जोपर्यंत जमीनदार व मजूर यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध नाहीत, तोपर्यंत दोघांचेहि नुकसान आहे. सहकार्य निर्माण करण्याची वेळ अजूनहि आली नाही का ? मजुरांना जगविले पाहिजे, सुखी केले पाहिजे. श्रम वाचविणारी लहान लहान यंत्रे आपण उपयोगांत आणली पाहिजेत. सुधारलेले हातमाग, सुधारलेल उंसाचे चरक, शास्त्रीय गोरक्षण व गोसंवर्धन, नाना गोष्टी खेड्यांतून करावयाच्या आहेत. यासाठी सहकार्य हवे. अनेकांनी एकत्र आले पाहिजे. शहरांतील प्रचण्ड प्रमाणावर चाललेल्या कारखान्यांतील दोष खेड्यांतून सहकारी तत्त्वावर चाललेल्या छोट्या संस्थांतून शिरणार नाहीत.

एकदा का होईना जर आदर्श गाव तयार करता आला तर ते उदाहरण इतरांस मार्गदर्शक होईल. दिव्याने दिवा लागतो. एकाचे पाहून दुसरा उचलील. परन्तु जोपर्यंत आपण प्रत्यक्ष काही तरी करून दाखवित नाही, तोपर्यंत मध्यवर्ती आपली संस्था निष्प्राणच राहील. जेथे परिघच नाही, तेथे केन्द्र कोठून असणार ?

कोठे तरी मध्यवर्ती सरकारच्या हातांतील सूत्रे आपल्या हाती यावी म्हणून आपण उत्सुक झालो आहोत. आपला सारा उत्साह त्यांत खर्च होत आहे. परन्तु ती सूत्रे हाती घेऊन ज्यांच्यावर राज्य करावयाचे त्यांची दशा काय आहे ? युरोपामधील प्रचण्ड कारखाने आपल्या देशांतील ज्याप्रमाणे उद्योगधंदे मारित आहेत, त्याप्रमाणेच हे परकी राज्ययंत्रहि खेड्यांतील आपल्या संस्था, व आपली संस्कृती यांना धुळीत मिळवित आहे. खेड्यांतून पूर्वी जे चैतन्य दिसे, जी चळवळ असे, त्याचे आज नावहि नाही. तळी कोरडी पडली, पाट गाळाने भरून गेले, कुरणे नष्ट झाली, देवळे ओस पडली. खेड्यांतील श्रीमंत लोक शहरांत राहू लागले आहेत. ते जेव्हा पूर्वी खेड्यांतच रहात तेव्हा त्यांच्या उत्सवसमारंभात, त्यांच्या सुखांत खेड्यातील जनता भाग घेई. क्षणभर सुखी होई. परन्तु आज श्रीमंतांचे मुनीम व हस्तक हेच खेड्यांत रहातात. आणि ते गरिबांना कसे वागवित असतील ते दिसतच आहे.

जनतेसमोर उदात्त व यथार्थ असे ध्येयच आज नाही. त्यागाचे जिवंत उदाहरण डोळ्यांसमोर नाही. नैतिकबंधने नाहीत, काही विधिनिषेध नाही. कठोर दंडुक्याच्या जोरावर देशांत आज स्मशानशान्ति राखली जात आहे. कायद्याला दया नाही. धर्म नाही. खोट्यानाट्या फिर्यादी होत आहेत. वादीप्रतिवादी परस्परांस धुळीत मिळवित आहेत. कोर्टकचे-या व वकील या कलहधर्मास उत्तेजन देत आहेत. खेडी मृतवत् होत आहेत. हिवताप सर्व देशाचा मसणवटा करित आहे. दुष्काळ नाही असे एकहि वर्ष सुधा जात नाही. अवर्षणे नित्याची झाली. पूर्वी दुष्काळांत आधार देणारी धान्याची पेवे असत. ती मात्र आता राहिली नाहीत. पोलिसांना किंवा गुंडांना हा म्हणण्याची, खबरदार म्हणण्याची जनतेत ताकद नाही. पोलिसांने दरडवावे, लुटारुने लुटावे, गुंडाने गप्प बसवावे. जनता प्रतिबंध करू शकत नाही. सारी प्रतिकारकशक्ती मेली. चोर व चोरांना पकडण्यासाठी ठेवलेले- दोघे जनतेला खात आहेत. आणि जनतेजवळ काय उरते ? खाण्यापिण्याची भ्रान्त आहे. दुधतूप शब्दच उरले. गरिबांच्या भोजनात त्या जणु निषिद्ध वस्तु ठरल्या ! शुद्ध तूप गेले, आता भेसळीचे येऊ लागले. खाण्यापिण्याची ददात्त आणि त्यांत पुन्हा रोग. पूर्वीचे घरचे देशी रोग आहेतच, आता परदेशांतीलहि नाना रोग आले आहेत व कायमचे रहिवाशी झाले आहेत.

आनंद नाही, अन्न नाही, आरोग्य नाही, आशा नाही, स्थान नाही, मान नाही, बळ नाही, फळ नाही, शेजारी मदत करावयास कोणी नाही. तडाका येताच तो मुकाट्याने घेण्यास माथे वाकवले जात आहेत. मृत्यु येताच हातपाय न हलवता त्याच्या स्वाधीन व्हावे लागत आहे. परमावधीच्या सोशिकपणामुळे अन्याय सहन केले जात आहेत. सारा दोष ग्रहदशेच्या माथ्यावर व कलियुगाच्या डोक्यावर दिला जात आहे. संकटे आली तर तारक एक फार तर परमेश्वरच उरला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel