१५. गंधारा (गांधारा)

यांची राजधानी तक्कसिला (तक्षशिला) येथे पुक्कुसति नावाचा राजा राज्य करत होती. त्याने उतारवयात आपले राज्य सोडले व राजगृहापर्यंत पायी प्रवास करून भिक्षुसंघात प्रवेश केला. तदनंतर पात्र आणि चीवर शोधण्यासाठी फिरत असता त्याला एका उन्मत्त गाईने ठार केले. त्याला गाईने मारल्याची कथा मज्झिमनिकायाच्या धातुविभंगसुत्तांत आली आहे. तो तक्षशिलेचा राजा होता आणि त्याची व बिंबिसार राजाची मैत्री कशी झाली, इत्यादि सविस्तर वर्णन या सुत्ताच्या अट्ठकथेत सापडते. त्याचा सारांश असा:

तक्षशिलेतील काही व्यापारी राजगृहाला आले. बिंबिसार राजाने वहिवाटीप्रमाणे त्यांचा आदरसत्कार करून त्यांच्या राजाची प्रवृत्ति विचारली. तो अत्यंत सज्जन असून वयाने आपल्या एवढाच आहे, असे समजल्यावर बिंबिसार राजाच्या मनात त्याच्याविषयी प्रेमादर उत्पन्न झाला; आणि त्याने त्या व्यापार्‍यांचा कर माफ करून पुक्कुसाती राजाला दोस्तीचा निरोप पाठविला. त्यामुळे पुक्कुसाति बिंबिसारावर फार प्रसन्न झाला. मगध देशातून येणार्‍या व्यापार्‍यांवर असलेला कर त्याने माफ केला आणि आपल्या नोकरांकडून त्या व्यापार्‍यांबरोबर बिंबिसार राजासाठी आठ पंचरंगी बहुमोल शाली पाठविल्या. बिंबिसार राजाने या भेटीचा मोबदला एक सुवर्णपट उत्तम करंडकात घालून पाठविला. त्या सुवर्णपटावरील बुद्ध, धर्म आणि संघ यांचे गुण उत्कृष्ट हिंगुळाने लिहिले होते. तो मजकूर वाचून पुक्कुसातीला बुद्धाचा निदिध्यास लागला; आणि शेवटी राजत्याग करून तो राजगृहापर्यंत पायी चालत आला.

थेते एका कुंभाराच्या घरी त्याची व बुद्धाची गाठ कशी पडली, त्याला बुद्धाने कोणता उपदेश केला आणि शेवटी उन्मत्त गाईकडून तो कसा मारला गेला, हा मजकूर वर निर्देशिलेल्या धातुविभंगसुत्तातच सापडतो.

गांधारांचा आणि त्यांच्या राजधानीचा (तक्षशिलेचा) उल्लेख जातक अट्ठकथेत अनेक ठिकाणी आहे. तक्षशिला जशी कलाकौशल्यात तशीच विद्वत्तेतही आघाडीवर होती. ब्राह्मणकुमार वेदाभ्यास करण्यासाठी क्षत्रिय धनुर्विद्या व राज्यकारभार शिकण्यासाठी आणि तरुण वैश्य शिल्पकला व इतर धंदे शिकण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशांतून तक्षशिलेला येत असत. राजगृह येथील विख्यात वैद्य जीवक कौमारभृत्य याने आयुर्वेदाचा अभ्यास याच ठिकाणी केला. हिंदुस्थानात अगदी प्राचीन असे प्रसिद्ध विश्वविद्यालय तक्षशिलेलाच होते.

१६.  कंबोजा (काम्बोज)

यांचे राज्य वायव्य दिशेला असून त्यांची राजधानी द्वारका होती, असे प्रो. ऱ्हिस डेव्हिड्स यांचे मत आहे. परंतु मज्झिमनिकायातील अस्सलायनसुत्तांत ‘योनकंबोजेसु’ असा त्या देशाचा यवनांबरोबर उल्लेख केला असल्यामुळे हा देश गांधारांच्याही पलीकडे होता असे दिसते. त्याच सुत्तांत यवनकाम्बोज देशात आर्य आणि दास अशा दोनच जाती आहेत व कधी कधी आर्याचा दास आणि दासाचा आर्य होत असतो असेही म्हटले आहे. गांधारांच्या देशात वर्णाश्रमधर्म दृढमूल झाला असल्याचे काही जातककथांवरून स्पष्ट होते. खुद्द तक्षशिलेत बहुतेक गुरू ब्राह्मणजातीचे असत. पण काम्बोजात चातुर्वर्ण्याचा प्रवेश झाला नव्हता. तेव्हा तो देश गांधाराच्या पलीकडे होता असे म्हणावे लागते.

या देशातील लोक जंगली घोडे पकडण्यात पटाईत होते असे कुणालजातकाच्या अट्टकथेवरून दिसून येते. घोडे पकडणारे लोक जंगली घोडे ज्या ठिकाणी पाणी पिण्यास येत त्या पाण्यावरच्या शेवाळाला आणि जवळच्या गवताला मध फाशीत. घोडे ते गवत खात खात त्या लोकांनी तयार केलेल्या एका मोठ्या कुंपणात शिरत. ते आत शिरल्याबरोबर घोडे पकडणारे कुंपणाचा दरवाजा बंद करीत आणि त्या घोडय़ांना हळूहळू आपल्या कह्यात आणीत असत. (आजकाल अशात काही उपायांनी म्हैसुरात हत्ती पकडत असतात हे सर्वश्रूत आहेच.) जंगली घोडय़ांना लगामात आणून त्यांना हे लोक काम्बोजातील व्यापार्‍यांना विकत असावेत. व्यापारी लोक घोडय़ांना तेथून मध्यदेशात बनारस वगैरे ठिकाणी आणून विकीत. (उदाहरणार्थ, तण्डुलनालिजातक पाहा.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel