प्रवेश आठवा
(पांडवाची झोंपडी, पांडबा बसला आहे व राघू टकळीवर सूत काढीत आहे.)

पांडबा -  राघू, फार वेळ असा बसूं नकोस. श्रम करूं नकोस पोरा ! नाहींतर फिरून पडायचास आजारी !

राघू -  नाहीं ! बाबा, मला हें दुधाच्या घारेवाणी पांढरंशुभ्र सूत काढायला लयी आवडतं. काल मी त्या मुलांच्या खोलीत गेलों. ते मला जवळ बसवून घेतात, सूत काढायला शिकवितात. ( नारायण येतो.)

पांडबा -  या बसा. राघू, त्यांच्या पायां पड. ( राघू पाया पडतो.)

नारायण -  पांडबा, तुमचा राघू आतां बरा झाला नाहीं का ! अजून जरा अशक्त आहे. सुधारेल, देवाजीनं खैर केली, रामरायानं कृपा केली !

पांडोबा -  आणि आपले उपकार झाले ! आपण माझ्या लेंकरासाठीं रातदिन खटपट केली, म्हणून तर हा सोन्याचा दिवस उजाडला.

नारायण -  माझे कसले श्रम ? आयुष्याची दोरी बळकट असली म्हणजे सर्व कांहीं मंगलच होतं. ' देव तारी, त्या कोण मारी ? ' काय राघू, काय करतो आहेस ?

राघू -  सूत काढतों आहें, महात्माजींचे आवडतं कार्य करतों ! स्वतंत्र चरखा असता तर मी त्याच्या सदैव भजनीं लागलों असतों.

नारायण - पांडबा, प्राचीन काळापासून महाराचा धंदा विणकामाचा आहे. मद्रासच्या बाजूचे अस्पृश्य मोठमोठे साधु व कवि झाले; पण त्यांचा धंदा विणकामाचाच असे. पांडबा, सूत काढावं, कापड विणावं, आणि पोटभर मीठभाकरी खावी, साधी व स्वच्छ राहणी ठेवावी; हीच ईश्वरी देणगी समजावी. अशी राहणी स्पृश्यांच्या जीवनालाहि लाजवील. मी देईन राघूला चरखा आणून.

पांडबा - पण तुम्ही आतां पैसे कुठून आणणार ?

राघू -  मला त्या खोलींतील विद्यार्थी देणार आहेत चरखा.

नारायण -  मग छान झालं. सारे तरूण या ' शिवूं नको ' च्या जुन्या रूढी तोडून असेंच बाहेर पडले पाहिजेत. राघू, तूं पिंजणहि शीक बरं का ? मी रात्रीची शाळा काढणार आहें तुमच्यासाठीं.

राघू -  मग मी येईन शिकायला. पण शाळेला जागा ?

नारायण -  त्या झाडाखाली !

राघू -  तुमचं घर आहेना मोठं ?

पांडबा -  नारायणराव, आपल्याला वडिलानीं घरांतून जायला सांगितलं हें खरं का ?

नारायण -  हो, असं झालं आहें खरं !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel