( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

तिची व माझी लहानपणापासूनची ओळख आहे .ती माझ्या बहिणीची मैत्रीण. ती आमच्या शेजारी जवळच रहात होती.नेहमी खेळण्यासाठी आमच्याकडे येत असे.काळी सावळी काटकुळी अशी ती दिसत असे.तिच्या दिसण्यावरून तिला मी नेहमी चिडवत असे.मी लहानपणी तिला चिडविताना चिचुंद्री म्हणत असे.ती लगेच पलटवार करीत असे.ती मला उंदीर आणि त्याचा शॉर्टफॉर्म उंद्या म्हणून हाक मारीत असे.त्यांच्या भातुकलीच्या खेळात मी सामील होत असे. आम्ही थोडे मोठे झालो आणि मग आमचा भातुकलीचा खेळ बंद झाला.तरीही भांडणे खेळणे चालूच होते. आट्यापाट्या, हूतुतू, लगोरी, आम्ही एकत्रच खेळत असू. 

ती नऊ दहा वर्षांची असताना तिच्या वडिलांची बदली झाली.त्यानंतर तिची पाच सहा वर्षे दृष्टी भेटही झाली नाही.नंतर पाच सहा वर्षांनी ते परत आमच्या गावी बदलून आले.सुदैवाने त्यांना आमच्या शेजारी जवळच भाड्याने जागा मिळाली.आता ती पूर्णपणे बदलली होती.सुरवंटाचे फुलपाखरू झाले होते. कळी उमलली होती.ती सोळा वर्षांची झाली होती.ती आता दहावीत होती.तर मी बारावीत होतो.तिची आकृती दर्शनीय व कमनीय झाली होती.नाहीतरी कुणीतरी म्हटलेलेच आहे .प्राप्तेतु षोडशे वर्षे गर्दभी अपि अप्सरा भवेत्.लिहिता लिहिता मी तिचा उल्लेख चुकून का होईना गर्दभी म्हणून केला.पूर्ण उमललेले फूल, फुलपाखरू, हीच उपमा जास्त चांगली आहे.अप्सरेची उपमा आपण बाजूला ठेवू.सांगण्याचे तात्पर्य ती आता आकर्षक दिसू लागली होती.ती छानपैकी लाजूही लागली होती .बोलता बोलता मान खाली घालून नखाने जमीन खरवडण्याची तिची अदा, तिचा विभ्रम लाजवाब होता.आता तिला चिचुंद्री म्हणून म्हणण्याची माझी काय टाप होती.मी तिला आता मैना म्हणू लागलो.लहानपणी काळी सावळी   दिसत असलेली ती आता बरीच उजळली होती.तीही मला आता राघू म्हणून हांक मारू लागली.मैना राघूची जोडी असे कोणीतरी म्हटल्यावर ती छानपैकी लाजली.

तेव्हाच माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमाचे बीज रोवले गेले.यथावकाश मी डॉक्टर  होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालो.माझ्यापाठोपाठ तीही डॉक्टर  होण्यासाठी त्याच महाविद्यालयात दाखल झाली.आम्ही दोघानाही आता तारुण्यात पदार्पण केले होते.बरोबर हिंडण्या फिरण्याचे, स्वप्नरंजनात रंगण्याचे, एकमेकांना प्रपोज करण्याचे, चिडवण्याचे, ते  सोनेरी दिवस होते .मी तिच्याकडे आता वेगळ्याच नजरेने पाहू लागलो होतो.तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त करावे असे मला आतून हजारदा वाटत असे.आम्ही अनेकदा भेटत असू,फिरत असू,  सिनेमा नाटक खरेदी यासाठी एकमेकांसोबत जात असू,परंतु मनात येऊनही का कोण जाणे मी तिला कधीही प्रपोज केले नाही.तिच्यावरील प्रेम व्यक्त करायचे राहून गेले.कदाचित मला तो धीर होत नसावा.

शेवटी एक दिवस मी सर्व धीर गोळा करून तिला बागेत गेलो असताना मागणी घालणार होतो.परंतु तिनेच प्रथम बोलायला सुरुवात केली.एका मुलाने त्याचे प्रेम व्यक्त केले आहे. तो तिला फिरायला घेऊन जात असतो. तिलाही तो आवडतो.तो मुलगा कसा काय आहे?त्याच्याबरोबर डेटला फिरायला जाणे योग्य होईल का?असा माझा सल्ला तिने विचारला. ती मला तिचा जिवलग मित्र समजत होती.प्रियकर म्हणून तिने माझ्याकडे कधीच पाहिले नाही असे माझ्या लक्षात आले .मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी योजलेले शब्द तसेच गिळून टाकले.त्या मुलासंबंधी अनुकूल किंवा प्रतिकूल मी काहीच बोललो नाही.त्याची माझी विशेष ओळख नाही.जरा जपूनच पाऊल टाक.सावधपणे तुझा तूच निर्णय घे .असा सल्ला मी तिला दिला .

त्यानंतरही अनेकदा ती मला भेटत असे.तो असे बोलला, तो तसे बोलला,तो असा आहे,  तो तसा आहे,आम्ही इकडे किंवा तिकडे फिरायला गेलो होतो.अमके रेस्टॉरंट चांगले आहे किंवा तमके रेस्टारंट चांगले नाही, असे मला तिच्या तोंडून ऐकायला मिळत असे.मीही ती बोलेल त्याला मान तुकवत असे.

मनातून मी माझ्यावरच चरफडत असे.आमची दोघांची इतकी लहानपणापासूनची ओळख .चिचुंद्री, उंद्या, मैना,राघू, असे आम्ही एकमेकांना मोकळेपणाने संबोधत असू.असे असताना,आपले तिच्यावर मनापासून प्रेम असताना,आपण ते लगेच योग्य वेळी व्यक्त केले नाही यासाठी मी मला दोष देत असे.

एके दिवशी ती मला थोडी उदास, थोडी खिन्न, थोडी अंतर्मुख,झालेली दिसली . आपुलकीने चौकशी करता तिचे ते प्रेम प्रकरण संपलेले आढळून आले.तो तिला जेवढा चांगला वाटला, तो तिला जेवढा अनुरूप  वाटला, तो तिला जेवढा आकर्षक वाटला, तो तिला जेवढा बुद्धिमान व सुस्वभावी वाटला, तेवढा प्रत्यक्षात तो नव्हता.आणखी पुढे जाण्याऐवजी ती गोष्ट तिथेच संपवलेली बरी असे तिला वाटले.तिने तिथेच त्या गोष्टीला पूर्णविराम दिला.हे सर्व ती मैत्रीच्या भावनेने मला मोकळेपणाने सांगत होती.मीही सहानुभूतीने ऐकून घेत होतो.नाहीतरी तो तुझ्या लायकीचा नव्हताच.नाहीतर तो असा वागला नसताच.झाले ते बरेच झाले.मी सांत्वनपर बोललो.

हे सर्व बोलत असताना मला आत कुठेतरी समाधान वाटत होते.आपल्या मार्गातील काटा आपोआपच दूर झाला,याबद्दलचे ते समाधान असावे.एका बाजूला जरी मी समाधानी असलो तरी दुसर्‍या  बाजूने तिचे दु:ख,तिची अस्वस्थता, तिचे असमाधान,मला त्रास देत होते.तिच्याशी असे व्हायला नको होते असे वाटत होते.तिला हृदयाशी घट्ट धरावे आणि तिचे सांत्वन करावे. अग वेडे काळजी करू नकोस मी आहे ना असे बोलावे,असे वाटत होते  .ज्या दिवशी तू तुझ्या डेटबद्दल सांगितलेस तेव्हा मीच तुला प्रपोज करणार होतो असे म्हणून तिला धीर द्यावा आणि त्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचे राहून गेले.आता मी तुला प्रपोज करतो.तू मला खूप आवडतेस असे सांगावे असे वाटत होते . 

मला ती वेळ अनुकूल वाटली नाही.ती दु:खात होती .ती खचली होती.तिला सावरायला वेळ द्यावा.असे मला वाटत होते.त्याबरोबरच असे बोलणे तिला रुचेल कि न रुचेल, तिची प्रतिक्रिया काय होईल, याबद्दलही मला भीती वाटत होती.हे कदाचित तिच्या दुःखावर डागण्या देण्यासारखे झाले असते.तिच्या दु:खाग्नीवर आपली पोळी भाजून घेण्यासारखे झाले असते.एकूण काय मी कांही काळ जाऊ देण्याचे ठरविले.ती सावरली, ती त्या प्रकरणातून पूर्णपणे बाहेर आली, ती नॉर्मल झाली, म्हणजे  आपण तिला मागणी घालू, आपण आपले प्रेम व्यक्त करू,मी कितीतरी दिवस तुझ्यावर प्रेम करीत आहे परंतु मला ते व्यक्त करण्याचा धीर झाला नाही, हेही तिला सांगू असे मनाशी ठरविले.

दिवस गेले,महिने गेले, ती शांत झाली, ती पूर्वीसारखी हसू खेळू बोलू लागली, ती नॉर्मल झाली तरीही मी आपले प्रेम व्यक्त करावे की न करावे यामध्येच होतो.माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्याविषयीची दोलायमान स्थिती   दूर होण्याचे लक्षण दिसत नव्हते.ती मला रोज भेटत होती.आज बोलू उद्या बोलू असे माझे चालले होते.मला आतून काय वाटत होते माझे मलाच कळत नव्हते.प्रेम व्यक्त करण्याची मी टाळाटाळ कां करीत होतो? कुणाला माहीत?एरवी स्पष्ट, सडेतोड, बेधडक, संकोच नसणारा मी, इथे मात्र अडखळत होतो.हे सर्व पाहून केव्हां केव्हां मला असे वाटे की मी खरेच तिच्यावर प्रेम करीत आहे का?हा प्रेमाचा आभास तर नाही ना? या बाबतीत माझा हॅम्लेट कां बरे होत आहे?    

एक दिवस ती मला भेटली तेव्हा तिचा चेहरा पुन्हा उल्हसित प्रसन्न दिसत होता.तिला पुन्हा एकाने डेटविषयी विचारले होते.त्याच्याबरोबर ती नुकतीच जाऊन आली होती.त्यामुळे ती एखाद्या मैनेसारखी गात होती. एखाद्या फुलपाखरासारखी उडत होती.पुन्हा तिला तिचा जिवलग भेटला होता.ती मला तिचा खरा मित्र समजत होती.आपले जेजे हृदगत, जीवश्च कंठश्च मैत्रिणीजवळ बोलावे, ते ते सर्व  ती माझ्याजवळ  नि:संकोचपणे सांगत होती.

माझे तिच्याविषयीचे प्रेम व्यक्त करणारे शब्द माझ्या पोटातच राहून गेले.मी पुन्हा एकदा श्रोत्याच्या भूमिकेत गेलो.ती जेव्हां जेव्हां भेटे, तेव्हां तेव्हां, तो असा आहे, तो तसा आहे, आम्ही इकडे गेलो होतो, आम्ही तिकडे गेलो होतो,असे ती एखाद्या लहान मुलासारखे न संपणार्‍या उत्साहात सांगत असे.मी जिथे होतो तिथेच होतो!!

तिला कुठेतरी तिचे सुख,तिचा आनंद,तिचे प्रेम सापडो,असे मला वाटत होते.तिच्यावरील प्रेमापोटी आता तरी ती स्थिर व्हावी असे मला वाटत होते.तर दुसर्‍या  बाजूने तिला आपण अगोदरच मागणी कां घातली नाही.म्हणून मी चुकचुकत हळहळत होतो.माझे कांही खरे नव्हते.

तिला तो पूर्णपणे पसंत होता.तिला शेवटी तिचे गन्तव्य स्थान  सापडले होते.इथे ती पूर्ण सुखी होईल याची तिला खात्री पटली होती.तिचा त्याच्याशी लग्न  करण्याचा निर्णय तिने मला सांगितला.माझे दु ख लपवीत मी तिचे अभिनंदन केले. एक दिवस तिने तिच्या लग्नाची पत्रिका माझ्या हातात ठेवली.  

आता सर्व काही संपले होते.असे मला वाटत होते.परंतु जीवनात असे काही सर्व संपत नाही.आपल्याला पुढचे काही दिसत नसते.ते दिसत नसते तेच चांगले.त्यामुळे जीवन जगण्यास गंमत येते असा माझा अनुभव आहे. तसेच माझे ते मतही आहे.असेच दिवस महिने चालले होते.

मी डॉक्टर होऊन दवाखाना उघडला होता.मी पूर्वीचे   सर्व काही विसरलो होतो.हॉस्पिटलही सुरू केले होते.

*आणि "ती" माझ्या जीवनात आली.*

*"ती"ही एक डॉक्टर होती.मला हॉस्पिटलमध्ये एक हाऊस डॉक्टर  नेमावयाचा होता.*  

*त्यासाठी "ती"मुलाखतीसाठी आली होती.ती मला दोन्ही अर्थांनी पसंत पडली.*

*हाऊस डॉक्टर म्हणून आणि हाउस वाइफ म्हणूनही.*

* हाऊस डॉक्टर म्हणून मी तिची नेमणूक केली.हॉस्पिटलमध्ये आमचे दोघांचे बंध चांगलेच जुळले.आपण एकमेकांसाठी आहोत याची खात्री पटली.  *

"मी मैनेला विचारले नाही ते बरेच झाले असे मला आता मागे वळून पाहता वाटते.*

*"हि"ला मी नि:संकोच प्रपोज केले."ति"नेही माझा स्वीकार केला.*

*जणू काही "हि"च्यासाठीच  तिला विचारताना माझे शब्द बाहेर पडत नव्हते.*  

*आता घर आणि दवाखाना आम्ही दोघेही एकत्र चालवीत आहोत.*   

१०/११/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel