आता रमाबाईला कसलीही वाण पडत नसे. वस्तूची इच्छा होण्याचा अवकाश की वस्तू आपली हजर. त्या दागदागिने घालून देवळात जात. मुलेबाळे सजवीत नटवीत. घरात कामाला आता गडीमाणसे ठेवण्यात आली. रमाबाई सुखी झाली. लोक म्हणत, 'त्रिंबकभटला कोणता देव पावला काही कळत नाही. परीस सापडला असावा, चिंतामणी मिळाला असावा का कल्पवृक्षाची कृपा झाली?'

त्रिंबकभटजीकडे आता अडडा जमे. तेथे पानसुपारीचे तबक भरलेले असे. सुंदर तपकीर असे. गाणेबजावणेही चाले. रमाबाईचे घर नेहमी गजबजलेले असे.

एके दिवशी शेजारचे लखूभटजी म्हणाले, 'त्रिंबकभटजी, तुम्हाला आता त्रिंबकराव म्हटले पाहिजे. तुम्ही आता भिक्षुकी करीत नाही. करण्याची जरूरीही नाही. तुम्ही आता गृहस्थ बनलेत. 'परंतु ते भूत म्हणाले, 'आपले पूर्वीपासून नाव चालत आले तेच खरे. पैसा दोन दिवसाचा. आज आहे उद्या नाही. मला भटजी नावाचा अपमान नाही वाटत, त्रिंबकभट असे म्हणवून घेण्यातच मला अभिमान वाटतो.'

असे दिवस चालले. कित्येक वर्षे गेली. ते भूत त्रिंबकभटजी म्हणून वावरत होते. नमीचे लग्न झाले. चिंतूची मुंज झाली. घरात आणखीही दोन मुलांची भर पडली. त्रिंबकभटाचा वाढता संसार आणखी वाढत होता. भरल्या गोकुळासारखे घर शोभत होते.

आणि तो खरा त्रिंबकभट? कोठे गेला तो, काय झाले त्याचे? तो पुष्कळ दूरदूर गेला. त्याने अनेक उद्योग केले. दहाबारा वर्षे त्याने अपार कष्ट काढले. हळूहळू त्याने जवळ चांगली पुंजी जमविली. आता घरी जावे, मुलेबाळे मोठी झाली असतील त्यांना भेटावे असे त्याच्या मनात आले. त्याने बायकोसाठी सुंदर लुगडी खरेदी केली. मुलांसाठी नाना प्रकारच्या जिनसा त्याने विकत घेतल्या आणि तो निघाला. मनात मनोराज्ये करीत जात होता. आता आयुष्याची शेवटची वर्षे तरी सुखाने जातील, बायको बोलणार नाही, अपमान करणार नाही. सेवाशुश्रूषा करील वगैरे विचार त्याच्या मनात चालले होते.

किती तरी वर्षांनी त्रिंबकभट आपल्या घरी आला. अंगणातून तो ओसरीवर आला; परंतु ओसरीवर ते भूत होते. ते भूत विचारू लागले, 'कोण पाहिजे तुम्हाला? आत कोठे चाललेत?'

त्रिंबकभटजी म्हणाला, 'तुम्ही कोण? मी माझ्या घरी आलो आहे.'

भूत म्हणाले, 'अहो मी त्रिंबकभट. या माझ्या घरात आज पन्नास वर्षे मी नांदतो आहे. मुलेबाळे झाली. संसार झाला. तुम्हाला भ्रम तर नाही झाला?'

दमूनभागून आलेला, आशेने आलेला त्रिंबकभट संतापला. तो शिव्या देऊ लागला. रमाबाई बाहेर आली. मुलेबाळे बाहेर आली. गडीमाणसे धावून आली. शेजारीपाजारी आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel