर वैद्यकी शीक."याचाच अर्थ जर भीक मिळत नसेल तर वैद्यकी शिकल्यावर थोडा तरी पैसा मिळेल.त्याकाळी वैद्याला विशेष पैसा मिळत नसे.रोग विशेष नव्हते.एकूण प्रकृती चांगल्या होत्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्याकडे जाण्याची प्रवृत्ती नव्हती.घरच्या घरी आजीबाईचा बटवा उपचार करीत असे.

हल्ली इंजिनीअरच्या बाबतीत "न मिळे भीक तर इंजिनिअरिंग शीक" अशी नवीन म्हण तयार करायला हरकत नाही.अर्थात कोणत्याही क्षेत्रात जे अव्वल असतात त्यांना मागणी नेहमीच असते.इंजिनीअरचे तसेच आहे.मी पहिल्या कांही क्रमांकात  जरी आलो नसलो तरी प्रथमश्रेणीत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झालो होतो.

शेवटी मनासारखी नोकरी मिळाली आणि मी अनंतनगर येथे येऊन नोकरीवर रुजू झालो.तूर्त मी ऑफिसमध्ये काम करणार होतो.कदाचित महिन्यातून कांही दिवस मला जिथे प्रत्यक्ष प्रकल्प चालू होता तिथे जावे लागणार होते.    आता राहण्याच्या जागेचा प्रश्न होता.हॉटेलमध्ये खर्च जास्त येतोच परंतु मला तिथले वातावरण आवडत नाही.गावात कुणीही नातेवाईक नसल्यामुळे सुरुवातीला मी एका हॉटेलात उतरलो.अर्थात नातेवाईक असते तरीही हॉटेलातच उतरलो असतो.एखाद्या नातेवाईकाकडे जावून त्याला व स्वत:ला अडचणीत टाकणे मला आवडत नाही.नातेवाईकांकडे पाहुणा म्हणून जाणे वेगळे आणि अशा कारणाने जाणे वेगळे.प्रत्येकाची रोजची एक जीवन पध्दती (रूटीन) ठरलेली असते.कुणीही पाहुणा म्हणून आल्यानंतर त्या रोजच्या कार्यक्रमात (रुटीनमध्ये) अडथळे निर्माण होतात.म्हणूनच कदाचित पूर्वीची आणखी एक म्हण तयार झाली असावी."पहिल्या दिवशी पाहुणा, दुसर्‍या  दिवशी पै, तिसऱ्या दिवशी राहील त्याची अक्कल जाईल."नोकरीच्या ठिकाणी रुजू झाल्यावर अर्थातच तुम्ही कुठे राहता इत्यादी गप्पा होतातच त्या वेळी मी सर्वांना मला एखादी छोटीशी जागा भाडय़ाने मिळाली तर पाहिजे आहे म्हणून सांगून ठेवले होते.सर्वांनी मला जागा केवढी पाहिजे म्हणून विचारले.माझे लग्न झाले आहे का? म्हणूनही चौकशी केली.माझे लग्न झालेले नाही मला एखादी छोटीशी परंतु इंडिपेंडंट स्वतंत्र खोली पाहिजे.खोलीला टॉयलेट बाथरूम संलग्न पाहिजे.अशी माझी छोट्याशा जागेची, मला हव्या असलेल्या अपेक्षित जागेची, सर्वसाधारण  कल्पना सांगितली.  

दोन दिवसांनी ऑफिसातल्या एका सहकाऱ्याने मला एका जागेची माहिती दिली.त्याने थोडक्यात जागेचे वर्णन केले.एका फ्लॅटमध्ये तीन बेडरूम्स आहेत.प्रत्येक बेडरुमला अटॅच्ड टाॅयलेट बाथरूम आहे.त्यातील एका बेडरूमला दोन दरवाजे आहेत.एक संपूर्ण फ्लॅटला जोडतो.दुसरा गॅलरीत उघडतो.फ्लॅट मालकांची मुले परगावी राहतात.येथे फक्त काका काकू असतात.त्यांना सोबतही होईल आणि उत्पन्नही मिळेल.जाऊन प्रयत्न करायला हरकत नाही.तुमचे दैव चांगले असेल तर जागा मिळेल.काका काकू जास्त चिकित्सक आहेत.एवढे वर्णन करून त्याने मला त्या जागेचा पत्ता दिला.

दोन दिवसानी रविवार आला.त्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी करंबेळकर काकांकडे गेलो.बिल्डिंगच्या तळमजल्याला फ्लॅट नंबर व मालक यांच्या पाट्या  लावलेल्या होत्या.फ्लॅट नं दोन शे तीन कमलाकर करंबेळकर अशी पाटी होती.मी लिफ्टने दुसर्‍या  मजल्यावर तीन नंबरच्या फ्लॅटसमोर गेलो आणि दरवाजावरील घंटी वाजवली. 

एका साधारण पासष्ठ वर्षांच्या गृहस्थानी दरवाजा उघडला.हेच ते काका करंबळेकर.त्यांनी माझी माझ्या आईवडिलांची कसून चौकशी केली.नाव गाव शिक्षण नोकरी नातेवाईक इत्यादीबद्दल त्यांनी चौकशी केली.तेवढ्यात काकू आतून आल्या.त्या चहा घेऊनच आल्या होत्या.काका जरा कडक स्वभावाचे वाटले होते.काकू त्या मानाने गरीब वाटल्या. 

मी काकांच्या पसंतीला उतरलो.त्यांनी मला जागा दाखविली.सहकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे खोली होती.खोली कॉट,गादी, टेबल खुर्ची इत्यादीनी सुसज्ज होती.मला कांहीही सामान विकत घेण्याची गरज नव्हती.त्यांच्याकडे केव्हापासून राहायला येऊ असे मी विचारले.अगदी आजपासून आलेत तरी चालेल असे त्यानी सांगितले.  

हॉटेलमधून त्या दिवशीच काकांच्या जागेत राहायला आलो.लिफ्टमधून बोळीत (पॅसेज)आल्यावर दोन दरवाजे होते.  एक काकांचा होता.दुसरा मला दिलेल्या खोलीचा होता.माझ्या खोलीचा एक दरवाजा काकांच्या फ्लॅटला जोडलेला होता.

मी काकांकडे राह्यला येवून सुमारे एक आठवडा झाला होता.नेहमीप्रमाणे मी ऑफिसातून घरी आलो.खोलीत हिंडताना कां कोण जाणे खोलीत कुणीतरी येवूत गेले आहे असा भास होत होता.मी खोलीत सर्वत्र फिरून निरीक्षण केले.सर्व वस्तू जागच्या जागी होत्या. मी मोठा व्यवस्थित आहे असे नाही.माझ्या अव्यवस्थितपणातही एक व्यवस्था असते.अर्थात वस्तूंची फिरवाफिरव झाली नसेलच असे सांगता येत नाही. कां कोण जाणे  माझ्या खोलीत कुणीतरी येऊन गेले एवढेच नव्हे तर अजूनही कुणीतरी आहे असा भास मला होत होता. त्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारा आला.

माझ्या खोलीत खरेच कुणीतरी येऊन गेले तर ते बाहेरच्या दरवाज्याने आत आले किंवा काकांकडून असलेल्या दरवाजातून आत आले असावे.बाहेरच्या दरवाजाला सेल्फ  लॉक होते.मी नुसता दरवाजा ओढून घेऊन जात असे.बाहेरून कडी कुलपाची सोय होती.मी बाहेरच्या दरवाज्याला कडी कुलूप लावायचे ठरविले.त्याचप्रमाणे काकांकडील दरवाजालाही कुलूप लावून बंदोबस्त केला.आता माझ्या खोलीत कुणालाही येणे कठीण होते.चार दिवस कांहीही झाले नाही.पांचव्या दिवशी कुणीतरी मी अव्यवस्थित टाकलेल्या पांघरुणाची घडी करून ती पायथ्याशी ठेवलेली आढळली.

मग मी मुद्दामच अव्यवस्थित राहायचे ठरवले.एक दिवस मी माझे चपला बूट वाटेल तसे ठेवले.संध्याकाळी आलो तेव्हां चपला बूट व्यवस्थित रॅकमध्ये ठेवलेले होते.एके दिवशी मी दरवाजा उघडून आत आलो तोच टॉयलेटच्या फ्लशचा आवाज आला.मी लगेच बाथरुममध्ये पाहण्यासाठी गेलो.न्हाणीघरात जावून पाण्याची टाकी पाहिली.टाकी पाण्याने भरत होती.याचाच अर्थ मी फ्लशचा आवाज ऐकला तो बरोबर होता.मी खोलीत सर्वत्र पाहिले.कुठेही कुणीही नव्हते.तरीही मी कॉटखाली, सोफ्यामागे,डोकावून पाहिले.खोली व न्हाणीघर रिकामे होते.

आता मात्र मला खोलीत राहायची भीती वाटू लागली.कुठे जरा खुट्ट  झाले की कुणीतरी खोलीत फिरत आहे असे वाटे.एकदा झोपल्यावर रात्री मी सहसा बाथरूमला जात नाही.त्या दिवशी रात्री नीट झोप न लागल्यामुळे जाग आली व बाथरूमला गेलो.टॉयलेट सीटवर बसल्यावर मला ती गरम वाटली.कुणीतरी माझ्या अगोदर तेथे येऊन गेले असावे असे वाटत होते.खोलीत तर कुणीच नव्हते हा निखालस भुताटकीचा प्रकार होता.कि मला भास होत होते.मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात.मीच बूट चपला व्यवस्थित लावून ठेवले असतील.आणि विसरून गेलो असेन.त्या अव्यवस्थित करून ठेवल्या असे मला वाटत होते.आणि मी उगीचच तर घाबरलो नव्हतो?

फ्लशच्या आवाजाचेही तसेच आहे.जर बॉल कॉक काम करीत नसेल तर पाणी भरतच राहते आत येण्याचे थांबत नाही.व भरल्यानंतर आपोआप फ्लश होते.बहुधा याला सायफन पध्दती म्हणतात.त्या दिवशी कांही कारणाने बॉल कॉक काम करत नव्हता आणि फ्लशचा आवाज आला असे कशावरून नसेल?मी उगीचच घाबरत असेन? माझ्या मनात नुसता गोंधळ उडाला होता. 

मी एकदा सर्व खिडक्या व्यवस्थित पाहिल्या.त्यांना लोखंडी ग्रील होते.शिवाय शटर्स होते.त्यातून कुणीही मनुष्य आंत येणे शक्य नव्हते.काकांच्या बाजूचा दरवाजा मी पाहिला.त्याला माझ्या बाजूने साधी कडी व बोल्ट होता.मी कडी व बोल्ट पक्का लावला होता.कुलूपही लावले होते. दरवाजा उघडला गेलाच तर कळावे म्हणून त्याला तीन चिकटपट्ट्या मारल्या.जाणीवपूर्वक पांघरुणाची घडी केली नाही. चादर अव्यवस्थित ठेवली.चपला बूट रॅकमधून काढून ठेवले.काळजीपूर्वक बाहेरचा दरवाजा बंद करून कुलुप लावून ऑफिसला गेलो.ऑफिसात काम करण्यात लक्ष लागत नव्हते.खोलीत काय चालले असेल असा विचार मनात येत होता.सीसीटीव्ही आणावा आणि खोलीत खोलीचा सर्व भाग दिसेल अशाप्रकारे बसवावा.असा विचार केला.म्हणजे नक्की काय प्रकार आहे ते कळून येईल.आज काय अनुभव येतो तो पाहावा.आणि उद्या सीसीटीव्ही आणून बसवावा असा विचार केला.

रात्री जेवण करून नऊ वाजता घरी आलो.भीत भीत दरवाजा उघडला.खोलीतील लाइट लागलेले होते.मी सकाळी बाहेर पडलो होतो.दिवे चालू ठेवण्याचे कांहीच कारण नव्हते. हे दिवे कुणीतरी मुद्दामहून चालू केले होते. अर्थात एक स्पष्टीकरण देण्यासारखे होते.वीज गेली असावी.चेक करण्यासाठी मी लाइट ऑन केले असावेत.नंतर बंद करायचे विसरून गेलो.मी गेल्यावर केव्हातरी लाइट आले.त्यामुळे सर्व दिवे लावलेले होते.चपला बूट व्यवस्थित रॅकवर लावलेल्या होत्या.त्यांतही बूट वरच्या कप्प्यात,चपला खालच्या कप्प्यात, घरात घालायची चप्पल त्याच्या खालच्या कप्प्यात, अशी व्यवस्थित ठेवली होती.पांघरुणाची घडी केलेली होती.गादीवरील बेडशीटही ताणून घट्ट व्यवस्थित बसवला होता.त्यावर एकही सुरकती नव्हती.माझ्या खोलीत निश्चितपणे अदृश्य स्वरुपात कुणीतरी वावरत होते.   

त्या दिवशी रात्री खोलीत झोपण्याची मला भीती वाटू लागली.मी मित्राकडे झोपायला गेलो.

आज इकडे कां म्हणून त्याने विचारले.मनात नव्हते तरी त्याला सर्व हकिगत सांगावी लागली.

*तो मला म्हणाला,तू मुलखाचा विसरभोळा आहेस.तूच सर्व कांही व्यवस्थित केले असशील.*

*विचारांच्या तंद्रीत असल्यामुळे, तणावाखाली असल्यामुळे, तू ते सर्व विसरलास.*

*तू उगीचच मनाने अनेक इमले रचत आहेस.मी मित्राला सीसीटीव्हीची कल्पना सांगितली.*

*त्याला ती एकदम पसंत पडली.दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये रजा टाकली.*

* चांगल्यापैकी सीसीटीव्ही विकत घेतला.मी व मित्र घरी आलो.*

*त्याच्या साहाय्याने खोलीत सीसीटीव्ही व्यवस्थित बसविला.त्या दिवशी माझा मित्र माझ्या सोबतीला माझ्याकडे झोपला.*

*रात्री कांहीही प्रकार घडला नाही.दुसऱ्या दिवशी मी ऑफीसला नेहमीप्रमाणे गेलो.*

*जाताना अर्थातच सर्व कांही इधर उधर करून गेलो होतो.मी काय केले ते पाहायला आज मित्र होता.माझा एक साक्षीदार होता*

*संध्याकाळी खरे काय ते कळणार होते.अजून या बाबतीत मी करंबळेकर काकांकडे कांहीही बोललो नव्हतो.*

*संध्याकाळी मी व मित्र घरी आलो.दबकत दबकत हळूच खोलीचे कुलूप काढून दरवाजा उघडला.*

(क्रमशः)

२७/२/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel