( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

एकाचा माझ्या पैशांवर डोळा होता तर दुसऱ्याची तिसरीच तऱ्हा होती‌.मी नोकरी सोडून द्यावी आणि घरी स्वयंपाक पाणी करावे. तो येईल तेव्हा सदैव त्याच्या स्वागताला हजर असावे अशी त्याची अपेक्षा दिसत होती.मी नोकरी करीन की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न होता. 

अर्थात विवाहानंतर निर्णयप्रक्रियेत पतीही सामील झाला असता यात शंका नाही परंतु त्याने अगोदरच मी काय करावे व काय करू नये हे सांगणे मला आवडण्यासारखे  नव्हते.

नंतरही त्याने केलेला हुकूम मला पटला नसता. आवडला नसता.अर्थातच मी त्या मुलाला ऑनलाईन नकार दिला.

एका मुलाची मला स्वयंपाक करता येतो की नाही अशी पृच्छा होती.जर मी एखाद्या मुलाला विचारले असते की त्याला स्वयंपाक करता येतो की नाही तर त्याला कसे वाटले असते?त्याने ते खेळकरपणे घेतले असते का?स्वयंपाक हे स्त्रीचे काम आहे पुरुषाचे नाही ही कल्पना मला मान्य होण्यासारखी नव्हती.जर स्त्री नोकरी करते तर पुरुषालाही  स्वयंपाक करता आला पाहिजे अशा मताची मी आहे. लग्नानंतर कुणी काय करावे किंवा काय करू नये ते परस्पर सहमतीने ठरवावे.प्रत्येक कामात दोघांचाही सहभाग असावा. दोघानाही स्वयंपाक करता आला पाहिजे असे मला वाटते. अर्थात श्रमविभागणीचे तत्त्व मलाही मान्य आहे.सर्व कामे सर्वजणांनी करीत बसण्यापेक्षा ती वाटून घेतली तर कामे लवकर होतात.एकमेकांच्या कामात ढवळाढवळ होत नाही.जबाबदारी निश्चित करता येते.या सर्व गोष्टी मान्य करूनही त्यांचे प्रश्न त्या प्रश्नांचा रोख मला रुचला नाही. या मुलाच्या    चौकशीवरून स्वयंपाक हा सर्वस्वी स्त्रीचा प्रांत आहे असे त्याचे मत दिसत होते, हे त्याचे मत मला मान्य होण्यासारखे नव्हते.अर्थात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये व आपल्या चालत आलेल्या परंपरेप्रमाणे स्वयंपाकघर हा स्त्रीचा प्रांत समजला जातो.कळत नकळत स्त्रियांनीही ते मान्यही केले आहे तो भाग निराळा. संकेतस्थळावरील स्थळांच्या इच्छा, अपेक्षा व कल्पना या माझ्या इच्छा, अपेक्षा व कल्पना यांच्याशी जुळत नाहीत असे पाहिल्यावर माझ्या आईने वेगळाच  घाट घातला. तिच्या दृष्टीने योग्य अशा एखाद्या मुलाशी माझी प्रत्यक्ष गाठ घालून द्यावी व नंतर काय होते ते पहावे असा विचार तिने केला .

आई ज्याप्रमाणे संकेतस्थळावर माझे लग्न जुळविण्याचा प्रयत्न करीत होती त्याचप्रमाणे ती तिच्या मैत्रिणींच्यामार्फत माझे लग्न जुळवण्याचा प्रयत्न करीत होती.एक दिवस तिने बोलता बोलता माझ्यासमोर एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली,तिच्या मैत्रिणीच्या  लांबच्या नात्यातील एक मुलगा दिल्लीला असतो. तो पुराणवस्तुसंशोधन(पुरातत्त्व) खात्यामध्ये काम करतो. तो मुलगा अधून-मधून सुटी मिळेल तेव्हा येत असतो.त्याचे मन दिल्लीत रमत नाही.त्याचे आई वडील इकडे असतात. त्याना भेटण्यासाठी, तसाच  मित्राना भेटण्यासाठी तो  येत असतो. त्याचे महाराष्ट्रात बदलीसाठी प्रयत्न चालू आहेत.हल्ली तो सुटीवर आलेला आहे.त्याची तीन चार दिवसच सुटी शिल्लक आहे.तेव्हा त्याला भेटण्यास काय हरकत आहे? कशाला भेटायचे?भेटून असे काय मोठे दिवे लागले आहेत असे म्हणावे असे मला वाटले.परंतु कां कोण जाणे माझ्या तोंडातून पटकन काहीच हरकत नाही असे उत्तर पडले. पहिल्याच सूचनेला माझा होकार ऐकून तिला आनंद झाला.मी नकार देईन असे बहुधा तिला वाटत असावे.आतापर्यंत विवाहविषयक  प्रत्येक गोष्टीसाठी तिला मला पटवावे लागत असे.तिच्या सूचनेला प्रथमच मी लगेच संमती दर्शवली होती .मलाही त्याचे आश्चर्य वाटले. तिने मला त्याचा फोन नंबर दिला. त्यालाही माझा फोन नंबर दिला असणार.तो तुला फोन करून केव्हां कुठे भेटायचे ते तुझ्या संमतीने ठरवील असे ती म्हणाली.

आईने सांगितल्याप्रमाणे   समीरचा त्याच दिवशी संध्याकाळी फोन आला.आमच्या घरासमोरच असलेल्या मोबाईल शॉपजवळ येऊन तो थांबणार होता.मला या समीरमध्ये विशेष रस नव्हता परंतु  आईने आग्रह केला म्हणून केवळ मी जाणार होते.थोडे उशीरा जावे म्हणजे तो कटेल, असा एक विचार माझ्या मनात आला.परंतु असे वर्तन माझ्या स्वभावात बसत नव्हते.  वेळेच्या बाबतीत मी अगदी काटेकोर आहे. दिलेली वेळ मी स्वतः पाळते. त्याप्रमाणेच दुसऱ्यानेही ती पाळावी असे मला वाटते.मी बरोबर सहा वाजता घरातून निघाले.मी नेहमीच्याच पोशाखात होते.तशी मी पोशाखाच्या बाबतीत थोडी अजागळ आहे असे माझे मित्र मैत्रिणी म्हणतात.त्याला भेटायला जायचे म्हणून पोशाख विशेष टापटिपीचा असावा असे मला वाटले नाही. तो बरोबर सहा वाजता तिथे येणार होता.चालत चालत पाच मिनिटात मी तिथे पोहोचले.त्याच्या बुलेटवर तो माझी वाट पाहत होता.वेळेच्या बाबतीत तो माझ्यासारखाच काटेकोर दिसत होता.मीच थोडी पाच मिनिटे कां होईना उशीरा आले होते.त्याच्या बुलेटकडे बघताना मला नेहमी स्वप्नात दिसणारा घोडा व राजकुमार आठवला.माझे मलाच हसू आले.गेल्या गेल्या थोडा उशीर झाल्याबद्दल मी त्याची माफी मागितली. वेळ थोडी मागे पुढे होतेच असे हसून तो म्हणाला.पाच मिनिटे उशीर म्हणजे काही फार उशीर नाही.मला पाच मिनिटे उशीर झाला हेही बोलता बोलता त्याने सहज दर्शविले.त्याने मला कुठे जायचे म्हणून विचारले.कुठेही तुम्ही न्याल तिकडे म्हणून मी त्याला सांगितले.त्यावर किंचित हसून त्याने  गांध तलावाकडे आपली बुलेट वळविली.

तलावाकाठी असलेल्या एका क्लबचा तो मेंबर होता. तलावात नौकानयनासाठी बोटी भाड्याने मिळत असत.त्याने एक बोट भाड्याने घेतली.आम्ही दोघे तलावात नौकानयनासाठी गेलो.बोटीत आम्हाला निवांतपणे गप्पा मारता येणार होत्या.आमच्या गप्पा सर्वसाधारण विषयांवर चालल्या होत्या.मी त्याला पुराणवस्तुसंशोधन(पुरातत्त्व) खात्यांमधील कामाबद्दल विचारले.त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यावर सविस्तर बोलताना त्याला आनंद होत होता.  तो मलाही विविध प्रश्न करीत होता.माझ्या मित्र मैत्रिणी नोकरी इत्यादीबद्दल तो प्रश्न विचारीत होता.अपरिचित व्यक्तीला कोणताही संकोच वाटू न देता त्याला बोलते कसे करावे याचे त्याचे कसब वाखाणण्यासारखे होते.कुठेही कृत्रिमता न आणता कित्येक दिवसांची ओळख असल्यासारखा तो स्वतः बोलत होता व मलाही बोलता करत होता.हा मार्केटिंग चांगले करू शकेल असाही एक विचार माझ्या मनात आला.त्या विचाराचे माझे मलाच हसू आले.  जवळजवळ एक तास आम्ही बोटिंग करीत होतो. क्लबमध्ये असलेल्या  रेस्टॉरंटमध्ये आम्ही स्नॅक व कॉफी घेतली.तो मला आमच्या घरी सोडण्यासाठी आला होता.मी त्याला घरी येण्याचा आग्रह केला.पुन्हा केव्हा तरी आता बराच उशीर झाला आहे असे तो म्हणाला.उद्या केव्हा व कुठे भेटायचे ते ठरवून नंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुढची भेट ठरविण्याची त्याची चतुराई मला आवडली.

इतका वेळ आम्ही बरोबर असूनही त्याने तुम्हाला किती पगार मिळतो?तुमची शिल्लक किती?तुम्ही नोकरी सोडू शकाल का ?नोकरी सोडून केवळ गृहिणी म्हणून राहणे तुम्हाला जमेल का ? तुम्ही स्वयंपाक करता का? तुम्हाला स्वयंपाक येतो का ?अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. सर्वसाधारणपणे मुले लग्नाच्या वेळी अशा प्रकारचे प्रश्न विचारतात.त्यातून त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षाही दिसून येतात.मला त्याच्याजवळ गप्पा मारताना एक प्रकारचे समाधान मिळत होते.संकेतस्थळावरील अशा प्रकारच्या प्रश्नांना मी विटले होते.एका बाजूने विचार केला तर असे प्रश्न विचारणे काहीच चूक नव्हते.विवाहानंतर संसार करताना या गोष्टी निश्चितच महत्त्वाच्या असतात. परंतु तेवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात असे नाही.इतरही अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.एकमेकांचे स्वभाव, विचार, दृष्टिकोन,लवचिकता,परस्परांशी जुळवून घेण्याची वृत्ती,ह्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात.सहवासातून, तुमच्या बोलण्यातून,तुमचे विचार,तुमच्या कल्पना, दुसऱ्याला सहज कळतात.माणूस समजण्यासाठी केव्हा केव्हा वर्षें अपुरी पडतात तिथे काही दिवस महिने यांचा काय़ पाड!शेवटी लग्न हा एकप्रकारचा जुगारच आहे असे काही जण म्हणतात.दान कसे पडेल ते सांगता येत नाही. पडेल ते दान स्वीकारावे लागते.  कांही असो समीर मला आवडला होता एवढे निश्चित.

नंतरच्या पुढच्या सर्व भेटींमध्ये माझ्या पोशाखाची व अवताराची मी काळजी घेत होते. दोन दिवस अाम्ही हिंडत फिरत होतो.एक दिवस सिनेमाला गेलो.एक दिवस नाटकालाही गेलो.एकमेकांचा सहवास आम्हाला कधीही कंटाळवाणा वाटला नाही.प्रत्येक वेळी आम्ही पुढची भेटण्याची वेळ व कार्यक्रम ठरवीत होतो.माझे बाबा म्हणतात लग्नामध्ये दोन माणसे कशी आहेत हे विशेष  महत्त्वाचे नाही.त्यांचे आकडे जुळतात की नाही हे महत्त्वाचे.तर सांगायची गोष्ट म्हणजे आमचे दोघांचे आकडे जुळत होते.

दोन दिवसांनी समीर दिल्लीला निघून गेला.त्याला निरोप देण्यासाठी मी विमानतळावर गेले होते.

त्यानंतर समीर वारंवार येतच राहिला.पूर्वी तीन चार महिन्यांनी येणारा समीर आता जरा सुटी मिळाली की लगेच येत असे.केव्हा केव्हा तो सुटीला जोडून रजा घेऊन येत असे.समाज माध्यमांच्या निरनिराळ्या मार्गानी आमचा एकमेकांशी संवाद होत असे.  एखादे दिवस जर काही कारणाने आमचा संवाद झाला नाही तर दोघांनाही चुकचुकल्यासारखे होत असे  .

आईने त्या दिवशी मला समीरला भेटायला जा असे सांगितले नसते.तिने सांगूनही मी गेले नसते.तर कदाचित समीर माझ्या आयुष्यात कधीच आला नसता.

*आमच्या गोष्टीचे पुढे काय झाले ते एखाद्या बालबोध कथेतील शेवटाप्रमाणे सांगितले पाहिजेच असे नाही.*  

*आई म्हणते त्याप्रमाणे विवाह ही  योगायोगाची गोष्ट आहे हेच खरे.*

* शेवटी माझे स्वप्न खरे झाले.*

*मला स्वप्नातील राजकुमार भेटला.*

*फक्त घोड्यावरून येण्याऐवजी तो बुलेटवरून आला होता!!*

*अकस्मात येण्याऐवजी तो पूर्व नियोजनाप्रमाणे आला होता.*

(समाप्त)

२४/१०/२०२०©प्रभाकर पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel