( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी मुक्तपणे आकाशातून विहरत जात होतो.किती युगानी कुणाला माहीत मी मुक्त झालो होतो.मुक्तपणे विहरत असताना माझा आनंद गगनात मावत नव्हता.आकाशात काळे ढग दाटून आले होते.थोड्याच वेळात पावसाला सुरवात होईल असे वाटत होते.ढगांची दाटी, ढगांचा काळा गडद रंग आणि पडलेला वारा पाहून पाऊस धुवाँधार कोसळेल असे वाटत होते.या अरण्यात अगोदरच गारठा खूप होता.पाऊस सुरू झाल्यावर तो आणखी वाढला असता.त्यात वारा सुरू झाला असता तर हुडहुडी भरली असती.मी कुठेतरी पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधत होतो.तेवढ्यात मला एक छोटी कोठी दिसली.बंगलीला बाहेरून विटांचे पक्के बांधकाम केले होते.आतून लाकडाचे आवरण दिलेले होते.हे मला बाहेरून कसे कळले ते विचारु नका.मला आंतील व बाहेरील सर्व कांही स्वच्छ दिसत होते.माझ्या शक्ती अद्भुत होत्या.  कोठीतील हवा समशीतोष्ण राहावी. जास्त गार पडू नये किंवा जास्त उष्मा होऊ नये यासाठी ही व्यवस्था असावी.मला कोठीमध्ये प्रवेश हवा होता.दरवाजासमोर मी उभा होतो.दरवाजावर थाप मारावी म्हणजे कुणीतरी दरवाजा उघडील आणि आपल्याला आंत जाता येईल म्हणून मी दरवाजावर थाप मारली.एका म्हाताऱ्याने दरवाजा उघडला.त्याने इकडे तिकडे पाहिले आणि दरवाजा पुन्हा बंद करून घेतला.तेवढ्यात मी आंत शिरलो होतो.मी आंत आल्याचे म्हाताऱ्याच्या लक्षातच आले नव्हते.आता मला थंडी वारा पाऊस कशापासूनही भीती नव्हती.मी वादळ वारा पाऊस याला घाबरत होतो असे नव्हे परंतु उगीचच भिजणे मला आवडत नसे.मला  म्हातार्‍यापासून तर भीती नव्हतीच. म्हातारा तसा काटक वाटत होता.तो आरामखुर्चीत बसला होता.त्याच्या शेजारीच एक बंदूक ठेवलेली होती.ती भरलेली होती.आंतील गोळी मला स्वच्छ दिसत होती. या जंगलात केव्हां कोण हल्ला करील सांगता येत नाही. तेव्हां प्रत्येकाने तयारीतच असलेले चांगले.मला अर्थातच त्यापासून भीती नव्हती.    

आता बाहेर पावसाला सुरवात झाली होती.वाराही वाहू लागला होता.विजा चमकू लागल्या होत्या.मला मोकळे राहणे त्रासदायक वाटत होते.कुणाच्या तरी आंत आपण राहावे असा माझा मनसुबा होता.या अगोदर कांही तासांपूर्वी मी बाटलीत बंद होतो.एका कुटुंबाला मी खूप त्रास देत होतो.माझ्यामुळे त्यांच्या घरातील शांतता भंग झाली होती.एकमेकांशी प्रेमाने वागत असलेले भाऊ आणि जावा आपापसात भांडू लागल्या होत्या.मी कधी या भावात, तर कधी त्या भावात, तर कधी या बाईत, तर कधी त्या बाईत, आसरा घेत असे.कधी सासूत तर कधी सासर्‍यात राहात असे.गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या एका आदर्श कुटूंबात एकाएकी कलह कसा होऊ लागला याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते.त्यांनी याबाबत योग्य ठिकाणी एका मांत्रिकाकडे  चौकशी केली.त्या मांत्रिकाला मी या सर्वांचे मूळ कारण आहे हे लक्षात आले.त्याने लगेच माझा बंदोबस्त करण्याचे ठरविले.मंतरलेले तांदुळ चारही दिशांनी फेकल्यानंतर मला त्याच्यासमोरच्या वर्तुळात येण्याशिवाय गत्यंतर नव्हते.तो महान मांत्रिक होता.अन्यथा मला पकडणे हे कांही येरागबाळ्याचे काम नव्हते.त्याने मला एका तांब्याच्या बाटलीमध्ये बंद केले.वर सीलही केले.तांब्याची बाटली घेण्याचे कारण ती सामान्यतः अभेद्य आहे.काचेची बाटली कांही कारणाने फुटली असती तर मी मोकळा झालो असतो.मी मोकळा होऊ नये लोकांना त्रास देऊ नये अशी त्या महामांत्रिकाची इच्छा होती. त्याने चांगला वीस फूट खोल खड्डा खणून त्यात मला पुरले होते.अंधाऱ्या जागी मी किती काळ होतो मलाच माहीत नव्हते.असाच कितीतरी काळ गेला होता.सूर्यप्रकाश दिसत नसल्यामुळे  किती वर्षे गेली मला सांगता येणार नाही.आता मी कधीच मुक्त होणार नाही असे मला वाटू लागले होते.

माझे नशीब चांगले होते.उत्खनन करण्यासाठी संशोधकांची एक टोळी जंगलात आली होती. इथे अश्मयुगीन वस्तू मिळतील असे खात्रीलायकरीत्या त्यांना कुठुनतरी समजले होते.

खणता खणता त्यांना मी असलेली बाटली सापडली.बाटली तांब्याची आणि सीलबंद होती.त्या संशोधकांना बाटलीत एखादा महत्त्वाचा दस्तऐवज असावा असे वाटले.त्यांनी  सील उघडले.बाटली रिकामी होती असे त्यांना वाटले.मी बाटलीत होतो परंतु त्यांना मी दिसणे शक्य नव्हते.त्यासाठी मांत्रिक आवश्यक होता.तोच मला पाहू शकत होता.सील निघताच मी चटकन बाहेर आलो.त्यांना एकदा त्रास देण्याचे माझ्या मनात आले.त्यांची थोडी गंमत करावी असे मला वाटले.परंतु त्यांच्यामुळे मी मुक्त झालो होतो.आपल्या उपकारकर्त्याला त्रास देणे योग्य नाही.असे माझ्या मनात आले.  

थोडावेळ तिथे घुटमळून मी आकाशात झेप घेतली.आकाशात विहरत विहरत या कोठीजवळ आलो.कोठीत कसा प्रवेश केला तुम्हाला माहीत आहेच.मला स्वतंत्र मोकळे राहणे आवडत नव्हते.कुणाच्यातरी आधाराने राहाणे बरे असते.तूर्त म्हाताऱ्याचा आधार घ्यावा त्याच्यामार्फत आणखी कुणाचा तरी आधार घेता येईल असे माझ्या मनात आले.मी अलगद म्हातार्‍यात शिरलो.

बाहेत पाऊस द्रुतलयीत पडत होता.विजा चमकत होत्या.चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात मला लांबवर पाच सहाजण येताना दिसले.ते आसरा शोधत होते.त्यांना कोठी दिसली. कोठडीतील प्रकाश त्यांना काचेच्या   खिडकीतून दिसला असला पाहिजे.खिडकीत तयार झालेल्या बोगद्याला बाहेरच्या बाजूने व आंतल्या बाजूने अशी दोन काचेची तावदाने होती.अर्थात संरक्षण म्हणून दोन्ही बाजूला लोखंडी जाळी बसवली होती.त्या सहा जणांमध्ये दोन मुली होत्या तर चार मुलगे होते.कोठी दिसताच त्यांना अपरिमित हर्ष झाला.झपाट्याने चालत ते कोठीच्या दिशेने येऊ लागले.ते जवळ आल्यावर आणि आंत आल्यावर मजा येणार होती.मी कोण आहे,मी येथे आहे आणि म्हातार्‍यात विसावलो आहे हे त्यांना माहीत असते तर इकडे येण्याचा विचार त्यांनी सोडून दिला असता. परंतु जे व्हायचे आहे ते टळत नाही ते असे.अदृष्टात असते ते होतेच.

पाऊस जोरात पडत होता.हां हां म्हणता ते सहाजण कोठी जवळ आले.दरवाजा बंद असला, भिंती असल्या, तरी पलीकडे काय चालले आहे ते मला दिसत होते.दोन मुलींपैकी एकीचे नाव मधुरा व दुसरीचे माधुरी होते.त्या मुलांनी मुलींना तुम्ही हाक मारा तुम्ही पुढे व्हा म्हणजे आपल्याला चटकन अांत घेतील.त्यांचा आपल्यावर विश्वास बसेल.मधुरा व माधुरी पुढे झाल्या आणि त्यांनी दरवाजा ठोठावला.जोराजोरात हांका मारण्यास सुरुवात केली.आंत जे कोणी असतील त्यांनी कृपया दरवाजा उघडावा आम्ही वादळात सापडलो आहोत.संकटात आहोत. असे त्या ओरडत होत्या.

मी हळू हळू चालत दरवाजाजवळ गेलो.म्हाताऱ्यात मी असल्यामुळे तडफेने म्हातारा तिथे जाऊ शकत होता.परंतु मला वृद्धपणाचे बेअरिंग राखायचे होते.मी दरवाजा उघडला.त्या दोन मुलींमधील माधुरी मला आवडली.मी त्या सर्वांचे स्वागत करत त्याना आत घेतले.आता आम्ही एकूण आठ होतो.सहा पाहुणे एक म्हातारा आणि मी. 

जयंत व माधुरी ही दोघे प्रेमात होती.दोघांच्याही आईवडिलांना ही गोष्ट माहीत होती.लवकरच दोघेही विवाहबद्ध होणार होती.भास्कर,रमाकांत,जयंत हे चांगले मित्र होते.विश्राम त्यांच्या गटातील नव्हता.तो त्याच्या मित्रांबरोबर अरण्यात आला होता.फिरता फिरता त्याची त्याच्या मित्रांशी चुकामूक झाली.एकटा फिरत असताना त्याची यांच्याशी भेट झाली.त्यांच्या आधाराने आपण आपल्या मित्रांना भेटू किंवा निदान अरण्यातून सुखरूप बाहेर पडू या आशेने तो यांच्याबरोबर आला होता. 

मला गोष्टी सुरळीत छानपैकी चाललेल्या आवडत नाहीत.हाणामारी खूनखराबा आवडतो.केवळ गंमत म्हणून रक्तपात झालेला आवडतो.तुम्हाला आठवत असेल एका कुटुंबात मी कलह माजवला आणि म्हणूनच मला तांब्याच्या बाटलीत बंद करून खोलवर पुरण्यात आले.

एवढी कठोर शिक्षा होऊनही मी सुधारलो नव्हतो.मी जयंतच्या शरीरात शिरलो.आता *जयंत जयंत नव्हता.**तो मी होतो.*मी विश्रामशी भांडण उकरून काढले.तो माधुरीच्या पुढेपुढे जास्त करतो.त्याचा तिच्यावर डोळा आहे.जर संधी मिळाली तर माधुरीचा विरोध असूनही, संमती नसूनही, तो तिच्यावर अत्याचार करायला मागेपुढे पाहणार नाही.

माझे हे बोलणे ऐकून विश्राम भडकला.माझ्यावर उगीचच्या उगीच आरोप करू नका.मी तुम्हाला ओळखतही नाही.मी जंगलात हरवलो म्हणून तुमच्याबरोबर आलो.उद्या उजाडताच तुमच्याबरोबर किंवा एकटा मी निघून जाईन.

मला माझ्यावर निष्कारण आरोप केलेले आवडत नाहीत.असे तो सांगू लागला.मी कांहीही ऐकून घ्यायला तयार नव्हतो.जयंतच्या मनाचा पूर्णपणे मी कब्जा घेतला होता.माझे ते वैशिष्ट्य होते.ज्याच्या शरीरात मी शिरत असे त्याच्या मनाचा कब्जा मी  प्रथम घेत असे.त्यामुळे ज्याचा कब्जा घेतला तो, 'तो' राहात नसे. तो "मी" होत असे.आता जयंत, जयंत नव्हता.हां हां म्हणता दोघांचेही माझे व विश्रामचे अकस्मात मी मी तू तू सुरू झाले.

*मी सुरा काढला आणि विश्रामच्या छातीत खुपसला.विश्राम दोन आचके देऊन तिथेच खलास झाला.*

*भास्कर व रमाकांत आ वासून हे पहात होते.अकस्मात असे कांही होईल याची त्यांना कल्पना नव्हती.*

*सर्व माझ्याकडे अवाक् होऊन पाहत होते.माझ्या हातात रक्ताने भरलेला सुरा होता.*

*कुणीही कांकणभरही कांही बोलत नव्हता.एखाद दुसरा कमी जास्त शब्द आणि मी लगेच त्याला ढेर करीन याची त्यांना खात्री पटली होती.*

*भास्कर व रमाकांत याना जयंत असा नाही हे पूर्णपणे माहीत होते.*

*डोके फिरल्यासारखे अकस्मात तो असा काय करतो असे त्याना वाटत होते.*

*जयंतचे डोके बिके फिरले नव्हते.तो जयंत नव्हताच.तो मी होतो.*        

(क्रमशः)

३/२/२०२२©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel