।।तीन।।

बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्त्रष्टेही इतर सामान्य जनांप्रमाणे स्थलकालनिबद्ध असतात. सभोवतींच्या आचारविचारांतूनच त्यांच्या कल्पनाही रंगरुप घेत असतात. त्यांच्या वर्तनाची त-हा आसमंतातल्या परिस्थितीतूनच जन्मलेली असते. अलौकिक बुद्धीचे महात्मे आपापल्या काळातील विचारांत नवीन मौलिक भर घालतात यात शंका नाही. परंतु स्वत:च्या काळाच्या अतीत त्यांनाही जाणे शक्य नसते व ते जातही नाहीत. समकालीन लोकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देतात. ती उत्तरेही, परंपरागत वचने व उत्तरे जी असतात, त्यांना फारशी सोडून नसतात. कधी कधी असे वाटते, की त्यांनी दिलेली उत्तरे नवीन होती. परंतु असे करताना, त्या सत्याकडे आपण ओढले जात आहोत असे त्यांना वाटे, त्या गहन गंभीर सत्यांना प्रकट करीत असता परंपरेने आलेलीच अपुरी भोषा ते वापरतात. त्या संज्ञा व कल्पना ते वापरतात. स्वत:च्या काळाच्या पलीकडे जाण्याची इच्छा असूनही ते स्वत:च्या काळाचेच प्रतिनिधी राहतात. विचार हा कधीही असंबद्ध उड्या मारीत जात नाही. जुन्या विचारांतच नवीन अर्थ दाखवून बुद्धी नवीन कल्पनांकडे जात असते. परंपरा न तोडता बुद्धी पुढे जात असते. ज्यांना ऐतिहासिक दृष्टी नाही अशा टीकाकारांच्या टीकेपासून बुद्धांनाही त्रास सहन करावा लागला आहे. ऐतिहासिक दृष्टी नसल्यामुळे बुद्धांची स्तुतीही केली गेली, निंदाही केली गेली. ऐकोणिसाव्या शतकात विज्ञान व नवज्ञान यांच्या वाढीमुळे युरोपभर संशयवादाची प्रचंड लाट उसळली. आणि या वेळेसच पाश्चिमात्यांना बुद्धधर्म वाढत्या प्रमाणात ज्ञात होऊ लागला. युरोपात या वेळेस प्रत्यक्षवाद, अज्ञेयवाद, नास्तिकवाद, नैतिक पायावर उभारलेला मानवतावाद, इत्यादी वादांना वाढता पाठिंबा मिळत होता. संशयवादी व अश्रद्धावादी वाङमयात बुद्धांचे नाव आदराने उच्चारलेले अनेकदा दिसून येते. नैतिक पायावर मानवतावादाची उभारणी करणारेही म्हणू लागले, की आमच्या विचारसरणीचा पहिला मोठा पुरस्कर्ता बुद्ध होय. मानवाचे सुख, मानवाची प्रतिष्ठा, सर्व मानवांचे मानसिक ऐक्य, यांचा पहिला पुरस्कर्ता बुद्ध असे हे सांगतात. मनुष्याला सत्य ज्ञान होणे शक्य नाही असे म्हणणारे, आणि दृश्य जगापलीकडे जाणण्यासारखी अशी सत्यता नाहीच मुळी असे म्हणणारे, दोघेही आपापल्या मंडनार्थ बुद्धांची साक्ष काढतात. बुद्धिप्रधान अज्ञेयवादी, जे अस्पष्ट अशा इंद्रियातीत ज्ञानाचा जणू खेळ करू बघतात, तेही बुद्धांचेच उदाहरण पुढे मांडीत  असतात, सामाजिक आदर्शवादी, नैतिक गूढवादी, बुद्धिप्रधान भविष्यवादी सारे बुद्धांच्या शिकवणीकडे आकृष्ट होतात व त्यांच्या शिकवणीचा स्वत:च्या समर्थनासाठी उपयोग करतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel