ते ब्रह्म आपल्या विविध शक्तीने नाना वर्णांच्या लोकांचे पालन करते, त्यांच्या गरजा भागवते. ते परब्रह्म, तो परमात्मा अनंत कर्मांनी स्वतःला देऊन टाकीत आहे. अखंड श्रमणार्‍या परमात्म्याला कर्म सोडून तू कसे मिळवणार? तो परमात्मा अनंत आनंद देत आहे. ही सृष्टी म्हणजे त्याची आनंद-देणगी.

परमेश्वराशी, त्या परात्पर पित्याशी साधर्म्य अनुभवायचे असेल तर स्वतःला कर्मद्वारा देत जा.

‘यः आत्मदा यः बलदा ।”

असे वेदांत ब्रह्माचे वर्णन आहे. परमात्मा स्वतःला देतो, आपली लेकरे आपल्यासारखी व्हावी म्हणून त्यांना बल देतो. सर्वतोपरी देऊन टाकणार्‍या त्या परमात्म्याची ऋषींनी पुढील प्रार्थना केली आहे -

“स नो बुध्दया शुभया संयुनक्तु ।”
तो आमचे शुध्द बुध्दीशी लग्न लावो. त्या प्रभूबरोबर काम करता यावे म्हणून शुभ बुध्दीची, सद्भावाची या प्रार्थनेत आपण मागणी करत आहोत. ज्या मानाने कर्मात शुभबुध्दी, सद्भाव, त्या मानाने प्रभूशी ऐक्य. शुभबुध्दी म्हणजे काय? दुसर्‍याच्या कल्याणात स्वतःचे कल्याण बघणे ही शुभबुध्दी. मानवजातीच्या कार्यांतील आपण आपले कर्मभार उचलावेत. समाजाचे मानवजातीचे असे कर्म करण्यातच तुझा आनंद, असे जी बुध्दी सांगते ती शुभबुध्दी, सद्बुध्दी. या सद्बुध्दीच्या अनुरोधाने वागू तर आपल्या जीवनात संयम होईल, सुसूत्रता येईल. ते जीवन यान्त्रिक नका म्हणू. कारण आत्म्याच्या आनंदाने प्रेरित होऊन ते कर्म आपण करतो. ते कर्म भित्रेपणाचे, आंधळे, गतानुगतिक असणार नाही. कर्माच्या आद्यन्ती परमात्मा भरलेला आपण पाहू. ते कर्म प्रथमपासून शेवटपर्यंत कल्याणावहच असेल.

“स्वाभाविकी ज्ञान-बल-क्रिया च ।”
असे त्याचे वर्णन आहे. ज्ञान, शक्ती व क्रिया असे त्याचे विविध रूप आहे. कर्म करणे ही जेव्हा आपली सहजप्रवृत्ती होईल तेव्हा ते बोजा न वाटता आनंदरूप होईल. जो कर्माचा वेळ तोच आनंदाचा. कामाचा दिवस तोच सुटीचा, तीच दिवाळी, आपण ज्या घटकेस काम करतो ती घटका आपणास सुखाची वाटत नाही. फुलाला फुलण्यात आनंद, नदीला वाहण्यात आनंद, मानवाला कर्मात आनंद, असे व्हायला हवे. कर्मद्वारा आपण स्वतःला देऊन टाकीत नसतो, त्यात आपला आत्मा नसतो; म्हणून ते कर्म आनंदरूपी आत्म्याचे संगीत असे न वाटता मानगुटीस बसणार्‍या भुतासारखे वाटते.  ते कर्म मोक्षरूप न वाटता पारतंत्र्याचे प्रतीक वाटते.

स्वतःला देऊन टाकणार्‍या प्रभो ! आनंदरूपाने नटणार्‍या ! तुझे दर्शन अग्नीच्या ज्वालांप्रमाणे पेटून आम्हाला तुझ्याकडे येऊ दे ! फुलाच्या सुगंधाप्रमाणे तुझ्यात भरून जाऊ दे. आम्हाला जीवनावर प्रेम करायला शिकव. यशापयश, सुखदुःख- सर्वांवर प्रेम करायला शिकव. तुझ्या या विश्वातील संगीत ऐकायला मला शक्ती दे, उत्साह दे. मी उत्साहाने अविरत श्रमावे म्हणून मला बळ दे. जे जीवन तू दिले आहेस ते मला पूर्णपणे जगू दे. शूराप्रमाणे मला देऊ दे; घेऊ दे. हीच आमची तुला प्रार्थना. तुझा आनंद कर्माहून निराळा, असली दुबळी कल्पना माझ्या मनातून काढून टाक. जेथे शेतकरी भूमी नांगरत असतो तेथे हिरव्यागार पिकांच्या रूपाने तुझाच आनंद नाचत असतो. काटेरी झाडेझुडपे तोडून, दगडधोंडे फोडून, मनुष्य सुंदर जागा तयार करून स्वतःसाठी घर बांधतो, तेथे व्यवस्थितपणाच्या नि शान्तीच्या रूपाने तुझाच आनंद प्रकट होत असतो. हे विश्वकर्मन्, वासंतिक वार्‍याप्रमाणे तुझ्या विश्वशक्तीच्या झुळुका आमच्या जीवनाकडे येवोत. त्या वसंताबरोबर विविध फुलांचा परिमल येवो, वनांतील गीते येवोत, तृणपर्णांचे आवाज येवोत, तो वसंतवात आमच्या निर्जीव, नीरस जीवनात सरसता-मधुरता आणो; तो आमच्या कंठांतून वाणी प्रकटवो. तो आमच्यात शक्ती संचरवो. या विश्वात पर्णरूपाने, पुष्परूपाने, फुलरूपाने स्वतःची अनंत परिपूर्णता आपण गाठू, असे आमच्यातील या नवशक्तीला सदैव वाटू दे, ही तिला उत्कंठा असू दे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel