( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

लहानपणी मला एक स्वप्न पडत असे.मी एखाद्या रस्त्यावर उभी अाहे .रस्ते विविध प्रकारचे असत.कधी कुरणामधून गेलेली साधी पायवाट असे,कधी गाडी रस्ता असे, कधी मोटारीचा  हमरस्ताअसे,कधी किल्ल्यावरील एखादी पायवाट असे ,रस्ता कोणत्याही प्रकारचा असे. तर अशा एखाद्या रस्त्यावर मी उभी असे.अगोदर घोडय़ाच्या टापांचे आवाज ऐकू येत.नंतर क्षितिजावर घोडा दिसू लागे.घोडा दौडत माझ्याकडे येत असे.हळूहळू घोड्यावरील स्वार दिसू लागे.घोड्यावर एक तरणाबांड राजकुमार बसलेला असे.तो घोडा दौडत असतानाच मला उचलून त्याच्या पुढ्यात घेई .आणि इथेच माझे स्वप्न संपत असे .

मध्यंतरी स्वप्न पडण्याचे बंद झाले होते.गेली दोन तीन वर्षे मला तेच स्वप्न पुन्हा पडू लागले आहे .आज मी अठ्ठावीस वर्षाची आहे . आईच्या म्हणण्याप्रमाणे ती माझ्या वयाची होती तेव्हा मी आठ वर्षांची होते. एमबीए केल्यावर मला चांगली नोकरीही आहे.मला पन्नास हजार रुपये पगार मिळतो.आई वडिलांची मी एकुलती एक लाडकी मुलगी आहे . आमची घरची स्थितीही उच्च मध्यमवर्गीयांमध्ये मोडण्यासारखी आहे.   

कॉलेजमध्ये असताना व आताही माझे मित्र वर्तुळ दांडगे आहे. सर्वांना असे वाटत होते की मी या माझ्या मित्रांपैकी एखाद्या मित्राशी लग्न करून मोकळी होईन.परंतु मित्र मित्रच राहिले त्यांच्यामध्ये मला विवाहयोग्य असा कुणीही आढळला नाही . ज्याला इंग्लिशमध्ये मॅरेज मटेरियल म्हणतात असा कुणी आढळला नाही.माझ्या स्वप्नाच्या भाषेत सांगायचे झाले तर मला माझा स्वप्नातील राजकुमार भेटला नाही.माझे आई वडील व मी यांच्यामध्ये मित्रासारखे संबंध आहेत.मी त्यांच्याजवळ एकदा स्वप्नातील राजकुमाराबद्दल बोलले होते .एकदा माझी आई तो संदर्भ देऊन म्हणाली,तो तुझ्या स्वप्नातील राजकुमार स्वप्नातच राहील आणि तू  आहे अशीच राहशील .ती पुढे म्हणाली , स्वप्नातील राजकुमार तुझ्याकडे आपणहून दौडत येईल याची वाट पाहण्यापेक्षा आपणच त्याचा शोध  घेतला तर काय हरकत आहे  .आपण त्याला आपल्याकडे दौडत येण्यासाठी रस्ता करून देऊ.तिच्या आग्रहाखातर मी तिला संमती दर्शवली. स्वप्नातील राजकुमाराचा शोध तिने विस्तारीत केला.तुझ्या मित्रांमध्ये तुला नकळत तुझा शोध चालला असेलच.म्हणजेच एखादा राजकुमार त्याची राजकुमारी शोधत असेल. तुझ्या नोकरीच्या ठिकाणी अनेक तरुण काम करीत असतील .त्यात एखादे दिवशी तुला तुझा राजकुमार सापडेल . या शोधामध्ये भर म्हणून हल्ली अनेक पालक व मुली जो मार्ग चोखाळतात तो चोखाळायला काय हरकत आहे ?लग्न जुळवण्यामध्ये  अनेक मध्यस्थ पूर्वी असत त्यामध्ये आता डिजिटल(अंकात्मक) माध्यमांची भर पडली आहे.विवाह संकेतस्थळावर तुझे नांव नोंदवायला काय हरकत आहे ?तू तुझ्या राजकुमाराबद्दलच्या कल्पना लिहून काढ.आपण तुझ्या अपेक्षा म्हणून त्या देऊ .एखादा योग्य राजकुमार तुला मिळून जाईल.विवाह संकेतस्थळावर मुलगेही त्यांची माहिती अपलोड करीत असतात.त्यांचाही राजकुमारीचा शोध चाललेलाच असतो.  

हा मार्ग मला काही फारसा रुचत नव्हता .तो यशस्वी होईल असेही मला वाटत नव्हते .राजकुमार येण्यासाठी आपल्याला काहीही करण्याची गरज नाही असे माझे मत होते.राजकुमार शोधत येईल असा माझा विश्वास होता. परंतु लग्न कर, लग्न कर, म्हणून सतत होणारा आईचा ससेमिरा टाळण्यासाठी मी तिला होकार दिला.माझी आई उत्साहाने कामाला लागली.या मार्गाने आपल्या मुलीचे लग्न जुळणार  याची तिला खात्री होती.आता मला माझ्या अपेक्षा लिहून द्यायच्या होत्या .काय लिहावे म्हणून मी विचारात पडले होते .शेवटी मी एक ओळ तिला लिहून दिली.~माझे स्वातंत्र्य जपणारा, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखणारा,असा राजकुमार मला पाहिजे.~

माझ्या आईचे समाधान एवढ्याने होत नव्हते.माझ्या अपेक्षा सविस्तर लिहून  द्याव्यात अशी तिची इच्छा होती.मी तिला सांगितले माझ्या राजकुमाराला एवढ्यावरच सर्व काही कळले पाहिजे तरच तो माझा राजकुमार आहे.मी ऐकणार  नाही असे पाहिल्यावर आई माझ्या विशेष नादी लागली नाही.अनेक ठिकाणी तिने माझे नाव नोंदविले.त्याठिकाणी तिने त्यांचा स्टँडर्ड(मानक/आदर्श तक्ता) फॉर्म भरून दिला.फॉर्ममध्ये अर्थातच माझी सर्व वैयक्तिक माहिती होती.उंची, वजन, रंग, शिक्षण, नोकरी, आर्थिक परिस्थिती, भावंडे, नातेवाईक, आई वडील,आवडी निवडी, इत्यादी सर्व माहिती दिलेली होती.त्यांच्या पद्धतीप्रमाणे दोन तीन फोटोही दिलेले होते. तिने तिच्या मैत्रिणीना व कांही  विवाह जुळविणार्‍या मध्यस्थानाही सांगून ठेवले होते .या वर्षी माझे लग्न झालेच पाहिजे यावर आई ठाम होती.तिने तिच्या बाजूने चंग बांधला होता,कंबर कसली होती असे म्हणूया.हळूहळू अनेक मुलांचा माझ्यावर पाऊस पडू लागला.मी रोज ऑफिसातून आल्यावर आई मला प्रत्यक्ष आलेले फोटो किंवा साइट्सवर आलेले फोटो दाखवू लागली.ती चविष्टपणे त्यांची माहिती मला सांगत असे.ती तिच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यातून काही फोटो निवडीत असे आणि मला ते दाखवीत दाखवीत असे.

मी फोटो पाहून ते धडधड नापास करीत होते.केवळ नापास करायचे म्हणून नापास करीत नव्हते तर माझ्या कल्पनेत बसणारा कोणताही मुलगा त्याच्यात नव्हता.

आईचा विचार मुलांना घरी बोलवावे आणि मला त्यांना दाखवावे असा होता. निदान काही मुलांना मी बाहेर भेटावे असे तिला वाटत होते . मी त्याला कडाडून विरोध केला.मी आईला स्पष्टपणे सांगितले, माझ्या अपेक्षांशी जुळणारा जर असेल तरच मग त्याबद्दल विचार करता येईल. अजून मला माझ्या अपेक्षांशी जुळणारा असा मुलगा भेटतच नाही त्याला मी काय करू? माझे बाबा माझ्या बाजूने होते.ते म्हणत घाई काय आहे?योग्य वेळ येताच तिचे लग्न ठरेल.त्यावर आई म्हणाली आपण हात जोडून स्वस्थ बसून रहायचे आहे का?आपण काही हातपाय हलवले पाहिजे की नको?आपली म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?त्यावर बाबा तिला कर तुला काय हवे ते असे म्हणून स्वस्थ बसत असत.बाबांचा पडोसन सिनेमा  आवडता होता.त्यातील एक प्रसिद्ध संवाद ते म्हणत असत."जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है"    त्यावर नेहमीप्रमाणे आई आपल्या मानेला एक हिसडा मारून आपल्या कामाला लागत असे.        

संकेतस्थळावर केवळ फोटोच नसत तर अनेक प्रश्नही विचारलेले असत. एकेका मुलाच्या प्रश्नांनी व त्यांच्या अपेक्षांनी माझे तर डोकेच फिरून गेले होते.मी तुम्हाला एक दोन प्रश्न व त्यांच्या अपेक्षा सांगते म्हणजे माझी मन:स्थिती कशी झाली असेल ते तुमच्या लक्षात येईल.

एका मुलाने तर  गणितच घातले होते.तो म्हणाला तुम्ही जी नोकरी करता तिथे तुम्हाला महिन्याला एक लाख रुपये सहज मिळत असतील(मला फक्त पन्नास हजार रुपये मिळत होते.आईने माझे उत्पन्न फुगवून लिहिले होते की चुकीने उत्पन्न एक लाख रुपये लिहिले गेले होते कुणास ठाऊक  ) म्हणजे वर्षाचे बारा लाख झाले. तुम्ही पाच वर्षे नोकरी करता म्हणजे एकूण तुम्ही साठ लाख रुपये मिळवले .समजा त्यातील तुम्ही एकतृतीयांश म्हणजे वीस लाख रुपये स्वतःवर खर्च केले तरी चाळीस लाख रुपये शिल्लक राहिले पाहिजेत.तुम्ही आपल्या आई वडिलांजवळ राहता म्हणजे त्यासाठी तुम्हाला खर्च येत नाही.पुढे त्याने विचारले तुमची बँकेत शिल्लक किती आहे?म्हणजे हा मुलगा माझ्या पैशावर उत्पन्नावर डोळा ठेवून होता.लग्नानंतर ही सर्व रक्कम मी घेऊन यावी आणि त्याचा विनियोग त्याला करु द्यावा अशी त्याची अपेक्षा दिसत होती.अर्थातच माझ्या पैशावर त्याचा डोळा होता.मी महिन्याला किती मिळविते त्यावर त्याचा डोळा होता. कदाचित मी उधळी आहे की काटकसरी आहे? मी माझ्या पैशाचा विनियोग योग्य करीत आहे की नाही ?तेही त्याला पाहायचे असावे.काही असले तरी त्याचा माझ्या पैशांवर डोळा आहे मी विवाहानंतर सर्व संचित पैसे घेऊन  त्याच्याकडे येणार आहे असा त्याचा समज असावा असा माझा ग्रह झाला होता.यातील एकही गोष्ट अर्थातच मला पसंत नव्हती.       

*एकाचा माझ्या पैशांवर डोळा होता तर दुसऱ्याची तिसरीच तऱ्हा होती‌.*

*मी नोकरी सोडून द्यावी आणि घरी स्वयंपाक पाणी करावे. तो येईल तेव्हा सदैव त्याच्या स्वागताला हजर असावे अशी त्याची अपेक्षा दिसत होती.*

*मी नोकरी करीन की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न होता.*   

*अर्थात विवाहानंतर निर्णयप्रक्रियेत पतीही सामील झाला असता यात शंका नाही परंतु त्याने अगोदरच मी काय करावे व काय करू नये हे सांगणे मला आवडण्यासारखे  नव्हते.*

*नंतरही त्याने केलेला हुकूम मला पटला नसता. आवडला नसता.अर्थातच मी त्या मुलाला ऑनलाईन नकार दिला.*

(क्रमशः)

२५/१०/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel