एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.'
तात्पर्य
- मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणामागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.