जेथे मनुष्य मनुष्याकडे भक्ष्य दृष्टीने बघतो तेथे संस्कृती कधी फुलणार नाही. कारण मानवी जीवनाची खरी किंमतच तेथे कळत नाही. मनुष्याने मनुष्याला काकडीसारखे खाणे याला आपण राक्षसीपणा म्हणत असू. परंतु राक्षसीपणाचा हा एकच नमुना नाही. तितक्याच दुष्टपणाचे दुसरे शेकडो प्रकार आज सर्वत्र राजरोस सुरू आहेत. स्वतःची संस्कृती श्रेष्ठ मानणार्‍या देशातही मनुष्य मनुष्याला केवळ यंत्र मानीत आहे. मनुष्य म्हणजे जणू त्याचा देह. तो बाजारात विकला जातो, विकत घेतला जातो ! उपयुक्ततेवरून त्याची किंमत. धनिक लोक माणसाला यंत्रच समजतात. स्वतःच्या या स्वार्थासाठी मानवाला त्यांनी अत्यन्त हीन दशेला आणले आहे. स्वार्थान्ध माणसाला मनुष्यातील दिव्यता कशी दिसणार? स्वार्थान्ध होऊन आपण विवेकशक्ती गमावतो. आपली जाणीव मरते. आध्यात्मिकदृष्ट्या आपण आत्महत्या करतो. कोठली संस्कृती नि काय? मग पीनल कोडे तयार होतात. नरकासारखे तुरुंग अस्तित्वात येतात. दुसर्‍या राष्ट्रांना पंगू करून गुलाम केले जाते. त्यांची संघटितरीत्या लूटमार केली जाते. हृदयशून्यतेमुळे जगावर हे अनर्थ कोसळतात.

मनुष्याचा देह एक आश्चर्यकारक यंत्र आहे. मन तर आणखीच आश्चर्यकारक. परंतु मनुष्यात दिव्यता आहे, ही सर्वांत महत्त्वाची वस्तू. परमात्म्याचा तो अंश आहे. मनुष्यातील आध्यात्मिकता त्याच्या प्रेमावरून ओळखता येते. अमक्या मनुष्यापासून कोणते काम करून घेता येईल, याच दृष्टीने जेव्हा अपाण पाहू, त्या वेळेस त्याचे खरे ज्ञान आपणास होणार नाही. मग आपण त्याच्याजवळ अन्यायाने वागतो. मजुरी कमी द्यायची, अधिक काम उकळून घ्यायचे, यातच आपणास आसुरी आनंद वाटू लागतो. परंतु मनुष्यात परमात्मा आहे. आपल्यातील आत्मतत्त्व त्यांच्यातही आहे असे जाणून वागू तर सारे तुम्हाला आपले वाटतील. मग माणसांशी कठोर होणे म्हणजे स्वतःशीच कठोर होणे वाटेल.

एकदा नौकेत बसून गंगेच्या प्रवाहातून मी जात होतो. सूर्य नुकताच मावळला होता. आकाशात काठोकाठ निःस्तब्ध शान्ती होती. गंगेच्या त्या विशाल प्रवाहावर एकही तरल तरंग उठत नव्हता. सायंकालीन रंगांच्या छटा प्रतिबिंबित झाल्या होत्या. दूरचे वाळवंट एखाद्या नागराजाप्रमाणे पसरले होते. नौका शान्तपणे जात होती. इतक्यात एक भला मोठा मासा पाण्यातून एकदम वर आला नि पुन्हा खाली गेला. त्याच्या अंगावर क्षणभर ते सायंकालचे रंग चमकले. पडदा दूर करून सायंकाळच्या मुख्य संगीताला साथ द्यायला का तो आला होता? मला वाटले की, एक मित्र आला आणि रामराम करून, अभिवादन करून गेला. हा विचार मनात येताच माझे हृदय भरून आले. परंतु नावाडी म्हणाला, ‘केवढा मासा होता ! निसटला, गेला !” त्याच्या डोळयांसमोर मासळीचे जेवण होते. त्याला त्या माशाकडे खाण्याच्या डोळयांनीच फक्त पाहता येत होते. माशाच्या जीवनातील अर्थ त्याला काय कळणार? मनुष्य हा केवळ पशू नाही. त्याला आध्यात्मिक दृष्टी आहे. तो वर उड्डाण करू इच्छीत असतो. ती आध्यात्मिक दृष्टी म्हणजेच संपूर्ण सत्याची दृष्टी. परंतु आपल्या भोगवासना खात जन्मीच्या वैर्‍याप्रमाणे या सत्यदृष्टीच्या, आत्मसाक्षात्काराच्या आड येतात. स्वार्थी वासनांमुळे सहानुभूतीचा विकास होत नाही, पाप होते. ईश्वर व आपण यामध्ये पापाचा पर्वत उभा राहतो. आपले ध्येय मर्यादित करणे, संकुचित दृष्टी घेणे म्हणजेच पाप. आपण तेवढे चांगले, बाकीचे वाईट, स्वतःच्या फायद्यासाठी सारे बघणे, करणे म्हणजे पाप.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel