आजी रागावली असें पाहून संध्या खालीं उतरली. तिनें आजीचा हात धरला. सर्व मुलें घरीं निघालीं.

“आजी, तूं नेहमीं संध्येचा हात धरतेस. आमचा कोणाचा कां नाहीं   धरीत ? ती तेवढी तुझी लाडकी !” दुसरीं मुलें म्हणालीं.

“अरे, ती इकडेतिकडे पळून जाईल म्हणून हो मी तिचा हात धरतें. तुम्ही सारीं माझीं आवडतीं, सारीं लाडकीं. मी सर्वांना खाऊ नाहीं का देत ? सर्वांना गोष्टी नाहीं का सांगत ?”

“आजी, तूं रस्त्यांत पडूं नयेस म्हणून मी तुझा हात धरतें, खरं ना ?” संध्येनें हंसून विचारलें.

“होय हो संध्ये. मुलं म्हणजे म्हाता-याची काठी.” आजी म्हणाली.

भागीरथीकाकू रोज भीमेवर स्नानासाठीं जावयाची. पंढरपूराहून वाहात आलेली पवित्र भीमा. उडगी गांवची तीच गंगा. ती चंद्रभागा. आजीबरोबर कधींकधीं संध्याहि जावयाची व पाण्यांत डुंबावयाची.

“संध्ये, तूं आज गंगेवर येऊं नकोस. फार आहे थंडी.”

“आजी, तुला थंडी लागत नाहीं, मग मला कशी लागेल ? मला तर भीमेच्या पाण्यांत मौज वाटते. जणूं मी आईच्या कुशींत शिरत आहें असं मला वाटतं. संध्येला थंडी-ऊन बाधत नाहीं. पाऊसपाणी बाधत नाहीं. तहानभूक लागत नाहीं. भीमेचं पाणी पिऊन माझी तहानभूक नाहींशी होते.”

“कांहीं तरी बोलतेस. गंगेवरून आलीस की दुप्पट खातेस. पाण्यांत डुंबून भूक मरते वाटतं ? बरं, चल; तूं कांही ऐकायची नाहीस.”

त्या दिवशी भीमेच्या पाण्यांत डुंबता डुंबतां संध्या जणूं देहभान विसरली. तिकडे भागीरथीकाकू स्तोत्रें म्हणत होती, अभंग म्हणत होती. संध्येलाहि गाण्याची स्फूर्ति आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel