(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

इतिहासाची पुनरावृत्ती तिला करायची नव्हती .म्हणूनच ती सुबोधला, तो आग्रह करीत असतानाही घरी घेऊन कधी गेली नव्हती.

आईला अगोदर सांगून तिला पार्श्वभूमी तयार करायची होती.

आईशी बोलायला तिची जीभ रेटत नव्हती.

आज उद्या करता करता इतके महिने निघून गेले होते.

आज शेवटी ती सुबोधला घेऊन घरी निघाली होती.

तिला सुबोध जवळ आई संदर्भात झालेले बोलणे आठवत होते. सुबोधला घेऊन ती तिच्या घरी का जात नाही असे शेवटी स्पष्टपणे सुबोधने तिला विचारले होते .सुबोध तिला म्हणाला होता .आपण दोघांनी लग्न करायचे ठरविले आहे.आता आपल्या दोघांमध्ये गुपित असे काही असू नये . तुला संकोच करण्याचे कारण नाही .तू आईजवळ बोलली का म्हणून विचारल्यावर दरवेळी तू नाही असे म्हणतेस.मला घरी घेऊन चल असे अनेकदा सांगितल्यावरही तू आत्ता नको असे म्हणतेस. तुझ्या मनात नक्की काय आहे ?हे असेच चालले तर मी एक दिवस तुझ्या घरी तुला सांगितल्याशिवाय येऊन तुझ्या आईच्या पुढ्यात उभा राहीन.तिला तुझ्या व माझ्या बद्दल सर्व काही सांगेन.मग जे काही व्हायचे असेल ते होवो त्याला तोंड द्यायला मी तयार आहे .

सुबोध इतका अटीतटीवर आल्यावर तिने त्याच्याजवळ एक दिवस मागितला.आज मी आईजवळ सर्व काही सांगते आणि उद्या तुला घरी घेवून जाते, असे ती म्हणाली .त्या दिवशीही तिला आईजवळ काहीही बोलता आले नाही.ती बोलण्याचा धीर करी परंतु तिची जीभ रेटत नसे. आई काय म्हणेल ?आईला काय वाटेल? हे दोनच प्रश्न तिच्या भोवती गुंजारव करीत असत.आईला दुखवून तिला काहीही करायचे नव्हते.आईचे दुःख ती लहानपणापासून पाहात होती. आई तिचे सर्वस्व होती. ती आईची सर्वस्व होती .तिच्याशिवाय आईला कोणताही आधार नव्हता .सुबोधने तिला प्रपोज केल्यावर आणि तिने त्याला संमती दिल्यावरही तिने एक   अट घातली होती .~मला आईला दुखवून काहीही करायचे नाही. तिने संमती दिली तरच आपले लग्न  होईल.~

यानंतर तिने सुबोधला आई तिच्या तरुणपणात कोणकोणत्या खडतर प्रसंगातून गेली ते सविस्तर सांगितले होते .कश्या  बिकट परिस्थितीत तिने शामलीला मोठे केले तेही सांगितले होते .शामली तिच्या आईचा एकमेव आधार आहे हेही सांगितले होते. 

हे सर्व ऐकल्यावर सुबोध म्हणाला होता .मला तुला तुझ्या आईपासून हिरावून घ्यायचे नाही .तुमच्या कुटुंबात तुम्ही मला सामावून घ्यावे असेच मला वाटते.तुझी आई ज्या बिकट प्रसंगातून गेली त्यामुळे तिचे मत प्रेमविवाहाविरुद्ध आहे ते मी समजू शकतो .मला तुझ्या आईबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. मला माझे कुटुंब आहे .मीही माझ्या आईवडिलांचा आधार आहे.त्यांची आपल्या लग्नाला संमती आहे .तुझ्या आईची संमती अापण मिळवू . संमती मिळाली तरच आपण लग्न करू .आपल्या कुटुंबीयांना दुखवून केलेले लग्न आपल्याला सुख देणार नाही .तुझी आई दुःखी आहे हा सल सतत  आपणा दोघांना बोचत राहील .मला खात्री आहे की आपण तुझ्या आईची संमती मिळवूच .

सुबोध जवळ झालेले बोलणे आठवता आठवता तिला तिचे घर केव्हा आले ते कळलेच नाही.ती तिच्या ब्लॉकसमोर उभी होती .धीर करून तिने बेलवर हात ठेवला. 

आईने दरवाजा उघडला .कां ग इतका उशीर झाला असे ती म्हणाली.प्रथम तिचे लक्ष सुबोधकडे गेलेच नव्हते .तेवढ्यात तिने सुबोधला पाहिले . सुबोध शामली बरोबर आला आहे हेही तिच्या लक्षात आले .एक तरुण मुलगा आपल्या तरुण मुलीबरोबर घरी येतो यातून काय अर्थ काढायचा अश्या  संभ्रमात ती असावी.तिच्या चेहऱ्यावर अभ्रे दाटून आली होती .शामलीचा एखादा मित्र सहज तिच्याबरोबर घरी आला असेल इथपासून ,तो या दोघांची मैत्री फार पुराणी असावी आणि आपल्या जवळ काहीतरी मागण्यासाठी ही दोघे आली असावीत, इथपर्यंत सर्व शंका तिच्या मनात येऊन गेल्या.

तिने दोघांनाही आंत या म्हणून सांगितले . ती दोघांचाही चेहरा निरखत होती .त्यांच्या चेहऱ्यावरून काही अंदाज करता येतो का ते ती पाहत होती. तिने त्या दोघांपेक्षा कितीतरी अधिक पावसाळे पाहिलेले होते .शामली व तिचा आलेला मित्र केवळ मित्र नाही हे तिच्या लगेच लक्षात आले.दोघेही आपल्या जवळ काहीतरी बोलण्यासाठी सांगण्यासाठी उत्सुक आहेत हेही तिला जाणवले .

क्षणार्धात तिने आपला चेहरा नॉर्मल केला .सुबोधला सोफ्यावर बसायला सांगितले .मी चहा ठेवते असे म्हणून ती आत गेली .सुबोधला बस मी ही आलेच असे खुणावून शामली आईच्या पाठोपाठ  स्वयंपाकघरात गेली.तिने आईला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला .आईने तिला तू दमून आली असशील. फ्रेश हो.मी चहा घेऊन बाहेर येते.नंतरच आपण काय ते बोलू असे सुचविले .

शामलीला आईचा काहीच अंदाज येईना.आई सहज म्हणाली की आईला राग आला आहे हे तिला ओळखता येईना.ती तशीच बाहेर जावून सुबोध जवळ बोलत बसली . आई चहा घेऊन आली .

शामलीने हा सुबोध,कंपनीत आम्ही दोघे  एकत्र काम करतो.याला तुझी ओळख करून घ्यायची होती म्हणून तो आज माझ्याबरोबर आला आहे असे सांगितले .

सुबोधने बोलण्याला सुरुवात केली .काकू मी बोलतो म्हणून राग मानू नका . माझी व शामलीची ओळख गेली दोन वर्षे आहे.गेले वर्षभर आम्ही दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करीत आहोत.काम करता करता आमचे दोघांचे स्वभाव मिळते जुळते आहेत असे आमच्या लक्षात आले .आम्ही दोघे एकमेकांना आवडू केव्हा लागलो ते आमचे आम्हालाच कळले नाही .शामली ऑफिसात एक दिवस आली नाही तर मला बेचैन वाटू लागले . एक दिवस मी काही कारणाने ऑफिसात आलो नव्हतो .दुसऱ्या दिवशी तिलाही  तशीच बेचैनी वाटत होती असे आढळून आले. यालाच प्रेम म्हणतात असे मी तिला सांगितले. त्यावर ती छानपैकी लाजली.

मी तिला माझ्याबद्दल तुम्हाला सांगावे असे अनेकदा सुचविले .तिला तुमच्याजवळ बोलण्याचा धीर होत नाही .तुम्हाला काय वाटेल हा एकच प्रश्न तिच्यासमोर असतो . शेवटी आज मी तिच्याबरोबर तुमच्या घरी येण्याचे ठरविले .

आम्ही दोघे विवाह करू इच्छितो.हे तुमच्या लक्षात आले असेलच . शामलीचे तुमच्यावर विलक्षण प्रेम आहे .तुम्हाला दुखवून तुमच्या मनाविरुद्ध तिला काहीही करायचे नाही. तिला काहीही करता येणार नाही.ती तुमच्या मतांचा आदर करते.आईवडिलांना दुखवून आपण सुखी होणार नाही याबद्दल आम्हा दोघांचे एकमत आहे.

तुम्ही नाही म्हणालात तर आम्ही लग्न करणार नाही . 

आता निर्णय तुम्ही द्यायचा आहे .निर्णय घेण्यासाठी तुम्ही कितीही वेळ घ्या .

आम्ही कितीही काळ तुमच्या निर्णयासाठी थांबायला तयार आहोत .

निर्णय आम्हाला अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो आम्ही तो शिरसावंद्य मानू.

एवढे शांतपणे बोलून सुबोध बोलायचा थांबला .सुबोध बोलत असताना  शामलीची आई सुबोधच्या चेहऱ्याकडे निरखून पाहात होती .त्याचे शब्द खोलवरून आतून येत आहेत की वरवरचे आहेत याचा अंदाज ती घेत असावी.यावर काहीही न बोलता तिने बोलण्याचा रोख दुसरीकडे वळविला .सटरफटर गप्पा झाल्यावर शेवटी ती म्हणाली ."मला विचार करायला अवधी पाहिजे ."आठ दहा दिवसांत,कदाचित वर्षानंतर सुद्धा  मी माझे उत्तर देईन.त्यावर सुबोधने आठ दहा दिवस कां? तुम्ही कितीही वेळ घ्या. काहीही उत्तर द्या. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल,असे सांगितले .

सुबोध निरोप घेऊन निघून गेला .विद्या सुबोधचा चेहरा मन:चक्षूसमोर आणीत होती.त्याच्या चेहऱ्यावरील भावना, त्याच्या शब्दांशी  किती प्रामाणिक आहेत, त्याचा ती अंदाज घेत असावी .

एक महिना झाला .विद्याने काहीही उत्तर दिले नाही .शामलीच्या चेहऱ्यावरील ताणतणाव ती निरखीत होती .आपण दुःखी झालेले जसे आपल्या मुलीला पाहवणार नाही त्याचप्रमाणे ती दुःखी  झालेली आपल्यालाही पाहवणार नाही हे तिच्या लक्षात आले .असे असले तरी ती तिच्या मतावर ठाम होती .

प्रेम विवाह हा खर्‍या अर्थाने प्रेमविवाह असतोच असे नाही .बऱ्याच वेळा शारीरिक आकर्षणाचा तो आविष्कार असतो .एकमेकांचे दोष लक्षात येत नाहीत .संस्कृती भिन्नतेमुळे कुठे कुठे अडू शकेल, काय काय बोचू शकेल ते  दोघांच्याही लक्षात येत नाही .म्हणूनच प्रेम आंधळे असते असे म्हणतात .बूट कितीही आकर्षक असला तरी तो घातल्यावरच कुठे बोचतो ते कळते .म्हणूनच केवळ वरच्या आकर्षणावर दिसण्यावर न जाता कंपनी ,इतर लोकांची मते, त्यांचा अनुभव,इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत .

असेच सहा महिने गेले . सुबोधने किंवा शामलीने कोणतीही प्रतिक्रिया दर्शविली नाही.

"तुम्ही तुमचा वेळ घ्या .तुम्ही तुमचा निर्णय केव्हाही सांगा. आम्हाला तो शिरसावंद्य असेल .तुमच्या निर्णयासाठी आम्ही कितीही काळ थांबायला तयार आहोत" असे सुबोधने विद्याकाकूना त्यांच्या पहिल्या भेटीतच सांगितले होते .त्याचे बोलणे किती खरे आहे ते ती अजमावीत असावी.

सहा महिन्यानंतर तिने शामलीला सुबोधला घरी घेऊन ये म्हणून सांगितले.सुबोध शामलीच्या घरी आला. आल्यानंतर तो विद्या काकूंच्या पाया पडला .त्यांचे त्याने आशीर्वाद मागितले.हसून मनःपूर्वक काकूनी त्याला आशीर्वाद दिले.

विद्या शामली व सुबोध याना म्हणाली.

तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहिला याबद्दल मला माफ करा .तुमच्या बोलण्यात आणि आचरणात किती संवाद आहे ते मी पाहात होते .

मी तुझ्या घरी जावून तुझ्या  आई वडिलांना भेटून आले.माझे पूर्ण समाधान झाले आहे.मी जग पाहिले आहे .मी प्रेमविवाहाच्या विरूद्ध नाही.~फक्त तो खराच प्रेमविवाह असला पाहिजे असे माझे ठाम मत आहे .याच्याशी कुणी सहमत होणार नाही असे मला वाटत नाही .आजकाल जिच्यावर आपण प्रेम करतो तिने नकार दिला तर तिच्यावर अॅसिड  फेकण्यापर्यंत मुलांची मजल जाते .मला नाही तर कुणालाच नाही असा दृष्टिकोन असतो.याला प्रेम म्हणत नाही.

जमेल तोवर गट्टी नाहीतर सोडचिठ्ठी असा प्रकार असतो. 

नाही मला तर नाही कुणालाच याला प्रेम म्हणत नाहीत.

प्रेम  म्हणजे केवळ घेणे नव्हे तर देणे होय. 

खरे प्रेम दुसर्‍याच्या सुखात स्वतः सुखी होत असते.

प्रेमात शारिरीक  आकर्षण जरूर असते परंतु प्रेम म्हणजे  केवळ  शारिरीक  आकर्षण नव्हे.

लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र येणे नव्हे तर दोन घराणी एकत्र येत असतात हे जेव्हां तरुण तरुणींना कळेल तेव्हाच सर्व समस्या  सुटतील .

मी तुमची कसोटी घेत होते .तुम्ही एकदा उत्तर माझ्यावर सोपविल्यावर, उत्तर मिळण्यासाठी कितीही काळ थांबायला तयार आहोत असे सांगितल्यावर, तसे तुम्हाला खरेच वाटते का ते मला पाहायचे होते .

*प्रेम विवाह व पारंपरिक विवाह यातील सुवर्णमध्य मला पाहिजे होता .*

*सुबोध ,तू शामलीला खरेच सुखी करशील का  त्याची मला खात्री  करून घ्यायची होती .*

*तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण  झाला आहात .*

(समाप्त)

१५/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel