अद्यापहि एकत्र येऊन सहकार्याने कामे करण्याचा निश्चय होत नसेल तर आपण मानेस धोंडा बांधून समुद्रांत जीव तरी देऊ या. नीट जगा नाहीतर मरा तरी. परन्तु ना धड जगणे ना मरणे. या स्थितीला काय म्हणावे ?

शिक्षणाचा प्रश्न तर सर्वांत आधी हाती घेतला पाहिजे. शंका घेणारा विचारील, या शिक्षकांना पगार कोठून द्यायचा ? पगार देण्याचेसुद्धा आम्ही आमच्या शिरावर घेतले पाहिजे. देशाचे कार्य आम्ही करू लागलो, देशाचे कार्य जर आमच्या हाती घेतले, तर ते काम करणा-यांना आम्ही का मुशाहिरा देऊ शकणार नाही ? जो पगार देतो तो धनी असतो ही गोष्ट खरी. आपणांस पगार देणारे सरकार असेल तर सरकार धनी राहील. आणि हा परकी धनी स्वतःचाहि खिसा नीट भरून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सारी कार्यक्षेत्रे आपण आपल्या हाती घेतली पाहिजेत. आणि सर्वांत आधी शिक्षण. शिक्षणावर आपली हुकमत हवी. धंदेशिक्षणाच्या बाबतीत आपणांस अडचणी येतील, परन्तु आपणांस भरपूर अनुभव आतापर्यंत आला आहे की परकीय सरकार तर धंदेशिक्षणाची कधीच सोय करणार नाही. कारण त्यांत त्या सरकारचे मरण आहे.

माझे टीकाकार म्हणतील आता बरीक कठीण झाले ! कारण आता तर प्रत्यक्ष कार्याचीच भाषा सुरू झाली. होय. केवळ बोलाचीच कढी व बोलाचाच भात याने अतःपर भागणार नाही. काम कठीण तर खरेच, परन्तु म्हणूनच ते शिरावर घेण्यांत अपार गोडी आहे. अजींच्या कागदाची नाव करून तीत बसून सोन्याची पिसे धुंडाळून आणू अशी जर कोणी कल्पना काढली तर काही देशभक्त त्या गोष्टींतील लोकांप्रमाणे खरोखर त्या नावेत बसून निघण्यास तयार होतील. परन्तु राष्ट्राचे खरे भांडवल असल्या फुसक्या नौकेत घालून धोक्यात आणावे अशी सल्ला मी देणार नाही. धक्का बांधून पाणी अडविणे हे कठीण आहे. आणि “हे पाण्या, कृपाकरून मागे सर” अशी हात जोडून सनदशीर चळवळ करण्याची गोष्ट सोपी आहे. परन्तु पहिला मार्ग दगदगीचा व कठीण असला तरी त्याचा अवलंब करूनच आपण संकटमुक्त होऊ. दुसरा मार्ग बुडवील यांत शंका नाही. काही तरी स्वस्तात मिळवणारा मनुष्य “मी किती हुशार” अशी बढाई मारतो. परन्तु ती स्वस्त वस्तु जेव्हा कामी येत नाही, तेव्हा दुस-या कोणावर तरी दोष लादून तो मनुष्य मोकळा होतो. परन्तु दुस-यावर दोष लादून स्वतःचे कितीही लटके समाधान केले तरी कार्य होत नाही ही गोष्ट डोळ्यांना दिसत असते.

जोपर्यंत जबाबदारी दुस-यावर असते तोपर्यंत त्या जबाबदारीचे महत्त्व आपणांस वाटत नाही. परन्तु तीच जबाबदारी जर स्वतःच्या शिरावर येऊन पडली तर तिचा आपण केवढा तरी बाऊ करतो. दुस-यावर असताना जी जबाबदारी हलकी वाटे, ती स्वतःवर येतांच जड वाटू लागते. परन्तु ही खरी नीती नव्हे. सर्वांना एकच न्याय लावला पाहिजे. ज्या वेळेस आपण ब्रिटिशांचे वर्तनावर ताशेरा झाडतो, त्याचे आपण न्यायाधीश होतो, त्या वेळेस मानवी दुर्बलता, मनुष्य सहजदोष, या सर्व गोष्टी आपण ध्यानांत घेतल्या पाहिजेत. इंग्रज झाले तरी मनुष्यच आहेत. त्यांच्या बाबतीत आपण जितकी कठोर कसोटी लावू, त्यापेक्षा अधिक कसोटी स्वतःचे बाबतीत आपण स्वतः लावली पाहिजे. कारण इंग्रज बोलून चालून परका. त्याला भारताबद्दल आपलेपणा का व कसा वाटावा ? भाराताविषयीचे कर्तव्य तो नीट बजावीत नाही म्हणून आपण कडक शेरा मारला. आता स्वतःचे वर्तनावरहि शेरा मारा. न्यायाचा कांटा तोच ठेवा. ब्रिटिशांना शिव्याशाप देणे हे सोपे राजकीय काम आहे. परन्तु तेवढ्याने ध्येयप्राप्ती होत नाही. जशास तसे, टोल्यास टोला, ह्यामुळे ख-या कर्तव्याचा गंभीर व खंबीर पाया घालण्याचे आपण विसरू. ज्यावेळेस एखादा पक्षकार इरेस पडतो, माझे सारे जरी गेले तरी मी हा खटला लढवीनच लढवीन असे म्हणतो, त्या वेळेस त्याला विवेक राहत नाही. तो विकारवश पशुच होतो. आपल्या राजकीय चळवळीचा पाया जर क्रोध असेल तर साध्य दूर राहून क्रोध हेच आपले ध्येय होऊन बसेल. दुय्यम व कमी महत्त्वाच्या प्रश्नांस महत्त्व प्राप्त होईल. आणि विचारांची व आचारांची गंभीरता लुप्त होईल. विकारांचा नंगानाच सुरू होईल. परन्तु भरमसाट भावना, भरमसाट कृति म्हणजे सामर्थ्य नसून दुबळेपणा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel